Sunday, September 23, 2018

मुलँ रूज


मनोगत
तुलूझ लोत्रेकच्या जीवनावर आधारीत पीएर ल मूर याने लिहीलेली मुलँ रूज ह्या कादंबरीचे हे स्वैर रूपांतर. पीएर ल मूर हा फ्रेंच लेखक. दुसऱ्या महायुध्दानंतर त्याने अमेरीकेत स्थलांतर केले. तो पर्यंतचे त्याचे सगळे लिखाण फ्रेंचमध्ये आहे. पण अमेरीकेत आल्यानंतर त्याने इंग्रजीतून लिहायला सुरवात केली. मुलँ रूज ही त्याची इंग्रजीतील पहिली कादंबरी. ती अतिशय लोकप्रिय झाली. हॉलीवूडमध्ये त्या कादंबरीवर त्याच नावाने दोन चित्रपटही निघाले.
हेन्री तुलूझ लोत्रेकचा जन्म फ्रान्समधील एका प्रख्यात राजघराण्यात झाला होता. ऐन शैशवात एका विचीत्र आजाराची शिकार झाल्याने त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटली. यौवनात प्रवेश करण्यापूर्वीच त्या मौजमस्तीला तो पारखा झाला. चित्रकाराचा पेशा घराण्याच्या इतमामाला शोभेसा नसला तरी हेन्रीने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपला हट्ट पूरा केला. त्यासाठी तो पॅरीसच्या प्रतिष्ठीत वस्तीतील आपले निवासस्थान सोडून शहरा बाहेरील मोंमार्त्र या गरीब वस्तीत रहायला जातो. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्यातील जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टकरी, सर्कस व नाटकातील कलाकार, नाईट क्लबमध्ये नाचणाऱ्या मुली, रस्त्यावर भटकणाऱ्या गावभवान्या यांच्या विश्वात तो समरसून रममाण होतो. हे जीवन जगतानाच आपल्या कलेत त्याचे चित्रणही करत होता. आपल्या सभोवतालच्या रंगील्या निशाजीवनाची त्याने केलेल्या पेंटींग्जनी त्याला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वत:चे स्थान कसे मिळवून दिले, त्याची ही कहाणी.
मुलँ रूजचे मी केलेले रूपांतर लोकवाङमयगृहाने २०११ मध्ये अगोदरच प्रसिद्ध केले होते. मून अँड सिक्सपेन्सला मिळालेला प्रतिसाद बघून आता मुलँ रूज सुद्धा ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे.
माधूरी पुरंदरे यांना लस्ट फॉर लाईफ या कादंबरीचा अनुवाद करून व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा परिचय मराठी वाचकांना अगोदरच करून दिला आहे. मून अँड सिक्सपेन्स आणि मुलँ रोज मराठीत आणल्याने पॉल गोगँ आणि तुलूझ लोत्रेक या त्याच कालखंडातील दोन महान चित्रकारांचा परिचय होईल. युरोपच्या सहलीवर जाणाऱ्यांनी या कादंबऱ्या वाचल्या तर त्यांना युरोपच्या कला-संस्कृतीचीही ओळख होऊन स्थलदर्शन करतानाचा आनंद द्विगुणित होईल अशी आशा करतो.

२३ सप्टेंबर २०१८, पुणे




No comments:

Post a Comment