Wednesday, February 14, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५३


‘‘तेने व्हायोला ल कॅपितेन ब्रुनो, तो बघ कॅप्टन ब्रुनो तेथे बसलाय,’’ एके दिवशी मी तिअरने सांगितलेल्या गोष्टींचे धागेदोरे जुळवत होतो तेवढ्यात ती म्हणाली, ‘‘कॅप्टन ब्रुनो स्ट्रिकलँडला चांगलाच ओळखत होता. तो त्याच्या घरी गेलेला आहे.’’
कॅप्टन ब्रुनो एक मध्यमवयीन फ्रेंच इसम होता. काळी दाढी, चमकदार टपोरे डोळे. डकचा व्यवस्थित शिवलेला सूट घालून तो दुपारचं जेवण घेत होता. हॉटेलात काम करणाऱ्या आ लिन या चिनी मुलाने तो आजच पमेट्युवरून बोटीने आल्याचं सांगितलं.
तिअरने माझी ओळख करून दिली. त्याने त्याचं कार्ड मला दिलं. त्या कार्डावर रेन ब्रुनो, कॅपितेन अ लाँ कोर ... मास्टर मरिनर असं छापलेलं होतं. आम्ही स्वैंपाकघराच्या बाहेरील व्हरांड्यात बसलो होतो. तिअर तिच्या हॉटेलात काम करणाऱ्या मुलींपैकी एका मुलीचे कपडे शिवत होती. तो आमच्या बरोबर बसला.
‘‘मी स्ट्रिकलँडला ओळखत होतो,’’ तो म्हणाला. ‘‘मला बुद्धीबळाच्या खेळाची खूप आवड आहे. मी माझ्या धंद्याच्या निमित्ताने वर्षातून तीन चार वेळा ताहितीत येतो. तो त्यावेळी पपीएतमध्ये असला तर आम्ही खेळायचो. जेव्हा त्याचं लग्न झालं,’’ त्याने हसत डोळे मिचकावले. ‘‘आँ शॉन, शेवटी तो जेव्हा तिअरने दिलेल्या त्या मुलीबरोबर राहयला गेला तेव्हा त्याने मला त्याच्या घरी बोलावलं होतं. मी त्यांच्या लग्नाच्या मेजवानीला हजर होतो.’’ त्याने तिअरकडे पाहिलं. ते दोघंही हसले. ‘‘तो लग्नानंतर पपीएतला फारसा आला नाही. त्यानंतर वर्षभराने बेटाच्या त्याभागात काहीतरी काम होतं. काय काम होतं ते आता नीट आठवत नाही. पण मला स्ट्रिकलँडची आठवण झाली. व्होयाँ, हे बघा, आलोच आहे तर बिचाऱ्याला भेटून येऊ. मी एक दोन स्थानिक माणसांना विचारलं. मी होतो तेथून तो पाच एक किलोमीटरवरच राहत होता. मी त्याला भेटायला गेलो. ते दृश्य मी कधीच विसरणार नाही. मी स्वत: एका प्रवाळद्वीपावर राहतो. समुद्र आणि आकाशाचे क्षणोक्षणी बदलणारे मनोहारी रूप मला नवीन नाही. पण तो जेथे राहत होता त्या जागेचं सौंदर्य केवळ अवर्णनीयच आहे. तुलना करायची झालीच तर ईडनच्या बागेच्या स्वर्गीय सौंदर्याशी करावी लागेल. निळ्याशार आकाशाखाली लपलेला हिरव्यागार वनराईचा एक लहानसा तुकडा. आसमंतात दरवळणारा स्वर्गीय सुगंध. अहाहा! जर मी तुम्हाला ती जागा प्रत्यक्ष दाखवू शकलो तर किती बरं होईल. त्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही.
तेथे तो राहत होता. त्याचा ना कोणाशी संबंध ना इतर कोणाचा त्याच्याशी. असं जीवन युरोपियनांच्या चष्म्यातून पाहिलं तर निश्चितच खटकेल. ते कच्चं घर मोडकळीला आलेलं होतं. थोडंस अस्वच्छही म्हणता आलं असतं. तीन चार स्थानिक माणसं व्हरांड्यात पडलेली होती. स्थानिक लोक कसे घोळक्याने पडलेले असतात तुम्हाला माहित आहेच. एक संपूर्ण उघडाबंब तरूण सिगारेट ओढत होता. त्याच्या अंगावर परेओ सोडल्यास काहीही नव्हतं.’’
परेओ म्हणचे एक कंबरेपासून खाली गुडघ्यापर्यंत नेसलेला लाल किंवा निळ्या रंगाच्या कापडाचा तुकडा. त्यावर पांढऱ्या रंगाचं डिझाईन असे.
‘‘पंधरा वर्षांची एक मुलगी गवताची हॅट विणत होती. एक म्हातारी बाई उकिडवी बसून पाईप ओढत होती. मला आटा दिसली. ती नुकत्याच जन्मलेल्या एका मुलाला स्तनपान देत होती. दुसरं एक नागडं मूल तिच्या पायाशी खेळत होतं. तिने मला पाहून स्ट्रिकलँडला हाक मारली. तो दरवाजात आला. परेओ सोडून त्याच्या अंगावर काहीही नव्हतं. त्याची शरीरयष्टी दांडगी होती. अस्ताव्यस्त वाढलेले केस, लांब दाढी आणि केसाळ छाती, अनवाणी चालून घट्टे पडलेले पाय. नागर जीवनावर अगदी खुन्नस काढल्यासारखा तो आदिवासी झाला होता. मला पाहून तो खुश झाला. त्याने आटाला जेवणासाठी एक कोंबडी मारायला सांगितली. मी आलो तेव्हा तो जे चित्र करत होता ते दाखवायला तो मला घरात घेऊन गेला. एका कोपऱ्यात पलंग होता. मध्यभागी असलेल्या इझलवर कॅनव्हास लावलेला होता. मला त्याची दया आली म्हणून त्याची दोन पेंटींग मी अगदी किरकोळ किंमतीला विकत घेतली. बाकीची मी माझ्या फ्रान्समधील मित्रांना पाठवून दिली. मी जरी ती दयेखातर घेतली असली तरी थोडे दिवस गेल्यानंतर मला ती आवडायला लागली. खरंच त्यात एक विलक्षण सौंदर्य होतं. लोकांनी मला वेड्यात काढलं होतं पण शेवटी मीच खरा ठरलो. तिअरला जळवण्यासाठी तो तिच्याकडे बघून हसला. सत्तावीस फ्रँकचा अमेरीकन स्टोव्ह घेऊन स्ट्रिकलँडची पेंटींग स्वस्तात घेण्याची तिची संधी कशी हुकली याची कहाणी तिने दु:खीत अंत:करणाने पुन्हा एकदा सांगितली.”
‘‘तुमच्याकडे अजून ती पेंटींग आहेत?’’ मी विचारलं.
‘‘अजून माझ्याकडेच आहेत. माझी मुलगी लग्नाची होईपर्यंत ती मी ठेवणार आहे. चित्रांच्या रुपाने तिच्या लग्नात द्यायच्या रूखवत, हुंडा वगैरेची सोय झाली असं समजा.’’
नंतर त्याने त्याच्या कहाणीला सुरवात केली.
‘‘ती संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. मी एका तासापेक्षा जास्त थांबणार नव्हतो. पण त्याने रात्रभर राहण्याचा मला आग्रह केला. मी थोडा साशंक होतो कारण त्याच्याकडच्या झोपण्यासाठी असलेल्या चटया अगदीच फुसफुशीत होत्या. पमेट्युमध्ये जेव्हा मी माझं घर बांधत होतो तेव्हा मी कित्येक महिने यापेक्षा कडक बिछान्यावर झोपलो होतो. कृमी कीटकांच्या चावण्याने त्रास होण्याइतकी माझी कातडी नाजूक नव्हती.’’
‘‘आटा जेवण बनवे पर्यंत आम्ही ओढ्यावर जाऊन अंघोळ केली. नंतर आम्ही व्हरांड्यात बसून जेवलो. आम्ही धूम्रपान करत गप्पा मारल्या. त्या तरूण मुलाकडे कॉन्सेर्टीना होतं. त्याच्यावर त्याने दहा बारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेली गाणी वाजवली. नागरी संस्कृती पासून हजारो मैल दूर असलेल्या प्रशांत महासागरातील एका बेटावर ती धून ऐकायला विचित्र वाटत होती. मी त्याला विचारलं. आदिम अवस्थेत जगणाऱ्या या लोकांबरोबर राहण्याचा तुला कंटाळा नाही येत. त्याने नाही म्हणून सांगितलं. तो म्हणाला चित्र काढताना सगळी मॉडेल हाताशी असलेली बरी. मोठ्याने जांभाया देत स्थानिक लोक एका मागोमाग एक झोपी गेले. फक्त मी आणि स्ट्रिकलँड उरलो. तिथे जी संपूर्ण शांतता होती त्याचं वर्णन मी करू शकणार नाही. मी ज्या पमेट्यु बेटावर राहतो तेथे अशी संपूर्ण शांतता कधीच नसते. किनाऱ्यावर अनेक प्राणी रात्रभर संचार करत असतात त्यांचं कर्णकूट भेसूर ओरडणं, कवचधारी कीटकांची किरकिर, खेकड्यांची किटकिट, खाडीतून उड्या मारणाऱ्या माशांचा डुबुक डुबुक आवाज आणि समुद्राच्या लाटांची अखंड गाज. पण येथे कसलाच आवाज नव्हता. हवेत रातराणीचा सुगंध दरवळत होता. ती रात्र एवढी सुंदर होती की आत्म्याला शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन अनंताच्या प्रवासाला जाण्याचा मोह व्हावा. अशा ठिकाणी मृत्यु आलाच तर एखादा प्राणप्रिय मित्र बऱ्याच वर्षांनी भेटावा आणि हृदय उचंबळून यावं तसं वाटेल.’’
तिअरने एक सुस्कारा सोडला.
‘‘मी जर पंधरा वर्षांची असते तर.’’
तिला टेबलावरच्या कोळंबीच्या बशीकडे डोळा लावून बसलेली मांजर दिसली. तिने एक शिवी हासडत बाजूचं पुस्तक त्याच्या शेपटीवर मारलं.
‘‘तुम्ही आटाबरोबर सुखी आहात का असं मी त्याला विचारलं.
‘‘ती मला एकट्याला सोडते, असं तो म्हणाला. ती माझं जेवण बनवते, मुलांचा सांभाळ करते. मी तिला सांगतो ते ती करते. पुरूषाला स्त्रीपासून जे हवं असतं ते सगळं ती मला देते.’’
‘‘तुम्हाला युरोप सोडल्याचा पश्चाताप होत नाही का? तुम्हाला कधी तरी पॅरीस किंवा लंडनच्या रस्त्यांवरील दिव्यांची, तुमच्या मित्रांची, सहकाऱ्यांची, किंवा कोणाचीतरी आठवण येत नाही? क्वी सेज मी काय म्हणतोय, वर्तमानपत्रं आणि नाट्यगृह, फरसबंदी रस्त्यांवरील ओम्नीबसचा खडखडाट वगैरे, वगैरे.’’
‘‘बराच वेळ तो गप्प होता. नंतर तो म्हणाला:
‘‘ ‘मी येथे मरेपर्यंत राहणार आहे.
‘‘ ‘पण तुला कधी कंटाळा येत नाही, एकटेपणा जाणवत नाही?’ मी विचारलं.
‘‘तो गालातल्या गालात हसला.
‘‘ ‘माँ पुअर अ‍ॅमी, बिचारा,’ तो म्हणाला. ‘‘कलाकार कसा असतो ते तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय.’ ’’
कॅप्टन ब्रुनो माझ्याकडे बघत हसला. त्याचे काळेभोर डोळे चमकले.
‘‘असं म्हणून त्याने माझ्यावर अन्याय केला. स्वप्न बघणं म्हणजे काय ते मलासुद्धा माहित होतं. माझीही स्वप्न होती. मीसुद्धा एका प्रकारे कलाकार आहे.’’
आम्ही बराच वेळ निशब्द बसलो. तिअरने तिच्या झग्याच्या मोठ्या खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं. तिने प्रत्येकाला एक एक सिगारेट दिली. सरते शेवटी तिने शांततेचा भंग केला:
‘‘से मस्यु या साहेबांना स्ट्रिकलँडची माहिती हवी आहे तर तुम्ही त्यांना डॉ. कोत्राजकडे का घेऊन जात नाही. ते त्याच्या आजारपणाविषयी काही तरी सांगतील?’’
‘‘व्हॉलंटीर,’’ कॅप्टन माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘मी तयार आहे.’’
मी त्याचे आभार मानले. त्याने घडाळ्यात पाहिलं.
‘‘सहा वाजून गेले आहेत. ते आत्ता घरीच असतील. तुम्हाला वेळ असेल तर चला.’’
मी फार आढेवेढे न घेता निघालो. आम्ही डॉक्टरांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत होतो. तो गावाच्या बाहेर राहत होता. हॉटेल डी ला फ्लाऊसुद्धा गावाच्या वेशीवर होतं. त्यामुळे आम्ही पटकन गावा बाहेर आलो. रुंद रस्त्यावर सावलीसाठी दुतर्फा उंच झाडं लावलेली होती. दोन्ही बाजूला नारळी आणि व्हॅनीलाची लागवड होती. ताडाच्या झाडावर बसलेले समुद्रपक्षी कर्वâश आवाजात ओरडत होते. आम्ही एका ओढ्यावरच्या दगडी पुलावर आलो. ओढ्यात आदिवासी मुलं हसत ओरडत मस्ती करत होती. त्यांची तांबूस कांती संध्याकाळच्या उन्हात चमचम करत होती.

Artist: Paul Gauguin
Title: I Raro te oviri, Under the Pandanus I, Date: 1891
Medium: oil on canvas, Dimensions: 68 × 90 cm (26.8 × 35.4 in)
Current location: Dallas Museum of Art, Source: wikidata:Q37693/Q18665175



1 comment: