Tuesday, February 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५१


माझी कथा तिअरला सांगून झाल्यावर तिने माझ्या शहाणपणाला दाद दिली. मी तिच्याबरोबर वाटाणे सोलण्यात गुंतल्यामुळे थोडा वेळ आम्ही गप्प होतो. तिचे कान नेहमी स्वयंपाकघराकडे असल्यामुळे तिला तिच्या चिनी स्वयंपाक्याने केलेली काहीतरी चूक केवळ आवाजावरून कळली. तिने बसल्या जागेवरून त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. स्वत:चा बचाव करण्यात तो चिंक मागे नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून सरबत्ती सुरू झाली. त्यांनी फ्रेंच सोडून स्थानिक भाषेत बोलायला सुरवात केली. त्या भाषेचे मला फार तर अर्धा एक डझन शब्द येत असतील. त्यांचं भांडण ऐकून मला आता जगबुडी होईल की काय असं वाटायला लागलं. पण भांडण संपल्यावर तिअरने त्याला एक सिगारेट दिली. ती दोघं शांतपणे धुम्रपान करू लागले आणि तात्पुरती का होईना शांतता प्रस्थापित झाली.
‘‘त्याला बायको मी बघून दिली हे तुम्हाला माहित आहे का?’’ तिअर अचानक हसत हसत म्हणाली.
‘‘कोणाला, या स्वयंपाक्याला?’’
‘‘स्ट्रिकलँडला.’’
‘‘त्याला अगोदरच एक बायको होती.’’
‘‘तो सुद्धा असंच म्हणाला. पण मी त्याला सांगितलं की ती तर इंग्लंडमध्ये आहे. आणि इंग्लंड इथून केवढं लांब आहे, जगाच्या दुसऱ्या टोकालाच म्हणाना.’’
‘‘खरं आहे तुम्ही म्हणता ते.’’
तो पपीएतला दर दोन-तीन महिन्यांनी येत असे. पैसे, रंग किंवा तंबाखू वगैरे कशाची गरज पडली की. मग तो एखाद्या कुत्र्यासारखा इकडे तिकडे भटकायचा. मला त्याचं फार वाईट वाटायचं. माझ्याकडे त्यावेळी आटा नावाची मुलगी कामाला होती. माझी लांबची नातेवाईकच म्हणा ना. तिला आई वडिल कोणी नव्हतं. ती माझ्याकडेच राहायची. स्ट्रिकलँड जेवायला अधूनमधून माझ्याकडे यायचा. कधी तरी इथल्या मुलांबरोबर बुद्धीबळाचा डाव मांडून बसायचा. मी तिला विचारलं की तुला तो आवडला का? तर ती हो म्हणाली. तुम्हाला माहित आहे. या मुली गोऱ्या माणसाबरोबर राहायला एका पायावर तयार असतात.
‘‘ती कोण स्थानिक मुलगी होती का?’’
‘‘होय. शुद्ध स्थानिक होती. तिच्यात थेंबभर सुद्धा गोरं रक्त नव्हतं. तिच्याशी बोलल्यानंतर मी तिला स्ट्रिकलँडकडे पाठवली. मी त्याला म्हणाले: आता तुमची एका जागी स्थिर होण्याची वेळ आली आहे. तुमच्या वयाच्या माणसानं त्या गल्लीतल्या मुलींकडे जाणं बरोबर नाही. त्या चांगल्या मुली नाहीत. त्यांच्याकडे जाऊन तुमचं भलं होणार नाही. तुमच्या खिशात पैसेही नसतात. कोणत्याच नोकरीवर तुम्ही दोन तीन महिन्यांपेक्षा जास्त टिकत नाही. असं असताना तुम्हाला कोण नोकरी देणार. तुम्हाला जंगलात जाऊन स्थानिक लोकांबरोबर राहयला आवडतं आणि तुम्ही गोरे आहात म्हणून तेसुद्धा तुम्हाला सांभाळून घेतात. पण गोऱ्या माणसांना हे शोभत नाही. आता माझं ऐका.’’
तिअर बोलताना इंग्लीश मध्ये फ्रेंचचं मिश्रण करत होती कारण तिला दोन्ही भाषा चांगल्या येत होत्या. ती बोलताना गाणं गुणगुणल्या सारखी बोलायची. ते ऐकायला एवढं काही वाईट लागत नव्हतं. जर पक्ष्याला इंग्लीश बोलता आलं असतं तर ते कानाला असंच वाटलं असतं.
‘‘आटाशी लग्न करण्याविषयी तुमचं काय मत आहे? ती चांगली मुलगी आहे. फक्त सतरा वर्षांची. ती या इतर मुलींसारखी चालू नाही. फक्त कॅप्टन किंवा फार तर फर्स्ट मेट. स्थानिक लोकांबरोबर तर कधीच नाही. एल से रीस्पेक्त वोई, तू हे बघ, तीही स्वत:चा आब राखून असते. ओआहु वरचा पर्सर मला गेल्या आठवड्यात भेटला होता. तो म्हणत होता की आटापेक्षा चांगली मुलगी अख्या बेटावर शोधून मिळणार नाही. तिलासुद्धा आता घर संसार बघायला हवा. कॅप्टन आणि फर्स्ट मेटसुद्धा नेहमी मिळत नाहीत. थोड्या दिवसांनी ते कंटाळतात. मी माझ्या मुलींना कायमची ठेऊन घेत नाही. तिच्या मालकीची तारावोमध्ये जमिन आहे. खोबऱ्याच्या उत्पन्नावर तुमच्या दोघांचं चांगलं चालेल. तिचं घर आहे. तिथे तुम्हाला चित्र काढायला भरपूर वेळ मिळेल. तुमचं काय म्हणणं आहे.’’
तिअर श्वास घ्यायला थांबली.
‘‘मी असं म्हणाले तेव्हा त्याने मला त्याच्या इंग्लंडमधील बायकोविषयी सांगितलं. मी त्याला म्हणाले, ‘अरे बाबा, सगळ्यांच्या बायका जगाच्या पाठीवर कुठे नी कुठे असतात. म्हणूनच ते ताहितीला येतात. आटा समजदार मुलगी आहे. तिला कुठे मेयरला बोलवून चर्चमध्ये समारंभ करायचा आहे. ती प्रोटेस्टंट आहे आणि तुम्हाला माहित आहे की ते या गोष्टींकडे कॅथॉलिकांएवढ्या सोवळेपणाने बघत नाहीत.”
‘‘नंतर तो म्हणाला: आटाचं काय म्हणणं आहे. मला वाटतं ती तुमच्यावर बीग्वाँ फिदा आहे. तुमचा होकार असेल तर तीही तयार होईल. मी तिला बोलावू का?’ तो त्याच्या स्वभावाप्रमाणे गालातल्या गालात हसला. मी तिला बोलावून घेतलं. मी काय बोलत आहे हे तिला चांगलं माहित होतं, पण ती माझ्या ब्लाऊजला इस्त्री करण्यात गुंग आहे असं दाखवत होती. माझं तिच्यावर बारीक नजरेने लक्ष होतं. आमचं बोलणं ती कान टवकारून ऐकत होती. माझी हाक ऐकताच ती आली. ती किंचित लाजली. स्ट्रिकलँडने तिच्याकडे न बोलता पाहिलं.’’
‘‘ती दिसायला कशी होती? सुंदर?’’
‘‘एवढी वाईट नव्हती. तुम्ही तिचं पेंटींग पाहिलंच असेल. त्याने तिची अनेक पेंटींग केली. कधी परेओ घालून तर कधी काहीच कपडे न घालता. तसं तिला सुंदरच म्हटलं पाहिजे. शिवाय तिचा स्वैंपाकही चांगला होता. मी स्वत:च तिला शिकवलं होतं. मी पाहिलं स्ट्रिकलँड विचारात पडला होता. म्हणून मी म्हटलं: मी तिला चांगला पगार द्यायचे. शिवाय तिला कॅप्टन आणि फर्स्ट मेट मंडळींकडूनही अधेमधे थोडेफार पैसे मिळत. तिच्याकडे काही शें फ्रँक साठलेले आहेत.
‘‘त्याने त्याची लाल दाढी खाजवली आणि हसला.
‘‘ ‘आटा, मी तुला नवरा म्हणून चालेल का?’’ तो म्हणाला.
‘‘ती काही बोलली नाही, नुसती खुदकन हसली.
‘‘ ‘मी तुम्हाला सांगते, ती तुमच्यावर बीग्वाँ फिदा आहे.मी म्हणाले.
‘‘ ‘ मी तुला मारेन, चालेल.तो तिच्याकडे बघत म्हणाला.
‘‘ ‘त्याच्याशिवाय तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे कसं कळणार?’ ’’
तिअरने तिचं वर्णन थांबवलं आणि माझ्याकडे विचारमग्न चेहेऱ्याने बघू लागली. ‘‘माझा पहिला नवरा कॅप्टन जॉन्सन नेहमी मला मारायचा. तो दिसायला एकदम देखणा पुरूष होता. चांगला सहा फूट तीन इंच उंच होता. कधी कधी एवढा मारायचा की मी काळी निळी पडायची. पण तो गेला तेव्हा मी रडरड रडले. जॉर्ज रेनी बरोबर लग्न करेपर्यंत मी काय गमावलं आहे ते मला कळलं नव्हतं. माणूस कसा असतो ते जोपर्यंत तुम्ही त्याच्या बरोबर राहत नाही तो पर्यंत तुम्हाला कळत नाही. जॉर्ज रेनीच्या बाबतीत मी जेवढी फसले तेवढी मी दुसऱ्या कोणाबाबत फसले नाही. तो जवळपास कॅप्टन जॉन्सन एवढाच उंच होता आणि तेवढाच दणकट. पण ते वरवरचं होतं. तो कधीच दारू पीत नसे. त्याने माझ्यावर कधीच हात उगारला नाही. तो कदाचित पूर्वी मिशनरी असावा. बंदरात लागणाऱ्या प्रत्येक बोटीवरच्या अधिकाऱ्याबरोबर मी असायची. पण जॉर्जच्या नजरेला काहीच पडायचं नाही. मला त्याचा एवढा कंटाळा आला की शेवटी मी घटस्फोट घेऊन मोकळी झाले. अशा नवऱ्याचा उपयोग काय? अशा पुरूषांबरोबर आयुष्य काढणं किती भयंकर असतं.’’
पुरूष नेहमी फसवतातच असं बोलून मी तिला सहानुभूती दाखवली आणि नंतर स्ट्रिकलँडची गोष्ट पुढे चालू ठेवायला सांगितली.
‘‘ ‘आपल्याला तशी घाई नाही. तुमचा वेळ घ्या आणि मला सांगा. आटा शेजारच्या खोलीत राहते. तिच्या बरोबर महिनाभर रहा. बघा तुमचं जमत का ते. तुमचं जेवण इथेच घ्या. जर तुम्हाला तिच्या बरोबर लग्न करावसं वाटलं तर तिच्या मालकीच्या शेतात जा आणि तिथेच घर संसार चालू करा.
‘‘त्याने त्याला मान्यता दिली. आटा माझ्याकडे काम करत होती आणि मी त्याच्या खाण्या पिण्याची काळजी घेत होते. त्याला आवडणारे एक दोन पदार्थ मी तिला करायला शिकवले. त्या काळात त्याने फारशी चित्र काढली नाहीत. तो डोंगरात फिरायला जायचा, झऱ्यामध्ये डुंबायचा, तळ्याच्या काठी जाऊन बसायचा. संध्याकाळी किनाऱ्यावर जाऊन मुरिया बेटाकडे बघत बसायचा. कधी कधी तो प्रवाळाच्या खडकांवर मासे पकडायला जायचा. तो अगदी शांत आणि सुस्वभावी होता. रात्री जेवण झाल्यावर तो आटा बरोबर तिच्या खोलीवर जायचा. मी पाहिलं तो जंगलात जाण्यासाठी तळमळत होता. महिना संपायला आल्यावर त्याने काय ठरवलं आहे ते विचारलं. तो म्हणाला जर आटाची तयारी असेल तर त्याची हरकत नाही. मग मी त्याला लग्नाची मेजवानी दिली. सगळं जेवण मी माझ्या हाताने बनवलं. वाटाण्याचं सूप, लॉबस्टर अ ल पोर्तूगीज, करी आणि खोबऱ्याचं सॅलड. तुम्ही कधी खाल्लं आहे का? नसेल तर जाण्यापूर्वी तुम्हाला एकदा खिलवलं पाहिजे. नंतर मी आईसक्रीम दिलं. प्यायला हवी तेवढी शँपेन होती. पाठोपाठ लिक्यूर्स. मी सगळं थाटात करायचं ठरवलं होतं. नंतर ड्रॉर्इंग रूममध्ये जाऊन आम्ही नृत्य केलं. तेव्हा मी एवढी जाड नव्हते. मला नाचायला खूप आवडतं.’’
हॉटेल डी ला फ्लाऊ मधील ड्रॉर्इंग रूम अगदी छोटाशी होती. रूममध्ये एक गावठी पियानो होता. वेल्वेटने मढवलेले महॉगनी फर्नीचर भिंतीलगत नीट लावलेले होते. एका गोल टेबलावर फोटोंचे आल्बम ठेवलेले होते. भिंतीवर तिअर आणि तिचा पहिला नवरा जॉन्सनचा एक फोटो लावलेला होता. आता तिअरचं वय झालं असलं आणि ती खूप जाड झाली असली तरी कधी कधी ड्रॉर्इंग रूम मधलं जुनं ब्रुसेल्स कार्पेट अंथरलं जातं, तिअर तिच्या मोजक्या मित्रमैत्रीणींना बोलावते आणि नाचते. संगीतासाठी ग्रामोफोनवर खरखर आवाज करणारी रेकॉर्ड लावली जाते. व्हरांड्यामध्ये तिअरने लावलेल्या सेंटचा सुगंध दरवळत होता. रात्रीच्या निरभ्र आकाशात त्रिशंकूचा तारा चमकत होता.
गतकाळच्या जुन्या आठवणींनी हरकून जाऊन तिअर स्वत:शीच हसली.
‘‘त्या रात्री आम्ही तीन वाजे पर्यंत जागे होतो. झोपायला गेलो तेव्हा कोणी शुद्धीवर होतं असं मला वाटत नाही. मी त्यांना जो पर्यंत रस्ता जाईल तो पर्यंत माझी गाडी घेऊन जायला सांगितलं. पुढे त्यांना पायीच जायचं होतं. आटाचं शेत डोंगरांच्या दुबोळक्यात होतं. ते भल्या पहाटेच निघाले. मी त्यांच्या सोबतीला पाठवलेला मुलगा दुसऱ्या दिवसापर्यंत परत आला नाही.’’
‘‘अशी ही स्ट्रिकलँडच्या लग्नाची गोष्ट.’’

Artist: Paul Gauguin
Title:  The Delightful Land, Date 1892
Medium: oil on canvas, Dimensions: 91 × 72 cm (35.8 × 28.3 in)
Current location: Ohara Museum of Art, Source: wikidata:Q28797047
Sothern Cross
Stars visible only from southern hemisphere used for navigation like North Star.




1 comment: