Friday, February 2, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २४

नाताळच्या थोडे दिवस अगोदर डर्क स्ट्रोव्ह माझ्या घरी आला आणि त्याने नाताळ साजरा करण्यासाठी मला त्याच्या घरी येण्याचं आमंत्रण केलं. नाताळचा दिवस त्याला आपल्या मित्रमंडळींना घरी बोलावून परंपरागत पद्धतीने साजरा करायला आवडे. आमच्यापैकी कोणीही स्ट्रकलँडला गेल्या दोन आठवड्यात तरी पाहिलं नव्हतं. मी पॅरीसमध्ये आलेल्या माझ्या काही मित्रांबरोबर होतो त्यामुळे मला वेळ मिळाला नव्हता तर स्ट्रोव्हला भांडणामुळे. या खेपेला त्यांचं भांडण नेहमीपेक्षा थोडं जास्तच कडाक्याचं झालं होतं. त्यामुळे स्ट्रोव्हने यापुढे त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. स्ट्रिकलँडचं कोणाशीही पटणं कठीण होतं. स्ट्रोव्हने तर त्याच्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतली होती. पण सणासुदीचे दिवस जवळ आल्याने त्याचा राग सौम्य झाला होता. सणाच्या दिवशी त्या बिचाऱ्याला एकटंच सोडून कसं चालेल. आपल्याला जसं वाटतं तसंच त्यालाही वाटत असेल असं त्याने गृहीत धरलं. चित्रकाराने आनंदाच्या दिवशी एकट्यानेच कुढत बसायचं ही कल्पना त्याला सहन झाली नाही. स्ट्रोव्हने स्टुडियोत ख्रिसमस ट्री आणून ठेवला. त्याच्या फांद्यांवर त्याने नाताळच्या त्या निरर्थक भेटवस्तू लहान मुलाच्या उत्साहाने टांगून ठेवल्या असाव्यात असा मला दाट संशय होता. पण स्ट्रिकलँडला पुन्हा भेटायला तो किंचीत लाजत होता. त्याने त्याची इतक्या वेळा मानखंडना केली होती की त्याला एवढ्या सहजतेने माफ करणं त्याला अपमानास्पद वाटत होतं. दिलजमाई केलेली तर त्याला हवी होती पण ती होताना मी तिथे हजर असलो पाहिजे अशी त्याची अपेक्षा होती.
आम्ही ऍव्हेन्यु द क्लिशी पर्यंत चालत गेलो पण स्ट्रिकलँड तिथल्या कॅफेमध्ये नव्हता. थंडीमुळे बाहेर बसणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही आतमध्ये असलेल्या लेदर सोफ्यावर बसलो. आत खूप गरम आणि कोंदट होतं. वातावरण धुराने भरलेलं होतं. स्ट्रिकलँड तेथे नव्हता पण तो ज्या फ्रेंच चित्रकाराबरोबर बुद्धीबळं खेळायचा तो आम्हाला दिसला. माझी त्याची थोडी ओळख होती. तो आम्ही बसलो होतो त्याच्या जवळ येऊन बसला. स्ट्रोव्हने त्याला स्ट्रिकलँड विषयी विचारलं.
“तो आजारी आहे. तुम्हाला माहित नाही का?”
“खूप आजारी आहे?”
“मला वाटतं परीस्थिती खूप गंभीर असावी.”
स्ट्रोव्ह पांढरा फटक पडला.
“त्याने मला का कळवलं नाही? त्याच्याशी भांडण्यात माझंच चुकलं. आपण त्याला जाऊन बघू या. त्याच्याकडे बघणारं कोणीही नाही. तो कुठे रहातो?”
“मला माहित नाही.” फ्रेंचमन म्हणाला.
त्याला कुठे शोधायचं हे आम्हा दोघांनाही माहित नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं. स्ट्रोव्ह बेचैन झाला.
“त्याचं काही बरं वाईट झालं तर कोणाला कळणारसुद्धा नाही. हे फारच भयंकर आहे. मला तो विचारच सहन होत नाही. तो कुठे रहातो ते आपल्याला लवकरात लवकर शोधायलाच हवं.”
पॅरीसमध्ये असं सहजपणे कोणाला शोधून काढणं हे मूर्खपणाचं आहे हे मी त्याला समजावून सांगितलं. त्यासाठी आपल्याला काहीतरी योजना आखली पाहिजे.
“त्या बिचाऱ्याची हालत खराब झालेली असेल आणि आपण त्याला शोधण्यात वेळ घालवू तर तो पर्यंत कदाचित उशीर होईल.”
“तरीही त्याला शोधायचं असेल तर आपल्याला बसून नीट विचार केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.”
मला ठाऊक असलेला पहिला पत्ता हॉटेल बेल्जचा होता. पण स्ट्रिकलँडने ते हॉटेल केव्हाच सोडलं होतं. त्यांना असा कोणता इसम आपल्या हॉटेलमध्ये राहून गेला होता ते आठवतच नव्हतं. आपला थांगपत्ता गुप्त ठेवण्याच्या अट्टाहासामुळे हॉटेल सोडून जाताना आपण दुसरीकडे कुठे जात आहोत त्याचा निरोप त्याने ठेवला असण्याची शक्यता शून्य होती. शिवाय तो रहात होता त्याला आता पाच वर्ष उलटली होती. पण तो फार दुरवर गेला नसावा याची मला खात्री होती. तो पूर्वी ज्या कॅफेमध्ये यायचा त्याच कॅफमध्ये अजूनही तो येतो म्हणजे त्याला ते त्याच्या रहाण्याच्या जागेपासून जवळ पडत असावे. त्याला एका बेकरीवाल्याने पोर्ट्रेट करण्याचं काम मिळवून दिलं होतं ते मला अचानक आठवलं. त्या बेकरीतच तो पाव घ्यायला जायचा तिथे त्याची चौकशी केली तर त्याचा पत्ता मिळण्याची शक्यता होती. मी डिरेक्टरी घेतली आणि बेकरींचे पत्ते शोधायला सुरूवात केली. त्या विभागात पाच बेकऱ्या होत्या. त्या सगळ्या बेकऱ्यांकडे जाणं भाग होतं. स्ट्रोव्हच्या मनात माझ्याबरोबर येण्याऐवजी ऍव्हेन्यू द क्लिशीवरच्या सगळ्या घरात जाऊन चौकशी करायची होती. पण माझ्या योजनेला पटकन फळ मिळालं. दुसऱ्याच बेकरीतील काऊंटरवरची बाई त्याला ओळखत होती. पण तिला तो नक्की कोणत्या घरात रहातो ते माहित नव्हतं. नशीबाची आम्हाला साथ होती. पहिल्याच इमारतीच्या कन्सर्जने तो सर्वात वरच्या मजल्यावर रहातो असं आम्हाला सांगीतलं.
“तो आजारी आहे का?” स्ट्रोव्हने विचारलं.
“आँ नीफेत.” कन्सर्ज उडत उडत म्हणाला. “असेल. बऱ्याच दिवसांत मी त्यांना पाहिलेलं नाही.”
स्ट्रोव्ह जिन्यावरून धाडधाड धावत पुढे गेला. मी जेव्हा वरच्या मजल्यावर जाऊन पोचलो तेव्हा स्ट्रोव्ह पायजमा घातलेल्या एका इसमाबरोबर बोलत होता. त्याने दुसऱ्या दरवाजाकडे बोट दाखवलं. त्याच्या मते तिथे रहाणारा इसम चित्रकार असावा. त्यानेसुद्धा आठवडाभरात त्याला पाहिलं नव्हतं. स्ट्रोव्ह दरवाजा ठोठावण्यासाठी पुढे झाला पण इतक्यात त्याने मान वळवून असहाय्यपणे माझ्याकडे एक नजर टाकली. तो अतिशय गोंधळलेला दिसत होता.
“जर तो गेला असेल तर?”
“उगाच घाबरू नकोस. तसं होणार नाही.” मी त्याला धीर दिला.
मी दरवाजा ठोठावला. आतून उत्तर आलं नाही. मी दरवाजा ढकलला. दार आतून लावलेलं नव्हतं. मी आत शिरलो. स्ट्रोव्ह माझ्या पाठोपाठ आला. आत काळोख होता. ती वरच्या मजल्यावरच्या पोटमाळ्याची खोली होती. उतरत्या छपरातून झिरपणारा अंधूक प्रकाश खोलीत पडला होता.
“स्ट्रिकलँड.” मी हळूच हाक मारली.
उत्तर नाही. मला थोडा संशय आला. बाजूला पाहिलं तर स्ट्रोव्हचे पाय लटलट कापत होते. दिवा पेटवावा की नको या विचारात मी उभा होतो. एका कोपऱ्यात पलंग असावा असं मला अंधूकसं दिसलं. दिवा लावला तर आपल्याला प्रेत बघावं लागेल की काय या विचाराने माझ्या काळजात चर्र झालं.
“गाढवा, तुझ्याकडे काडेपेटी आहे की नाही?”
एका कोपऱ्यातून स्ट्रिकलँडचा घोगरा आवाज आला आणि माझा जीव भांड्यात पडला.
स्ट्रोव्ह ओरडला.
“अरे देवा, मला वाटलं तुला काही बरं वाईट तर झालं नाही.”
मी काडी ओढली आणि मेणबत्ती कुठे आहे ते पाहू लागलो. ती खोली अगदी छोटी होती. अर्धा भाग रहाण्यासाठी व उरलेल्या अर्ध्याभागात स्टुडियो. एक पलंग आणि भिंतीकडे पुढा करून ठेवलेले काही कॅनव्हास, इझल, टेबल आणि एक खुर्ची याशिवाय अक्षरश: काहीही नव्हतं. जमिनीवर अंथरायला कार्पेट नव्हतं की उबेसाठी शेगडी. टेबलावर पॅलेट नाईफ, ब्रश, रंग आणि इतर सटरफटर गोष्टींचा खच पडलेला होता. एका टोकाला मेणबत्ती होती ती मी पेटवली. पलंग स्ट्रिकलँडच्या देहाच्या मानाने छोटा असल्याने त्या पलंगावर तो कसाबसा आखडून पडला होता. अंगात उब येण्यासाठी तो असतील नसतील ते सगळे कपडे अंगावर घालून झोपला होता. त्याच्याकडे बघताच तो तापाने फणफणला आहे ते कळून येत होतं. स्ट्रोव्ह कापऱ्या आवाजात त्याला म्हणाला:
“मित्रा तुला झालंय तरी काय? तू एवढा आजारी आहेस ते मला माहित नव्हतं. मला का नाही सांगितलंस? मी तुझ्यासाठी काहीही करीन हे तुला कळायला पाहिजे होतं. माझं बोलणं तू एवढं मनाला लावून घेतलंस. मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तुझ्यावर एवढा चिडलो हा माझा मुर्खपणाच झाला.”
“गो टू हेल.” स्ट्रिकलंड क्षीण आवाजात कण्हत म्हणाला.
“थोडा दम धर. मी तुझ्या अंगावरचं पांघरूण नीट करतो. तुझी काळजी घ्यायला कोणी नाही का?”
त्याने त्या घाणेरड्या खोलीतील पसाऱ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्याने अंथरूण पांघरूण नीट केलं. स्ट्रिकलँडला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याने न बोलता चीड व्यक्त केली. मी त्याच्याकडे बघत गप्प उभा होतो.
“तुला जर माझ्यासाठी खरंच काही करायचं असेल तर थोडं दूध आणून दे. मी दोन दिवस बाहेर पडलेलो नाही.”
पलंगाच्या बाजूला एक दुधाची रिकामी बाटली आणि वर्तमानपत्रात गुंडाळलेला पावाचा एक तुकडा होता.
“तू काही खाल्लं आहेस की नाही?”
“काही नाही.”
“असं किती दिवस चाललं आहे?” स्ट्रोव्ह ओरडला. “म्हणजे गेले दोन दिवस तुझ्या पोटात काहीही गेलेलं नाही. भयंकर आहे.”
“मी पाणी पीत होतो.”
हाताच्या अंतरावर असलेल्या पाण्याच्या मोठ्या भांड्याकडे बघत तो म्हणाला.
“मी ताबडतोब जाऊन घेऊन येतो. तुला आणखी का ही हवं आहे का?” स्ट्रोव्ह म्हणाला.
मी तापमापक, थोडीशी द्राक्ष आणि पाव आणायला सुचवलं. स्ट्रोव्ह आनंदाने जिन्यावरून धाडधाड धावत खाली गेला.
“मूर्ख कुठला.” स्ट्रिकलँड पुटपुटला.
मी त्याची नाडी पाहिली. नाडी लागायला वेळ लागला. ठोके जलद पडत होते. मी त्याला दोन तीन प्रश्न विचारले. त्याने उत्तर दिलं नाही. मी परत विचारलं तेव्हा त्याने भिंतीकडे तोंड फिरवलं. आता स्ट्रोव्ह येईपर्यंत शांतपणे वाट बघण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. दहा मिनीटांनी स्ट्रोव्ह धापा टाकत आला. मी सांगितलेल्या गोष्टींखेरीज त्याने मेणबत्त्या, मटणाचं सार आणि स्पिरीटचा दिवा आणला होता. मोठ्या लगबगीने वेळ न दवडता त्याने आणलेलं दुध गरम करायला घेतलं. मी त्याचा ताप बघीतला. एकशे चार होता. तो खूपच आजारी होता.

No comments:

Post a Comment