Sunday, September 30, 2018

मुलँ रूज - १५


रॅचो आणि कंपनीप्रमाणे तो मोंमार्त्रमधल्या एका मोडकळीला आलेल्या घरात राहू लागला. खिदमतीला नोकरचाकर नव्हते की तळहातावरील फोडासारखी जपायला आई नव्हती. पण तिथे होते मनमुराद स्वातंत्र्य. सकाळी उशिरा उठा. जवळच्या एखाद्या बिस्ट्रोमध्ये जाऊन नाश्ता करा व नंतर सावकाश रमतगमत ॲतलिएवर जा. दुपारी ओग्युस्तिनातल्या भरल्या बैठकीतून अर्ध्यावर उठून घरी जाण्याची घाई नव्हती. वर संध्याकाळी मनाला येईल तिकडे जायला मोकळीक. कॅफे शाँतॉन, अधूनमधून फर्नांदोची सर्कस किंवा ॲरिस्टीड ब्रुअँटची देशभक्तीने ओथंबलेली गाणी.
सर्वात महत्वाचे म्हणजे आता ल एलीसमध्ये जाण्यात कोणतीही अडचण नव्हती. ल एलीस मोंमार्त्रमधले एक जुनेपुराणे प्रचंड गोंगाट असलेले नृत्यगृह होते. प्लास पिगालच्या कारंज्याप्रमाणेच चित्रकार, मॉडेल वगैरे लोकांची एक आवडती जागा. काही वर्षांपूर्वी मोंमार्त्र पॅरीस शहराच्या सीमेवरील एक शांत असे खेडेगाव होते. मोंमार्त्रच्या परिसरात जुन्या, वापरात नसलेल्या मोडक्या पवनचक्क्या आढळत. त्यांची न फिरणारी पाती एके काळच्या खेडेगावाची साक्ष होती. त्या वेळी मोंमार्त्र गुंड, मवाली, वेश्या व त्यांचे भडवे यांचा एक आ म्हणून प्रसिद्ध होते. सभ्य नागरिक तर जाऊद्याच पोलिसांचीसुद्धा तेथे फिरकण्याची सहसा छाती होत नसे.
जवळ जवळ एक शतकभर मोंमार्त्रचे स्थानिक रहिवासी ल एलीसला उदार आश्रय देत आले होते. पण उर्वरित पॅरीसमध्ये मात्र ल एलीसची ख्याती फारशी पसरली नव्हती. व्हिन टॉड नावाची साखरेच्या पाकापासून बनवलेली स्वस्त वाईन, कपच्या उडालेल्या क्रॉकरीमधील जेवण. तिथल्या ओकच्या टेबलांवर प्रेमिकांनी आपल्या चाकूने कामबाणांनी रुद्ध झालेले हृदय व आपल्या नावाच्या आद्याक्षरांची आकृती कोरून आपले प्रेमसंबंध अजरामर करण्याचा प्रयत्न केला होता. पण इतक्या वर्षांच्या वापराने ती टेबले एवढी गुळगुळीत झाली होती की ती आद्याक्षरे काही नीट वाचता यायची नाहीत. धोबीकाम, शिवणकाम, कारखान्यातील मोलमजुरी वगैरे कष्टाची कामे करणाऱ्या स्त्रिया नेहमी तेथे येत. ल एलीसमध्ये त्या कष्टकरी स्त्रियांना नुसत्या विरंगुळ्यांपेक्षा अधिक काहीतरी मिळत असे. काही थोड्या दिडक्यांच्या बदल्यात तिथल्या संगीतात आणि मोकळ्या वातावरणात त्या आपले काबाडकष्टांचे, हलाखीचे जीवन काही वेळ विसरून जात. तिथे कोणाचे पाऊल थोडे वाकडे पडले तर कोणाला त्यात फारसे काही वाटत नसे. खाजगी बाब म्हणून तिकडे दुर्लक्ष व्हायचे.
एका रात्री रॅचो हेन्रीला ल एलीस दाखवायला घेऊन गेला. संगीताची धून नुकतीच चालू झाली होती. गर्दी बऱ्यापैकी दिसत होती. आतमध्ये शिरताच रॅचोला बघून एका पोरीने त्याचा हात धरला व त्याला सरळ स्टेजवर घेऊन गेली. स्टेजवर जाताच त्या दोघांनी संगीताच्या तालावर नाचायला सुरुवात केली. हेन्रीने एका कोपऱ्यातले टेबल पकडले व कोमट व्हिन शॉड मागवली. हेन्री शांतपणे गंमत बघत होता. थोडा वेळ गेल्यावर त्याने स्केचबुक काढले व स्टेजवर नाचणाऱ्या मुली, इकडेतिकडे फिरणारे वेटर, बसलेले गिऱ्हाईक यांचे स्केच करायला सुरुवात केली.
वादनाचा एक फेरा संपल्यावर रॅचो हेन्रीच्या टेबलाकडे आला व म्हणाला, “इथल्या या मुलींनी सगळा ताळतंत्र सोडलाय. त्या तरी काय करतील. त्यांना वारसाच तो मिळालाय. त्यांच्या आया, आज्या, पणज्या सगळ्यांची प्रेमप्रकरणे या ल एलीसमध्येच जमली. येथे शब्दांपेक्षा ओळख स्पर्शानेच जास्त होते. सुरुवात खुर्चीवर बसून एकमेकांच्या पायावर पाय घासण्यात व्हायची. शेवट बहुधा टेबलाखाली जाऊन एकमेकांवर झोपण्यात. या पोरी ल एलीस म्हणजे आपली झोपण्याची खोली समजतात वाटतं. मनात येईल त्याचा हात धरून सरळ मूत्रीत जाऊन त्याच्यासमोर झगा वर करून उभ्या राहतील. नॉम दे दियू, देवाच्यान काही बोलायची सोय राहिलेली नाही. तो ऑर्केस्ट्राचा कंडक्टर पाहिलास ना. या सगळ्याला जबाबदार तो आहे. त्याने जो हा कॅनकॅन म्हणून नाच बसवलाय त्याने डोकंच फिरतं बघ सालं. त्या मुली नाचताना एवढ्या ढेंगा वर करतात की सगळं दर्शन होतं. या दरवाजात एक पोलीस चौकी आणून बसवली तरी या मस्तवाल पोरी काही ताळ्यावर येणार नाहीत.
ल एलीसमध्ये हेन्रीची ओळख ला गुल्वीशी झाली. ती रॅचोबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नाच करी. त्या नाचात तिचे असे काही खास वैशिष्ट्य असे. ती अठराएक वर्षांची धोबीण होती. तिला बोलताना सारखं हसू फुटायचं. तिच्या तोंडची भाषा अतिशय शिवराळ होती. पण कॅनकॅन नृत्यात तिचा हात मात्र कोणी धरू शकत नसे. नृत्याचा ताल तिच्या रोमारोमांतून व्यक्त व्हायचा. शरीराच्या कामूक हालचालीतल्या तिच्या कौशल्याला तर तोडच नव्हती. हेन्रीच्या दृष्टीने ती मोंमार्त्रमधील परिटीणींचा एक नमुना होती. या मुली दिवसभर धुणी बडवून झालेली कमाई उधळायला रात्री ल एलीसमध्ये हजेरी लावीत. दिवसभर धुणी बडवण्याचे कंबरतोड श्रम केल्यानंतरसुद्धा त्या नृत्यासाठी रात्री ताज्यातवान्या असायच्या. नृत्यसुद्धा कॅनकॅनसारखे सर्वात कठीण व अंगमोडे.
कितीही वेळ झाला तरी हेन्रीला कंटाळा म्हणून कधी यायचा नाही. त्या सगळ्या गर्दी-गोंधळाची त्याला मोठी मौज वाटायची. तेथे जमणारे पुरुष बहुधा लोफर, लफंगे, भुरटे चोर वगैरे कोणीतरी अगदी समाजाच्या तळागाळांतले असत. ते बरोबर आपापल्या मैत्रिणींना घेऊन येत. एकटे असले तर तशाच एकट्या आलेल्या दुसऱ्या मुलीबरोबर तेवढ्या रात्रीपुरती मैत्री होई. वातावरणातली धुंदी मंद प्रकाश व सिगारेटच्या धुराने अधिकच वाढायची. कानाकोपऱ्यांत युगुले एकमेकांच्या मिठीत प्रणयचेष्टा करण्यात मशगूल असायची.
बरोबर बाराच्या ठोक्याला सिंबलच्या झणत्कारापाठोपाठ ड्रमची तडतड सुरू झाली आणि एकदम कळ फिरल्याप्रमाणे सर्व जण नृत्यासाठी पुढे सरसावले. मुलींनी आपापले स्कर्ट वर उचलून धरले तर पुरुषांनी पायाने ठेका धरला. संगीताची लय हळूहळू जलद होऊ लागली. मुली गिरक्या घेत अंग आणि नितंब हलवीत उड्या मारीत नाचत होत्या. त्यांचे पुरुष जोडीदार हाताने टाळ्या वाजवीत, मधेच मांडीवर थाप मारत, जोडीदाराला ओरडून उत्तेजन देत होते. ला गुल्वी तर बिजलीसारखी नाचत होती. ऑर्केस्ट्राचा कंडक्टर लय सतत वाढवत होता. वादक, नर्तक आणि प्रेक्षक सर्वांचे भान हरपले होते. वाद्यांच्या जोडीला टाळ्या व बुटाच्या टाचांनी धरलेला ठेका आणि जोडीदारांच्या आरोळ्यांची भर पडली होती. वाद्यांचा ताल व नृत्य यांची लय टिपेला जाऊन पोहचली. नर्तकांच्या वासनेला नृत्यातून जणू काही प्रकट स्वरूप मिळाले होते. पुरुष ॲकॉर्डियनच्या उघडझापीसारखे आपले पाय फाकवीत होते तर मुली हवेत टांगा झाडत होत्या. पाय इतक्या वर नेत की क्षणभर त्यांच्या अंतर्वस्त्राचे ओझरते दर्शन व्हायचे.
हेन्री अधूनमधून जेव्हा आईकडे राहायला जायचा तेव्हा तो मोंमार्त्रमधील सर्व गमती-जमती आईला न विसरता सांगायचा. मोंमार्त्रमधील वातावरण शब्दांत पकडणे कठीण होते. ती एक जीवनशैली होती. स्वतः अनुभवल्याशिवाय त्यातील मजा कळणे शक्य नव्हते.
कॉर्मेनच्या हाताखाली स्वतःची शैली मारून हेन्रीचे धडे गिरवणे जोरात चालू होते. दिवस भराभर उलटत होते. हिवाळा संपून वसंताची चाहूल लागली होती. रस्त्याच्या कडेला फरसबंदीच्या फटींतून पोपटी तृणांकुर डोकावू लागले. परटिणी धुणी बडवता बडवता गाणी गुणगुणु लागल्या. पोलीस दोन्ही हातांचे अंगठे कंबरपट्ट्यात अडकवून रस्त्याने फिरताना हलकेच शीळ वाजवू लागले. हेन्री मेर दलोरनॉम दे दिऊसारखे शब्द सहजतेने वापरू लागला. आता तो मोंमार्त्रमधला एक बनचुका, टपोरी चित्रकला विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्या उन्हाळ्याच्या सुटीत त्याने आईकडे हळूच विषय काढला.
पुढल्या वर्षी मला सॅलूनसाठी पेंटिंग करायचंय. खूप मोठं काम आहे ते. घरी होण्यासारखं नाही. त्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ लागेल.


(मर्सिल लेंडर डान्सिंग बोलेरो ऍट शिल्पेरी – तुलूझ लोत्रेक – तैलरंग, कॅनव्हास, १४५x१५० सेमी)



No comments:

Post a Comment