Wednesday, February 14, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५२


पुढची तीन वर्ष स्ट्रिकलँडच्या जीवनातील सर्वात सुखाचा काळ असावा. आटाचं घर बेटावरच्या रस्त्यापासून आठ किलोमीटर आत होतं. तिच्या घरापर्यंत जाणाऱ्या वळणावळणाच्या वाटेच्या सभोवती उष्ण कटीबंधातील हिरवीगार झाडं होती. तिचं घर म्हणजे एक लहानसं लाकडी खोपटं होतं. रंग न लावलेल्या साध्यासुध्या दोन छोट्या खोल्या आणि बाहेर छप्पर घातलेली एक मोकळी जागा. स्वयंपाक करायला त्या जागेचा वापर करता येई. झोपण्यासाठी असलेल्या चटया सोडता दुसरं कसलंही सामान घरात नव्हतं. व्हरांड्यात एक डुलती आरामखुर्ची होती. घरालगत केळीची झाडं होती. त्याची फाटकी पानं भिकेला लागलेल्या सम्राटाच्या वस्त्रासारखी दिसत. पाठीमागच्या बाजूला जंगली नास्पतीचं एक झाड होतं. पहावं तिकडे नारळाची झाडं दिसत होती. आटाच्या वडिलांनी शेताच्या सभोवती लावलेली क्रोटनची झाडं फोफावली होती. त्यामुळे लालभडक ज्वालेचं कुंपण घातल्यासारखं वाटत होतं. दारासमोर आंबा होता. सोन्याचं उत्पन्न देणाऱ्या नारळांचं संरक्षण करणारी लालभडक फुलांची दोन जुळी झाडं कोपऱ्यात उभी होती.
स्ट्रिकलँड तेथे राहत होता. तो क्वचितच पपीएतला जाई. जवळच असलेल्या झऱ्यावर जाऊन तो अंघोळ करी. झऱ्याच्या खालच्या अंगाला कधी कधी माशांच्या झुंडी येत. झुंडी आल्या की स्थानिक लोक भाले बरच्या घेऊन तेथे जमत आणि प्रचंड आरडा ओरडा करत समुद्राकडे जाणारे गोंधळलेले मासे पकडत. कधी कधी स्ट्रिकलँड प्रवाळाच्या खडकांवर जाऊन टोपलीभर रंगीबेरंगी मासे पकडून आणी. आटा ते खोबरेल तेलात तळे नाहीतर लॉबस्टर बरोबर शिजवे. कधी कधी ती खेकड्यांचा एखादा चवदार पदार्थ बनवी. डोंगरात रानटी संत्री मिळत. आटा गावातल्या दोन तीन बायकांना घेऊन जाई आणि टोपलीभर संत्री घेऊन येई. नारळ काढायचे झाले की आटा आपल्या नातेवाईकांना नारळ काढायला बोलावे. त्यांचं टोळकं सरसर झाडावर चढून पटापट नारळ काढून देई. ते फोडून उन्हात वाळवून त्यांचं खोबरं काढून ते पोत्यात भरत. तळ्याकाठच्या गावात एक व्यापारी महिन्यातून एकदा येई. तो खोबऱ्याच्या बदल्यात तांदूळ, साबण, मटनाचे हवाबंद डबे, वगैरे वस्तू आणि थोडेसे पैसे देई. कधी कधी गावात मेजवानी असे. त्यावेळी डुक्कर कापत. मग ते पोट फुटेस्तोवर खात, गाणी गात आणि नाचत.
त्यांचं घर गावापासून खूप लांब होतं. ताहितीयन लोक आळशी आहेत. त्यांना भटकायला, गप्पा मारायला, चकाट्या पिटायला खूप आवडतं. पण पायी चालायचा कंटाळा येई. कित्येक दिवस आटा व स्ट्रिकलँड एकटेच असत. तो चित्र काढायचा किंवा वाचत बसायचा. रात्री ते व्हरांड्यात बसून धूम्रपान करत आकाशाकडे बघत बसत. आटाला एक मूल झालं. बाळंतपणात तिची काळजी घ्यायला एक म्हातारी बाई आली. ती तिथेच राहिली. नंतर तिची नात तिच्या सोबतीला म्हणून आली. काही दिवसांनी एक मुलगा आला. तो कोणाचा मुलगा, कुठून आला हे कोणालाच माहित नव्हतं. पण तो तिथेच त्या कुटुंबाचा भाग बनून राहिला. अशा रितीने दोघांच्या कुटुंबात चारांची भर पडली आणि ते सगळे तिथे आनंदाने नांदू लागले.

Artist: Paul Gauguin
Title:  Mahana no Atua, Day of the God, Date: 1894
Medium: oil on canvas, Dimensions: 66 × 87 cm (26 × 34.3 in)
Current location: Art Institute of Chicago, Source: wikidata:Q37693, Q3765980



1 comment: