Saturday, February 10, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४४

चित्रकारांचं दुसऱ्यांच्या चित्रांवरचं मत हे खूप महत्वाचं असतं. या ठिकाणी स्ट्रिकलँड दुसऱ्या बुजूर्ग चित्रकारांनी काढलेल्या चित्रां बद्दल काय म्हणतो ते पाहू. माझ्याकडे सांगण्यासारखं फारसं नाही. कारण स्ट्रिकलँड फारसं बोलत नसे. आपलं म्हणणं चपखल शब्दात तो मांडू शकत नसे, त्यामुळे ते लक्षात रहात नसे. त्याला विनोदाचं वावडं होतं. त्याचा विनोद म्हणजे उपहास कुचेष्टा. त्याचा हजरजबाबीपणा उद्धटपणात मोडला असता. एखादा विनोद त्याने केला तर तो खरं सांगितल्यामुळे झालेला असे.
स्ट्रिकलँड हा फार बुद्धीमान होता असं म्हणता येणार नाही. चित्रकलेवरचे त्याचे विचार हे सर्वसामान्य मतांपेक्षा फार वेगळे नव्हते. त्याच्या स्वत:च्या शैलीशी साधर्म्य असणाऱ्या चित्रकारांबद्दल त्याला बोलताना मी कधी ऐकलं नव्हतं. उदा. पॉल सेझाँ किंवा व्हॅन गॉग. त्याने त्यांची चित्रं कधी पाहिली असतील की नाही याचीही मला शंका आहे. इंप्रेशनीझम मध्ये त्याला फारसा रस नव्हता. त्यांच्या तंत्राचा त्याच्यावर प्रभाव होता पण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत काही खास नव्हतं. जेव्हा स्ट्रोव्ह, क्लॉद मॉने कसा महान चित्रकार आहे ते जीव तोडून सांगत होता तेव्हा तो म्हणाला होता: ‘‘मला त्यापेक्षा विंटरहॉल्टरच जास्त आवडतो.’’ पण हे तो त्याला चिडवण्यासाठी म्हणाला असावा असं मला वाटतं. आणि तसं असेल तर त्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला होता.
त्याची मत सनसनाटी होती असं काही नव्हतं. त्याच्या स्वभाव इतका स्फोटक होता की त्याची मतंसुद्धा तेवढीच स्फोटक असती तर ते त्याच्या स्वभावाला साजेसं दिसलं असतं. त्याच्या पूर्वासूरींना तो शिव्या देईल असं मला वाटलं होतं पण त्याचं मत इतरांसारखच होतं. एल ग्रेकोचं नाव त्याने ऐकलं होतं असं मला वाटतं नाही. वेलास्क्वेजविषयी त्याला आदर होता, शेदाँ त्याला आवडायचा आणि रेम्ब्रांदने त्याचं हृदय उचंबळून येत असे. रेम्ब्रांदचा त्याच्यावरील प्रभाव त्याने मला वर्णन करून सांगितला होता. पण त्याला मनापासून आवडणारा चित्रकार म्हणजे ब्रुघेल द एल्डर. त्यावेळी मला त्याच्याबद्दल फार माहिती नव्हती आणि स्ट्रिकलँडला समजावून सांगता येत नव्हतं. त्याचे शब्द मला नीट आठवत आहेत कारण त्याचा अर्थ लावण्याचा मी अजून प्रयत्न करत आहे.
‘‘तो ठीक आहे,’’ स्ट्रिकलँड म्हणाला होता. ‘‘मी पैजेवर सांगतो यात खूपच आव्हान आहे.’’
नंतर व्हिएन्नामध्ये मला पीटर ब्रुघेलची चित्रं बघायला मिळाली तेव्हा स्ट्रिकलँडला तो का आवडला असावा ते कळलं. ब्रुघेलच्या चित्रातील जग हे त्याचं स्वत:चं होतं. त्याच्या विषयी काही तरी लिहीता यावं म्हणून मी खूप टिपणं काढून ठेवली होती पण ती माझ्याकडून हरवली. आता फक्त काही गोष्टीच आठवतात. त्याच्या चित्रातील प्राणीमात्रांचे आकार भयंकर बेडौल असत, आयुष्य म्हणजे एक सावळा-गोंधळ, चित्रविचित्र घटनांची गोळा-बेरीज. माझ्या दृष्टीने ब्रुघेलला जे सांगायचं होतं त्यासाठी त्याने निवडलेलं माध्यम चुकीचं होतं. कदाचित त्यामुळेच स्ट्रिकलँडला त्याच्याविषयी सहानभूती वाटली असावी.
कदाचित ते दोघंही जो विषय साहित्यातून हाताळायला पाहिजे होता तो विषय ते चित्रकलेतून हाताळायचा प्रयत्न करत असावेत.

या वेळी स्ट्रिकलँडचं वय साधारणपणे सत्तेचाळीसच्या जवळपास असावं.
Artist:Franz Xaver Winterhalter (1805 - 1873)
Title: Portrait of Elizabeth of Bavaria, Oil on canvas
Location: Wien, Kunsthistorisches Museum, Source: Wikipedia

Artist: Claude Monet  (18401926)
Title: Woman with a Parasol - Madame Monet and Her Son
Medium: oil on canvas, Date: 1875
Dimensions: H 100 mm (3.94 in). W 81 mm (3.19 in).
Current location :National Gallery of Art, Source wikidata:Q2395218

Artist: Pieter Brueghel the Elder  (1526/15301569)
Title: The Peasant and the Birdnester, Date: 1568
Medium oil on oak, Dimensions: 59.3 × 68.3 cm (23.3 × 26.9 in)
Current location: Kunsthistorisches Museum, Vienna, Austria. Source: wikidata Q43270

No comments:

Post a Comment