Tuesday, September 25, 2018

मुलँ रूज - ४

सन १८५५ मध्ये पॅरीसमध्ये शाँझ एलिजेतील एका मोकळ्या मैदानावर एक भव्य एक्स्पोझिशन भरले होते. तेथे जागोजागी कमानी, महिरपी, प्लॅस्टरचे प्रचंड पुतळे वगैरे गोष्टींची एकच गर्दी झाली होती. एरवी त्या मैदानाचा काही तरी उपयोग व्हावा या उद्देशाने तेथे चित्रकार व शिल्पकारांचे एक वार्षीक संमेलन, सॅलून द पेंटर ए स्कल्प्‌चर द आर्टिस्ट्‌स ऑफ फ्रान्स भरत असे. हे प्रदर्शन नुसत्या सॅलून या नावाने ओळखले जाई. याव्यतिरिक्त तेथे गुराढोरांचे प्रदर्शन, चॅरिटी बाजार, देशभक्तिपर मेळावे वगैरे नियमितपणे भरत असत. शिवाय कधी कधी खास निमंत्रितांसाठी कार्यक्रम आयोजित केलेले असत. एकदा हेन्रीला त्याचे काका जॉकी क्लबच्या कार्यक्रमाला घेऊन गेले. तेथे चालू असलेल्या घोड्यावरच्या कसरतींचे एक वृद्ध चित्रकार आपल्या स्केचबुकात भराभर चित्रण करत असताना हेन्री त्याच्याकडे अगदी टक लावून बघत होता. ते त्याच्या लक्षात आले व तो त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसला.
तुम्हाला चित्र काढायला आवडते का, असे आपल्या वहीत लिहून त्याने ती वही त्याच्या पुढ्यात धरली. हेन्रीला गोंधळात पडलेला पाहून त्याने आपण बहिरा व मुका असल्याचे खुणेने सांगितले. त्याने पुढे केलेल्या वहीत हेन्रीने अडथळ्यावरून उड्या मारणाऱ्या घोड्यांचे भराभर स्केच करायला सुरुवात केली. त्याचा वेग व आरेखन कौशल्य पाहून तो वृद्ध अचंबित झाला. हेन्रीचे चित्र काढून संपल्यावर त्याने त्या चित्राखाली तू खूप छान चित्र काढतोस असा शेरा लिहून दिला. त्यातील खूप या शब्दाखाली त्याने ठळक रेघ मारली व खाली सही ठोकली. घरी गेल्याबरोबर त्याने ताबडतोब आईला तो शेरा दाखवला. दिवसभराच्या दगदगीने तो अगदी दमून गेला होता. आईला फारसे कौतुक वाटले नसले तरी त्या वृद्ध चित्रकाराने केलेल्या कौतुकाने त्याची स्वारी खूश होती. त्या खुशीतच तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी हेन्री उठला तो तापाने फणफणतच. त्यात त्याचे डोकेसुद्धा ठणकत होते. डॉक्टरांनी तपासून काही घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. पण एका आठवड्यानेसुद्धा ताप जाईना तेव्हा ते गोंधळात पडले. म्हणून त्यांनी दुसऱ्या एका ज्येष्ठ डॉक्टरांना बोलावून आणले. त्यांनी हेन्रीला मोठ्या काळजीपूर्वक तपासले. पण लक्षणांची संगती काही केल्या लागेना. ॲनिमियामुळे आलेला अशक्तपणा म्हणावे तर ताप व डोकेदुखीचे काय?
‘‘त्याला आमेली ले बँला घेऊन जा. थोडा हवापालट झाला की बरं वाटेल. विशेषतः तिथलं पाणी. ते फारच गुणकारी आहे ॲनिमियावर.’’
पुढच्याच आठवड्यात सगळे सामानसुमान बांधून जाण्याची तयारी झाली. निघताना वडिलांनी फाल्कनरीवरचे एक पुस्तक दिले. मॉरीसने निरोप देताना कॅनडाला जायचा बेत विसरू नकोस असे बजावून सांगितले.
ग्रँड हॉटेल द आमेली ले बँ जवळ जवळ रिकामेच होते. वातावरणात एक विचित्र उदासीनता भरून राहिल्यासारखे वाटत होते. जणू काही तिथे पूर्वी राहून गेलेल्या लोकांच्या दुःख व वेदनांचा दर्वळ मागे रेंगाळत राहिला होता. जेवणाचा भव्य हॉल, वाद्यवृंद, नृत्यगृह सर्व प्रकारच्या राजेशाही सुखसोयी हजर होत्या पण तरीही वातावरणातील मरगळ दूर करण्यास त्या फारशा उपयोगी पडत नव्हत्या.
तेथे नव्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हेन्रीची पुन्हा एकदा सर्वांगीण तपासणी केली. आपसात बराच वेळ चर्चा करूनही नक्की निदान होईना तेव्हा मात्र आईचा चेहरा चिंतेने पांढराफटक पडला होता. निदान झाले नाही तरी हेन्रीचा ताप अचानक पळाला. एके दिवशी तो अगदी खुटखुटीत बरा झाल्यासारखा दिसायला लागला. डॉक्टरांच्या दृष्टीने हेन्रीच्या रहस्यमय आजाराइतकेच त्याचे अचानक बरे होणेसुद्धा तितकेच चिंतेचे होते. कदाचित आमेलीच्या पाण्याचा जादूई परिणाम असेल, काही सांगता येत नाही.
हवापालटासाठी त्यांनी रिव्हिएरासारख्या स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी जायचे ठरविले. आणि इस्टरनंतर पॅरीसला परत. हेन्री आजारपणात बुडालेल्या अभ्यासाच्या तयारीचे बेत आखू लागला. त्याने एक लांबलचक पत्र मॉरीसला लिहिले. ते नीसमध्ये आले तेव्हा कार्निव्हल नुकताच संपला होता. तुटलेल्या पताका व रंगीबेरंगी पट्ट्यांची भेंडोळी ॲव्हेन्यू व बुलेवारवर लोंबकळत होती. हिवाळ्यातला गारठा अजून ओसरला नव्हता. तीन-चार रशियन ग्रँड ड्युक व दोन-तीन अमेरिकन लक्षाधीशांचा शहरातील मुक्काम अजूनही हलला नव्हता. ग्रँड हॉटेल डी सिमेज्‌च्या बागेतील मिमोसाची वेल ऐन बहरात होती. तिच्या फुलांच्या वासाने हेन्री मोहरून गेला.
हॉटेलातील नाश्ता खूप छान असायचा. ठीक दहा वाजता शिकवणीचा शिक्षक यायचा. मग संध्याकाळी आईबरोबर प्रोम्नोद द आँग्लेवरून घोडागाडीतून फेरफटका मारताना व्हिक्टोरिया, लँडाऊ, फिॲकर, टिल्‌ब्युरी अशा विविध प्रकारच्या घोडागाड्या व डॉगकार्ट इकडून तिकडे जाताना दिसत. झोकदार पोशाखातल्या तरुण स्त्रिया हातातला चाबूक फडकावत, दाताखाली हळूच जीभ चावत गाडी दौडत मजेत चालल्या आहेत आणि त्यांचा कडक गणवेशधारी गाडीवान मात्र मागे बग्गीत अंग चोरून ताठ बसलाय हे दृश्य मोठे मजेशीर दिसे. हॉटेलमध्ये परत आल्यावर हेन्रीला जलरंगातल्या चित्रांसाठी चांगला विषय मिळालेला असे.
(वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी काढलेल्या जलरंगातील या चित्रांचा लोत्रेकच्या सर्वात लोकप्रिय कामात समावेश होतो. या चित्रांचे आजपर्यंत असंख्य प्रिंट्‌स निघाले आहेत.)
जसा गेला तसा अचानक ताप परत आला. तापाबरोबरच डोक्यातील गुणगुण. पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सर्वांगीण तपासण्या. पण नवीन कोणतेही निदान होईना. वरवर अशक्तपणा आणि ॲनिमिया वाटत होता पण आत काहीतरी गंभीर आजार असावा याची अस्पष्ट चाहूल डॉक्टरांना लागली होती. पुन्हा हवापाणी पालटण्याचा सल्ला. आता या वेळी बर्जेसचे पाणी.
ताबडतोब हेन्रीला घेऊन त्याची आई बर्जेसला रवाना झाली. तिथेसुद्धा मागचीच पुनरावृत्ती झाली. बर्जेसला आल्याबरोबर आजारात उतार पडला. रोज संध्याकाळी आई त्याला घेऊन नगरपालिकेच्या वाद्यवृंदाला जाई. पण थोड्याच दिवसात परत ताप आणि डोकेदुखी चालू झाली. हेन्रीचे हिंडणे-फिरणे पार बंद झाले.
या वेळी डॉक्टरांनी प्लाँबीएर्सला जायला सुचविले. लगोलग आई त्याला घेऊन प्लाँबीएर्सला गेली. पुन्हा ये रे मागल्या. दरवेळी डॉक्टर नवे ठिकाण सुचवीत. आता एव्हीअँ, महिन्याभराने गुयाँ आणि मग नीस असे करता करता परत एकदा आमेली ले बँची पाळी आली आणि एक फेरा पूर्ण झाला. फ्रान्सच्या नकाशावरची सर्व ठिकाणे पालथी घालून झाली. दर वेळी तोच प्रकार. थोडे दिवस आराम नंतर परत ताप, डोकेदुखीचा फेरा चालू. आता हेन्री बहुतेक वेळ अंथरुणात पडून असे. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे हेन्रीचे शाळेत परत जाण्याचे स्वप्न क्षितिजावर दूरदूर जाणाऱ्या जहाजासारखे हळूहळू धूसर होत गेले. पॅरीसमधले बुलेव्हार मलेशर्ब्सवरील घर, मित्रांबरोबरचा इंडियन वॉर हा लुटुपुटीच्या लढाईचा खेळ, कॅनेडियन ट्रॅपर फासेपारधी बनून मॉरीसबरोबर जंगलात लॉग हाऊसमध्ये राहण्याचे स्वप्न हे सारे हळूहळू विस्मृतीत विरून जाऊ लागले. उरले ते फक्त अंथरूण, ताप, डोक्यातील घण, थर्मामीटर, डॉक्टर, बेडस्टँड व त्यावरील नाना औषधांच्या बाटल्यांची किणकिण. डोळे मिटले तरी कानात चालू असलेली गुणगुण काही थांबत नसे. डोळे उघडताच उशाशी प्रार्थना पुटपुटत बसलेली दक्ष आई दिसे. सततच्या जागरणाने थकल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे हास्य मलूल झाले असले तरी त्यामुळे हेन्रीला मोठा दिलासा मिळे.


(डॉग कार – तुलूझ लोत्रेक, तैलरंग लागडी पृष्ठभाग, २७x३५ से.मी. लोत्रेक म्युझियम, आल्बी)

No comments:

Post a Comment