Wednesday, January 31, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २१

त्याच्या पसंतीच्या रेस्तोराँमध्ये आम्ही गेलो. वाटेत मी वर्तमानपत्र घेतलं. आम्ही जेवण मागवलं. सँ गामिएची बाटली समोर ठेऊन वर्तमानपत्राचा अंक उघडून मी वाचायला सुरवात केली. आम्ही शांतपणे जेवलो. तो अधे-मधे माझ्याकडे बघत होता ते मला जाणवत होतं पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. संभाषणाला सुरवात त्याने करावी असा माझा प्रयत्न होता.
“वर्तमानपत्रात काही खास बातमी?” आमचं जेवण संपता संपता त्याने विचारलं.
त्याच्या आवाजावरून तो किंचीत चिडून बोलत असावा असा मला संशय आला आणि आतून फार बरं वाटलं.
“मला नाटकाची परीक्षणं वाचायला आवडतात.” मी म्हटलं आणि वर्तमानपत्राची घडी करून ते बाजूला ठेवलं.
“जेवण छान होतं.”
“कॉफी इथेच घेतली तर बरं होईल नाही का?”
“चालेल.”
आम्ही सिगार शिलगावल्या. मी शांतपणे धुम्रपान करत होतो. अधून मधून तो माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसत होता. मला कसलीच घाई नव्हती.
“आपण मागे भेटलो होतो त्यानंतर तू काय करत होतास?” सरते शेवटी त्याने विचारलं.
सांगणयासारखं माझ्याकडे काही नव्हतं. थोडी मेहनत, थोडं साहस, थोडी गंमत. इकडे तिकडे केलेली मुशाफिरी. साहित्य आणि साहित्यिकांचे आलेले चार अनुभव. स्ट्रिकलंडला त्याच्याबद्दल चुकुनही काही विचारायचं नाही याची मी मुद्दाम काळजी घेत होतो. तो काय करत होता याच्यात मी आता पर्यंत अजिबात रस दाखवला नव्हता. शेवटी माझ्या चिकाटीला फळ आलं. त्याने स्वत:विषयी बोलायला सुरवात केली. स्वत:चं मन नीट व्यक्त करताना त्याला जमत नव्हतं. गेल्या पाच वर्षात त्याने कोणत्या हालअपेष्टा भोगल्या हे नीट कळण्यासाठी मला त्याच्या तुटक बोलण्यातील गाळलेल्या जागा अंदाजाने भराव्या लागल्या. तो कसा आहे हे जाणून घेण्यात एक लेखक म्हणून मला रस होता. त्यासाठी तर मी मुद्दाम थांबलो होतो. पण ते असं तुकड्या तुकड्याने अर्घवट हाती लागत होतं. त्यामुळे माझी निराशा झाली. त्याचं बोलणं ऐकणं आणि त्याचा अर्थ लावणं म्हणजे एखादं फाटलेलं हस्तलिखीत वाचण्यासारखं ते होतं. त्याला पावला पावलावर कडा संघर्ष करावा लागला होता. इतरांना जे भयंकर कष्टप्रद वाटलं असतं त्याचं त्याला काहीच वाटलं नव्हतं. स्ट्रिकलँड कोणत्याही सुखसोईंच्या बाबतीत अगदी उदासीन असे. या दृष्टीने तो इतर इंग्लीश लोकांच्या तुलनेत फार वेगळा होता. घाणेरड्या जागेत रहायचं त्याला काहीच वाटत नसे. आपल्या अवती भोवती छान छान गोष्टी असण्याची गरज त्याला वाटत नसे. तो रहात होता त्या खोलीच्या वॉलपेपरचे पोपडे उडाले आहेत हे त्याच्या लक्षातही आलं नव्हतं. बसण्यासाठी खुर्चीची गरज त्याला पडत नसे. एका बारक्याश्या किचन स्टूलवर त्याचे काम भागत असे. त्याची भूक चांगली होती. पण ताटात काय आहे याची त्याला फिकीर नसे. समोर अन्न आले की ते ग्रहण करणे मग ते काहीही असो, नसले तरी चालेल. सहा महिने त्याने फक्त दूध पाव खाऊन काढले होते. त्याच्या विषयवासना तीव्र होत्या. तरीही तो स्त्रियांच्या बाबतीत उदासीन असायचा. एकांतवासाने त्याचे हाल होत नसत. ज्या फकिरी बाण्याने तो जगत होता त्याचे कौतुकच केले पाहिजे.
लंडनवरून येताना आणलेले थोडेफार पैसे संपल्यावर त्याचे हाल कुत्रा खाईना. त्याचं एकही पेंटींग विकलं गेलं नव्हते. पैसे मिळवण्यासाठी म्हणून त्याने दुसरे मार्गही चोखाळून पाहिले. पॅरीसच्या रंगेल रात्रींची सफर करायला लंडनमधून येणाऱ्या खेडवळ प्रवाशांचा गाईड म्हणून त्याने थोडे दिवस काम केलं होतं, हे एकदा त्याने मला विषादाने सांगितलं. हे काम त्याच्या कुचेष्टेखोर स्वभावाला साजेसे होते. एव्हाना पॅरीसच्या त्या कुप्रसिद्ध भागाची त्याला चांगलीच माहिती झाली होती. कायद्याने बंदी असलेल्या गोष्टी करण्यात रस असलेला कोणी इंग्लीशमन मिळतो का ते शोधताना एकदा त्याला बुलेवार द ला मॅदलीनवर रात्र काढावी लागली होती. एकदा नशीबाने त्याला लंडनहून जीवाचं पॅरीस करायला आलेल्या पाच सहा मित्रांच टोळकं मिळालं पण त्याच्या अवताराकडे बघून त्या मंडळींनी पळ काढला. त्याच्यावर विश्वास ठेऊन तो नेईल तिकडे त्याच्या मागोमाग जाण्याचं धाडस करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. त्यानंतर त्याला इंग्लाडला निर्यात करायच्या औषधांच्या लेबलांवरील फ्रेंच मजकुराचं इंग्लीश भाषांतर करण्याचं काम मिळालं. पॅरीसमधील कामगारांच्या संपात त्याने घरांना रंग लावण्यासाठी हातात ब्रश घ्यायला मागे पुढे पाहिलं नाही.
ते काहीही असलं तरी त्याच्या चित्रकलेत खंड पडला नव्हता. स्टुडियोचा कंटाळा आल्याने तो घरीच काम करीत असे. कॅनव्हास आणि रंग घ्यायला लागणाऱ्या पैशात त्याने कधीच काटकसर केली नाही. खरं पाहाता त्याला दुसरं काहीच लागत नसे. त्याला चित्र रंगवताना खूप अडचणी येत. पण दुसऱ्याची मदत घ्यायला तो कधीच तयार नसे. त्यामुळे ज्या तांत्रिक अडचणींवर मागच्या पिढीतील चित्रकारांनी अगोदरच मात केली होती अशा साध्या साध्या गोष्टीतून स्वत:च चुकत माकत शिकायला त्याला खूप वेळ लागत असे. त्याला काही तरी साधायचं होतं. काय ते मला कळलं नाही. त्यालासुद्धा ते कितपत माहित होतं याची शंकाच आहे. तो कशाने तरी झपाटलेला असावा हे जे माझं पहिलं मत होतं ते कायम झालं. तो जे काही करायचा त्याने त्याचं डोकं ठिकाणावर आहे असं कोणाला वाटलं नसतं. स्वत:ची चित्रं दुसऱ्याला दाखवून त्याचं मत विचारण्यात त्याला रस नसायचा. कारण त्याला स्वत:लाच ती फारशी आवडत नसावीत. तो स्वप्नांच्या दुनियेत विहार करत असावा. वास्तवाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. मला असं वाटायचं की पेंटींग करताना त्याच्यातील हिंस्रपणा उफाळून वर येत असावा. अंतर्दृष्टीला जे दिसत आहे ते सर्व कॅनव्हासवर उतरवण्याच्या नादात तो सर्वस्व विसरून स्वत:ला झोकून देत असावा. ते एकदा संपलं की तो ते पेंटींगही विसरून जात असला पाहिजे. मला वाटतं की त्याने क्वचितच त्याचं पेंटींग पूर्णत्वाला नेलं असेल. निर्मितीच्या उर्जेची ज्वाला विझून गेल्यावर त्याचा त्या निर्मितीतील रस संपून जात असावा. त्याने जे केलं त्याने त्याचे कधीही समाधान होत नसले पाहिजे. अंत:चक्षूंना दिसणाऱ्या पेंटींगसमोर कॅनव्हासवर उतरलेलं पेंटींग त्याला कस्पटासमान वाटत असे.
“तू तुझी पेंटींग प्रदर्शानात का पाठवत नाहीस? आपल्या पेंटींगबद्दल दुसऱ्यांना काय वाटतं ते आपल्याला कळावं असं तुला वाटत नाही काय?”
“तुला वाटतं?”
या दोन शब्दातून त्याने जी तुच्छता व्यक्त केली होती त्याला तोड नव्हती.
“तुला प्रसिद्धी नको आहे का? प्रसिद्धी ही एक गोष्ट अशी आहे की कोणताही कलाकार तिच्यापासून फार काळ उदासीन राहू शकत नाही.”
“लहान मुलासारखं बोलू नकोस. एका फालतू माणसाच्या मताला मी जेथे किंमत देत नाही तेथे अनेक फालतू लोकांची गर्दी झाली म्हणून मी त्यांच्या मताला किंमत द्यावी हे कितपत योग्य आहे.”
“तुझं डोकं उलटंच चालतं हे मात्र खरं आहे.”   
“प्रसिद्धी कोणाला मिळत नाही? समीक्षक, लेखक, शेअर बाजारातील दलाल, स्त्रिया.”
“जी माणसं तुला ओळखत नाहीत अशांनी तुझी पेंटींग पाहिली आणि त्यांना काही वाटलं, त्यांच्या भावना उचंबळून आल्या तर तुला समाधान वाटणार नाही का? लोकांच्या मनावर राज्य करायला सगळ्यांनाच हवं असतं. आपला प्रभाव दुसऱ्यावर पडलेला कोणाला आवडणार नाही?”
“हा शुद्ध भावनांचा खेळ, मेलोड्रामा झाला.”
“तुझी चित्रं चांगली आहेत किंवा वाईट आहेत याने तुला काय फरक पडतो?”
“मुळीच फरक पडत नाही. मला फक्त मला जसं दिसतं तसंच रंगवायचं असतं.”
“समज मी एका समुद्रातील एखाद्या निर्जन बेटावर आहे. तिथे जर माझं लिखाण वाचणारा दुसरा कोणी नसेल तर मला लिहीता येईल असं मला वाटत नाही.”
स्ट्रिकलँड बराच वेळ काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती. जणू काही तो एक अद्भूत अनुभूती घेण्यात मग्न असावा.
“कधी कधी अथांग सागरावरील एखाद्या निर्जन बेटावर मी आहे. तेथील डोंगर, दऱ्या, नदी नाले, चित्रविचित्र झाडेझुडपे, पशुपक्षी, नि:शब्द शांतता मला खुणावत आहेत असं मला वाटतं. मला हवं ते कदाचित तेथे मिळू शकेल कोण जाणे?”
तो जे बोलला ते शब्द प्रत्यक्षात वेगळेच होते. तो विशेषणांच्या ऐवजी हातवारे करून सांगायचा. बोलता बोलता तो मध्येच थांबायचा. बऱ्याच ठिकाणी त्याला काय सांगायचं असावं ते मी माझ्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
“गेल्या पाच वर्षांचा विचार करता जे झालं ते ठीक होतं असं वाटतं का?”
त्याने माझ्याकडे पाहिलं. मी काय म्हणतोय ते त्याच्या ध्यानात आलं नव्हतं असं मला त्याच्या नजरेवरून वाटलं. मी अधिक खुलासा केला.
“तू तुझा सुखी संसार, घर सोडलंस. बऱ्यापैकी पैसे तुझ्या गाठीला होते. इथे पॅरीसमध्ये तू सडत आहेस. जर हा निर्णय घेण्याची परत एक संधी मिळाली तर तू पाच वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होतास तोच निर्णय घेशील?”
“बहुधा.”
“तू अजून तुझी बायको, मुलं यांची काहीच चौकशी केली नाहीस. तुला त्यांची आठवण येत नाही का?”
“नाही.”
“तू एका शब्दापेक्षा जास्त शब्द वापरलेस तर बरं होईल. तुझ्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला आहे त्याचा तुला कधी एक पळभर तरी पश्चाताप वाटला होता का?”
तो किंचीत हसला आणि त्याने मान हलवली.
“मला वाटतं तुला अधून मधून भूतकाळाची आठवण आल्याशिवाय रहात नसावी. मी गेल्या सात आठ वर्षांच्या पूर्वीचा काळाविषयी विचारत नाही. त्याही पूर्वीच्या काळाविषयी, जेव्हा तू तुझ्या बायकोला पहिल्यांदा भेटलास, तुझं तिच्यावर प्रेम बसलं, आणि मग तिच्याशी लग्न केलंस, तिला पहिल्यांदा जेव्हा बाहूपाशात घेतलंस, पहिलं चुंबन घेतलंस.”
“मी भूतकाळाचा विचार करत नाही, फक्त चालू वर्तमानकाळाचा विचार करतो.”
त्याने दिलेल्या उत्तराचा पहिल्यांदा अर्थ लागत नव्हता, पण थोडा विचार केल्यावर त्यात थोडं तथ्य आहे असं वाटू लागलं.
“तू सुखी आहेस का?” मी विचारलं.
“मी सुखी आहे.”
याच्यावर बोलण्यासारखं काही नव्हतं. मी गप्प बसलो आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. त्याने माझ्या नजरेला नजर भिडवली. त्याचे डोळे चमकले.
“मला वाटलं तू माझ्यावर टीका करशील.”
“मूर्खपणा आहे,” मी तात्काळ उत्तर दिलं. “एखाद्या अजगरावर टीका करण्याचा काही उपयोग असतो का? मला फक्त तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते जाणून घेण्यात रस आहे.”
“तू फक्त एक व्यावसायिक साहित्यिक म्हणून माझ्याकडे बघतोयस.”
“होय, एका साहित्यिकाच्या शुद्ध व्यावसायिक दृष्टीकोनातून.”
“तसं असेल तर तू कशाला माझ्यावर टीका करण्यात तुझा वेळ खर्च करशील? तुला फक्त माझी शवचिकित्सा करण्यात रस आहे. तू अगदी भयंकर आहेस.”
“कदाचित म्हणूनच तुझं माझं जमत असावं.” मी टोमणा मारला.
तो कोरडं हसला. त्याच्या हसण्याचं योग्य वर्णन करायला माझ्याकडे शब्द असते तर बरं झालं असतं. त्याचा चेहेरा एक क्षणभर उजळला. त्याचा चेहेरा सहसा गंभीर असायचा किंवा तो कोणाचा तरी उपहास किंवा कुचेष्टा करतोय असं वाटत असायचं. त्याच्या ऐवजी त्याच्या चेहेऱ्यावर हसू फुटायला लागलं होतं. उन्मादाने हसावं तसं. क्रूर नाही आणि प्रेमळही नाही. कामांध, अमानवी वाटेल अश्या त्याच्या त्या भयंकर हास्यामुळे मी त्याला विचारलं:
“तू पॅरीसला आल्यावर कोणाच्या प्रेमात वगैरे पडलास की नाही?”
“तसल्या मुर्खपणाच्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. प्रेम आणि कला या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आयुष्य पुरं पडणार नाही.”
“तुझ्याकडे पाहिलं की तू वैरागी वगैरे असशील असं वाटत नाही.”
“प्रेमासारख्या फालतू गोष्टींची मला किळस वाटते.”
“मनुष्य-स्वभाव म्हणजे एक वैतागच असतो नाही.”
“तू माझ्याकडे बघून असा का हसतोयस?”
“कारण तुझ्यावर माझा विश्वास नाही.”
“तू एक महामूर्ख आहेस.”
त्याचा अंदाज घ्यायला मी थांबलो.
“माझ्याशी असली थापेबाजी करण्यात काय अर्थ आहे?”
“तुला काय म्हणायचंय?”
मी हसलो.
“तुला आता स्पष्टच सांगतो. इतके दिवस मला वाटत होतं की तुझ्या टाळक्यात काही शिरत नसावं. हे सगळं कायमचं संपलंय असा समज तू करून घेतला आहेस. तू इकडे पॅरीसला तुझ्या मनाला येईल तसं वागतोयस. तुला वाटतं की तू आता मुक्त झाला आहेस. तुझे हात आकाशाला भिडले आहेत. पण तसं नाही. अचानक तुझ्या लक्षात येतं की तुझे पाय मातीचेच आहेत. चिखलात लोळायचा तुला झटका आलाय. दारू पिताना तुला भान रहात नाही. वासनेने अंध होईपर्यंत तू दारू ढोसतोस. मग तुला एक बाई सापडते. गावंढळ, सामाजिक दृष्ट्या खालच्या दर्जाची, अशिक्षित आणि मूर्ख, दोन पायाच्या जनावरासारखी. मग तू तिच्या देहावर एखाद्या जंगली श्वापदासारखी झडप घालतोस.”
काहीही न करता अगदी निश्चलपणे तो माझ्याकडे अगदी टक लावून पहात होता. मी त्याच्या डोळ्याला डोळे भिडवले आणि मी त्याच्याशी हळू हळू बोलायला सुरवात केली.
“यात चमत्कारिक काय ते मी तुला सांगतो. हे सगळं संपतं तेव्हा तुला देहाच्या पावित्र्याची आठवण होते. तू आत्म्यासारखा मुक्त विहार करतोस. सौंदर्याच्या अनुभूतीला तू एखादी सैंद्रिय गोष्ट असल्यासारखा स्पर्श करायला जातोस. हवेची झुळूक, पानांची सळसळ, निर्झराची खळखळ यांनी तू मोहरून जातोस. आपण स्वत:च परमेश्वर आहोत असं तुला वाटायला लागतं. हे कसं होतं ते तू मला समजावून सांगू शकशील का?”
माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत त्याची नजर माझ्यावर खिळून होती, ती नंतर बाजूला वळली. त्याचा चेहेरा भकास दिसत होता, पोलीसांच्या कोठडीत अनन्वीत छळाने मृत्यु पावलेल्या कैद्यासारखा. तो गप्प होता. आमचा संवाद संपला हे मला कळलं.

1 comment: