Monday, September 24, 2018

मुलँ रूज - १

माँ पेतीत
प्लीज ममा. हलू नका. मी तुमचं चित्र काढतोय ना.
किती चित्रं काढायची ती. कालच एक काढून झालं ना. तेव्हापासून माझं नाक, कान, डोळे सर्व काही आहे तिथेच आहे की बदललंय?”
अेदल कॉम्ते द तुलूझ लोत्रेक यांनी हातातील काम थांबवले आणि आपल्या लाडक्या लेकाकडे एकवार कौतुकाने पाहिले. काळेभोर कुरळे केस, सेलर सूट घातलेला छोटा रिरी समोरच्या स्केचबुकमध्ये पेन्सिलीने भराभर चित्र रेखाटत होता. त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांच्या निराशामय एकाकी जीवनातील एकमात्र विरंगुळा.
तुम्ही त्या जोसेफचं का नाही चित्र काढत?”
त्याची केव्हाच चांगली दोन चित्रं काढून झालीयत.तो त्यांच्या नोकराकडे बघून म्हणाला, आता तो झोपलाय आणि झोपल्यावर त्याचा चेहरा अगदी ठोकळ्यासारखा दिसतोय. माशी बसली तरी हलत नाही.
ठीक आहे, तू एवढा आग्रह करतोयस तर. पण मी आणखी फक्त पाच मिनिटंच देईन हां.
१८७२ च्या सप्टेंबरमधली ती एक शांत दुपार होती. वर आकाशात सूर्य मावळतीकडे संथपणे उतरत होता. पक्षी घरट्यांच्या काठावर बसून एकमेकांशी गुजगोष्टी करत होते. झाडांच्या पिवळट पडू लागलेल्या पानांमधून झिरपणाऱ्या उन्हामुळे ती मध्ययुगीन गढी सुस्तावल्यासारखी वाटत होती. गढीची डागडुजी बऱ्याच वर्षांत झालेली दिसत नव्हती. तरीही गढीच्या गतवैभवाच्या खुणा तिच्या कानाकोपऱ्यांतून विखुरलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या उंची सामानसुमानांतून दिसून येत होत्या. इकडे तिकडे फिरणारे गणवेशधारी नोकरचाकर, या ना त्या निमित्ताने वाड्यात मुक्कामाला असलेली असंख्य माणसे उमराव घराण्यातील खानदानी रीतिरिवाजात अगदी मुरलेली होती. पण अशा या भाऊगर्दीतसुद्धा ती मायलेकरांची जोडी अगदी एकाकी होती.
मायलेकरांचा संध्याकाळचा कार्यक्रम ठरलेला असे. थोडा वेळ बग्गीतून शेतीवाडीवर फेरफटका. फिरून आल्यावर साधे जेवण नंतर झोप. झोपी जाण्यापूर्वी आई त्याला गोष्टी सांगायची. येशू ख्रिस्ताच्या, जोन ऑफ आर्कच्या आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या. त्याच त्याच गोष्टी आलटून-पालटून व्हायच्या. पण हेन्रीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे पहिल्या क्रुसेडची. ती रोजच सांगावी लागे. पहिल्या क्रुसेडमध्ये त्याच्या खापर खापर पणजोबांनी मोठा पराक्रम गाजवला होता. रेमंड कॉम्ते डी तुलूझ द फोर्थ त्या युद्धात ख्रिश्चन सरदारांच्या एका तुकडीचे नेतृत्व करीत होते. त्या वेळी त्यांनी पॅरीस ते थेट जेरुसलेमपर्यंत मजल मारली होती. अशा गोष्टी ऐकता ऐकता हेन्रीला झोप लागायची. छोटा हेन्री झोपल्यावर वाड्यातील दिवे एक एक करून मालवले जात.
थोड्याच वेळात हेन्रीने स्केच पूर्ण करून वही आईसमोर धरली.
बघ. पाच मिनटंसुद्धा लागली नाहीत.
छान आहे. अगदी हुबेहूब काढलंयत की!तिने कौतुक केले खरे, पण ते फारसे मनापासून नव्हते.
लोत्रेकने लहानपणी काढलेल्या चित्रांपैकी काही विस्मयकारक चित्रे सध्या आल्बीमधल्या म्युझियममध्ये आहेत. या चित्रांतील सफाई त्याच्या वयाच्या मानाने विलक्षण आहे.
तुम्ही आता सात वर्षांचे झालात. किती दिवस हे असं चित्र काढत बसणार आहात? आता शाळेत नाव घालायला पाहिजे.
मी नाही जा शाळेत जाणार.
राजे, असं कसं म्हणून चालेल. तुम्हाला जहाजाचा कप्तान व्हायचंय ना? मग त्यासाठी शाळेत जावच लागतं. पॅरीसमध्ये फॉन्तॉन म्हणून एक मोठी शाळा आहे. त्या शाळेत तुमचं नाव घालायचं ठरवलंय काउंटसाहेबांनी.
शाळेत जाण्याच्या कल्पनेने त्याचे बालविश्व उद्‌ध्वस्त झाले. शेतीवाडीवर आता हुंदडायला मिळणार नाही या कल्पनेने त्याला रडू फुटले.
शू ऽऽ असे रडतायत काय वेड्यासारखं. तुलूझ लोत्रेकांच्या घराण्यात कधी कोणी रडत नसतं. नीट लक्षात ठेवा.
पॅरीसमध्ये पण खूप मज्जा असते. जोसेफ आणि ऑनेतसुद्धा आपल्याबरोबर आहेत की. शिवाय तिकडे आपल्याला पप्पांबरोबर राहायला मिळेल. मग काय अगदी मजाच आहे बुवा एका माणसाची.
वर्षातून कधीतरी पपा वाडीवर आले की कशी धमाल उडायची. सुस्तावलेल्या गढीला जाग यायची. अभ्यासाला बुट्टी. पपा रोज घोडागाडीतून लांबवर फिरायला घेऊन जात. घोड्यांच्या खुरांचा टपटप आवाज, चाकांची करकर, मधेच चाबकाचा कडकडाट. या पार्श्वभूमीवर चालायच्या शिकारीच्या व लढाईच्या गोष्टी. दिवस कसे भुर्रकन उडून जात. पपांच्या आठवणीने तो मोहरून गेला. पपांबरोबर राहायला मिळत असेल तर मग पॅरीसला जायला हरकत नाही.
पुढचा आठवडा धावपळीचा गेला. प्रवासाची तयारी, सामानाची बांधाबांध, गढीच्या देखभालीच्या काळजीपूर्वक केलेल्या असंख्य सूचना. मोठ्या लवाजम्यासह गाजावाजा करीत लोत्रेक मंडळी एकदाची रेल्वे स्टेशनवर येऊन डेरेदाखल झाली. आगगाडीत बसायला मिळणार म्हणून हेन्री अगदी उत्तेजित झाला होता. वाफेचे लोट सोडीत गाडी एकदाची चालू झाली. दुतर्फा वाऱ्यावर डोलणारी खेड्यातील शेते, हिरवीगार वनराई हे दृश्य पाहता पाहता हेन्री पटकन झोपी गेला. जाग आली तेव्हा गाडी पॅरीसमध्ये नुकतीच शिरत होती. पाऊस पडल्याने सगळीकडे चिखलाची नुसती राड झाली होती. कारखान्यांच्या काळाकुट्ट धूर ओकणाऱ्या चिमण्या, गिचमिड घरे, अरुंद रस्ते. पॅरीसचे हे पहिलेवहिले दर्शन त्याला मुळीच आवडले नाही. गाडी स्टेशनात शिरली तेव्हा प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत सर्वात उठून दिसणाऱ्या पपांना त्याने लांबूनच ओळखले. अंगात लांब कोट, हनुवटीवर दाढी, डोक्यावर हॅट घातलेले पपा कॉम्ते अल्फान्सो द तुलूझ लोत्रेक मोठे देखणे आणि रुबाबदार दिसत होते. पॅरीसमध्ये काउंटसाहेबांचा मुक्काम एका बड्या हॉटेलमध्ये ठरलेला असायचा. त्याप्रमाणे ते काउंटेस आणि हेन्री यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्या रात्री जेवणानंतर शेकोटीशी गप्पा मारता मारता त्यांनी छोट्या हेन्रीला मोठ्या प्रेमाने जवळ बसवून घेतले आणि तुलूझ लोत्रेक घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगायला सुरुवात केली.
त्या काळी तुलूझ लोत्रेक घराण्याची गणना फ्रान्समधील फार महत्वाच्या घराण्यांमध्ये केली जार्ई. ते फ्रान्समधील एक इतिहासप्रसिद्ध असे तालेवार घराणे होते. चौदाव्या लुईच्या दरबारात त्यांना खूप मान होता. कालांतराने राजसत्तेचे महत्त्व कमी झाल्यावर सर्व सरदार घराण्यांचे मानमरातब बरेच कमी झाले होते खरे असले तरी एके काळी लोत्रेक घराण्याची फ्रान्समधल्या तुलूझ या बऱ्याच मोठ्या प्रांतावर सत्ता होती. त्यांच्या ताब्यातील जहागिरीच्या प्रचंड महसुलामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती जमा झाली होती. त्यामुळे त्यांचा तोरा अजून थोडाफार शिल्लक होता. निरनिराळी घराणी, त्यांच्या अखत्यारीतील वेगवेगळे प्रांत, सध्याच्या घराण्यांतील आपापसातील नातेसंबंध, तुलूझ लोत्रेकांची वंशावळ, त्यातील ऐतिहासिक पुरुषांची कामगिरी वगैरे बरीच तपशीलवार माहिती त्यांनी हेन्रीला सांगितली. काउंट, ड्युक, मार्क्वेज वगैरे विविध पदव्यांचे अर्थ, त्यांचा अधिकार, दरबारी रीतिरिवाजातील बारीकसारीक तपशील, चमत्कारिक प्रथा या सगळ्या गोष्टी सद्य परिस्थितीत कितीही कालबाह्य झाल्या असल्या तरीही त्या सांगताना ते अगदी रंगून गेले होते. झोपेमुळे हेन्रीचे डोळे मिटत होते तरीही त्यांनी त्याला मोठ्या आग्रहाने आपल्या बंदुका, पिस्तुले, तलवारी, पदके, मानचिन्हे वगैरे गोष्टींचा संग्रह मोठ्या प्रौढीने दाखवला.
                     

1 comment:

  1. हे पुस्तक उपलब्ध आहे का? लोकवाङ्मयगृह प्रकाशनात? तुम्ही ब्लॉग रूपाने लिहिले आहे हे चांगले आहे. पण पुस्तक उपलब्ध असेल तर तेही घेईन म्हणतो.

    ReplyDelete