Tuesday, September 25, 2018

मुलँ रूज - ३


लवकरच शाळेला सुट्टी पडली आणि हेन्री आपल्या इस्टेटीवर परतला. जवळ जवळ चार महिन्यांनी परत येत असल्याने हेन्रीने मनसोक्त हुंदडून घेतले. परत पॅरीसला परतल्यावर सारखे नजरेसमोर असावे म्हणून त्याने आपल्या स्केचबुकमध्ये भरपूर स्केचेस करून घेतली. धान्याचे कोठार, कोंबड्यांचे खुराडे, गायींचा गोठा, घोड्यांचा तबेला, शेतातली पाणबदके, शेतकरी. तेथे विषयांना काहीच तोटा नव्हता. सकाळी हातात स्केचबुक घेतलं की संध्याकाळपर्यंत सगळं बुक भरून जायचं. दुसऱ्या दिवशी नवी वही.
(या मुक्कामात हेन्रीने काढलेल्या चित्रांपैकी गाढव जुंपलेली खतांची गाडी हे जलरंगातील चित्र आणि इतर अनेक स्केचेस सध्या आल्बीमधल्या म्युझियममध्ये आहेत.)
त्या सुटीत हेन्रीची दोन विषयांची जंगी तयारी करून घेण्यात आली. पहिला विषय म्हणजे पाटर्या, सभारंभांत वावरण्याचे रीतिरिवाज. पार्टीला जाताना कोणता पोशाख करावा, कोणी एखाद्याची ओळख करून दिल्यावर तोंडावर उसने हसू आणत कंबरेत किंचित वाकून आपल्याशी ओळख होण्यात माझा बहुमानच झाला आहे, असे मी समजतो वगैरे कृत्रिम संभाषण कसे करावे. पुरुषांचे एक ठीक. थोड्याशा जुजबी संभाषणानंतर लगेच ते आपले मद्यपानाकडे वळायला मोकळे होत. ...अय्या किती छान दिसतो नाही या पिंक कोटमध्ये... किती कुरळे केस आहेत नाही... वगैरे संभाषणांचा शेवट बहुधा गालगुच्चा किंवा मुका घेऊनच होई. आईने तर बजावूनच सांगितले होते की कोणी मुका घेत असेल तर घेऊ द्यावा. तोंड बाजूला फिरवायचे नाही. दुसरा विषय शिकारीचा. त्यासाठी हेन्रीला खास कपडे शिवण्यात आले. लाल रंगाचा कोट व गुडघ्यांपर्यंत वर येणारे शिकारीचे बूट. कोटाचा रंग लाल असला तरी त्याला पिंक कोट म्हणायचे असा शिरस्ता होता.
हेन्रीचा बुजरेपणा जावा म्हणून त्याला जवळच असलेल्या लॉरी नावाच्या गावातल्या इस्टेटीवर पाठवण्यात आले. त्या पाटर्या आणि शिकारींचा हेन्रीला मनस्वी कंटाळा येई. जेव्हा कधी त्याला संधी मिळे तेव्हा मधेच सटकून काखोटीला स्केचबुक मारून तो सरळ तबेल्यावर जाई. घोड्यांना खडीसाखर भरवल्यावर ते त्याला हवी ती पोज देत.
(घोड्यावर बसायला सज्ज असलेली स्त्री, तिची वस्त्रे वाऱ्यावर फडफडत आहेत असे एक आणि पाळीव प्राण्यांची अनेक चित्रे आल्बीमधल्या म्युझियममध्ये आहेत.)
सगळ्या लवाजम्यानिशी त्याला सांबराच्या शिकारीला नेत असत. घोडेस्वारी त्याला बऱ्यापैकी जमू लागली पण शिकारीच्या सगळ्या धामधुमीच्या शेवटी सांबर तोंडातून विचित्र आवाज काढून टाचा घासत प्राण सोडे. ते दृश्य बघताना त्याच्या पोटात कसंसंच होई आणि डोळ्यांतून टपकन पाणी येई. या सगळ्या जबरदस्तीमुळे सुट्टी संपून जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा त्याला मनापासून आनंद झाला.
शालेय शिक्षणाबरोबरच त्याचे दरबारी रीतिरिवाजांचे शिक्षणसुद्धा चालू झाले. खरे म्हणजे त्यालाच जास्त महत्त्व होते. बीजगणित, व्याकरण व सिसेरोच्या भाषणांपेक्षा तलवारबाजी व नृत्य महत्वाचे. व्याकरण व सिसेरोची भाषणे बायकांना एक वेळ ठीक आहेत. पण वादविवादात पुरुषांना पांडित्यापेक्षा तलवारबाजीतल्या कौशल्याचाच जास्त उपयोग होतो. पुरुषांच्या शब्दांना वजन तलवारीनेच येते, पुस्तकांनी नव्हे. नृत्यातील कौशल्य म्हणजे पुरुषांच्या यशाची गुरुकिल्लीच. या किल्लीनेच पुढील कारकिर्दीचे दरवाजे उघडत असतात. प्रतिष्ठितांच्या वर्तुळात प्रवेश व्हावा म्हणून हेन्रीला पाटर्या-समारंभांना कटाक्षाने नेले जाई. पार्टीला आलेल्या सर्व बड्या हस्तींशी हेन्रीची रीतसर ओळख करून दिली जाई. धिस इज्‌ किंग लिओपाल्ड ऑफ बेल्जम. मीट मिस्टर ह्युगो. हे लिहितातसुद्धा बरे का. वगैरे वगैरे. मद्यपानच्या प्रसंगी हेन्रीला ग्रेनेडाईनचा पेला भरून दिला जाई. कोणत्या प्रसंगी कोणाबरोबर काय प्यावे या शास्त्राची तोंडओळख हेन्रीला एवढ्या लहान वयातच करून देण्यात आली.

(फोटो – हेन्री तुलूझ लोत्रेक म्युझियम, आल्बी)


No comments:

Post a Comment