Thursday, September 13, 2018

फ्रेंच राज्यक्रांती आणि इंग्लीश भाषा


इंग्लीश ही जर्मन भाषाकुळातील तर फ्रेंच ही लॅटीन भाषाकुळातील भाषा आहे. पण इंग्लीशने शेकडो वर्षांपासून फ्रेंच भाषेतून भरपूर उसवानवारी केलेली आहे, आणि ही उसनवारी पुढील शेकडो वर्ष चालू राहील. आज मितीला जवळ जवळ ३० टक्के इंग्लीश शब्दांचं मूळ फ्रेंचमधे सापडतं. फ्रेंच लोक म्हणतातच इंग्लीश ही जवळपास फ्रेंचच आहे, फक्त उच्चार वाईट आहेत एवढं सोडलं तर. या उलट इंग्लीश लोकांच्या मते इंग्लीशमधले बहुतेक अपशब्द हे फ्रेंचमधून आले आहेत कारण फ्रेंच भाषा तशी अशीष्टच आहे. कदाचित हे खरं ही असेल. रस्त्यावर निर्माण झालेल शब्द फार चटकन स्विकारले जातात. अर्नेस्ट गोवर यांनी म्हटलंच आहे ‘Today's slang becomes tomorrow's jargon and day after tomorrow's King's English’
एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्दांची देवाण घेवाण सतत चालू असते. पण जेव्हा जगात फार मोठ्या घटना घडतात तेव्हा या प्रक्रियेला जोर येतो आणि ज्या प्रदेशात जी घटना घडलेली असते त्या घटनांचा अर्थ व्यक्त करणारे शब्द जर दुसऱ्या भाषेत नसतील तर ती घटना समजून घेण्यासाठी ते शब्द आयात करण्यावाचून गत्यंतर नसते. इंग्लीश भाषेत वेगवेगळ्या कालखंडात आलेले शब्द तपासून पाहिल्यास त्यात जगाच्या इतिहासाचं प्रतिबिंब पडलेलं आढळून येईल.
दुसरे महायुद्ध: genocide, quisling, crash-landing, debrief, cold war
१९५० चे दशक: cold war, countdown, cosmonaut, sputnik, beatnik
१९६० चे दशक: fast food, jetlag, fab, Watergate
व्हिएतनाम युद्ध: bong, credibility gap
पण फ्रेंच राज्याक्रांती एवढा प्रचंड परिणाम दुसऱ्या कोणत्याही घटनेचा झाला नसेल. जीवावर उदार झालेला सामान्य माणूस हातात कुदळ फावडी घेऊन पॅरीसच्या रस्त्यांवर लढायला उतरला होता. प्रत्येक नवी घटना, नवा विचार, नवी कल्पना इंग्लीश भाषिकांना समजून घेण्यासाठी सरळ फ्रेंच शब्दांची उसनवारी केल्याशिवाय भागणारं नव्हतं. क्रांतीकाळातील प्रत्येक वादळी घटना, कलाटणी, शिरच्छेद आणि क्रांतीकारांची भाषणांची बातमी ब्रिटनमध्ये तीन चार दिवसांनी पोचत असे. त्यावेळी इंग्लीशमध्ये आलेल्या फ्रेंच शब्दातून क्रांतीचा इतिहास दिसून येतो.
१७८९­: aristocrat; १७९२: capitalist, regime, emigrant, immigrant
१७९३: disorganized, demoralized, guillotine; १७९५: terrorism; १७९१: tricolore
फ्रेंच राज्यक्रांतीमुळे कुप्रसिद्ध झालेल्या गिलोटीन या शब्दाची आणखी एक गंमत आहे. हे नाव डॉ.गिलोटीन यांच्या नावावरून पडले हे जरी खरं असलं तरी त्याचा शोध त्यांनी लावला नव्हता. वास्तविक त्यांचा मृत्युदंडाच्या शिक्षेला ठाम विरोध होता. गिलोटीन नक्की कोणी शोधलं हे सांगणं कठीण आहे. हार्प्सिकॉर्ड हे वाद्य बनवणाऱ्या एका जर्मन कारागिराला हार्प्सिकॉर्डच्या आकारावरून गिलोटीनची रचना सुचली आणि त्यावरून त्याने क्षणार्धात शिरच्छेद करण्याचं यंत्र तयार केलं असा एक प्रवाद आहे. हार्प्सिकॉर्डचे सूर जुळवताना शिरच्छेदाची कल्पना त्याच्या मनात कशी आली असावी हे कळायला काही मार्ग नाही. क्रांतीच्या पूर्वी फ्रान्समध्ये मृत्युदंडाची शिक्षा देताना फासावर लटकवून दिली जात असे. मृत्युदंडाची शिक्षा फर्मावलेली अभागी व्यक्त्ति जर राजघराण्यातील किंवा समाजातील एखादी प्रतिष्ठीत असामी असेल तर त्या व्यक्त्तिला ही शिक्षा भोगण्यासाठी यासाठी फाशी किंवा शिरच्छेद असा पर्याय उपलब्ध असे. शिरच्छेद कमी यातनादायक असतो असा निष्कर्ष त्याकाळी कोणत्या आधारावर काढला असावा हे कळत नाही. पण त्यामुळे क्रांतीकारकांच्या अनेक मागण्यांमध्ये सामान्य माणसालासुद्धा शिरच्छेदाची शिक्षा मागण्याचा हक्क आहे ही एक महत्वाची मागणी होती. या साठी क्रांतीकारकांनी जी एक समिती नेमली होती तिचे प्रमुख डॉ.गिलोटीन होते. त्यांच्या शिफारसीवरून गरीब बिचाऱ्या सामान्य माणसांना शिरच्छेदाचा हक्क मिळाला आणि क्रांतीनंतर लगेचच बऱ्याच जणांची मान गिलोटीनखाली आली.
फ्रेंच ही जशी क्रांतीची भाषा आहे तशीच ती रोमान्सची ही भाषा आहे. कारण फ्रेंच हे स्वभावतःच रोमँटीक असतात. प्राचीन काळी रोमन साम्राज्य नावाचं एक मोठं साम्राज्य होतं आणि रोम मध्ये रहाणारे रोमन लोक त्यावर राज्य करत असत. त्यांची भाषा लॅटीन होती. त्या भाषेत खूप मोठे लेखक होऊन गेले आणि त्यांनी विवीध विषयांवर लेखन केलं हे जरी महत्वाचं असलं तरी त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचे सैन्य हे त्याहून मोठे आणि बलाढ्य होतं. रोमन सम्राटांनी त्याकाळच्या ज्ञात जगात मोठ मोठी युद्धे करून कत्तली आणि संपत्तीची लूट करता करता नकळत लॅटीनच्याही प्रसाराला हातभार लावला. पण साम्राज्य कोलमडतात आणि साम्राज्याच्या विनाशा पाठोपाठ साम्राज्याची भाषाही बदलते. इंग्लीशचा आद्य लेखक चॉसरचं उदाहरण घ्या. चॉसरने जे इंग्लीश लिहलं आहे ते आज जरी वाचता आलं तरी त्याचा अर्थ लावण्यासाठी त्यावेळच्या भाषेचा अभ्यास असावाव लागतो.
रोमन आणि त्यांच्या लॅटीनचंही तेच झालं. हे एकाएकी झालं नाही. अगदी हळू हळू त्यांची भाषा बदलत गेली. इतकी की रोममधील कोणालाही त्यांच्या त्या थोर लेखकांनी लिहीलेलं एक अक्षरही समजेनासं झालं. त्यामुळे जुनी भाषा आणि रोमच्या रस्त्यावर बोलली जाणारी प्रचलित भाषा यातील फरक कळण्यासाठी त्यांनी या नव्या भाषेला Romanicus असं नाव दिलं. रोमन साम्राज्या बरोबरच रोमन संस्कृतीही विलयाला गेली आणि युरोपातील अंधारयुगाचा प्रारंभ झाला. लॅटीन आणि रोमॅनीकस मधली दरीही वाढत गेली. पण लॅटीन नष्ट होण्यापासून वाचली. कारण चर्च आणि उच्च शिक्षण अशा संस्थात्मक पातळीवर तिचं जतन झालं आणि अभिजात भाषा हे स्वरूप लॅटीनला मिळालं. जर कोणाला पोप, प्राध्यापक किंवा तत्वज्ञ वगैरे मंडळींनी दखल घ्यावी असं काही लिहायचं असेल तर ते लॅटीन मधूनच लिहावं लागे. अगदी १६८७ मध्ये सुद्धा न्युटनला त्याचा प्रिन्सिपिया मॅथेमॅटीका हा ग्रंथ लिहीण्यासाठी लॅटीन भाषेची निवड करावीशी वाटली. त्यानंतरच त्याला महत्व प्राप्त झालं.
पण सर्वसामान्य लोकांना ख्रिस्त पुराण, गणिती शास्त्रे, तत्वज्ञान वगैरे विषयांवरील पुस्तके वाचण्यात मुळीच रस नव्हता. त्यांना शूर सरदार व संकटात सापडलेल्या सुंदर तरूणी किंवा आग ओकणारे ड्रॅगॉन यांच्या कथांमध्ये जास्त रस होता. आणि या विषयांवर जे खंडणीभर वाङ्गमय लिहीले जात होते त्यांची भाषा Romanic होती. येथे us ही अक्षर गाळली गेली. या रोमॅनीक भाषेचं स्वरूप स्पेन, पोर्तूगाल, फ्रान्स, रोमानिया असं प्रदेशानुसार भिन्न भिन्न होत गेलं. त्या त्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेला पोर्तूगीज, स्पॅनीश, फ्रेंच, रोमानीयन अशी नावे मिळाली पण एकून या भाषा रोमॅनीक भाषा म्हणूनच ओळखू लागल्या. आणि त्या भाषेतील शूर देखणे सरदार व त्रस्त सुंदरींच्या गोष्टी सांगणारं साहित्यसुद्धा रोमॅनीक. एकूण प्रवास Romanicus>Romanic>Romance असा झाला. 

जयंत गुणे, ९६१९०१६३८५
संदर्भ – ‘The Etymologicon – A Circular Stroll Through the Hidden Connections of the English Language, First published by - Icon Books Ltd, Distributed in India - Penguin’

No comments:

Post a Comment