Monday, September 24, 2018

मूलँ रूज - २


दुसऱ्या दिवशी लोत्रेक कुटुंबीय नव्या जागेत राहायला गेले. ही जागा म्हणजे बुलेव्हारवरील एक प्रशस्त अपार्टमेंट होते. त्यांच्या इस्टेटवरच्या गढीच्या मानाने खूपच लहान असले तरी एकंदर खोल्या भरपूर होत्या व खेळायला जागाही त्या मानाने बरीच होती. दोन दिवसात सगळे सामानसुमान लावून झाल्यावर लगेच हेन्रीची शाळा सुरू झाली. इस्टेटीवर खेळायला फारसे सवंगडी नसत. पण येथे मात्र जिकडेतिकडे मुले खेळताना दिसत होती. हेन्रीला नव्याने आलेला पाहून त्यातला एक जण धावत धावत पुढे आला.
तू नवीन आहेस का रे?”
होय. आज माझा पहिला दिवस.
मला एक महिना झालाय.
थोडा वेळ ते दोघे एकमेकांकडे लहान मुलांच्या निरागसतेने रोखून बघत होते.
तू मोठा झाल्यावर कोण होणारेस रे?”
मी किनई कप्तान होणार आहे. जहाजाचा कप्तान. माहितीय.
छ्या. कप्तान काय सगळेच होतात. आपण बुवा समुद्री चांचा होणार.
चांचा? तो काय करतो रे?”
त्यांचं स्वतःचं जहाज असतं. ते दुसऱ्या जहाजांना पकडतात आणि त्याच्यावरचा खजिना लुटून तो एका गुप्त बेटावर लपवून ठेवतात. ती जागा अगदी कोणाला म्हणजे कोणालासुद्धा माहीत नसते.ट्रेझर आयलंड वगैरे वाचून झालेल्या माहितीवर त्याच्या बढाया चालू होत्या. चांचा बनून काळा झेंडा फडकावलेल्या जहाजावरून समुद्रात फिरता फिरता मधेच कधी युनियन जॅक फडकावलेले इंग्लिश जहाज दिसले रे दिसले की त्याच्यावर कशी झडप घालायची याची सगळी तपशीलवार योजना त्याच्याकडे तयार होती.
तुझं नाव काय रे?”
मॉरीस. मॉरीस ज्वायाँ. तुझं?”
हेन्री द तुलूझ लोत्रेक.
केवढं लांब नाव आहे तुझं. तू कोणत्या गावचा?”
आल्बी. खूप लांब आहे. आगगाडीत बसून जायला अख्खा दिवस लागतो.
तिकडे बर्फ पडतो का?”
नाही. लांब डोंगरावर पडतो कधी कधी.
आमच्या गावाला हिवाळ्यात खूप बर्फ पडतो. सगळे रस्ते, झाडं, घराची छप्परं कापसासारख्या बर्फाने भरून जातात. खूप मजा येते बर्फात खेळायला.
या पहिल्या ओळखीनंतर दोघांची दोस्ती जी पक्की झाली ती अगदी कायमची. दोघेजण सारखे एकमेकांच्या बरोबर असत. वर्गात एका बाकावर, मधल्या सुटीत खाऊ खाताना, खेळात आणि अभ्यासात.
एके दिवशी मधल्या सुटीत मॉरीस त्याला म्हणाला, मोठेपणी आपण चांचा व्हायचं ठरवलं होतं ना त्यात एक अडचण आहे. आमचे काका सांगत होते की चांचे अगदी दुष्ट असतात. लोकांना नुसती गंमत म्हणून ते ठार मारतात. त्यापेक्षा आपण कॅनडात जाऊन फासेपारधी होऊया. चालेल तुला?” मॉरीसने त्याच्यासमोर दुसरा पर्याय ठेवला.
कॅनडात जाऊन फासेपारधी व्हायचं म्हणजे काय करायचं असतं?”
तुला अगदी काहीच ठाऊक नाहीसं दिसतंय. अरे त्यात तर खूप मजा येते. माहितीय. कॅनडामध्ये किनई खूप दाट जंगल आहे. त्या जंगलात बंदूक घेऊन फिरायचं, अस्वलांची शिकार करायची आणि त्यांची फर काढून विकायची. खूप पैसे मिळतात. माहितीय.
जंगलात आपण राहायचं कुठे?”
कॅनडात तिकडे लोक लाकडाच्या घरात राहतात.
त्याच्या म्हणण्याला लागलीच मान्यता दिली असे व्हायला नको म्हणून त्याने खूप खुसपटे काढली. पण मॉरिसने ती सगळी उडवून लावली.
चालेल, पण आपण एकाच घरात राहायचं बरं का. तू कध्धी म्हणून मला सोडून जायचं नाहीस. घे शपथ.हेन्रीने अट घातली.
घेतली शपथ. पण त्यापेक्षा आपण ब्लड ब्रदरच होऊ. म्हणजे अगदी मरेपर्यंत आपली मैत्री कायम राहील. मग तर झालं!
मी पण घेतो शपथ.
तसं नको. अगदी पद्धतशीर करू या सगळं.
मॉरीसने एका टाचणीने आपल्या मनगटाला टोचून थेंबभर रक्त काढले व हेन्रीलासुद्धा तसे करायला सांगितले. मग दोघांनी हाताला हात लावून आपल्या हातावरचे रक्ताचे थेंब एकमेकांत मिसळले आणि मोठ्या गांभीर्याने शपथ घेतली.
अ ला व्हिए अ ला मोर्त.
चल, आता आपण या विस्तवात थुंकू. म्हणजे आपलं नातं अगदी मरेपर्यंत पक्कं होईल.
दोघेही एकाच वेळी शेकोटीतल्या विस्तवात थुंकले. अशा रीतीने पॅरीस मुक्कामी पहिल्याच वर्षी त्या दोघांच्या मैत्रीवर एका अनोख्या नात्याचे शिक्कामोर्तब झाले़.
(फोटो – तुलूझ लोत्रेकांचा आल्बी येथील शॅटो – गढी/वाडा)


No comments:

Post a Comment