Wednesday, September 26, 2018

मुलँ रूज - ५

लहानग्या हेन्रीच्या आजारपणात बघता बघता दोन वर्षे उलटून गेली. आता कोणताही डॉक्टर, कोणतेही आरोग्यधाम, फ्रान्समध्ये ज्ञात असलेला कोणताही उपचार करायचा बाकी राहिला नव्हता. शेवटी अगदी नाइलाजाने आई आपल्या लाडक्या लेकराला घेऊन निराश मनाने इस्टेटीवर परतली. सगळ्या गोष्टी अगदी आपापल्या जागी जशाच तशा होत्या. शेवाळाचा राप चढलेल्या गढीच्या काळपट भिंती, वटवाघळे वस्तीला असलेले बुरूज, सर्वत्र भरून राहिलेला कुबट दर्प, दिवाणखान्यातील भली मोठी फायरप्लेस, तुलूझ लोत्रेक घराण्यातल्या पुरुषांच्या छातीवर पदकांच्या माळा लटकावलेल्या भल्या मोठ्या तसबिरी, कशात काहीही फरक पडला नव्हता. नाही म्हणायला तान्ते नावाची मोलकरीण केसांचा टोप घालू लागल्याने दहा एक वर्षांनी तरुण दिसत होती इतकेच. ऋतुचक्र नेहमीप्रमाणे फिरत होते. वसंत ऋतू ऐन बहरात होता, बागेत फुले फुलली होती, फुलपाखरे उडत होती, पक्षी कुजन करीत होते. फरक पडला होता तो फक्त हेन्रीमध्ये. सततच्या आजाराने तो खूप अशक्त झाला होता. त्याचे खेळणे, बागडणे, हसणे सारे काही हरवून गेले होते. घोडदौड तर दूरच राहिली, चित्र काढण्यासाठी पेन्सिल घेऊन बसणेसुद्धा त्याच्याने होत नव्हते. आपल्या खोलीतून गच्चीवर जायलासुद्धा त्याला एका बाजूने आई व दुसऱ्या बाजूने जोसेफचा आधार लागत होता.
जून महिन्यात प्रकृतीला थोडासा आराम पडताच त्याला त्याच्या आजोळी पाठवण्यात आले. आजोबा ग्राँपेर त्याची वाट पाहत दरवाजातच उभे होते. हेन्रीला दुरून येताना पाहताच त्यांच्या हृदयात आनंदाचे भरते आले. पण तो जवळ येताच त्याची अवस्था पाहून त्यांच्या पोटात अगदी गलबलून गेले. किती अशक्त आणि बारीक दिसत होता तो. आपला नातू उमरावपुत्र असावा या आपल्या हव्यासाची तर ही किंमत नसावी, या शंकेने त्यांच्या काळजात चर्रर्र झाले. तरी अेदल व काउंट अल्फान्सो यांच्या विवाहापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या परीने धोक्याचा इशारा दिला होता. चुलत-मावस भावंडांच्या संबंधातून झालेल्या संततीत आनुवंशिक दोष असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यात अेदल व काउंट अल्फान्सो तर सख्खी मावस भावंडे. पण काय दुर्बुद्धी सुचली आणि तुलूझ लोत्रेक घराण्याच्या नावाचा मोह पडला. नातवाच्या नावामागे लांबलचक उपाध्यांची बिरुदावली असेल आणि नावापुढे राजे-महाराजांप्रमाणे रोमन अंक असतील. कॉम्ते द तुलूझ लोत्रेक हेन्री द फिफ्त. खानदानापुढे काही दिसेनासे झाले होते. हेन्रीच्या धमन्यातून वाहणारे रक्त शुद्ध होते हे खरेच, पण तेवढेच ते अशक्तही होते.
बाळराजे थोडे दिवस विश्रांती घ्या. लवकरच तुम्ही बरे व्हाल.पोटाशी धरून हेन्रीला थोपटताना कदाचित हा आपला एकुलता एक नातू कधीच बरा होणार नाही, या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. गळ्यात दाटलेल्या हुंदक्याने स्वर रुद्ध झाला.
आजोबा तुम्ही रडू नका. मला आता बरं वाटतंय.
आजोळचा मुक्काम हेन्रीला फारसा लाभला नाही. किंबहुना त्याची तब्येत थोडीशी ढासळली. परतीच्या प्रवासात तो सतत आईच्या मांडीवर डोके ठेवून होता. अशक्तपणाने आलेल्या ग्लानीत मधेच डोळे किलकिले करून तो आईकडे बघून मलूल हसायचा. दुतर्फा लालबुंद फळांनी लगडलेल्या चेरीच्या बागा होत्या. वसंत ऋतूचा बहर ओसरायला अजून अवकाश होता. पण गाडीत बसलेल्या माय-लेकरांच्या आयुष्यातील वसंत केव्हाच ओसरला होता.
तीन दिवसांनी एक अपघात झाला.
काउंटेस लायब्ररीत वरच्या फळीवरचे एक पुस्तक काढीत असता एक क्षणभरच तिचे हेन्रीवरचे लक्ष विचलित झाले. तेवढ्यात हेन्री खुर्चीवरून उठला आणि नुकत्याच पॉलीश केलेल्या जमिनीवरून घसरून पडला. वास्तविक खाली पडणे तसे अगदी किरकोळीत जमा होण्यासारखे होते, पण हेन्रीला परत उठून आपल्या पायावर उभे राहणे काही जमले नाही. डॉक्टर आले आणि त्यांनी पाय मोडल्याचे सांगितले. दोन्ही हाडे अगदी वेडीवाकडी मोडली होती. हाडे जुळून कुबड्यांच्या आधाराने चालायला येईपर्यंत दोन महिने गेले.
एके दिवशी हेन्री आईबरोबर गावातल्या बागेत फिरायला गेला असताना कुबडीच्या खाली एक छोटा वाटाण्याएवढा दगड आल्याचे निमिक्त झाले आणि काखेतली कुबडी निसटून हेन्री धाडकन खाली आपटला.
ममाऽऽहेन्रीच्या किंकाळीने संध्याकाळच्या गर्दीतील सर्वजण दचकले. या वेळी त्याचे दोन्ही पाय मोडले होते.
त्या रात्री तो असह्य वेदनांनी तळमळत होता. वेदनेची कळ येताच त्याचा चेहरा पिळवटून गेला. हातापायांना कापरे भरले. दात वाजू लागले. पायांच्या स्नायूतून सुरू झालेली वेदनेची तीव्रता हळूहळू वाढत जात मांड्यांमध्ये, पाठीच्या कण्यामधून सर्व शरीरभर पसरली. तोंड वेडेवाकडे झाले. हाताची मूठ घट्ट आवळली गेली. मस्तकात घुसलेली कळ कवटी फोडून बाहेर पडेल की काय असे वाटू लागले. सुरुवातीला सुईच्या तीक्ष्ण अग्राप्रमाणे असलेली वेदना अवघे शरीर व्यापून उरली. असह्य होऊन तोंडावाटे बाहेर पडू पाहणारी किंकाळी आतल्या आत घुसमटून गेली. डोळे खोबणीत गरकन फिरले. मिनिटभरात सर्व शांत झाले. आईच्या हातावरची पकड सैल झाली. आईकडे बघून तो किंचित हसला. आईने त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून ओघळणारा फेस रुमालाच्या टोकाने हलकेच टिपला.
थोड्या वेळात वेदनेचे दुसरे आवर्तन. पुन्हा एकदा सर्वांगाला कंप, श्वासाची घुसमट... नंतर कितीही इलाज झाले तरी त्या रात्री सुरू झालेल्या यातनाचक्रातून पुढे केवळ मृत्यूनेच त्याची सुटका केली.
या वेळी जे डॉक्टर आले ते बरोबर क्लोरोफॉर्मचा वास व चकाकणारी स्कॅलपेल घेऊनच. एकूण चार शस्त्रक्रिया झाल्या. तरी तुटलेली हाडे काही जुळून येईनात. निदान... कॅल्शियम व खनिजांचा अभाव. पुन्हा एकदा वेगवेगळ्या आरोग्यधामांच्या वाऱ्या चालू झाल्या. पण या वेळी प्रवास करणे मागच्यापेक्षा जास्त कष्टप्रद होते. कारण हेन्रीचे दोन्ही पाय प्लास्टरमध्ये होते. त्याच्या सर्व हालचाली स्ट्रेचरवरून व्हायच्या. पांढरा गणवेश घातलेल्या परिचारिकांचा तांडा, रुग्णवाहिका, खास राखून ठेवलेला रेल्वेचा डबा, या बिछान्यातून दुसऱ्या नव्या बिछान्यात. सर्व उपचार थकले. इलेक्ट्रोथेरपी, मालीश, गंधकाच्या पाण्याचे स्नान, पुन्हा एक नवी शस्त्रक्रिया. सर्व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन झाला. सगळे उपचार करून झाले पण व्यर्थ. दुखण्यात काही केल्या उतार पडेना.
हळूहळू डॉक्टरांना दाखवायचे कमी होत गेले. वेदना सुद्धा कमी कमी होत गेल्या. जणू काही थकूनभागून संवेदनाच बोथट झाल्या होत्या. वेदनांचा आवेग बराच ओसरला होता. एखाद्या मंद्र सप्तकातल्या पार्श्वसंगीताप्रमाणे वेदनांच्या संथ लयीची त्याला सवय होऊन गेली. आयुष्याशी एकरूप झाल्यासारखी.
हेन्रीचा आजार असाध्य आहे हे तोपर्यंत सर्वांना कळून चुकले. काळ्याकुट्ट निराशेने त्या दोघा माय-लेकरांचे जीवन ग्रासून गेले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच हेन्रीला खूप समज आली. दोघेही माय-लेकरे आपापल्या मनातील नैराश्य दुसऱ्याला कळू नये म्हणून एकमेकांच्या नजरेला नजर देणे टाळू लागली. एवढ्या कोवळ्या वयात त्याने फार मोठ्या धीराने सत्याचा कडू घोट गिळला होता. या रुग्णशय्येवरून उठून उभे राहणे आपल्याला आता कधीच जमणार नाही. प्लॅस्टरमध्ये अडकलेले ते जडशीळ आणि दुखरे पाय. अंथरुणावर झोपून छतावरतीच काय ती कल्पनाचित्रे रंगवायची. पडल्या पडल्या खिडकीतून दिसतोय तेवढाच आकाशाचा तुकडा म्हणजे आपले जग. घोड्यावरची रपेट, फाँतॉनची शाळा, मॉरीस, कॅनेडियन ट्रॅपरचे जंगलातील लाकडी खोपटे हे सर्व हळूहळू विस्मृतीच्या पडद्याआड झाले. आई, आई आणि आई हेच जीवन आणि हेच सत्य. सकाळी उठल्याबरोबर पहिले दर्शन व्हायचे ते आईचे. फिकुटलेले मंद स्मित, बॉन्ज्युर माँ पेतीत, गुड मॉर्निंग माझ्या राजा हे शब्द. नंतर दिवसभर ती त्याच्या अवतीभवती सारखी वावरताना दिसायची. नंतर रात्री झोपताना डोळे मिटावेत तर आई प्रार्थना पुटपुटत असायची.

(खाली दिलेले पोर्ट्रेट करताना कॉम्ते एदल शेतॉ द मार्लोम येथील वाड्यातील ब्रेकफास्ट रूममध्ये बसलेली आहे. आपल्या मुलाच्या आयुष्यतील दु:ख तिने ज्या शांतपणे स्विकारले आहे तो हताश भाव आणि तिचे खानदानी सौम्य व्यक्तिमत्व लोत्रेकने या पोर्ट्रेटमध्ये अचूक पकडले आहे. लोत्रेक ब्रशचा वापर पेन्सिल ड्रॉईंगसारखा फार प्रभावीपणे करायचा. त्याच्या या तंत्राची झलक या पोर्ट्रेटमध्ये दिसून येते.)


(कॉम्ते एदल तुलूझ लोत्रेक, तैलरंग – कॅनव्हास ९२x८० सेमी – १८८१ म्युझियम, आल्बी)

No comments:

Post a Comment