Saturday, September 29, 2018

मुलँ रूज - १३


कोर्मोनचा वर्ग संपल्यावर हेन्री आपल्या मित्रांच्या टोळक्याबरोबर ओग्युस्तिनामध्ये जाऊन बसे. तिकडच्या सर्व गडबड-गोंधळामध्येच त्या सर्वांचे तावातावाने वादविवाद चालत. कलेचा इतिहास, प्रगती, कलाविक्रेत्यांची व समीक्षकांची बदमाषी, त्यांचे साटेलोटे वगैरे वगैरे. त्या वेळी नव्या विचारांच्या काही तरुण मंडळींनी आपली एक संघटना नुकतीच स्थापन केली होती. सोसायटी द आर्टिस्ट्‌स इंडिपेंडंट्‌न्स. त्यांचे बरेच सभासद तेथे गप्पा मारायला येत. बाकी कितीही मतभेद असले तरी अकादमीच्या सभासदांना शिव्या देण्यात त्यांचे एकमत होई. तिथे हेन्री आणि त्याच्या मित्रांची काही समविचारी चित्रकारांशी ओळख झाली. गोबऱ्या गालांचा, दांडगट शरीरयष्टीचा पॉइंट्यालिस्ट जॉर्ज सुरा हा त्यापैकी एक. बहुतेक वेळा तो ओग्युस्तिनामध्ये पाइप ओढत, कॉफी पीत कुठेतरी तंद्री लावून बसलेला असे. खूपशी न्युड पेंटिंग आपल्या खात्यात जमा असलेला रेन्वा. श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्मलेला एदुआर माने. कधी कधी पोल सेझान.
एकदा हेन्रीच्या टोळक्याला ओग्युस्तिनासह कमील पिस्सारोने आपल्या घरी जेवायला बोलाविले. तेथे त्याची ओळख त्यावेळी प्रख्यात झालेल्या एदगर देगासशी झाली.
तुम्ही सगळे चित्रकलेचे विद्यार्थी आहात तर. भावी चित्रकार. आपल्या प्रतिभेच्या आविष्काराने सगळ्या जगाचे डोळे दिपवण्याची अगदी घाई झालेली दिसतेय तुम्हाला.बॅले गर्ल या सुप्रसिद्ध पेंटिंगचा चित्रकार काहीशा कुचेष्टेने म्हणाला. पण त्याच्या बोलण्यातील वक्रोक्ती हेन्रीच्या लक्षात आली नाही. देगाससारख्या दैवताबरोबर कॉफी प्यायला मिळतेय यानेच तो भारावून गेला होता.
तुमच्या चित्रकलेकडून काय अपेक्षा आहेत? प्रसिद्धी, पैसा, मानमरातब की तुम्हाला कलेच्या इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवायचा आहे? या दोन्ही अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण आपला वेगळा ठसा उमटवण्याचं तुम्ही ठरवलं असेल तर एक लक्षात ठेवा. जगाच्या इतिहासात आजतागायत महान म्हणता येतील असे फक्त साठ चित्रकार होऊन गेलेयत. त्यातले पाच या शतकात. जेरीकोल, दॉमिए, माने, इन्ग्रेस आणि दलाक्रवा. या शतकाचा कोटा केव्हाच संपलाय. आता तुमच्यापैकी कोणालाही इतिहासात अमर होण्याची शक्यता मुळीच राहिलेली नाही. आता राहिला पैसा. त्यासाठी तुम्ही चित्रकार व्हायचं ठरवलं असेल तर हा पेशा अगदी बेभरवशाचा आहे हे विसरू नका.देगास म्हणाला.
एडगर प्लीज्‌.पिस्सारो त्याला मधेच अडवीत म्हणाला, “असं बोलून या पोरांना तुम्ही नाउमेद करू नका.
माझा नाइलाज आहे. पण सत्य परिस्थिती कोणीतरी सांगायलाच हवी. ते कटू काम मी वेळीच करतोय. याबद्दल ही तरुण मंडळी आयुष्यभर माझी आठवण काढतील.देगास परत विद्यार्थ्यांकडे वळून म्हणाला, “हे पाहा चित्रकारांची परिस्थिती फार वाईट आहे. सबंध पॅरीसमध्ये शोधून शोधून फार तर पन्नास जण असे निघतील की ज्यांचं पोट चित्रकलेवर भरत असेल. उरलेल्या सर्वांना दोन वेळचे फाके पडत असतात. आज जे घरं रंगवणारे रंगारी आहेत ना त्यातला प्रत्येक जण एके काळी उगवता चित्रकार समजला जायचा.
ओग्युस्तिनाने त्याला पाठीमागून हळूच हाक मारली. सिन्योर देगास-
आता काय पाहिजे तुला?’’ मधेच व्यत्यय आल्याने देगासने वसकन ओरडून विचारले.
तुम्हाला एक मॉडेल हवीय का. एकदम नवी कोरी. माझी एक चुलत बहीण नुकतीच पालेर्मावरून आलीय. दिसायला अगदी चिकनी आहे बरं का.
दिसायला कशी का असेना. माझी काही हरकत नाही. प्रॉटेस्टंट आहे का.
आता पालेर्मामध्ये तुम्हाला कोण प्रॉटेस्टंट मिळणार आहेत. आमच्या तिकडचे झाडून सगळे श्रद्धावान कॅथलिक असतात.
तिचे उरोज कसे आहेत. ते जर चांगले असतील तर मग श्रद्धावान कॅथलिक असली तरी चालेल.
आता उरोजांचं ते काय. आहेत चारचौघींसारखे. छान, गोल, भरलेले.
तसं नसतं. प्रत्येक स्त्रीच्या उरोजांचा आकार वेगवेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. तुझ्या बहिणीचे उरोज जर सफरचंदासारखे गोल गरगरीत असतील तर मला मुळीच चालणार नाही. पण पेरसारखे टोकदार असतील तर उद्या लगेच पाठवून दे स्टुडिओवर. आणि आता फूट इथून. या तरुण मुलांना चार गोष्टी सांगायच्यायत मला.
हेन्री व त्याच्या साथीदारांकडे वळून देगास म्हणाला, “तर मी काय सांगत होतो ते लक्षात घ्या. या चित्रकार बनण्याच्या नादाने तुम्ही फुकट उपाशी मराल. फाटके बूट घालून रस्तोरस्ती कामाची भीक मागत वणवण फिरावे लागेल. थंडीच्या दिवसात स्टुडिओ नामक तुमच्या खोपटात गारठून मरण्याची वेळ येईल. घरमालक समोर दिसताच हातापायांना कापरं भरेल. यापेक्षा आपण कारकून नाही तर पोस्टमन झालो असतो तर फार बरं झालं असतं असं वाटायला लागेल.
मस्य देगास, तुम्ही त्यांचा आत्मविश्वास खच्ची करताहात.पिस्सारो म्हणाला.
मी कोण यांचा आत्मविश्वास खच्ची करणारा. यांच्या चेहऱ्याकडे बघा. आपण मायकेल अँजेलोचे बाप लागून गेलो आहोत असा भाव आहे की नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर. या कॅफे बाहेरच्या जगाची यांच्यापैकी कोणाला कल्पना नाहीय. हे जीवन फार कठोर आहे रे बाबांनो. गुड डे-असे म्हणून देगास उठला.
त्यांच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका. जेवणानंतर पाचक म्हणून उगाच काहीतरी बोलत असतात ते.पिस्सारो म्हणाला.
म्हातारा भडवा खट आहे नाही.रॅचो सर्वात अगोदर भानावर आला.

(लोत्रेकवर देगासचा खूपच प्रभाव होता. एका अर्थाने तो लोत्रेकचा गुरूच होता असं म्हणावे लागेल. लोत्रेक प्रमाणेच तो सुद्धा एका प्रतिष्ठीत घराण्यातून आला होता. देगासने इंप्रेशनीस्ट शैलीमध्ये प्रामुख्याने पेस्टल या माध्यमाचा फार प्रभावी वापर केला आहे. त्याची बहूतेक कामे स्टुडियोत किंवा आठवणावर विसंबून केलेली आहेत. विषय, हाताळणी आणि तंत्राच्या अंगाने त्याने बरेच प्रयोग केले. तो काळजीपूर्वक विचार करून पेंटींग करे. तो म्हणायचा कलेच्या प्रांतात कोणतीही गोष्ट योगायोगावर सोडून चालत नाही. लोत्रेकच्या सुरवातीच्या कामावर देगासचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. बॅलेरीना आणि स्टँडिंग डान्सर्स, आफ्टर द बाथ आणि एट द टॉयलेट या चित्रांत देगासचा प्रभाव कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो ते दोन्ही कळून येते. दोघांच्या स्वभावत जो फरक होता तो त्यांच्या कामात दिसून येतो. देगास एकांत प्रिय होता तर लोत्रेक नेहमी लोकांच्या गर्दीत रमत असे. लोत्रेकमधील असामान्य गुणवत्ता अगदी सुरवातीलाच देगासच्या लक्षात आली होती. तो त्याचे खूप कौतूक करायचा. ‘आम्हाला ज्या गोष्टी शिकण्यात आयुष्य घालवायला लागलं ते पहा या पोराने किती चटकन आत्मसात केलं आहे ते.’ पण लोत्रेकची लोकप्रियता वाढू लागल्यावर याच कौतूकाची जागा असूयेने घेतली. ‘लोत्रेक काय माझेच कपडे वापरतो, पण थोडे आखूड करून’ लोत्रेकच्या मागे तो बघायचा.)
(वुमन कोम्बींग हर हेअर - एडगर देगास – कागदावर पेस्टल, ५२x५१ सेमी , १८८५ – हर्मिटाज म्युझियम, सेंट पीटर्सबर्ग)

(एट द टॉयलेट – तुलूझ लोत्रेक – तैलरंग कार्ड ६७x५४ सेमी, १८८६ – म्युसी डी’ओर्से, पॅरीस)






No comments:

Post a Comment