Sunday, September 30, 2018

मुलँ रूज - १४


हेन्री दुपारचा सगळा वेळ रॅचोच्या स्टुडिओवर घालवी. पेंटिंग, गाणे बजावणे, गप्पा-टप्पा. नंतर संध्याकाळी सगळ्या मित्रांच्या टोळक्याबरोबर ला नुव्हेलमध्ये. तो आता त्यांच्यातलाच एक झाला होता. कधी कोणाला पैसे उसने दे, अधूनमधून बीअर पाजणे, त्यांच्या वादविवादात हळूच आपले मत मांडणे. त्याचा बुजरेपणा हळूहळू जात होता. त्याच्या वागण्या-बोलण्यातील खानदानी हळुवारपणा जाऊन त्याच्या जागी मोंमार्त्रमधल्या तरुण चित्रकारांच्या कोणत्याही गटात शोभेल असे त्याचे व्यक्तिमत्त्व आकार घेत होते. बोलताना अधूनमधून नॉम दे दियू, मेर दलोर, मी तुझ्या थोबाडावर थुंकीन वगैरे मोंमार्त्रमधली भाषा त्याच्या तोंडी रुळली होती. कोणत्याही विषयावर बोलता बोलता गाडी शेवटी स्त्रियांवर येऊन थांबे. ओळखीच्या स्त्रिया, ओळख व्हावी असे वाटणाऱ्या स्त्रिया, भोगलेल्या स्त्रिया, भोगाव्या असा ध्यास धरलेल्या स्त्रिया, स्त्रियांपासून काय सुख मिळाले, स्त्रियांना काय सुख दिले, स्त्रीचे शरीर, स्त्रीचा स्वभाव, प्रेमशास्त्र ते कामशास्त्र, स्त्रियांचे हृदय कसे जिंकावे, तिचा प्रतिकार कसा मोडून काढावा, तिचा कामाग्नी कसा प्रज्वलित करावा, कुमारिकांना कसे वश करावे, विवाहितांना कसे नादी लावावे, स्त्रियांपासून होणारे फायदे-तोटे वगैरे एक ना हजार गोष्टींवर त्यांच्या तासन्‌तास गोष्टी चालत. न कंटाळता, न थकता.
हेन्रीला आश्चर्य वाटायचे. या गोष्टी ज्यांच्याविषयी चालायच्या त्या सर्व जणी हेन्रीच्या बघण्यातल्या होत्या. पोर्ट्रेट काढून झाल्यावर कपडे घालण्यापूर्वी पेंटरबरोबर तिथेच इझलखाली फाटक्या जाजमावर झोपणाऱ्या मुली, काबाडकष्टांमुळे तारुण्याची रया गेलेल्या धोबिणी, वयपरत्वे निवृत्ती जवळ आलेल्या वेश्या. त्यांच्यापैकी कोणालाही कोणत्याही अर्थाने सुंदर म्हणणे अशक्य होते. कित्येक जणींकडे सर्वसाधारण स्वच्छतासुद्धा अभावानेच होती. त्यांचे कपडे स्वस्तातल्या स्वस्त कापडाचे, घरी शिवलेले असत. गळ्यात स्वस्त हलक्या दर्जाचा हार. सूप पिताना त्या तोंडाने फुर्रफुर्र असा आवाज करीत. पर्फ्युम लावलेला असेल तर तो अगदी उग्र वासाचा असायचा. या मुली कशाही असल्यातरी त्याच्या मित्रांना त्या आवडायच्याच. त्यांच्या मते त्यांच्या ठायी अवर्णनीय काही तरी सुप्त आकर्षण होते. कामुकता, लासवटपणा किंवा दुसरे काही तरी. पण त्याला काही ते पटत नसे.
तेथल्या कोणत्याही स्त्रीविषयी त्याला कधी फारसे आकर्षण वाटले नाही. तरी त्याला कॅफेतले एकूण वातावरण खूप आवडायचे. किचनमधल्या भांड्यांचा आवाज, गाणी गुणगुणत फिरणाऱ्या वेट्रेस, सगळ्या आवाजावर मात करून चाललेल्या गप्पा, कोणत्याही क्षणी हमरीतुमरीवर येणारे वाद, मोठमोठ्याने हसणे-खिदळणे. तीन-चार वर्षांपूर्वी तो बिछान्याला खिळून होता. पाय प्लॅस्टरमध्ये. पुन्हा कधी काळी चालता येईल याची आशा सोडलेली. आता वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तो एक लोकप्रिय असा कलाविद्यार्थी झाला होता. कॅफेत बीअरचे घुटके घेत घेत मायकेल अँजेलो किंवा पुरातन इटालियन चित्रकला किंवा अशाच दुसऱ्या विषयांवरची आपली मते इतरांना ऐकवीत नाहीतर बायकांवरचे चावट किस्से ऐकत ऐकत त्याचा वेळ कसा निघून जाई ते कळतच नसे. त्या धुंद वातावरणातून घरी परत जायला अगदी जिवावर येई. दर वेळी उशीर झाला की काहीतरी सबब सांगावी लागे. चित्रकला वर्ग तर दुपारीच संपायचा. त्यामुळे ट्रॅफिक जॅम वगैरे रोज कसे पटणार. गाडी जुनी-पुराणी झालीय या सबबीचा फार तर एकदाच उपयोग झाला असता. कारण दुसऱ्याच दिवशी आईने नवी गाडी घेऊन दिली असती. मोंमार्त्रमधून हेन्रीचा पाय निघत नसे. रोज नवीन सबबी तरी किती शोधायच्या? आपण मोंमार्त्रमध्येच मुक्काम ठोकावा असे हेन्रीला प्रकर्षाने वाटायचे. पण तो विषय आईकडे कसा काढायचा याचा त्याला मोठा प्रश्न पडला. रोज संध्याकाळच्या प्रवासात थंडीवारा बाधून न्युमोनिया वगैरे होईल त्यापेक्षा मोंमार्त्रमध्येच राहायला जागा बघतो असे काहीतरी खोटे सांगून आईला भावनिक कोंडीत पकडणे त्याच्या जिवावर आले होते. कशा रीतीने हा विषय आईकडे काढावा याचा त्याने खूप विचार केला. पण प्रत्यक्ष विचारायच्या वेळी त्याला वाटायचे की आपण फक्त स्वतःचाच विचार करतोय. म्हणून तो ते पुढे ढकलीत होता.
शेवटी एके दिवशी आईने आपण होऊन विचारले, “तुमचा मोंमार्त्रमध्ये राहायला जाण्याचा विचार दिसतोय वाटतं.
मी काही अजून तसं ठरवलं नाहीय. पण तुम्ही म्हणताय तर बघू या. जवळपास जागा घेतली तर खूप सोयीचं पडेल नाही.
म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या मित्रांबरोबर कॅफेत जास्त वेळ काढता येईल. शिवाय रात्री गाव भटकता येईल.
आईला सगळे कळलेले दिसतेय. आडवळणे घेण्यात काही अर्थ नाही. प्लीज ममा. तसं काही नाहीय. माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने बघा. ॲतलिएच्या जवळपास कुठेतरी राहायला जागा मिळाली तर किती बरं होईल.
तशी माझी काही हरकत नाहीय. पण तुमची काळजी कोण घेणार? पुन्हा पडलात वगैरे आणि पायांना काही दुखापत वगैरे झाली तर काय घ्या. देव करो आणि तसं काही न होवो.
त्याची तुम्ही काही काळजी करू नका. ग्रेनिएकडे चांगली दोन खोल्यांची जागा आहे. तुम्हाला मस्य ग्रेनिए माहीत आहेत ना. मी बोललो होतो त्यांच्याविषयी. मागच्या आठवड्यातच ते मला विचारत होते. त्यांना एवढ्या मोठ्या जागेची गरज नाहीये. शिवाय भाडंही त्यांना परवडत नाही. मी त्यांच्याकडे राहायला गेलो तर तेवढीच त्यांना मदत होईल.
मागच्या आठवड्यात त्यांनी तुम्हाला विचारलं. तुम्ही मला बोलला नाहीत ते कधी.
तसं नव्हे मीच त्यांना विचारलं.
हेन्री. तुम्ही कधी खोटं बोलायला जाऊ नका. तुम्हाला नाही जमणार.ती जड अंतःकरणाने म्हणाली, “सांगा तुमच्या मित्राला तुम्हाला केव्हापासून त्यांच्याकडे रहायला जायचंय ते. माझी हरकत नाही.ती जड अंतःकरणाने म्हणाली.
मी खरंच मोंमार्त्रमध्ये राहायला जाऊ?” हेन्रीचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. त्याला वाटले नव्हते इतक्या सहज परवानगी मिळेल म्हणून.
खरंच हेन्री. फक्त स्वतःची काळजी घ्या म्हणजे झालं.
थँक्यू ममा. थँक्यू व्हेरी मच.हेन्री आनंदाने उचंबळून घाईघाईने म्हणाला, “माझी खात्री होती की तुम्ही मला समजून घ्याल.थोडी उसंत घेऊन तो पुढे म्हणाला, “ज्या जागेत मी राहायला जाणार आहे ना ती अगदी मस्तच आहे. खिडकी उघडली की समोर मस्य देगास यांचा स्टुडिओ दिसतो. कल्पना करा नजरेसमोर सतत देगास यांचा स्टुडिओ असणार आहे.
कोण हे मस्य देगास.देगासच्या नावाची छाप पडण्याचे सोडा पण देगास हा कोण हे तिला मुळात माहीतही नव्हते.
देगास म्हणजे कोण तुम्हाला माहीत नाही. आजच्या घटकेला जगातल्या महान चित्रकारांत त्यांची गणना केली जाते. बॅले गर्ल, लाँड्रेसिस्‌, न्युड्‌स वगैरे त्याची पेंटिंग तुम्ही पाहायला हवी होती. गेल्या आठवड्यात द्युराँ रुएल येथे त्याचं प्रदर्शन होतं. मी रॅचोबरोबर गेलो होतो बघायला.’’
त्याच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्याचे विषय, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे जग हळूहळू तिच्यापासून दूर चालले होते. तो आता तारुण्यात पदार्पण करत होता. घराबाहेर पडायला लागल्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता खरा पण हे बाहेरचे जग किती कठोर असते याची कल्पना यायला तो अजून खूप लहान होता. या कठोरतेचे काटे त्याला टोचू नयेत म्हणून आईला तो आपल्याजवळ राहायला हवा होता. तिने कितीही काळजी घेतली तरी त्याच्या जीवनाचा स्वतंत्र प्रवास ती आता फार काळ रोखू शकणार नव्हती. शारीरिक व्यंगामुळे आपल्या वाट्याला दुःखांचा कोणता भोगवटा येणार आहे याची नीटशी जाणीव हेन्रीला व्हायला अजून अवकाश होता. त्यात भर स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पनांची. तारुण्यातील स्वप्ने बघत सुरू झालेला वेगळ्या वाटेवरचा प्रवास शेवटी हेन्रीला कुठे घेऊन जाईल या चिंतेने आईचे हृदय व्याकूळ झाले. शिवाय हेन्रीचे बिऱ्हाड वेगळे झाल्यावर या भल्या मोठ्या जागेत एकट्याने भुतासारखे दिवस कंठायचे या विचाराने तिच्या अंगावर शहारे आले.
त्या रात्री हेन्री झोपल्यावर ती हळूच त्याच्या खोलीत गेली. किती शांतपणे झोपला होता तो. त्याच्या शरीराचा कंबरेखालचा भाग एखाद्या दहा-बारा वर्षांच्या शाळकरी मुलासारखा दिसत होता. मोंमार्त्रमधले रांगडे जीवन त्याला कसे काय झेपेल. त्याचा चेहरा दाढी-मिशांनी भरून गेला होता तरी कोवळीक लपत नव्हती. स्त्री-पुरुष संबंधांवरील कॅफेतल्या चावट गप्पा, पेंटिंगच्या निमित्ताने घडणारा नग्न मॉडेल सहवास वगैरे गोष्टींचा त्याच्यावर अजून फारसा परिणाम झालेला नव्हता. पण एक ना एक दिवस त्याला या सर्व गोष्टी जाणवू लागतील. जेव्हा त्याला स्त्रीसहवासाची, प्रेमाची गरज भासू लागेल तेव्हा त्याला स्वतःच्या देहाविषयीचे निष्ठुर सत्य उमगेल. अरे देवा! लवकरच येऊ घातलेल्या त्या वादळाच्या नुसत्या कल्पनेनेच ती हादरली.
(पोर्ट्रेट कॉउंटेस एदल - तुलुूझ लोत्रेक - तैलरंग कॅनव्हास)


No comments:

Post a Comment