Friday, February 16, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५६


आणखी दोन वर्ष गेली. कदाचित तीन असतील. ताहितीत दिवस कसे जातात ते कळतच नाही. मोजदाद ठेवायला कठीण जातं. पण एके दिवशी स्ट्रिकलँड अखेरच्या घटका मोजतोय असा निरोप आला. आटाने पपीएतला टपाल घेऊन येणाऱ्याला सरळ डॉक्टरांकडे निरोप द्यायला बजावून ठेवले होते. पण जेव्हा निरोप आला तेव्हा डॉक्टर बाहेर गेले होते. निरोप कळला तेव्हा खूप रात्र झाली होती, म्हणून डॉक्टर पहाटेच निघाले. तारावाओला पोचायला दुपार झाली होती. त्यांना सात किलोमीटर पुन्हा एकदा पायी तुडवत जायचं होतं पण ती त्यांच्या आयुष्यातील ती शेवटची पायपीट होती. रस्त्यात झाडोरा खूप वाढला होता. आता या पुढे बरीच वर्ष तरी या रस्त्यावरून कोणी जाण्याची शक्यता दिसत नव्हती. रस्ता अधिकच दुस्तर झाला होता. वाटेत वारंवर अडथळे येत होते. कधी ओढ्याच्या पाण्याला खेच, तर कधी वाटेत माजलेलं तण. कधीकधी काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत होता. वाट काढताना डोक्यावर लटकणाऱ्या मधमाशांच्या पोळ्यांचीही काळजी घ्यावी लागत होती. कसं ही असो, पण त्या अंतर्भागातील शांतता मोठी विलक्षण होती.
शेवटी ते मोडकळीला आलेलं घर आलं आणि त्यांनी एक निश्वास टाकला. इथेसुद्धा ती असह्य शांतता होती. एक लहान मुलगा उन्हात खेळत होता. त्यांची चाहूल लागल्यावर तो पळून लांब गेला. डॉ. कोत्राना संशय होता की झाडामागे लपून तो पहात असावा. त्या मुलाच्या लेखी अनोळखी माणूस म्हणजे शत्रू. दरवाजा सताड उघडा होता. त्यांनी हाक मारली पण कोणीच ओ दिली नाही. तो आत गेला आणि त्यांनी दार ठोठावलं. त्यांनी आत पाऊल टाकलं. जी दुर्गंधी येत होती त्याने त्यांच्या पोटात ढवळून आलं. त्यांनी नाकाला रूमाल लावला आणि धीर करून आत पाऊल टाकलं. आत अंधूक प्रकाश होता. बाहेरच्या लख्ख उन्हातून आल्यामुळे सुरूवातीला त्यांना काही दिसत नव्हतं. थोडा वेळाने सरावल्यानंतर त्यांना आपण कुठे आहोत तेच कळेना. एका अनोख्या विस्मयकारक विश्वात त्यांनी प्रवेश केला होता. प्रचंड वृक्षवेलींचे प्राचीन अरण्य आणि त्यात मुक्त विहार करणारे नग्न आदिवासी स्त्री पुरूष. नंतर त्यांना कळलं की ते भिंतींवर रंगवलेलं चित्र आहे.
‘‘माँ दयू, अरे देवा मला वाटलं की उन्हाने डोळे दिपल्यामुळे मला भास होतोय.’’ ते स्वत:शीच पुटपुटले.
त्यांना कोपऱ्यात काहीतरी हालचाल दिसली. आटा उकीडवी बसून मुकपणे रडत होती.
‘‘आटा, आटा.’’ त्यांनी हळूच हाक मारली.
तिचं लक्ष नव्हतं. तो घाणेरडा दर्प पुन्हा त्यांच्या नाकात घुसला. त्यांना भोवळ येईल असं वाटलं. त्यांनी चिरूट शिलगावला. त्यांची नजर अंधाराला सरावली. त्या भिंतींवर रंगवलेली चित्रं पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांना चित्रकलेतील काही कळत नव्हतं. पण त्या चित्रात असं काही विलक्षण होतं की त्याने त्यांना झपाटल्यासारखं झालं. जमिनी पासून छप्परापर्यंत निसर्गातील विवीध घटकांच्या वेगवेगळ्या रचना केल्या होत्या. त्यातील गूढ सौंदर्य केवळ अवर्णनीय होतं. त्यांच्या भावना उचंबळून आल्या. विश्वाच्या निर्मीतीचं रहस्य कळल्यामुळे एकाच वेळी ते आनंदित आणि भयकंपित झाले. निसर्गाच्या छुप्या रहस्यांचा शोध आपल्या प्राणांची बाजी लावून घेतलेल्या एका माणसाचं ते काम होतं. ज्या गोष्टींचं ज्ञान त्याला व्हायला नको होतं अशा गोष्टी त्याने पापापुण्याची पर्वा न करता जाणून घेतल्या होत्या. हे काही तरी अमानवी असावं अशी अंधूक शंका त्यांना आली.
‘‘माँ दयू, अरे देवा हा तर प्रतिभेचा अस्सल आविष्कार!’’ त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
त्यांची नजर दुसऱ्या कोपऱ्यातल्या गवती बिछान्याकडे गेली. तेथे त्यांना सगळे अवयव झडलेल्या स्ट्रिकलँडच्या शरीराची मुटकुळी दिसली. तो केव्हाच मेला होता. ते धीर करून जवळ गेले आणि त्यांनी त्या सडलेल्या देहाकडे वाकून पाहिलं. कोणतरी मागे उभं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांचा थरकाप उडाला. ती आटा होती. ती कधी उठून उभी राहिली ते त्यांना कळलं नव्हतं. ती त्यांच्या मागे उभी राहून ते जे बघत होते ते बघत होती.
‘‘अरे बाप रे, तू मला एवढं घाबरवलंस.’’
त्यांनी चार्ल्स स्ट्रिकलँड नावाच्या माणसाच्या त्या निष्प्राण देहाकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि ते भितीने खचून मागे फिरले.
‘‘तो तर आंधळा होता.’’
‘‘एक वर्ष झालं त्यांचे डोळे गेल्याला.’’

Artist: Paul Gauguin
Title: D'où venons-nous? Que sommes-nous? Où allons-nous?
Where Do We Come From? What Are We? Where Are We Going? 
Date: 1897, Medium: oil on canvas, Dimensions: 139.1 × 374.6 cm (54.8 × 147.5 in)
Current location: Museum of Fine Arts, Boston, Source: wikidata:Q890678


3 comments:

  1. गोगँ सिम्बिलिस्ट चित्रकारांमधील एक प्रमुख चित्रकार होता. तसेच पुढे प्रिमिटीव्हीजम आणि सिन्थेसिस्ट या नावाने ओळखू लागलेल्या शैलींचा तो प्रणेता होता. Where Do We Come From? What Are We? Where Are We Going? ही पॉल गोगँची सर्वात महत्वाची आणि गाजलेली दृष्टांतात्मक कलाकृती. ह्या प्रचंड आकाराच्या पेंटींगमध्ये पॉल गोगँला जे काही सांगायचे होते ते त्याने सांगितल आहे असं त्याने स्वत:च लिहून ठेवले आहे. हे पेंटींग करून झाल्यावर माझा मृत्यु होईल असं त्याने जाहीर केलं होतं. पॉल गोगँच्या इतर महत्वाच्या पेंटींग विषयी अधिक माहिती माझ्या ब्लॉगवरील नेव्हरमोअर (मौज दिवाळी 2014) या लेखामध्ये मिळेल.
    https://jayantgune.blogspot.com/2014/01/nevermore-nevermore.html

    ReplyDelete
  2. केवळ निःशब्द !

    ReplyDelete