Thursday, February 8, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३९

ब्लांशचे अंत्यविधी आटोपल्यानंतर मी त्याला त्याच्या घराजवळ सोडलं होतं. तो जड अंत:करणाने घरात शिरला. आत्मपीडेच्या अंत:प्रेरणेने त्याच्या नकळत त्याला स्टुडियोत ओढून आणलं होतं. पुढे होणाऱ्या यातना त्याला दिसत होत्या. जिन्याच्या पायऱ्या कशाबशा चढत तो वर आला. त्याचे पाय लटपटत होते. दरवाजा उघडून आत पाऊल टाकण्याचा धीर यावा म्हणून त्याने बराच वेळ वाट पाहिली. त्याच्या पोटात ढवळून आलं. जिन्याच्या पायऱ्या उतरून माझ्या घरी जावं असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं. स्टुडियोत कोणीतरी आहे असा त्याला भास झाला. कित्येक वेळा जिना चढून झाल्यानंतर दम खाण्यासठी त्याला मिनीट दोन मिनीट थांबावं असं वाटायचं, पण ब्लांशला भेटायला अधीर झाल्यामुळे लगेच दरवाजा उघडून आत शिरायचा, याची त्याला आठवण झाली. तासभर जरी तो बाहेर असला तरी त्याला ते युगानुयुगासारखे वाटत. ती गेली आहे हे सत्य तो क्षणभर विसरला. जे झालं ते एक दु:स्वप्न असावं, भयंकर दु:स्वप्न. जेव्हा तो दरवाजा उघडत असे तेव्हा त्याला ब्लांश किचनमध्ये काही तरी काम करत असलेली दिसायची, शेदाँच्या बेनेडिसिते या चित्रातल्या बाईसारखी. त्याने खिशातून किल्ली काढली आणि दरवाजा उघडून आत गेला.
अपार्टमेंट रिकामं असल्यासारखं वाटत नव्हतं. त्याच्या बायकोचा टापटीपीचा गुण त्याला अतिशय आवडायचा. तो टापटीपीच्या वातावरणात वाढला होता. त्याला व्यवस्थितपणाची आवड होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी जागच्या जागी पाहून त्याला बरं वाटलं. झोपण्याची खोली बघून ती नुकतीच बाहेर गेली आहे असं वाटत होतं. प्रसाधनाच्या टेबलावर ब्रश, कंगवे वगैरे गोष्टी लावून ठेवलेल्या होत्या. तिला स्टुडियोतून हॉस्पिटलमध्ये नेल्यावर कोणी तरी पलंगावरच्या चादरीच्या चुण्या नीट केल्या होत्या. तिचा नाईटड्रेस घडी करून ठेवलेला होता. हे सगळं बघून तिला स्टुडियोत परत यायला मिळणार नाही यावर कोणाचा विश्वास बसला असता.
तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. इथे सुद्धा सगळं जागच्या जागी होतं. स्ट्रिकलँडशी भांडण झालं त्या रात्रीची जेवणाची भांडी धुवून रॅकवर व्यवस्थित लावून ठेवलेली होती. काटे, चमचे, सुऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. उरलेलं चीज झाकून ठेवलं होतं. पत्र्याच्या डब्यात पाव होता. ती रोजच्या रोज बाजारात जाऊन जे आवश्यक असेल फक्त तेच घेऊन यायची. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी फारसं उरलेलं नसायचं. स्ट्रिकलँड भांडण झाल्यानंतर ताबडतोब निघून गेला होता हे पोलीसांच्या चौकशीत समजलेलं होतं. भांडण झाल्यावर ब्लांशने सगळं धुवून आवराआवर केली असली पाहिजे हे लक्षात आल्यावर त्याच्या अंगावर काटा आला. आत्महत्या करतानासुद्धा तिला तिच्या व्यवस्थितपणाचा विसर पडला नव्हता. आत्मनाश करण्याचा निर्णय घेतल्यावरसुद्धा तिला असलेलं आत्मभान भयंकर विलक्षण होतं. अचानक आलेल्या दु:खाच्या उमाळ्याने त्याला भोवळ आली. शयनगृहात जाऊन त्याने बिछान्यावर अंग झोकून दिलं.
‘‘ब्लांश, ब्लांश, ब्लांश.’’ तो कण्हत कण्हत तिला हाका मारत होता.
तिला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याच्या विचाराने झोप लागणं शक्य नव्हतं. त्याच्या नजरेसमोर दृश्य तरळलं. ती स्वयंपाकघरात प्लेट, ग्लास, काटे-चमचे धुत आहे, सिंक घासत आहे, पोतेरं वाळत घालत आहे ... अजूनही ते चिंध्या झालेलं फडकं तिथेच वाळत घातलेलं दिसत होतं ... नंतर तिने एकवार चौफेर नजर फिरवून सगळी साफसफाई झाली आहे याची खात्री करून घेतली. तिने एप्रन काढून दरवाज्याच्या मागच्या खुंटीला लावला, ऑक्झॅलीक अ‍ॅसिडची बाटली घेतली आणि ती शयनगृहात गेली.
दु:खातिरेकाने तो उठला आणि स्टुडियोत गेला. उजेड येण्यासाठी त्याने खिडकीचे पडदे खर्कन बाजूला केले आणि चौफेर नजर फिरवली. काहीही बदललेलं नव्हतं. स्ट्रिकलँडला आपल्या भोवती काय आहे आणि काय नाही याची कसलीच फिकीर नव्हती. स्टुडियो सजावटीत स्ट्रोव्हची कलात्मक दृष्टी दिसून येत होती. भिंतीवर ब्रोकेडचे तुकडे लावलेले होते, रेशमी चादरीने झाकलेला पॉलीश उडालेला पण सुबक पियानो एका कोपऱ्यात होता, दुसऱ्या कोपऱ्यात व्हिनस डी मिलो आणि त्याच्या समोर व्हिनस डी मेडिसीच्या शिल्पाच्या नक्कल केलेल्या फ्रेंच प्लास्टरमधल्या प्रति होत्या. कोरीव काम केलेली इटालियन कॅबिनेट आणि दोन तीन उठाव-शिल्प ठेवलेली होती. व्हेलास्केजच्या इनोसन्ट एक्सची या पेंटींगची रोममध्ये असताना स्वत: स्ट्रोव्हने केलेली एक नक्कल जाड-जूड सोनेरी फ्रेम करून भिंतीवर लावलेली होती. स्ट्रोव्ह स्वत:च्या सगळ्या चित्रांसाठी अशा कोरीव नक्षीकाम केलेल्या लाकडी फ्रेम वापरत असे. स्ट्रोव्हला स्वत:च्या रूचीचा अभिमान होता. स्टुडियोतील वातावरण रुमानी असलं पाहिजे असा त्याचा कटाक्ष असायचा. ते दृष्य बघून आता त्याला काळजात कट्यार खुपसल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याला भिंतीकडे पाठ करून ठेवलेला एक कॅनव्हास दिसला. तो नेहमी जे कॅनव्हास करायचा त्यापेक्षा हा खूपच मोठा दिसत होता. त्याने जवळ जाऊन पाहिलं. ते एक न्युड होतं. त्याचं हृदय धडधडू लागलं. ते स्ट्रिकलँडचं चित्र होतं. त्याने लाथ मारून ते भिंतीकडे ढकललं. त्यामुळे ते उताणं पडलं. कुतुहलाने त्याने ते इझलवर लावलं आणि मागे जाऊन पाहू लागला.
त्याने एक आवंढा गिळला. ते सोफ्यावर पहुडलेल्या एका नग्न स्त्रीचं चित्र होतं. एक हात डोक्या खाली ठेवला आहे, दुसऱ्याने हाताने योनी झाकली आहे, एका पायाचा गुडघा किंचीतवर उचलेला आहे. न्युड पेंटींगची ती एक अभिजात पोज होती. स्ट्रोव्ह चक्रावला. ती ब्लांश होती. दु:ख, मत्सर आणि संतापाने त्याचं डोकं फिरलं. तो गुरगुरला. त्याने मुठी आवळल्या आणि अदृश्य शत्रूवर हवेत गुद्दे मारले. त्याला मोठ्या आवेशाने आरोळी ठोकायची होती पण तसं करताना त्याचा आवाज चिरकला. त्याचा स्वत:वरचा ताबा सुटला. हे सहन करण्याच्या पलीकडचं होतं. ही हद्द झाली. त्या चित्राच्या फाडून चिंध्या करण्यासाठी काही मिळतं का म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिलं. एका मिनिटांत ते नष्ट करायला हवं. त्याच्या हाताला काही लागेना. शेवटी त्याला एक मोठा पेंट स्क्रॅपर सापडला. तो पेंट स्क्रॅपर एखाद्या खंजिरासारखा हातात घेऊन युध्दोन्मादात मारतात तशी मोठी आरोळी मारत त्याने कॅनव्हासवर उडी घेतली.
ही गोष्ट सांगताना स्ट्रोव्हच्या अंगात संचारलं होतं. त्याने टेबलावरचा डिनर नाईफ हातात घेऊन परजला. वार करण्यासाठी हात उचलला आणि मुठीतून सुरी सोडून दिली. सुरी जमिनीवर पडून खण्कन आवाज झाला. माझ्याकडे बघून त्याने विकटहास्य केलं. पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेना.
‘‘बोल. काय सांगणार आहेस ते एकदाचं सांगून मोकळा हो.’’
‘‘मला काय झालं ते कळेना. मी त्या कॅनव्हासवर एक वार करून तो फाडणार होतो. वार करण्यासाठी मी हात उचलला होता. पण अचानक मला ते दिसलं.’’
‘‘काय दिसलं?’’
‘‘ते चित्र. ती एक दिव्य कलाकृती होती. मला त्याला स्पर्श करवेना. मला भिती वाटली.’’
स्ट्रोव्ह पुन्हा गप्प झाला. तो आ वासून त्याच्या टपोऱ्या निळ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघायला लागला.
‘‘ती एक महान कलाकृती होती. माझ्या छातीत धस्स झालं. एक भयंकर गुन्हा माझ्या हातून जवळ जवळ होणार होता. मी जवळ जाऊन पाहिलं. माझा पाय खाली पडलेल्या स्क्रॅपरला लागला. माझ्या अंगावर शहारे आले.’’
त्याला काय वाटलं असावं त्याची मला थोडी कल्पना आली. मी दुसऱ्या दुनियेत गेलो. तेथील मूल्यव्यवस्था अगदी वेगळीच होती. मला तेथे एखाद्या परक्या माणसासारखं वाटायला लागलं. स्ट्रोव्ह मला त्या चित्राविषयी सांगत होता पण तो जे बोलत होता ते अगदी असंबद्ध होतं आणि त्याचा अर्थ कळण्यासाठी मला विचार करावा लागत होता. स्ट्रिकलँडला ज्या बंधनांनी आजपर्यंत जखडून ठेवलं होतं त्या बंधनातून तो मुक्त झाला होता. त्याच्या प्रतिभेचे दिव्य चक्षू उघडले होते. त्याची रेषा साधी, जोरकस आणि नेमकी होती. त्या रेषेवर त्याचा स्व:तचा संपूर्ण ताबा आणि ठसा होता. पहुडलेल्या नग्न देहाचं वजन रेषेत आलं होतं. त्याचं रंगकाम मनस्वी होतं. नग्न देहाच्या सौंदर्यातील अलैकिकत्वाला बाधा न आणता वासनेची अनुभूती येत होती. चित्राची गूढ रचना दर्शकाच्या कल्पनाशक्तीला खाद्य पुरवणारी होती. चित्राच्या अवकाशातील प्रकाशाने उजळलेल्या मोकळ्या जागा नव्या रहस्यांचा शोध घेत होत्या.
माझं बोलणं अलंकारीक वाटायला कारण स्ट्रोव्ह आहे. कारण त्याने त्याच भाषेत मला वर्णन करून सांगितलं. काव्याची निर्मिती भावनेच्या भरात होते हे आपल्याला माहित आहे. स्ट्रोव्हला असं पूर्वी कधीही वाटलं नव्हतं. ते शब्दात कसं पकडावं ते त्याला नीट कळत नव्हतं. अवर्णनीय गोष्ट शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल. पण एक गोष्ट त्याने मला स्पष्ट सांगितली. लोक सौंदर्याकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत, शब्दांची त्यांना जाण नसते, शब्दांचा वापर ते फार निष्काळजीपणे करतात, त्यामुळे त्या शब्दांचा अर्थ हरवून बसतो, एकच शब्द बऱ्याच गोष्टींसाठी वापरला जातो त्यामुळे त्या शब्दातून जे महत्वाचं तत्व व्यक्त करायचं असतं ते बाजूलाच राहतं आणि इतर असंबद्ध किरकोळ गोष्टी समोर येतात. उदाहरणार्थ कपडे सुंदर असतात, कुत्रा सुंदर असतो, चर्चमधील प्रवचनही सुंदर असतं. पण साक्षात सौंदर्य सामोरं आलं तर त्यांना ते ओळखताच येत नाही. त्यांच्यामध्ये जी काही थोडी फार संवेदनाशीलता असते तिची धार पोकळ वटवटीने बोथट झालेली असते. भोंदू साधू अध्यात्मिक शक्तीचा दावा करून लोकांना फसवतो तसं हे असतं. स्ट्रोव्ह जरी बावळट असला तरी तो सौंदर्याचा भोक्ता होता, त्याची तळमळ सच्ची होची, तो प्रामाणिक होता. त्याच्या लेखी सौंदर्यानुभूती म्हणजे दैवी अनुभव होता. सश्रद्ध माणसाच्या मनात जे स्थान देवाला असतं ते स्थान त्याच्या मनात सौंदर्याला होतं. म्हणूनच जेव्हा त्याला सौंदर्याचं साक्षात दर्शन झालं तेव्हा तो घाबरून गेला.
‘‘तू जेव्हा स्ट्रिकलँडला भेटलास तेव्हा तुमचं काय बोलणं झालं?’’
‘‘मी त्याला तू हॉलंडला येशील का असं विचारलं.’’
माझी वाचाच बसली. मी त्याच्याकडे वेड्यासारखा पाहू लागलो.
‘‘ब्लांश आम्हाला दोघांनाही आवडायची. माझ्या आईच्या घरात त्याच्यासाठी जागा करता आली असती. गावातल्या गरीब, सिधा-साध्या खेडूतांच्या संगतीत त्याचा जीव रमला असता. त्यांच्या सरळमार्गी जीवनक्रमातून त्याला काही तरी घेता येण्यासारखं होतं.’’
‘‘तो काय म्हणाला?’’
‘‘तो फक्त हसला. माझा प्रश्न त्याला मूर्खपणाचा वाटला असावा. तो म्हणाला त्याचा दुसरं काही तरी करण्याचा विचार आहे.’’
मला वाटलं की त्याने आणखी वेगळे शब्द वापरले असावेत.
‘‘ब्लांशचं चित्र त्याने मला दिलं.’’
स्ट्रिकलँडने असं का केलं याचं मला आश्चर्य वाटलं. पण मी काही बोललो नाही. थोडा वेळ आम्ही दोघंही गप्प होतो.
‘‘तू तुझ्या बाकीच्या सामानाचं काय केलंस?’’ मी शेवटी विचारलं.
‘‘मी एका ज्यू सावकाराला गाठलं. त्याने मला सगळ्या सामानाचे एक रकमी पैसे दिले. माझी चित्रं मी बरोबर घेऊन जाणार आहे. त्याशिवाय या जगात माझ्याकडे दुसरं काही नाही, फक्त एक कपड्यांची पेटी आणि थोडी फार पुस्तकं सोडली तर.’’
‘‘बरं आहे तू तुझ्या घरी परत चालला आहेस ते,’’ मी म्हणालो.
त्याला त्याचा सर्व भूतकाळ विसरायचा होता असं मला वाटलं. काळ जसा जाईल तसं त्याला वाटणारं दु:ख हलकं होत जाईल. मानवाला मिळालेल्या विस्मृतीच्या वरदानाने आयुष्याचा गाडा पुनश्च हाकण्याची शक्ती त्याला लवकरच मिळेल. तो तरूण होता. थोडी वर्ष गेली की आयुष्याच्या या दुर्दैवी कालखंडाकडे तो जेव्हा मागे वळून पाहिल तेव्हा त्याला फारसं वाईट वाटणार नाही. आज ना उद्या हॉलंडमधील एखाद्या प्रामाणिक मुलीशी त्याचं लग्न होईल. माझी खात्री होती की त्याचा संसार सुखी होईल. तिय्यम दर्जाची असंख्य फालतू चित्र रंगवत तो आपलं उर्वरित आयुष्य कंठेल या विचाराने मला मात्र मनातल्या मनात हसू आलं.

दुसऱ्या दिवशी मी त्याला अ‍ॅमस्टरडॅमला जाण्यासाठी निरोप दिला.


Artist: Jean-Baptiste Chadrin
Title: Benedecite, Date: circa 1791
Medium: oil on canvas, Source: Wikipedia


Artist: Diego Velázquez  (1599–1660), Title: Portrait of Innocent X, Date: circa 1650
Medium: oil on canvas, Dimensions: H: 141 cm (55.5 in). W: 119 cm (46.9 in),
Current location: Doria Pamphilj Gallery, Source: wikidata:Q1240092

1 comment:

  1. वाह , हेही प्रकरण फारच हृदयस्पर्शी आहे...
    👌👍💐

    ReplyDelete