Thursday, February 1, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २२

मी पॅरीसमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर नाटक लिहायला घेतलं. माझा नियमित दिनक्रम असा होता. सकाळी उठून काम करायचं. दुपारी लक्झेम्बर्ग बागेतून फेरफटका नाहीतर रस्त्यातून भटकणे. मी लूवर म्युझियममख्ये खूप वेळ घालवयाचो. इतर कोणत्याही आर्ट गॅलेरीपेक्षा लुवरमध्ये घरच्यासारखं वाटे. शिवाय कोणत्याही गोष्टीवर विचार करत बसायचं असेल पॅरीसमध्ये त्याच्या एवढी चांगली जागा दुसरी नाही. कधी कधी मी बोटीच्या धक्कयावर जाऊन रेंगाळत असे, तर कधी जुन्या पुस्तकांच्या दुकानात. पुस्तक विकत घ्यायचं नसलं तरीही पुस्तक चाळत एखाद दुसरं पान वाचायचो. मोठमोठ्या लेखकांशी आपण होऊन ओळख करून घ्यायला मला आवडत असे. ओळख वरवरची असली तरी मला चालायचं. संध्याकाळ मी मित्रांच्या भेटी गाठी घेण्यात घालवत असे. अधून मधून स्ट्रोव्ह दांपत्याकडे फेरी असायची. कधी कधी त्यांच्या पाहूणचाराचा लाभ मिळे. डर्क स्ट्रोव्हला इटालियन पदार्थ करायला खूप आवडायचं आणि ते बनवताना त्याचा उत्साह उतू जात असे. त्याची स्पाघेत्ती त्याच्या पेंटींगपेक्षा खूप चांगली असायची हे मला कबूल केलं पाहिजे. एकदा त्याने मला शाही मेजवानी दिली. टॉमेटो घालून केलेली रसाळ स्पाघेत्ती, घरी भाजलेला पाव आणि रेड वाईनची बाटली. मजा आली. ब्लांश स्ट्रोव्हची आणि माझी चागंली दोस्ती जमली. तिच्यासारखा मीही इंग्लीश होतो. तिच्या परीचयाच्या माणसांमध्ये इंग्लीश माणसं फारशी नव्हती. त्यामुळे मी भेटल्यावर तिला खूप आनंद होत असे. ती दिसायला साधी असली तरी छान दिसायची. पण ती आपणहोऊन फारशी बोलत नसे, बहुधा गप्पच राही. त्याचं कारण मला कळलं नव्हतं. त्यामुळे ती काही तरी लपवत असावी अशी मला नेहमी शंका येई. कदाचित तिच्या नवऱ्याच्या बडबड्या आणि नको इतक्या मोकळ्या स्वभावाच्या तुलनेत ती अबोल वाटत असावी असा विचार मी केला. डर्क अगदी खाजगी वैयक्तिक गोष्टीसुद्धा कसलाही आडपडदा न ठेवता सांगत असे. त्यामुळे ती कधी कधी अडचणीत येई. एकदा त्याने जुलाबाचे औषध घेतलं होतं. ती नको म्हणत असतानासुद्धा ती गोष्ट त्याने मला अगदी तपशीलवार सांगितली तेव्हा मात्र तिचा चेहेरा शरमेने लाल झाला होता. स्वत:च्या फजितीच्या गोष्टीसुद्धा तो एकदम गंभीरपणे सांगत असे. अशा वेळी कितीही केलं तरी मला हसू आवरत नसे. त्यामुळे ती अधिकच वैतागत असे.
“स्वत:चं हसं करून घ्यायला तुम्हाला आवडतं तरी कसं,” ती म्हणाली.
त्याचे डोळे आणखी मोठे झाले. ती रागावली आहे हे लक्षात आल्यावर त्याने भुवया वर केल्या.
“लाडके, तुला त्रास झाला का? मी पुन्हा घेणार नाही. मला जरा अपानवायुचा त्रास होतो म्हणून मी घेतलं. माझं बैठं काम आहे. त्यातच मी व्यायामसुद्धा करीत नाही. तीन दिवस मी ...”
“कृपा करून जरा गप्प बसता का?” तिने मध्येच थांबवलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
त्याचा चेहेरा पडला. रागे भरलेल्या मुलासारखे त्याने ओठ मुडपले. मी मध्ये पडावं या उद्देशाने त्याने माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. पण माझा नाईलाज झाला आणि मी खो खो हसू लागलो.
एके दिवशी आम्ही एका चित्रविक्रेत्याकडे गेलो. त्याच्याकडे स्ट्रिकलँडची दोन तीन पेंटींग असावीत अशी अटकळ होती आणि त्या निमीत्ताने ती बघता आली असती. पण त्याच्याकडे गेल्यावर आम्हाला कळलं की स्ट्रिकलँड ती पेंटींग परत घेऊन गेला होता. परत घेऊन जाण्याचं कारण त्याने विक्रेत्याला सांगितलं नव्हते.
“ती पेंटींग माझ्या दुकानात ठेवल्याने मला काही फायदा होण्याची शक्यता नव्हती. मस्य स्ट्रोव्हनी आग्रह केला म्हणूत ती मी ठेऊन घेतली होती. म्हटलं बघू या प्रयत्न करून. पण खरं सांगायचं तर ...” त्याने डोकं हलवलं. “तरूण कलाकारात मला रस आहे. पण वोयाँ, आता तुम्हीच बघा, मस्य स्ट्रोव्ह, या स्ट्रिकलँडमध्ये तुम्हाला काय सापडलं मला कळत नाही.”
“मी लिहून देतो. स्ट्रिकलँडच्या तोडीचा एकही चित्रकार मला आजवर आढळलेला नाही. माझी खात्री आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या हातातील संधी निसटून जाईल. तुमच्या दुकानात ठेवलेल्या सगळ्या पेंटींगची एकत्र मिळून जेवढी किंमत येणार नाही तेवढी याच्या एका पेंटींगला येईल. एके काळी मॉनेच्या पेंटींगला शंभर फ्रँकसुद्धा येत नसत. आज त्याच्या पेंटींगची किंमत कुठे गेली आहे ते तुम्ही पहातच आहात.”
“तुम्ही म्हणता ते खरं आहे. मॉनेची पेंटींग विकली जात नव्हती तेव्हा आणखी शेकडो कलाकार होते. आज मॉनेच्या पेंटींगची किंमत आकाशाला भिडली असेल पण मॉने सोडला तर त्याच्या वेळच्या इतर कलाकारांच्य पेंटीगना अजूनही कोणी विचारत नाही. यशस्वी होण्यासाठी फक्त गुणवत्ता हा एकच निकष पुरेसा नसतो. तुम्हाला आता पटणार नाही. तुमच्या मताला मी मान देतो. पण तुमच्या या मित्राची गुणवत्ता अजून सिद्ध व्हायची आहे. स्ट्रिकलँडची तारीफ मस्य स्ट्रोव्ह सोडून दुसऱ्या कोणी केलेली अजून तरी माझ्या कानावर आलेली नाही.”
“गुणवत्ता कशी ओळखता येते असं तुमचं म्हणणं आहे?” डर्कचा चेहेरा रागाने लाल झाला होता.
“यश. हा एकच मार्ग आहे गुणवत्ता ओळखण्याचा.”
“हा अगदीच असंस्कृतपणा आहे..”
“मागे होऊन गेलेल्या महान चित्रकारांचं उदाहरण घेऊ या. राफाएल, मायकेल अँजेलो, इनग्रेस, दलाक्रवा ... हे सगळे चित्रकार यशस्वी होते.”

“चला, आपण येथून सटकलेलं बरं,” स्ट्रोव्ह मला म्हणाला. “नाहीतर माझ्या हातून याचं डोकं फुटेल.”


Artist: Paul Gauguin
Title: Le Mur mitoyen, ou Le Verger, Party Wall, Date: 1881
Medium: oil on canvas, Dimensions: 30.5 × 47 cm (12 × 18.5 in)
Current location: Private collection, Source: wikidata:Q37693

1 comment: