Thursday, February 8, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३८

एक आठवडाभर तरी त्याची आणि माझी गाठ पडली नाही. एके दिवशी संध्याकाळी सात वाजता तो मला जेवायला घेऊन गेला. त्याने शोकप्रदर्शक कपडे केले होते. बाऊलर हॅटवर मोठी काळी फित लावली होती. त्याचा रुमालसुद्धा काळ्या किनारीचा होता. त्याच्या त्या शोक प्रदर्शक वेषावरून असं वाटत होतं की जगातील त्याचे यच्चयावत नातेवाईक अगदी बायकोकडचे धरून एखाद्या अस्मानी आपत्तीला एका फटक्यात बळी पडले असावेत. पण त्याचं गुबगुबीत शरीर आणि गुलाबी गोबरे गाल त्याच्या काळ्या वेषाशी विसंगत दिसत होते. त्याने अगदी काटेकोरपणे केलेल्या शोकप्रदर्शक वेषामुळे तो या गंभीर प्रसंगात एखाद्या विदूषकासारखा दिसत होता. हा आचरटपणा म्हणावा की दैवाने केलेली क्रूर चेष्टा ते मला कळत नव्हतं.
मी सुचवल्याप्रमाणे इटलीला जाण्याऐवजी त्याने हॉलंडला जायचं ठरवलं आहे असं त्याने मला सांगितलं.
‘‘मी उद्याच निघणार आहे. आपली बहुधा पुन्हा भेट होणार नाही.’’
मी उत्तरादाखल काहीतरी बोलायचं म्हणून बोललो आणि म्लान चेहेऱ्याने बळेच हसलो.
‘‘मी गेल्या पाचएक वर्षात घरी गेलेलो नाही. सगळं विसरलो आहे असं वाटतं. इतकी वर्ष वाड-वडिलांच्या घरापासून एवढ्या लांब राहिल्यामुळे मला परत जायला थोडं कसं तरी वाटत होतं. पण ते केवळ एक निमित्त होतं.’’
तो खूपच हळवा झाला होता. त्याला त्याच्या आईच्या आठवणी आल्या. इतकी वर्ष आपला उपहास तो आनंदाने सहन करायचा. पण ब्लांशने त्याच्याशी प्रतारणा केल्यापासून त्याला ते सहन होईना. टिंगल टवाळी हसण्यावर नेणं यापुढे त्याला शक्य झालं नसतं. त्याने मला त्याचं वडिलोपार्जित लहानसं सुंदर घर, प्रेमळ, लाड पुरवणारी आई, तिची टापटीपीची आवड या बद्दल बऱ्याच गोष्टी तपशीलवार सांगितल्या. त्याचे वडिल आता खूप म्हातारे झाले होते. आयुष्यभर केलेल्या मेहनतीने त्यांच्या हाताला घट्टे पडले होते. संध्याकाळी ते त्याच्या आईला आणि बहिणीला मोठ्याने वर्तमानत्र वाचून दाखवत. बातम्या ऐकता ऐकता त्या दोघींचं शिलाईयंत्रावर बसून काहीतरी शिवणकाम चालू असे त्यात त्यांना खंड पाडायचा नसे. त्या छोट्याशा गावात काहीच घडत नसे. झपाट्याने पुढे जाणाऱ्या संस्कृतींच्या शर्यतीतून ते गाव केव्हाच पार मागे पडले होते. आयुष्यभर इमाने इतबारे काबाडकष्ट करणाऱ्यांना मित्रासमान वाटणाऱ्या मृत्युने गाठे पर्यंत वर्षामागून वर्ष निघून जायची.
‘‘माझ्या वडिलांची मी त्यांच्यासारखं सुतारकाम शिकावं अशी इच्छा होती. आमच्या घराण्यात पाच पिढ्या सुतारकाम आहे. बापाने आपली कला मुलाला शिकवावी, मुलाने इकडे तिकडे न बघता बापाच्या पावलावर पाऊल टाकावं. जीवनाची इतिकर्तव्यता झाली असं म्हणतात ती कदाचित यातच असावी. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला आमच्या शेजारी राहणाऱ्या गाडीकाम करणाऱ्याच्या मुलीशी लग्न करायचं होतं. ती निळ्या डोळ्यांची दोन शेपट्यांची वेणी घालणारी लहान मुलगी होती. एव्हाना आम्हाला एखादा मुलगाही असता आणि आज तो हाताशी आला असता.’’
स्ट्रोव्हने सुस्कारा सोडला आणि तो गप्प झाला. असं असतं तर काय झालं असतं याचं चित्र तो मनात रंगवत होता. त्या ग्रामिण जीवनातील सुरक्षितता नाकारून शहरात आल्याला बराच काळ लोटला होता. त्याच ग्रामीण जीवनाची आता त्याला ओढ वाटू लागली होती.
‘‘हे जग मोठं निष्ठुर असतं. आपण येथे कोठून आलो आहोत, का आलो आहोत, कुठे जाणार आहोत हे कोणालाही माहित नसतं. त्यामुळे आपण नेहमी नम्र असलं पाहिजे. शांततेतील सौंदर्य पाहता आलं पाहिजे. आयुष्याला आपण इतकं सरळ साधेपणे सोमोरं गेलं की दैवाच्याही ते लक्षात येणार नाही. सर्वसामान्यांचं प्रेम आपल्याला मिळेलं असं आपलं वर्तन असलं पाहिजे. त्यांचं अज्ञान कित्येक वेळा आपल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असतं. आपण सगळ्यांनी आपापल्या वाटेला आलेलं आयुष्य तसंच शांत, हळुवारपणे, कोणाला न दुखवता व्यतित केलं पाहिजे. त्यातच जीवनाचं शहाणपण असतं.’’
मला मात्र हे दुबळेपणाचं लक्षण वाटलं. संसाराचा परित्याग वगैरे गाष्टींच्या मी ठाम विरोधात आहे. पण माझं मत मी माझ्यापाशीच ठेवलं.
‘‘आपण चित्रकार आहोत याच्याबद्दल तुला काय वाटतं?’’
त्याने खांदे उडवले.
‘‘माझी चित्रकला बरी होती. मला शाळेत बक्षीसं मिळायची. माझ्या आईला माझं फार कौतूक होतं. तिने मला जलरंगाची एक पेटी आणून दिली होती. तिने माझी रेखाचित्रं आमच्या गावातील चर्चचा पॅस्टर, डॉक्टर आणि जजला दाखवली. त्यांनी मला शिष्यवृत्तीसाठी अ‍ॅमस्टरडॅमला पाठवलं. आणि मला ती शिष्यवृत्ती मिळालीही. तिला बिचारीला माझा प्रचंड अभिमान वाटला. मला अ‍ॅमस्टरडॅमला पाठवताना तिला अतिशय वाईट वाटत होतं. पण तिने हसून तिचं दु:ख लपवलं. तिचा मुलगा एक कलाकार होणार म्हणून ती आनंदित झाली होती. त्यांनी पोटाला चिमटा काढून माझं शिक्षण पुरं केलं. माझं चित्र जेव्हा पहिल्यांदाच प्रदर्शनात लागलं तेव्हा माझे वडिल, आई आणि बहीण अ‍ॅमस्टरडॅमला आले होते. माझं चित्र बघून तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.’’ त्याचे डोळे पाणावले.
‘‘आमच्या घराच्या प्रत्येक भिंतीवर माझी चित्रं सोनेरी फ्रेम करून लावलेली आहेत.’’
त्याची छाती अभिमानाने भरून आली होती. मला त्याने इटलीमधील सायप्रस आणि ऑलीव्हच्या झाडांच्या पार्श्वभूमीवर काढलेली शेतकऱ्यांची छान छान चित्रं आठवली. सोनेरी रंगाच्या जाड-जूड लाकडी फ्रेममधील ती चित्रं एका शेतकऱ्याच्या घरात कशी दिसत असतील असा विचार माझ्या मनात आला.
‘‘आईच्या मनाप्रमाणे मी चित्रकार झाल्यावर तिला बिचारीला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल. पण कदाचित माझ्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी जर साधा सुतार झालो असतो तर आज मी जास्त सुखी असतो.’’
‘‘कलेमुळे आयुष्यात काय मिळतं काय गमवावं लागतं हे आता तुला चांगलं ठाऊक झालं आहे. आता आहे हेच पुढे चालू ठेवणार आहेस की दुसरं काही करण्याचा विचार आहे. दुसरं काही केलंस तर कलेमुळे तुला जे काही मिळालं आहे ते गमावल्यासारखं वाटेल का?’’
‘‘कलेतून जे समाधान मिळतं तसं समाधान जगात दुसऱ्या कशातूनही मिळणं शक्य नाही.’’ तो थोडा वेळ विचार करून बोलला.
त्याने माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहिली. बोलावं की नाही असा विचार करून तो म्हणाला:
‘‘मी स्ट्रिकलँडला भेटलो ते तुला माहित आहे का?’’
‘‘एवढं झाल्यावर तू त्याला भेटायला गेलास?’’
मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मला वाटलं होतं की तो आयुष्यात त्याचं तोंडही बघणार नाही. स्ट्रोव्ह कसंनुसं हसला.
‘‘माझं स्वाभिमानाचं भान इतरांपेक्षा थोडंसं कमी आहे हे तुला ठाऊक आहेच.’’
‘‘तुला म्हणायचंय तरी काय?’’

त्याने मला एक गोष्ट सांगितली.

1 comment:

  1. वाह , खूपच हळुवार आहे प्रकरण ... 👌👍💐

    ReplyDelete