Thursday, February 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५५


डॉ.कोत्राज अवाढव्य शरीराचे एक वयस्कर फ्रेंच गृहस्थ होते. पुढे आलेलं पोट, लालबुंद चेहेरा, पांढरेशुभ्र केस, समाधानाने ओसंडून जाणारे निळे डोळे. त्यांच्याकडे बघताच त्यांची दया येई. त्यांनी आम्हाला घरात घेतलं. त्यांचा दिवाणखाना जुन्या काळातल्या फ्रेंच पद्धतीचा होता. तेथे ठेवलेल्या दोनतीन पॉलीनेशियन शोभेच्या वस्तू घराच्या एकूण फ्रेंच सजावटीत उपऱ्या वाटत होत्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या वागण्यातल्या वरवरच्या आपुलकी मागे असलेला धूर्तपणा लपत नव्हता. त्यांनी कॅप्टन ब्रुनोशी हस्तांदोलन केलं. मादाम ए लेझ आँफाँ, मॅडम आणि त्यांच्या मुलांची नम्रतेनी विचारपूस केली. स्थानिक बातम्या, खोबरं आणि व्हॅनिलाचं पीक अशा गोष्टींवर गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही माझ्या भेटीच्या प्रयोजना विषयी बोलायला सुरूवात केली.
डॉ.कोत्राजांनी जे सांगितलं ते मी त्यांच्या शब्दात न देता माझ्या शब्दात देण्याचा प्रयत्न करणार नाही कारण ते ज्या उत्साहाने सांगत होते ते माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत नीट पोचवणं कठीण आहे. त्यांचा धीरगंभीर आणि खर्जातला आवाज त्यांच्या भव्य देहयष्टीला शोभणारा होता. शिवाय त्यांना नाट्यमयतेची देणगी होती. त्यांचं बोलणं ऐकणं म्हणजे एखादं नाटक बघण्यासारखं होतं आणि तेसुद्धा आपण नेहमी पाहतो त्या नाटकांपेक्षा कितीतरी चांगलं. त्याचं असं झालं की एक दिवस डॉ.कोत्राज गावातील एका म्हाताऱ्या मुखियाला तपासण्यासाठी गेले होते. मग त्यांनी ती सगळी कहाणी सांगितली. मुखियाला तपासताना एक जाडी म्हातारी बाई काळ्या लोकांच्या गर्दीत एका मोठ्या पलंगावर धूम्रपान करत पहुडली होती. तपासून झाल्यानंतर ती डॉक्टरांना जेवणासाठी बाजूच्या खोलीत घेऊन गेली. कच्चे मासे, तळलेली केळी आणि कोंबडी - क्वी सेज - आणि जे काही असेल ते. आँदिजेन – स्थनिक आदिवासी लोकांचं नेहमीचं जेवण. ते जेवत असताना त्यांना एक रडवेली लहान मुलगी दरवाजाआडून त्यांच्याकडे बघताना दिसली. तेव्हा त्याला काही वाटलं नाही, पण नंतर ते त्यांच्या घोडागाडीत बसून घरी जायला निघाले तेव्हा त्यांना ती पुन्हा दिसली. ती एका बाजूला उभी राहून त्यांच्याकडे दु:खद नजरेने बघत होती. तिचे गाल अश्रूंनी भिजले होते. त्यांनी कोणाला तरी तिला काय झालं म्हणून विचारलं. तिच्या घरातला एक गोरा मनुष्य आजारी आहे. त्याला तपासायला याल का हे विचारायला ती जंगलाच्या अंतर्भागातून खूप लांबून आली होती. त्यांनी तिला डॉक्टरांना त्रास देऊ नकोस म्हणून सांगितलं होतं म्हणून ती गप्प होती. त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि तिला काय पाहिजे म्हणून आपण होऊन विचारलं. तिनं सांगितलं की तिला आटाने पाठवलं आहे. आटा हॉटेल डी ला फ्लाऊ मध्ये पूर्वी काम करत होती म्हणून त्यांना माहित होती. तिने डॉक्टरांना तिच्या घरातील रेड वनला तपासायला बोलावलं होतं. तिने त्याच्या हातात वर्तमानपत्राच्या कागदाची एक पुडी दिली. त्यांनी ती पुडी उघडली. त्यात शंभर फ्रँकची एक चुरगळलेली नोट होती.
‘‘हा रेड वन कोण आहे?’’ त्यांनी शेजारच्या माणसाला विचारलं.
त्याने सांगितलं की तो एक इंग्लीश माणूस आहे. तो चित्रकार असून तो आटाबरोबर त्या जंगलात राहतो. त्याचं घर तेथून सुमारे सात एक किलोमीटरवर आहे. त्याने केलेल्या वर्णनावरून तो स्ट्रिकलँड आहे हे डॉक्टरांना कळून चुकलं. पण तेथे जायचं तर चालतच जाणं भाग होतं. त्यांना स्वत:ला तेथे जाणं कठीण असल्यामुळे त्यांनी त्या मुलीला परत पाठवलं.
‘‘मी खरं सांगतो,’’ डॉक्टर माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘खराब रस्त्यावरून चौदा किलोमीटरचा पायी प्रवास करायची मला भिती वाटली, मी त्याच रात्री पपीएतला परत येऊ शकेन याचा खात्री नव्हती. शिवाय स्ट्रिकलँडचं आणि माझं जमत नसे. तो एक आळशी आणि नालायक इसम होता. आमच्या सगळ्यांप्रमाणे मेहनत करून स्वत:ची रोजीरोटी कमावण्याऐवजी तो त्या स्थानिक आदिवासी मुलीच्या जीवावर पोट भरत होता. माँ द्यू - अरे देवा, एक दिवस असामान्य प्रतिभावान कलाकार म्हणून जगभर त्याची किर्ती पसरणार आहे हे मला कळायला काही मार्ग नव्हता. तो माझ्याकडे येऊ शकेल का? मी त्या मुलीला विचारलं. त्याला काय झालं आहे, काय त्रास होतो वगैरे चौकशीही केली. ती काही बोलेना. मी खोदून खोदून विचारलं तर ती खाली बघून रडायला लागली. मी खांदे उडवले. शेवटी मला माझं कर्तव्य पार पाडणं भाग होतं. मी तिला रागानेच रस्ता दाखवायला सांगितलं.’’
ते जाऊन पोचले तेव्हासुद्धा गुश्यातच होते. शिवाय जंगलवाटेने केलेल्या पायपीटीने घामाघूम आणि तहानेने व्याकुळ झाले होते. आटा अर्ध्या रस्त्यात येऊन त्यांची वाट बघत होती.
‘‘मला अगोदर पाणी द्या, तहानेने माझा जीव चाललाय. पुअर लामूर द द्यू - कृपा करून मला एक शहाळं द्या.’’
तिने हाक मारताच एक मुलगा धावत आला. तो सुरकन झाडावर चढला आणि त्याने दोन तीन शहाळी खाली टाकली. आटाने एका शहाळ्याला भोक पाडलं आणि डॉक्टरांना दिलं. शहाळ्याचे पाणी घटाघटा पिऊन एक सिगारेट शिलगावल्यावर त्यांच्या जीवात जीव आला.
‘‘रेड वन कुठे आहे.’’
‘‘ते घरात चित्र काढत आहेत. तुम्ही येणार ते मी त्यांना सांगितलं नव्हतं. आत जा आणि त्यांना तपासा.’’
‘‘त्यांची तक्रार तरी काय आहे? त्यांना जर चित्र काढण्याइतकी ताकद असेल तर तारावाओला यायला त्यांना काय धाड भरली होती. एवढी पायपीट करण्याचा माझा त्रास तरी वाचला असता. त्यांच्या वेळेपेक्षा माझ्या वेळेला कमी किंमत आहे अशातला भाग नाही.’’
आटा एक शब्दही बोलत नव्हती. पण त्या मुलाच्या पाठोपाठ ती घराच्या दिशेने गेली. ज्या मुलीने डॉक्टरांना बोलावून आणलं ती व्हरांड्यात बसली होती. तिथे एक म्हातारी बाई भिंतीला टेकून विड्या वळत बसली होती. आटाने दरवाजाकडे बोट दाखवलं. डॉक्टरांना त्यांच्या विचित्र वागण्याचा अर्थ कळेना. ते आत गेले. स्ट्रिकलँड पॅलेट साफ करत होता. इझलवर एक कॅनव्हास होता. कंबरेला फक्त परेओ गुंडाळलेला होता. तो दरवाजाकडे पाठ करून उभा होता. बुटांचा आवाज ऐकताच तो मागे वळला. त्याच्या नजरेत वैतागल्याचं चिन्ह दिसत होतं. डॉक्टरांना बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्यांचं असं अचानक येणं त्याला आवडलेलं दिसलं नाही. डॉक्टर त्याच्याकडे निरखून बघत होते. त्यांचे पाय जमिनीला खिळले. त्यांनी एक सुस्कारा सोडला. त्यांना असं काही बघायला मिळेल याची अपेक्षा नव्हती. त्यांचा भयाने थरकाप उडाला.
‘‘तुम्ही कोणत्याही औपचारीकतेशिवाय आलात,’’ स्ट्रिकलँड म्हणाला. ‘‘बोला, काय सेवा करू?’’
डॉक्टरांनी स्वत:ला सावरलं. खूप प्रयत्नाने त्यांच्या तोंडातून शब्द फुटला. त्यांचा सगळा राग गेला. ए बियाँ, ओई, जू ने ले नी पा - मला त्याची कींव आली हे मी नाकारत नाही.
‘‘मी तारावाओला एका रोग्याला तपासायला आलो होतो. आटाने मला तुम्हाला तपासण्यासाठी बोलवून घेतलं.’’
‘‘ती वेडी आहे. माझं थोडं अंग दुखत होतं, थोडा ताप होता, त्यात काय एवढं घाबरायचं. जाईल तो. पुढच्या खेपेला कोणी पपीएतला जाणारा असला तर थोडंसं क्विनाईन मागवून घेणार होतो.’’
‘‘तुम्ही जरा आरशात स्वत:कडे नीट पाहा.’’
स्ट्रिकलँड हसला आणि भिंतीवर लावलेल्या लाकडी फ्रेममधील पारा उडालेल्या आरशात स्वत:चं प्रतिबिंब पाहिलं.
‘‘ठीक तर आहे.’’
‘‘तुमच्या चेहेऱ्यात झालेला विचित्र बदल तुम्हाला दिसत नाही का? तुमचा चेहेरा सुजवट दिसत आहे. तुम्हाला कसं सांगू. वैद्यकीय पुस्तकात याला सिंहाचा चेहेरा असं म्हणतात. माँ पुअर अ‍ॅमी, माझ्या मित्रा, तुम्हाला एक भयंकर रोग झाला आहे.’’
‘‘मला?’’
‘‘तुम्ही निरखून पाहिलंत तर महारोग्याच्या चेहेऱ्यावर दिसतात तशी चिन्हं तुम्हाला तुमच्या चेहेऱ्यावर दिसतील.’’
‘‘तुम्ही मस्करी तर करत नाही?’’
‘‘देवा ही मस्करी असती तर किती बरं झालं असतं.’’
‘‘मला महारोग झालाय असं तर तुम्हाला म्हणायचं नाही?’’
‘‘दुर्दैवाने त्यात काही संशय नाही.’’
डॉक्टर कोत्रासनी बऱ्याच जणांच्या मृत्युचं भाकित केलं होतं. ते सांगताना भितीने अंगावर जो काटा उभा रहातो त्याच्यावर मात त्यांना करणं जमलं नव्हतं. तो दुर्दैवी माणूस नकळत त्याच्या तुलनेत निरोगी असलेल्या डॉक्टरांशी स्वत:ची तुलना करतो. मृत्यु त्याच्या समोर उभा ठाकलेला असतो तर डॉक्टर जीवनाचा आनंद लुटत असतात. डॉक्टर नेहमीच अशा लोकांच्या तिरस्काराचे आणि क्षोभाचे धनी होतात. स्ट्रिकलँडने त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं. त्या भयंकर रोगाने दडदडीत झालेल्या त्याच्या चेहेऱ्यावर भावनांचा लवलेशही दिसत नव्हता.
‘‘त्यांना माहित आहे का?’’ व्हरांड्यात शांतपणे चूप बसलेल्या लोकांकडे बोट दाखवून त्याने विचारलं.
‘‘या आदिवासी लोकांना याच्या खाणाखुणा चटकन ओळखता येतात.’’ डॉक्टर म्हणाले. ‘‘ते तुम्हाला सांगायला घाबरत होते.’’
स्ट्रिकलँड दारात गेला आणि त्याने बाहेर पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यात काहीतरी भयंकर दिसत असलं पाहिजे. कारण त्या झोपडीत जमलेले ते सगळे जण दचकले आणि दु:खाने रडू लागले. त्यांचा रडण्याचा भेसूर आवाज टीपेला पोचला. स्ट्रिकलँड एक शब्दही बोलला नाही. त्यांच्याकडे एक क्षणभर दृष्टीक्षेप टाकून तो आत गेला.
‘‘मी किती दिवस जगेन असं तुम्हाला वाटतं?’’
‘‘सांगता येणार नाही. कधी कधी दहा वीस वर्ष सुद्धा जातात. पण त्यात देहाची विटंबना होते, खूप यातना होतात. त्यामुळे जेवढं लवकर संपेल तेवढं भाग्यच समजलं पाहिजे.’’
स्ट्रिकलँड इझल जवळ गेला आणि त्याने नुकत्याच पूर्ण केलेल्या पेंटींगकडे पाहिलं.
‘‘तुम्ही खूप लांबून आला आहात. महत्वाची बातमी आणणाऱ्या माणसाला तसंच बक्षीस मिळायला हवं. हे पेंटींग तुम्ही ठेऊन घ्या. सध्या त्याची तुम्हाला काही किंमत मिळणार नाही. पण कोणी सांगावं एखाद्या दिवशी तुम्हाला हे पेंटींग ठेऊन घेतल्याचं समाधान मिळेल.’’
डॉक्टर कोत्रासनी कोणतेही पैसे घ्यायला नकार दिला. आटाने दिलेले शंभर फ्रँक त्यांनी आल्या आल्याच परत दिले होते. पण स्ट्रिकलँडने पेंटींग घेण्याचा आग्रह केला. नंतर ते व्हरांड्यात बरोबर गेले. तेथे बसलेले लोक स्पुंदून स्फुंदून रडत होते.
‘‘आटा शांत हो, तुझे डोळे पुस,’’ स्ट्रिकलँड म्हणाला. ‘‘फार काही होणार नाही. मी लवकरच येथून निघून जाईन.’’
‘‘ते तुम्हाला घेऊन जाणार आहेत का?’’ तिने रडत रडत विचारलं.
त्यावेळी बेटांवर महारोग्यांसाठी अलग वसाहत केलेली नव्हती. महारोग्यांनी ठरवलं तर ते स्वतंत्र राहू शकत.
‘‘मी डोंगरात जाऊन राहीन.’’
आटा त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.
‘‘ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ दे. पण मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही माझे आहात आणि मी तुमची आहे. तुम्ही मला सोडून गेलात तर मी देवा शप्पथ जीव देईन.’’
ती जे बोलत होती ते अगदी ठामपणे बोलत होती. आता ती एक लहान आदिवासी मुलगी राहिली नव्हती, ती एका निश्चयी, पोक्त स्त्रीसारखी बोलत होती. तिच्यात विलक्षण बदल झाला होता.
‘‘तुला माझ्या बरोबर राहण्याची गरज नाही. वाटल्यास तू पपीएतला परत जा. तुला दुसरा एखादा गोरा माणूस मिळेल. मुलांची काळजी तुझी म्हातारी घेईल. तिअर तुला परत आनंदाने नोकरीवर ठेवेल.’’
‘‘तुम्ही जेथे जाल तेथे मी येणार.’’
स्ट्रिकलँडचा धीरोदात्तपणा क्षणभर कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि गालांवर ओघळले. नंतर तो नेहमीसारखा तिरकसपणे हसला.
‘‘बायका फार विचित्र असतात,’’ तो डॉक्टरांकडे वळून म्हणाला. ‘‘तुम्ही त्यांना कुत्र्यासारखं वागवा, हातदुखे पर्यंत मारा, पण तरीही त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कमी होत नाही.’’
‘‘तुम्ही डॉक्टरांना काय सांगत आहात? तुम्ही त्यांच्या बरोबर जाणार तर नाही?’’ आटाने संशयाने विचारलं.
‘‘तुला हवं असेल तर मी राहीन.’’
आटा त्याच्या समोर गुडघे टेकून बसली आणि तिने त्याच्या हातांचं चुंबन घेतलं. स्ट्रिकलँडने डॉक्टरांकडे बघून मंद स्मित केलं.
‘‘सरते शेवटी त्यांचा विजय होतो, त्यांच्या पुढ्यात तुमचं काही चालत नाही. गोरे, काळे, सावळे. सगळे शेवटी सारखेच असतात.’’
या भयंकर प्रसंगी औपचारिकरित्या शोकप्रदर्शन करणं डॉक्टरांना अप्रस्तुत वाटलं म्हणून ते निघून गेले. स्ट्रिकलँडने एका मुलाला त्यांच्या सोबतीला पाठवलं. डॉक्टर थोडावेळ थांबून मला म्हणाले.
‘‘तो मला मुळीच आवडत नसे. त्याचं माझं जमत नसे हेही तुम्हाला सांगून झालं आहे. पण तरीही मानवजातीच्या वाट्याला आलेल्या महाभयंकर रोगाचा त्याने ज्या धैर्याने सामना केला त्याचे कौतुक मला वाटल्याखेरीज राहिलं नाही. तारावाओची वाट चालत असताना तेच विचार माझ्या मनात होते. जेव्हा तो मुलगा गेला तेव्हा मी त्याला सांगितलं की थोडी फार औषधं मी त्याला अधेमधे पाठवून देत जाईन. ती औषधं तो कितपत घेईल याची मला शंका होतीच. त्यांचा त्याला कितपत उपयोग होईल हीसुद्धा शंका जास्त सतावत होती. काही लागलं तर मला बोलावणं पाठव असा निरोप मी आटाला ठेवला. जीवन कठोर असतं आणि कोणाला काय भोगावं लागेल याची कधीच खात्री देता येत नाही. मोठ्या जड अत:करणाने मी पपीएतला पोचलो.’’
बराच वेळ आमच्यापैकी कोणीही बोललं नाही.
‘‘पण आटाने मला कधीच निरोप पाठवला नाही,’’ डॉक्टरांनी त्यांची गोष्ट पुढे चालू केली. ‘‘आणि बेटाच्या त्या भागात जाण्याची माझ्यावरसुद्धा परत वेळ आली नाही.
स्ट्रिकलँड विषयी मला काहीच समजत नव्हतं. आटा पपीएतला रंग आणि इतर साहित्य विकत घ्यायला एक दोनदा वेळा येऊन गेली हे माझ्या कानावर आलं. पण माझी आणि तिची गाठ पडली नाही. मी तारावाओला गेलो होतो त्याला दोन वर्ष होऊन गेली. मी त्या म्हाताऱ्या मुखियाला भेटायला पुन्हा एकदा तारावाओला गेलो. मी त्यांच्याकडे स्ट्रिकलँडची चौकशी केली. त्याला महारोग झाला आहे हे तोपर्यंत सगळ्यांना कळलं होतं. त्याच्या घरातील सगळी माणसं एक एक करून दुसरीकडे निघून गेली होती. फक्त आटा आणि त्यांची मुलं उरली होती. त्यांच्या मळ्याकडे कोणीही फिरकत नसे. महारोगाविषयी स्थानिक आदिवासींच्या मनात प्रचंड भिती होती. पूर्वी अशा रोग्याला ठार मारलं जाई. कधी कधी गावातल्या मुलांना तो रानात फिरताना दिसे. त्याला पाहिल्या बरोबर ती घाबरून पळून जात. कधी कधी आटा रात्री गावात येई आणि गावातल्या वाण्याला उठवून तिला हव्या त्या गोष्टी घेऊन जाई. तिला माहित होतं की स्थानिक लोक तिच्याकडेसुद्धा त्याच दृष्टीने बघत आणि त्यामुळे तिला टाळत असत. एकदा गावातल्या बायकांनी तिला ओढ्यामध्ये कपडे धुताना पाहिलं तेव्हा त्यांनी तिला दगड मारून पळवून लावलं. गावकऱ्यांनी तिला पुन्हा ओढ्यात कपडे धुऊ नको असं बजावलं. नाहीतर त्यांनी तिचं घर जाळून टाकलं असतं.’’
‘‘नीच कुठले.’’ मी म्हणालो.
‘‘मे नॉन, माँ शेर मस्यु. तसं नसतं महाराज, माणसं कुठूनही सारखीच असतात. भितीमुळे माणुसकी विसरली जाते. मी स्ट्रिकलँडला भेटायचं ठरवलं. म्हातारीला तपासून झाल्यानंतर मी एका मुलाला रस्ता दाखवायला सांगितलं. पण माझ्या बरोबर यायला कोणीच तयार नव्हतं. मला एकट्यालाच रस्ता शोधणं भाग पडलं.’’
स्ट्रिकलँडचा शेतमळा जसा जवळ आला तसं डॉक्टरांना अस्वस्थ वाटायला लागलं. चालून चालून त्यांना उकडत होतं, तरीही त्यांच्या अंगात शिरशिरी आली. वातावरणात काही तरी विचित्र होतं. त्यामुळे ते थोडे थबकले. एक अदृश्य शक्ति त्यांना अडवत होती, त्यांचे पाय मागे खेचत होती. खाली पडलेले नारळसुद्धा कोणी उचलले नव्हते. सर्वत्र एक भयाण सन्नाटा पसरला होता. मळ्यात रान माजत चाललं होतं. अनादी काळातील अरण्यातून जो मळा निर्माण करण्यात कित्येक वर्षांचे अपार कष्ट खर्ची पडले होते तो मळा, ती प्राचीन सृष्टी पुनश्च गिळंकृत करत होती. त्या सर्व परिसरात एक आदिम वेदना व्यापून राहिली आहे असं त्यांना वाटलं. तिथल्या चिडीचूप निशब्द शांततेमुळे त्याला सर्वजण घर सोडून गेले असावेत असं वाटलं. पण त्यांना आटा दिसली. ती उकिडवी बसून काही तरी शिजवत होती. बाजूला तिचा लहान मुलगा मातीत खेळत होता. तिने डॉक्टकरांना पाहिलं तरीही ती हसली नाही.
‘‘मी स्ट्रिकलँडना बघायला आलो आहे.’’
‘‘मी आत जाऊन त्यांना सांगेन.’’
ती व्हरांड्याच्या पायऱ्या चढून घरात गेली. डॉ. कोत्रास तिच्या पाठोपाठ गेले पण तिने केलेल्या इशाऱ्यामुळे बाहेरच थांबले. तिने दरवाजा उघडताच महारोग्यांना येणाऱ्या किंचीत गोडूस वासाचा पोट ढवळणारा भपकारा आला. आतून आटाचा आवाज त्यांनी ऐकला. स्ट्रिकलँडने काहीतरी उत्तर दिलं. पण त्याचा आवाज ओळखता येणार नाही इतका घोगरा झाला होता. डॉ. कोत्रासनी भुवया उंचावल्या. रोगाने स्ट्रिकलँडच्या स्वरयंत्रावर विपरीत परीणाम झाला होता. आटा बाहेर आली.
‘‘ते तुम्हाला भेटायला तयार नाहीत. तुम्हाला परत जावे लागेल.’’
डॉ. कोत्रासनी पुन्हा पुन्हा सांगून पाहिलं, पण ती त्यांना आत जाऊ द्यायला तयार नव्हती. डॉ. कोत्रासनी खांदे उडवले. एक क्षणभर विचार करून ते मागे फिरले. ती त्यांच्या बरोबर गेली. त्यांना वाटलं की तिच्या मनातसुद्धा त्यांना फुटवायचं असावं.
‘‘मला करता येण्या सारखं काहीच नाही का?’’
‘‘जमलं तर रंग पाठवा, त्यांना दुसरं काही नको आहे.’’
‘‘त्यांना अजून चित्र रंगवता येतात?’’
‘‘त्यांनी आता घराच्या भिंतींवर चित्र रंगवायला घेतली आहेत.’’
‘‘मुली तुझ्यावर किती भयंकर परिस्थिती ओढवली आहे.’’
शेवटी ती अस्फुट का होईना हसली. तिच्या डोळ्यातून माया ओसंडून जात होती. डॉ. कोत्रासना आश्चर्य वाटलं. तिच्या निस्सीम प्रेमामुळे ते भारावून गेले. अधिक बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं.
‘‘ते माझे आहेत.’’ ती म्हणाली.
‘‘तुझं दुसरं मूल कुठे दिसत नाही. मागच्या वेळेला आलो तेव्हा मी पाहिलं होतं.’’
‘‘ते गेलं. आम्ही त्या आंब्याखाली त्याला पुरलं.’’
आटा त्यांच्या बरोबर चार पावलं चालत गेली. तिला परत फिरणं भाग होतं. डॉ. कोत्रासना वाटलं होतं त्याप्रमाणे गावकऱ्यांच्या नजरेला पडण्याच्या भितीमुळे ती जास्त पुढे गेली नाही. तू निरोप पाठवताच मी येईन हे त्यांनी पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं.

1 comment:

  1. बाप रे! शेवट भयंकर आहे ...

    ReplyDelete