Tuesday, February 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५०

काही व्यक्ती चुकीच्या जागी जन्म घेतात असं मला सारखं वाटत असतं. जन्माने त्यांना विशिष्ट परीस्थिती अपघाताने मिळालेली असते. पण त्यांना ओढ लागते दुसऱ्याच अनोळखी प्रदेशाची. त्यांच्या जन्मगावी ते परकेच असतात. ज्या प्रदेशात त्यांचं बालपण गेलेलं असतं तो प्रदेश त्यांच्या जीवनप्रवासातील एक तात्पुरता मुक्काम असतो. ते ज्या माणसांत आपलं सर्व आयुष्य घालवतात ते स्वकीय त्यांना परके वाटतात. त्यांच्या अवताभोवती घडणाऱ्या घटनांत ते अलिप्त असतात. कदाचित ही अलिप्तपणाची भावनाच त्यांना जेथे आपलेपणा वाटेल अशा दूरच्या प्रदेशांचा शोध घेण्यास भाग पाडत असावी. मानवाच्या प्रागऐतिहासिक काळातील पूर्वज ज्या प्रदेशातून आले असतील त्या अज्ञात प्रदेशाच्या स्मृती त्यांच्या मनात आदिम जाणीवांच्या रूपात खोलवर दडलेल्या असतील. कधी कधी माणूस एखाद्या जागी योगायोगाने जातो आणि नंतर त्याला ती जागा आपलीच आहे असं अचानक वाटूं लागतं. जो प्रदेश, जी माणसं त्याला आजपर्यंत अज्ञात होती त्या प्रदेशात तो आपलं घर वसवणार असतो, त्या त्या माणसांना तो आपलं म्हणाणार असतो. आणि तिथेच तो आपला शेवटचा श्वास घेणार असतो.
तिअरला मी सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये मला भेटलेल्या माणसाची गोष्ट सांगितली. तो अब्राहम नावाचा एक ज्यू तरूण होता. सोनेरी केसांचा, किंचीत स्थूल, लाजाळू आणि कमालीचा नम्र. कुशाग्र बुद्धीची त्याला दैवी देणगी होती. तो हॉस्पिटलमध्ये शिष्यवृत्तीवर शिकायला आला होता. शिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात त्याला होती नव्हती तेवढी सगळी पारितोषिकं मिळाली होती. तो हाऊस फिजीशिअन आणि सर्जन झाला. त्याच्या हुशारीमुळे सर्वजण त्याला मान देत. शेवटी त्याची हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्याचं भवितव्य उज्वल होतं. तो त्याच्या पेशाच्या सर्वोच पदी जाऊन पोचेल याची सर्वांना खात्री होती. मानसन्मान आणि संपत्ती त्याच्या पुढे हात जोडून उभे होते. पदावर रूजू होण्यापूर्वी त्याने सुटी घेतली. त्यावेळी त्याच्या गाठीला फारसे पैसे नसल्यामुळे तो लेव्हँटला जाणाऱ्या एका बोटीवर डॉक्टर म्हणून गेला. त्या बोटीवर सहसा डॉक्टर म्हणून कोणाला घेत नसत. पण त्या हॉस्पिटलचा एक वरिष्ठ डॉक्टर बोट कंपनीच्या डायरेक्टरला ओळखत होता, म्हणून अब्राहमला बोटीवर घेतलं गेलं.
थोड्या आठवड्यांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना त्याच्या राजीनाम्याचं पत्र मिळालं. जे पद मिळण्यासाठी लोक जीव टाकतात, ते पद ज्याला पदार्पणातच मिळालं होतं. त्याचा राजीनामा बघून सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं. जेव्हा कोणी एखादी अनपेक्षीत गोष्ट करतं तेव्हा त्याच्या मागे काही काळंबेरं असावं अशी अफवा संबंधीत लोक पसरवतात. अब्राहमच्या जागी यायला दुसरा माणूस तयार होता. लवकरच अब्राहमला सगळे विसरले. पुढे त्याच्या संबंधी काहीही कळलं नाही. तो विस्मृतीच्या उदरात गडप झाला.
त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी मी एका बोटीतून प्रवास करत होतो. बोट अलेक्झांड्रिया बंदरात लागत होती. वैद्यकीय तपासणीसाठी सगळ्या उतारूं बरोबर मी रांगेत उभा होतो. एक गबाळे कपडे केलेला जाडा माणूस डॉक्टर होता. त्याने डोक्यावरची हॅट काढल्यानंतर त्याचं टक्कल दिसलं. त्याला मी कुठेतरी पाहिलं आहे असं मला वाटायला लागलं. आणि अचानक मला आठवलं.
‘‘अब्राहम,’’ मी हाक मारली.
त्याने माझ्याकडे गोंधळून पाहिलं. आम्ही दोघंही चकित झालो. ती रात्र मी अलेक्झांड्रियात काढणार आहे हे कळल्यावर त्याने मला इंग्लीश क्लबवर जेवायचं आमंत्रण दिलं. आम्ही भेटलो तेव्हा त्याला तिथे पाहून मला किती आश्चर्य वाटलं ते सांगितलं. तो ज्या पदावर काम करत होता ते सामान्य होतं. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसावी. त्याने त्याची कहाणी सांगितली. तो जेव्हा भूमध्यसागरावरच्या सफरीवर निघाला तेव्हा लंडनलाच परत येऊन सेंट थॉमसमधील नोकरीवर रूजू व्हायचा त्याचा बेत होता. एके दिवशी सकाळी बोट अलेक्झांड्रियाला लागली. त्याने डेकवरून पांडऱ्या शुभ्र सूर्यप्रकाशात न्हाऊन गेलेल्या शहराकडे पाहिलं. धक्क्यावरच्या गर्दीत फाटक्या कपड्यातले स्थानिक लोक, काळे सुदानीज, गोंगाट करणारे ग्रीक आणि इटालियन, डोक्यावर गोंडेवाली उंच टोपी घातलेले धिप्पाड तुर्क, सूर्यप्रकाश आणि वर निळे आकाश, त्याला काही तरी झालं. तो म्हणाला डोक्यात वीज चमकली, तसं नाही, मला साक्षात्कार म्हणतात तो झाला. त्याच्या उरात कळ आली आणि अत्यानंदाने त्याचं भान हरपलं. त्याला आपल्या घरी आल्यासारखं वाटलं. त्याने तिथल्या तिथे निर्णय घेतला, फक्त तीन मिनीटांत. आता उरलेलं आयुष्य इथेच काढायचं, अलेक्झांड्रियात. त्याला बोटीवरून सामान उतरवून घ्यायला फार वेळ लागला नाही. पुढच्या चोवीस तासात आपल्या सगळ्या सामानानिशी तो किनाऱ्यावर होता.
‘‘कॅप्टनला तू ठार वेडा झालास असं वाटल असेल,’’ मी हसत म्हणालो.
‘‘कोणाला काय वाटेल याची मी पर्वा केली नाही. एखाद्या छोट्या ग्रीक हॉटेलात जावंसं मला वाटलं. मी इकडे तिकडे पाहिलं आणि मला कुठे जायचं ते आपोआप कळलं. तुला सांगून खरं वाटणार नाही, मी सरळ चालत गेलो, एक हॉटेल दिसताच मी ओळखलं की आपल्याला हवं आहे ते ग्रीक हॉटेल हेच.’’
‘‘तू अलेक्झांड्रियाला पहिल्यांदा कधी आला होतास?’’
‘‘कधीही नाही. इंग्लंडच्या बाहेर मी प्रथमच पाऊल टाकत होतो.’’
तेथे तो सरकारी नोकरीत शिरला. अजूनही तो तेथेच आहे.
‘‘तुला कधी पश्चाताप झाला का?’’
‘‘कधीही नाही. एक मिनीटसुद्धा नाही. मला माझ्या पोटापुरते पैसे मिळतात. त्यात मी समाधानी आहे. मरे पर्यंत मला याहून जास्त काही नको. फार सुंदर जीवन आहे हे.’’
मी दुसऱ्या दिवशी अलेक्झांड्रिया सोडलं. त्यानंतर कित्येक महिन्यांनी मी अलेक कारमायकेल या माझ्या समवयस्क मित्राबरोबर जेवण घेत होतो. तो पर्यंत मी अब्राहमला विसरून गेलो होतो. कारमायकेल थोड्या दिवसांच्या सुटीमध्ये इंग्लंडमध्ये आला होता, मला तो रस्त्यात भेटला. त्याने युद्धकाळात जी बहुमेल सेवा केली होती त्याबद्दल त्याला नाईटहुडचा किताब जाहिर झाला होता. त्याचे मी अभिनंदन केलं. आम्ही जुन्या काळच्या आठवणींवर गप्पा मारण्यासाठी म्हणून एकत्र जेवण घ्यायचं ठरवलं. आम्हाला मनसोक्त गप्पा मारता याव्यात म्हणून त्याने दुसऱ्या कोणालाही बरोबर घ्यायचं नाही असं ठरवलं. क्वीन अ‍ॅन स्ट्रीटवरील एका जुन्या सुंदर घरात तो राहत होता. त्याने ते मोठ्या रसिकतेने सजवलं होतं. डायनींग रूमच्या भिंतीवर बेलेटो आणि झोफॅनीची हेवा वाटावा अशी दोन सुरेख पेंटींग लावलेली होती. त्याच्या उंच व सुंदर पत्नीने शुद्ध जरीचं काम केलेला गाऊन घातला होता. ती गेल्यावर आम्ही एकत्र शिकत होतो त्यावेळची परिस्थिती आता किती बदलली आहे असं मी त्याला हसत हसत बोललो. त्याकाळी आमच्या दृष्टीनं वेस्टमिन्स्टर ब्रिज रस्त्यावरच्या एखाद्या घाणेरड्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवण घेणं ही सुद्धा एक न परवडणारी चैन होती. आता अलेक कारमायकेल अर्धा डझन हॉस्पिटलशी निगडीत होता. मला वाटतं त्याला सालीना दहा एक हजार तरी मिळत असावेत. त्याला मिळालेला नाईटहूडचा सन्मान म्हणजे पुढे मिळणाऱ्या अनेक बहुमानांची सुरूवात होती.
‘‘माझं अगदी उत्तम चाललं आहे,’’ तो म्हणाला. ‘‘पण त्याचं श्रेय मला माझ्या नशीबाला द्यावं लागेल.’’
‘‘नशीबाला म्हणजे?’’
‘‘तुला अब्राहम आठवतो. भवितव्य त्याला होतं. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा तो प्रत्येक बाबतीत माझ्या पुढे होता. ज्या ज्या शिष्यवृत्या आणि पारितोषकांसाठी मी प्रयत्न करायचो त्या सगळ्या त्याला मिळायच्या. त्याच्या तुलनेत मी नेहमीच दुसरा होतो. त्याचा पहिला क्रमांक ठरलेलाच असायचा. स्पर्धा असायची ती फक्त दुसऱ्या क्रमांकासाठी. जर तो येथे राहिला असता तर आज मी जेथे आहे तेथे तो असता. शस्त्रक्रियेत तर तो असामान्यच होता. जेव्हा त्याची रजिस्ट्रार म्हणून नेमणूक झाली तेव्हा मला मुळीच संधी नव्हती. मी फार तर साधा जनरल प्रॅक्टीशनर झालो असतो. आता जी.पी. ला वर यायची संधी किती कमी असते ते तुला सांगायला नको. पण अब्राहमने ती जागा स्विकारली नाही आणि मला संधी मिळाली.’’
‘‘तू म्हणतोस ते खरं आहे.’’
‘‘फक्त नशीब. अब्राहम थोडा सटक होता. बिचारा, त्याच्या कारकीर्दीची माती झाली. अलेक्झांड्रामध्ये तो सॅनीटरी इन्स्पेक्टर का अशीच कोणती तर दीडदमडीची फालतू नोकरी करतोय. मला कळलं की तो एका म्हाताऱ्या, करूप ग्रीक बयेबरोबर राहतो, अर्धा डझन पोरांच्या लेंढारात. मला सांगायचं काय आहे, यश मिळवण्यासाठी फक्त डोकं असून चालत नाही, यश पचवायची ताकद सुद्धा लागते. अब्राहमकडे ती ताकद नव्हती.’’
ताकद? मला वाटतं मानसन्मान आणि पैशांपेक्षा दुसरं काही जास्त महत्वाचं वाटलं म्हणून हाताशी असलेली संधी पाच मिनीटांत ठोकरून द्यायला त्यापेक्षा जास्त ताकद लागते. पण मी काहीच बोललो नाही. अलेक कारमायकेल पुढे म्हणाला:
‘‘अब्राहमने जे केलं त्या बद्दल मला वाईट वाटतंय असं म्हणणं म्हणजे ढोंगीपणा होईल. शेवटी मी ही ते माझ्या गुणवत्तेच्या जोरावरच मिळवलं आहे.’’ त्याने त्याच्या करोना सिगारचा एक दीर्घ झुरका घेतला. ‘‘याच्यामुळे माझा वैयक्तिक फायदा नसता तर गुणवत्तेच्या ह्या अपव्ययाबद्दल मला वाईट वाटलं असतं. आपल्या हाताने आयुष्याची अशी वाट लावणं हे किती अक्षम्य आहे.’’

अब्राहमने खरंच आपल्या आयुष्याचा सत्यनाश करून घेतला होता का. सत्यनाश कशाला म्हणायचं. आपलं जीवन आपल्या स्वत:च्या अटींवर, स्वत:च्या मर्जीने जगणं की लोकार्थाने यशस्वी, प्रसिद्ध होऊन, वर्षाला दहा हजार कमवून, सुंदर बायको मिळवणं. हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मला वाटतं तुमच्या मते आयुष्याचा अर्थ काय आहे त्यावर हे अवलंबून असतं. समाजाच्या तुमच्या कडून असलेल्या अपेक्षा की तुमच्या स्वत:च्या. पण मी माझी जीभ चावली. नाईटसाहेबांशी वाद घालणारा मी कोण?
Artist: Johann Zoffany
Title: Queen Charlotte with her Two Eldest Sons, Date: 1765
Medium: oil on canvas, Dimensions: 112.2 × 128.3 cm (44.2 × 50.5 in)
Current location: Royal Collection

Artist: Johann Zoffany
Title: Queen Charlotte with her Two Eldest Sons, Date: 1765
Medium: oil on canvas, Dimensions: 112.2 × 128.3 cm (44.2 × 50.5 in)
Current location: Royal Collection



11 comments:

  1. हा मध्येच अब्राहम कुठुन आला। पॅच वाटतो ।49 भाग एवढे मस्त झाल्यावर हा पॅच कशाला?

    ReplyDelete
  2. मान्य आहे. माणसाची जी वेगवेगळ्या प्रदेशात जाण्याची जी उर्मी असते, किंवा एखाद्याचं जे प्राक्तन असतं त्या विषयी मॉमला जे म्हणाचंय त्याला जोर यावा म्हणून त्याने हा पॅच टाकला असावा.

    ReplyDelete
  3. Momchi bhasha ani shaily chhan ahe. Tyacha anuvad assal marathi vattoy. Bhashantar vatat nahi. e. g. Satvaine lihun thevlele praktan vagaire. Avadala.

    Ravi Bhagwate mhanje, charu bhide chya podar college groupcha ka? Mi tichi dhakti bahin. Anju.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे. रवी भगवतेचा आदिम म्हणून एक ग्रूप आहे. त्यात मीही तिला कधी तरी पाहिल्याचं आठवतंय.

      Delete
    2. भाषा ही एक संस्कृती घेऊन आलेली असते. भाषेतून संस्कृती वजा करता येत नाही. एक भाषा जर अनेक संस्कृतीत बोलली जात असेल तर प्रत्येक संस्कृतीत ती वेगळ्या प्रकारे येते. अनुवाद करताना एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना संस्कृती मात्र शक्यतो मूळची ठेवण्याचे पथ्य पाळण्याचा मी कटाक्षाने प्रयत्न करतो. पण हे कधी कधी खूप कठीण होतं. कारण कोणतीही संकल्पना संस्कृतीसापेक्ष असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत ती तशीच्या तशी उतरवल्यास रसभंग होण्याची शक्यता असते. खालील तीन उदाहरणात मी रसभंग होऊ नये या साठी थोडंस स्वातंत्र्य घेतलंय ते वाचक समजून घेतील
      प्रकरण 46 - Merciful Providence - सटवीचा शाप
      प्रकरण 43 - wrestled desperately with the Angel of the Lord त्याच्या प्राक्तनाबरोबर त्याचा जो लढा
      प्रकरण 30 - nymph अप्सरा, Satyr यक्ष

      Delete
    3. कथानकाचा कालखंड १०० वर्षांपूर्वीचा आहे. अनुवादासाठी वापरलेली भाषा ही त्याला पूरक वाटते.
      वाचतांना काळ किंवा संस्कृती आड येत नाही, म्हणजे त्यादृष्टीने खटकत नाही. मी या कलखंडाशी संबंधीत असलेल्या कथानकांचे काही उत्तम अनुवाद वाचलेले आहेत. त्यामुळे मला तशी सवयही आहे.

      Delete
    4. धन्यवाद. चूक दाखवून दिल्याबद्दल.

      Delete
  4. वाह , काय एकेक व्यक्तिमत्त्व येतायत मधे मधे ...
    👌👍🌷🌷🌷🌷🌷

    ReplyDelete
  5. हो मीच तो । Nice meeting you on this blog

    ReplyDelete
  6. अनुवाद करणार्याने मूळ लेखनाशी पूर्ण प्रामाणिक राहायला हवे.पाश्चात्य संस्कृतीची,भाषेची भारतीय वाचकाला ओळख व्हावी हाही अनुवादामागचा एक हेतू असतो.क्लिष्ट गोष्टी समजून सांगण्यासाठी कंसात आपल्याकडे त्याला असं म्हणतात असं लिहावं.
    स्वैर अनुवाद ( My gair lady चं ती फुलराणी) करताना भाषांतरकार पूर्ण स्वातंत्र्य घेऊ शकतो. पण मूळ कादंबरीतील एखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादा patch वाटला तर अनुवादाशी त्याचा काही संबंध नसतो,असं माझं मत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कंसात देण्याची वेळ येऊ नये, पण आलीच तर कंस देताना रसभंग होईल याची चिंता करण्याच अर्थ नाही. Satyr, Nymph ताबडतोब दुरूस्त करतोय.

      Delete