Tuesday, January 30, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २०

स्ट्रिकलँड ज्या कॅफेत जायचा त्या कॅफेत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला घेऊन जायला डर्क स्ट्रोव्ह तयार झाला. मी पॅरीसमध्ये पाच वर्षांपूर्वी स्ट्रिकलँडबरोबर ज्या कॅफेत ऍबसिंथ पित बसलो होतो तेच हे कॅफे आहे का हे जाणून घेण्यात मला रस होता. तो अजून त्याच कॅफेत जात असेल तर याचा अर्थ तो आळशी आहे, त्याला कोणताही बदल नको असतो किंवा त्याचा स्वभावच तसा असेल.
“तो बघ. तिथे बसला आहे.” आम्ही कॅफेत पोचताच स्ट्रोव्ह म्हणाला.
ऑक्टोबर महिना असला तरी हवा अजून गरम होती. फुटपाथवरच्या टेबलांवर गर्दी होती. मी इकडे तिकडे नजर फिरवली. पण स्ट्रिकलँड मला दिसला नाही.
“तो बघ. त्या कोपऱ्यात बुद्धीबळाचा डाव मांडून बसला आहे.”
एक माणूस टेबलावर बुद्धीबळाचा पट मांडून त्यावर झुकून बसला होता. भली मोठी फेल्ट हॅट आणि तांबूस दाढी सोडून मला काही दिसत नव्हतं. टेबलांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही त्याच्या जवळ गेलो.
“स्ट्रिकलँड.”
त्याने मान वर करून पाहिलं.
“ए जाड्या. काय पाहिजे तुला?”
“मी तुझ्या जुन्या मित्राला घेऊन आलो आहे. तुला भेटायला.”
स्ट्रिकलँडने माझ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्याने मला ओळखलं नसावं. त्याने परत बुद्धीबळाच्या पटाकडे नजर वळवली.
“बस इथे. पण आवाज करू नकोस.”
त्याने पटावर एक चाल केली आणि तो खेळात गढून गेला. बिचारा स्ट्रोव्ह कावरा बावरा होऊन माझ्याकडे बघू लागला. माझा तोल ढळू न देता मी बसलो. ड्रिंक मागवलं आणि स्ट्रिकलँडचा डाव संपेपर्यंत शांतपणे बसून राहिलो. त्याचं निरीक्षण करण्याची संधी आयतीच चालून आली होती आणि ती मला दवडायची नव्हती. त्याला एरवी पाहिला असता तर मी ओळखलंच नसतं. एकतर त्याच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीने त्याचा अर्धाअधिक चेहेरा झाकलेला होता. त्याचे केसही खूप लांब वाढले होते. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो अगदी बारीक झाला होता. त्यामुळे त्याचे ते आढ्यताखोर लांब नाक जास्तच उठून दिसत होतं. त्याची गालफडं वर आली होती. त्याच्या अवघ्या शरीरावर प्रेतवत अवकळा आली होती. मी पाच वर्षांपूर्वी त्याला भेटलो होतो तेव्हा जो सूट तो वापरत होता तोच सूट त्याने आजही घातला होता. इतक्या वर्षांच्या वापराने फाटलेला, डागाळलेला, विरलेला सूट त्याच्या हडकुळ्या शरीरावर टांगल्यासारखा वाटत होता. अस्वच्छ हात, वाढलेली नखं, लांब-रूंद हाडांची मोळी बांधल्यासारखा देह. एके काळी तो धिप्पाड शरीराचा इसम होता हे त्याच्या या अवस्थेत ओळखू येणं कठीण होतं. पण तो सगळं लक्ष खेळावर केंद्रीत करून ज्या पद्धतीने बसला होता त्यामुळे तो एखाद्या मजबूत माणसासारखा वाटत होता. त्यामुळे तो रोडावला आहे हे पटकन माझ्या लक्षात आलं नाही.
आपली चाल केल्यानंतर तो खुर्चीला पाठ टेकून ताठ बसला आणि त्याने आपल्या समोर बसलेल्या प्रतिस्पर्ध्याकडे टक लावून पाहिलं. तो एक जाडा, दाढी-दिक्षित, फ्रेंच माणूस होता. त्याने समोरच्या पटाचं थोडा वेळ निरीक्षण केलं आणि अस्फुट हसला. पटावरील सगळे मोहरे त्याने गोळा करून खोक्यात ढकलले, स्ट्रिकलँडला शिव्या दिल्या, वेटरला बोलावून ड्रिंकचे पैसे दिले आणि निघून गेला. स्ट्रोव्हने त्याची खुर्ची टेबलाजवळ ओढून घेतली.
“आता आपल्याला बोलायला हरकत नाही.” स्ट्रिकलँड म्हणाला.
स्ट्रिकलँडने आपले डोळे त्याच्यावर रोखले. त्याच्या नजरेत एक मिश्किलपणा होता. मला वाटलं तो काहीतरी खोचक बोलण्याच्या विचारात असावा. पण काही न सुचल्यामुळे तो गप्प बसला.
“मी तुझ्या जुन्या मित्राला तुला भेटायला घेऊन आलो आहे.” स्ट्रोव्हने मोठ्या उत्साहात परत सुरूवात केली.
स्ट्रिकलँड एक मिनीटभर माझ्याकडे टक लावून बघत होता. मी एक अक्षरही तोंडातून काढलं नाही.
“मी याला उभ्या आयुष्यात पाहिलेलं नाही.”
तो असं का म्हणाला असावा ते मला कळलं नाही. पण त्याच्या डोळ्यात ओळख पटल्याची अंधूक खूण पाहिल्याची मला खात्री होती. इतक्या वर्षात खजील होण्याची ही माझी पहिलीच खेप होती.
“तुमची पत्नी थोड्या दिवसांपूर्वी मला भेटली होती. तिची खुशाली कळावी असं तुम्हाला वाटत नाही का?”
तो किंचीत हसला. त्याने डोळे मिचकावले.
“आपण एकदा इथे गप्पा मारत बसलो होतो नाही का.” तो म्हणाला. “किती दिवस झाले असतील त्याला?”
“पाच वर्ष.”
त्याने आणखी एक ऍबसिंथ मागवली. आम्ही पॅरीसमध्ये कधी भेटलो, आमच्या भेटीत स्ट्रिकलँडचा विषय योगायोगाने कसा निघाला वगैरे तपशील स्ट्रोव्ह घडाघडा सांगत होता. स्ट्रिकलँड ऐकत होता की नाही ते मला सांगता येणार नाही. त्याने माझ्याकडे एक दोन वेळा वळून पाहिलं. पण तो आपल्याच विचारात दंग होता. स्ट्रोव्ह बडबडत नसता तर कठीण होतं. अर्ध्या तासाने डचमॅनने घड्याळात पाहिलं आणि त्याला एक काम आहे आणि त्यासाठी त्याला निघणं भाग आहे असं जाहीर केलं. जाताना त्याने येतोस का असं मला विचारलं. स्ट्रिकलँडकडून काहीतरी ऐकायला मिळेल असा विचार करून मी आणखी थोडा वेळ थांबेन असं सांगितलं.
तो जाड्या गेल्यावर एकेरीवर येत मी म्हणालो:
“डर्क स्ट्रोव्हला वाटतं की तू एक महान चित्रकार आहेस.”
“त्याला काय वाटतं याची मी पर्वा करत असेन असं तुला का वाटतं?” तेवढ्याच सहजतेने तोही एकेरीवर आला.
“तुझी पेंटींग बघायला मिळतील का?”
“माझी पेंटींग मी तुला का दाखवावीत?”
“कदाचित त्यातलं एखादं पेंटींग मला विकत घ्यावसं वाटेल.”
“पण विकावं असं मला वाटलं नाही तर?”
“तुला पैसे कितपत मिळतात?” मी हसत हसत विचारलं.
तो गालातल्या गालात हसला.
“मी कसा दिसतोय?”
“अर्धपोटी, भुकेला.”
“मला भूक लागलीच आहे.”
“चल तर मग जेवू या.”
“मला एवढं का बोलावतोयस?”
“उपकार म्हणून नाही.” मी थंडपणे उत्तर दिलं. “तू जिवंत आहेस की उपाशीपोटी तडफडतोयस याला माझ्या लेखी काडीचीही किंमत नाही.”
त्याचे डोळे पुन्हा चमकले.

“चल मग. मला चांगलं जेवण हवंच आहे.”

3 comments:

  1. ह्या भागाबरोबर, painting missing आहे. आतापर्यंत दिलेल्या अनेक उत्तम paintings बद्दल धन्यवाद.
    एका मनस्वी चित्रकाराची जडण घडण समजून घेणं interesting आहे

    ReplyDelete
  2. पुढे बरीच पेंटींग टाकली आहेत. देण्यासारखी अनेक आहेत, पण अतिरेक नको. खरा इंटरेस्ट असणाऱ्यांना इंटरनेट उपलब्ध आहेच. पण बरेच जण आळस करतात म्हणून फक्त कुतुहल जागवण्यासाठी अधून मधून टाकली आहेत.

    ReplyDelete