Saturday, February 10, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४२

स्ट्रिकलँडने मला त्याची चित्रं बघायला अचानक का बोलावलं ते मला कळलं नाही. मी ती संधी साधली. माणसाची खरी ओळख त्याच्या कामातून होत असते. सामाजिक संबंधातून जी ओळख होते ती वरवरची असते. त्याला जे हवं असतं तेच तो तुम्हाला दाखवतो. खरी ओळख त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून काढलेल्या निष्कर्षामुळे होत असते. माणसाच्या चेहऱ्यावरचे त्याच्या नकळत, क्षणभर येऊन जाणारे भाव बरंच काही सांगून जातात. काही जण मुखवटा घेऊन वावरत असतात. पण कालांतराने ते मुखवटाच होऊन जातात. पण लेखकाने लिहीलेलं पुस्तक किंवा चित्रकाराने रंगवलेलं पेंटींग त्याची खरी ओळख लपवू शकत नाही. त्यातून तो अंतर्बाह्य उघडा पडतो. ढोंगी माणसाची अक्कल दिसते. कितीही सोंग आणलं तरी खरी कुवत लपत नसते.
मी स्ट्रिकलँडच्या घराचा लांबलचक उंच जिना चढून वर गेलो. जिना चढताना मी थोडा उत्तेजित झालो होतो हे मला कबूल केलंच पाहिजे. आपण काही तरी साहस करतोय असं वाटत होतं. मी सभोवताली एक दृष्टीक्षेप टाकला. त्यात अगदी कमीत कमी सामान होतं. इंग्लंडमधील माझ्या ज्या मित्रांना सगळ्या सुखसोर्इंनी युक्त असा भला मोठा स्टुडियो असल्या शिवाय चित्र काढायला जमत नसत त्यांना हा स्टुडियो दाखवायला आणलं पाहिजे.
‘‘तू इथेच उभा रहा.’’ ज्या विशिष्ट जागेवरून मी चित्र पहावीत असं त्याला वाटत होतं त्या जागेकडे बोट दाखवत तो म्हणाला.
‘‘मी काही बोललो तर तुला चालेल ना.’’
‘‘बोललास तर मी तुला धोपटून काढीन. तोंड बंद ठेऊन गुपचूप बघ.’’
त्याने एक कॅनव्हास इझलवर ठेवला. मला बघणयासाठी दोन तीन मिनीटं दिली आणि दुसरा कॅनव्हास लावला. मला वाटतं त्याने एकूण तीस एक कॅनव्हास मला त्या दिवशी दाखवले असावेत. ती त्याची सहा वर्षांची मेहनत होती. त्यातील एकही पेंटींग विकलं गेलं नव्हतं. कॅनव्हास वेगवेगळ्या आकारात होते. वस्तूचित्रणाचे छोटे तर निसर्गचित्रांचे मोठे. अर्धा डझन पोर्ट्रेट्स होती.
‘‘सगळी मिळून ही एवढी आहेत.’’
मला त्यातल्या सौंदर्याचं त्यावेळी आकलन झालं असतं, त्यातील अस्सलपणा जाणवला असता तर किती बरं झालं असतं. त्यातील बरीच पेंटींग मला नंतर पुन्हा बघायला मिळाली आणि काहींच्या प्रतिकृती. पण प्रथमदर्शनी मात्र माझी निराशा झाली होती याचं आता मला राहून राहून आश्चर्य वाटतं. उत्तम कलाकृती बघताना जी एक शिरशिरी अनुभवायला मिळते तसं मला त्यावेळी वाटलं नाही. त्याची पेंटींग बघून मला अस्वस्थ वाटलं, पण एखादं पेंटींग विकत घेण्याची बुद्धी मला त्यावेळी झाली नाही हे सत्य होतं. मला त्याचा आता खूप पश्चात्ताप होतोय. पण अशा पश्चातबुद्धीचा काही उपयोग नसतो. माझ्या हातातील एक सुवर्णसंधी गेली होती. त्या चित्रांपैकी बरीचशी पेंटींग आता प्रख्यात म्युझियमच्या संग्रहात आहेत. उरलेली श्रीमंत शौकीनांचे खाजगी संग्रह भूषवत आहेत. मला त्यांचं मूल्य त्यावेळी का जाणवलं नाही याची काहीतरी सबब शोधण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटयचं की माझी आवड चांगली आहे, कलाकृतीची जाण आहे, पण माझी नजर अस्सल चीज ओळखण्या इतकी तयार नाही याची मला जाणीव आहे. चित्रकलेच्या प्रांतात इतरांनी तयार केलेले मापदंड मी वापरत असे. त्याकाळी इंप्रेशनीस्टांबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. सिस्ले किंवा दगाचं एखादं चित्र माझ्याकडे असावं अशी माझी आकांक्षा होती, मॅनेची तर मी पूजा करीत असे. त्याचं ऑलिम्पिया हे पेंटींग तर माझ्या मते आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट कलाकृती होती. ल देजान्यू सुर लहर्ब (लन्शन ऑन द ग्रास)ने मी प्रचंड भारावून गेलो होतो.
स्ट्रिकलँडने मला जी चित्रं दाखवली त्या बद्दल मी फारसं बोलणार नाही. चित्रांचं वर्णन कंटाळवाणं असतं. ज्यांना या विषयात रस आहे त्यांना ती माहित आहेतच. आधुनिक चित्रकलेवर स्ट्रिकलँडचा प्रचंड प्रभाव आहे. आता ज्या प्रांतात जाण्यासाठी लोकांची रीघ लागते त्या प्रांतात पाऊल ठेवणारा तो पहिलाच होता. आता त्याची चित्रं पहिल्यांदा पाहाणाऱ्याचं मन तयार असतं. पण त्यावेळी मला तसं काही वाटलं नव्हतं हे मात्र खरं.
त्याच्या चित्रात तांत्रिक सफाई नव्हती त्याचा मला मोठा धक्का बसला. ओल्ड मास्टर्सची गाजलेली चित्रं मला माहित होती. ज्या इन्ग्रेसला आधुनिक काळातील महान रेखाचित्रकार समजलं जातं त्याच्या तुलनेत स्ट्रिकलँडला तर रेखाटनसुद्धा धड करता येत नाही असंच म्हणावं लागेल. तो चित्रविषयाचं जे सुलभीकरण करू पाहात होता तो काय प्रकार आहे हे मला माहित नव्हतं. मला संत्र्यांचं एक वस्तू-चित्र आठवतंय. त्यात संत्री ठेवलेल्या प्लेटचा आकार गोल नव्हता, संत्री वेडीवाकडी होती. पोर्ट्रेटमधील चेहेऱ्यांचा आकार प्रत्यक्षापेक्षा मोठा होता. त्यामुळे ती उगाचच बेडौल वाटत होती. त्यातील चेहेरे मला एखाद्या व्यंगचित्रासारखे वाटले. त्याची रंगकामाची पद्धत मला नवीन होती. त्याच्या निसर्गचित्रांनी तर मला जास्तच कोड्यात टाकलं. फाँटेनब्लुच्या जंगलाची दोन तीन आणि पॅरीसच्या रस्त्यांची कित्येक चित्र होती. मला पहिल्यांदा वाटलं की ती एखाद्या दारूड्या गाडीवानाने काढली असावीत. मी पार गोंधळून गेलो. रंग अगदीच ओबडधोबड होते. मला वाटलं की हा सगळा प्रकार एखाद्या भव्य पण डोक्यावरून जाणाऱ्या नाटकासारखा आहे. मागे वळून बघताना स्ट्रोव्हची पारख किती अचूक होती ते जाणवतं. कलाजगतात क्रांतीकारी असं काही तरी घडतंय हे त्याला पहिल्याप्रथम जाणवलं. त्याने स्ट्रिकलँडमधला असामान्य प्रतिभावंत त्याच्या जडण-घडणीच्या काळातच ओळखला होता, जगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या कितीतरी आधी.
मी त्याच्याकडे वळलो.
‘‘तुझी माध्यमाची निवड चुकली आहे असं तुला वाटत नाही का?’’
‘‘तुला काय म्हणायचं आहे?’’
‘‘काही तरी सांगायचं तुझ्या मनात आहे. पण त्यासाठी चित्रकलेचा तुला कितपत उपयोग होईल हे मला सांगता येणार नाही.’’
त्याची चित्र बघून त्याच्या स्वभावाचा मला काहीतरी थांग लागेल असं जे मला वाटलं होतं ती माझी चूक होती. त्याने माझ्या मनात आधीच असलेला गोंधळ वाढला.
एकच गोष्ट मला कळली की तो कोणत्या तरी शक्तिने झपाटला होता आणि त्यातून मुक्त होण्यासाठी जीवाच्या आकांताने त्याची धडपड चालू होती. ती शक्ति काय होती आणि
त्याच्या धडपडीचा शेवट काय होणार होता हे मात्र माझ्या आकलना बाहेर होतं. आपण सर्व या जगात तसं बघायला गेलं तर एकटेच असतो. पण त्याने स्वत:ला एका हस्तीदंती मनोऱ्यात बंद करून ठेवलं होतं. त्याला तेथून बाह्य जगाशी संपर्क साधायचा झाल्यास फक्त खाणाखुणांच्या भाषेतून साधणं शक्य होतं. खाणाखुणा सुद्धा अशा की त्यांच्या अर्थाचीच निश्चिती नाही. आपलं हृदगत तर सांगायचं आहे पण शब्दच जिथे नाहित तिथे संवाद कसा साधणार. आपण सहप्रवासी असलो तरी संवादाविना प्रत्येकाचा प्रवास एकट्यानेच चालू राहतो. परक्या देशाची भाषा येत नसेल तर संवादाचं पुस्तक हातात घेऊन किती आणि काय बोलणार.
स्ट्रिकलँडचे आकार आणि रंगांची निवड ही खास त्याची स्वत:ची होती. त्याला आतून जे वाटत होतं तेच तो त्याच्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला जे सांगायचं आहे ते अधिक चांगल्याप्रकारे सांगता येत असेल तर त्यासाठी सुलभीकरण आणि विरूपीकरण अशी दोन्ही तंत्र त्याने न डगमगला वापरली होती. जणू काही त्याला सर्वव्यापी वैश्विक तत्व सापडलं होतं. मला त्याची चित्र गोंधळात टाकणारी वाटली तरीही त्यातील भावनिक आशय मनाला भिडत होता. स्ट्रिकलँडविषयी माझ्या मनात करूणा उत्पन्न होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं, पण त्या करूणेने माझं हृदय द्रवलं.
‘‘ब्लांश स्ट्रोव्हबद्दल तुला जे वाटत होतं त्याला तू का शरण गेलास ते मला आता कळलंय.’’
‘‘कां?’’
‘‘तुझी हिंमत झाली नाही. तुझ्या शारिरीक दौर्बल्यावर तुला मात करता आली नाही. तुझा कोंडमारा होत आहे. त्यातून मुक्त होण्याची तुझी तडफड चालू आहे. तुझा ध्यास, अंतिम ध्येय काय आहे ते मला अजून कळलेलं नाही. पण तुझा प्रवास चालू झाला आहे. एका अस्तित्वात नसलेल्या तीर्थक्षेत्राचा तू यात्रेकरू आहेस. कोणत्या अगम्य निर्वाणाकडे तुला जायचं आहे मला माहित नाही. तुला स्वत:ला तरी ठाऊक आहे का? तुला सत्याचा आणि स्वातंत्र्याचा हव्यास आहे. एक क्षणभर तुला वाटलं की प्रेमामध्ये तुला सत्य सापडेल. तू थकला होतास आणि स्त्रीच्या बाहूपाशात तुला विश्रांती मिळाली. थोड्या वेळाने तुला जाणवलं की ती विश्रांती खरी नाही अणि त्यामुळे तू तिचा तिरस्कार करायला लागलास. तुला ना तिच्याबद्दल सहानभूती होती ना स्वत:बद्दल. तू तिला घाबरलास. ती भिती अजून गेली नाही. त्या भितीपोटी तू तिला ठार मारलंस. त्या भितीने तू आजही थरथर कापतोयस.’’
तो दाढी खाजवत कोरडं हसला.
‘‘माझ्या मित्रा तू भावनेच्या भरात फारच वाहवत जात आहेस.’’

एका आठवड्याने मला कोणाकडून तरी चुकून कळलं की स्ट्रिकलँड मास्येझला गेला आहे. त्यानंतर तो मला आयुष्यात पुन्हा कधीही भेटला नाही.


Artist: Édouard Manet (18321883)
Title: Le Déjeuner sur l'herbe, Luncheon on the Grass
Medium: oil on canvas, Date: 1863, Dimensions: 208 x 264.5 cm (81.9 in × 104.1 in)
Current location: Musée d'Orsay, Source: wikidata:Q152509
Artist: Paul Gauguin
Copy of Olympia, 1888, Oil on canvas
 Original by Edourd Manet 1863

3 comments:

  1. ऑलिंपिया आणि लंशन ऑन ग्रास या दोन पेंटींग वरून त्यावेळच्या युरोपमध्ये अश्लीलतेचे आरोप होऊन टीकेचा गदारोळ उठला होता. सगळा समाज ढवळून निघाला होता. आपल्याकडे ठाकूरसिंगांच्या ओलेती ने जो धुमाकूळ घातला होता त्याची आठवण व्हावी असाच प्रकार तेव्हा तिकडेही झाला होता. जिज्ञासूंनी खालील लिंक पहावी. बाकी सर्व प्रकरण चिन्हच्या नग्नेते वरील विशेषांकात दिले आहेच.

    http://satara.nic.in/images/oleti_aundh.jpg

    ReplyDelete
  2. http://satara.nic.in/htmldocs/Aundh_museum.htm

    करेक्ट लिंक

    ReplyDelete