Monday, January 29, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १८

पॅरीसमध्ये रहायला गेल्यावर पहिल्याच आठवड्यात स्ट्रिकलँड आणि माझी भेट झाली.
रू द डॅम मधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरचे एक छोटेसे अपार्टमेंट मला मिळाले होते. जुन्या फर्नीचरच्या दुकानातून शंभर एक फ्रँकला आवश्यक ते फर्नीचर घेऊन घर सजवले. कन्सर्जला सांगून मी घराची साफसफाई आणि सकाळच्या कॉफीची व्यवस्था करून घेतली. तेथून मी सरळ डर्क स्ट्रोव्ह या माझ्या जुन्या मित्राला भेटायला गेलो.
डर्क स्ट्रोव्ह डच होता. त्याला पाहून एक तर हसू तरी फुटतं किंवा ही वल्ली इथे कुठे उपटली असं वाटून त्याची अडचण तरी वाटायला लागते. देवाने त्याला विदुषकाचं रूप देऊन पाठवलं होतं. तो चित्रकार होता पण अगदी टुकार. आमची पहिली भेट रोममध्ये झाली होती. त्यावेळी तो काढायचा ती चित्र मला अजूनही आठवतायत. जगातल्या सगळ्या फालतू गोष्टीत त्याला अमाप उत्साह असायचा. त्याचं कलाप्रेम अशावेळी उतू जायचं. बर्नीनी आणि पिआझा दी स्पाग्ना येथील मूळ चित्रांच्या भव्यतेने, अतुलनीय सौंदर्याने बिलकूल दबून न जाता, त्या चित्रकारांचं सामर्थ्य आपली कुवत काय यांचा कसलाही विचार न करता तो बिनदिक्कत त्यांच्या नकला करायला घ्यायचा. त्याच्या स्टुडियोमध्ये त्याने रंगवलेले कॅनव्हास टांगलेले होते. मोठ्या डोळ्यांचे, मोठ्या हॅट घातलेले मुच्छड शेतकरी, फाटके कपडे घातलेली केविलवाणी दिसणारी गरीब अनाथ मुलं, चर्चच्या पायर्यांवर बसलेल्या किंवा सायप्रसच्या झाडांमागे लपलेल्या रंगीबेरंगी पेटीकोट घातलेल्या स्त्रिया. रेखाटन अचूक, रंगसंगती हुबेहुब. फोटोग्राफ आणि पेंटींग यातील फरक कळणार नाही, बटबटीत वाटावं इतकं काटेकोर. व्हिला मेडिसी मधील इतर चित्रकारांनी त्याला ‘ल मैत्र द ला बोएत अ शकुला’ मास्टर ऑफ चॉकलेट बॉक्स असं नाव ठेवलं होतं. त्याची चित्रं पाहिल्यावर क्लॉड मॉने, एदुआर मॅने वगैरे इंप्रेशनीस्ट चित्रकार होऊन गेले आहेत की नाही याची शंका यावी.
“मी फार मोठा चित्रकार आहे असा उगाच आव आणत नाही.” तो म्हणायचा. “मी काही मायकेल अँजेलो नाही म्हणून माझ्यात काही नाही असं नाही. माझ्यात काही तरी आहे म्हणून लोक माझी चित्रं विकत घेतात. त्यांना त्याच्यापासून आनंद मिळतो. माझ्या ग्राहकात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. फक्त माझ्या देशात हॉलंडमध्येच आहेत असं नाही तर नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सगळ्या देशात आहेत. माझ्या गिर्हाइकांत व्यापारी वर्ग जास्त आहे. या देशात हिवाळ्यात थंडी किती कडक असते आणि दिवसा किती अंधारलेलं असतं ते तुम्हाला सांगायला नको. माझ्या चित्रात मी इथला इटलीतला निसर्ग रंगवतो. हा निसर्ग त्यांना आवडतो कारण त्यांच्या देशात त्यांना तो सहसा बघायला मिळत नाही, तो ते माझ्या पेंटींगमधून बघत असतात.”
डर्क स्ट्रोव्ह आपल्या भूमिकेला शेवटपर्यंत तसाच चिकटून राहिला. आजूबाजूच्या क्रूर वास्तवाकडे त्याने कधीच लक्ष दिलं नाही. त्याच्या लेखी इटली म्हणजे स्वप्नील प्रेमकथा आणि ऐतिहासिक अवशेषांचा देश होता. आपल्या चित्रांतून त्याने आदर्शवत वाटतील असेच विषय हाताळले. तो एक गरीब बिचारा विक्रीसाठी म्हणून चित्र काढणारा, सामान्य कुवतीचा चित्रकार होता. कसंही असलं तरी ते त्याचं प्रामाणिक ध्येय होतं. त्याच्या निष्पाप, प्रेमळ आणि गंमतीदार स्वभावामुळे तो हवा हवासा वाटत असे.
इतरांच्या दृष्टीने डर्क स्ट्रोव्ह हा उपहास आणि टिंगल टवाळीचा विषय होता. पण मला तसं वाटत नसे. त्याचे सहकारी त्याच्या चित्रांची टिंगल करत. पण त्याची चित्रं कशी का असेनात त्यांचे त्याला बर्यापेकी पैसे मिळत. त्याची टिंगल करणारे हे मित्र त्याच्या पैशांवर चैन करायला मात्र बिनदिक्कत पुढे येत. तो उदार स्वभावाचा होता. त्याला निर्लज्जपणे हसणारे त्याचे मित्र त्याच्याकडे पैसे मागताना मात्र अतिशय उद्धटपणाने वागत. तो खूप भावनाप्रधान होता. तो कोणतीही गोष्ट चटकन मनाला लाऊन घेई. पण त्याच्या स्वभावात असं काही तरी विचित्र होतं की त्याच्याकडून फायदा झाला तरी त्याची जाणीव ठेवावी असं कोणाला वाटत नसे. त्याच्याकडून पैसे उकळणं हे एखाद्या लहान मुलाकडून पैसे चोरण्याइतकं सोपं होतं. पण त्याच्या मूर्खपणाचा राग येई. एखादी श्रीमंत बाई आपली दागदागिन्यांनी भरलेली व्हॅनिटी बॅग कॅबमध्ये विसरून गेलेली पाहून जसा आपल्या कलेचा अभिमान असणार्या अट्टल चोराला जसा राग येईल तसं त्याला लुटणार्या मित्रांना त्याच्याकडे पैसे मागताना वाटत असे. देवाने त्याला बुद्धी दिली नव्हती पण त्याला संवेदनाशीलता द्यायला मात्र तो विसरला नव्हता. मित्रांच्या चेष्टा मस्करीमुळे त्याला मानसिक व शारीरिक दृष्ट्या खूप त्रास होई. त्याचे मित्र त्याला छळण्यासाठी नाना युक्त्या-प्रयुक्त्या रचत. आणि हे सारखं चालू असे. यात त्याची नेहमी फजिती उडून त्याचा अपमान होई. तरीही त्याची चेष्टा करणार्यांवर त्याने कधीही डूख धरला नाही. हा त्याचा अति चांगुलपणा. साप चावला तरी त्या अनुभवाने तो कधी शहाणा झाला नाही. उलट बरं वाटल्यावर त्याने त्या सापाला उचलून मांडीवर घेतलं असेल. पोट दुखेपर्यंत हसवणार्या फार्सिकल नाटकासारखं त्याचं आयुष्य म्हणजे एक शोकांतिका होती. मी मात्र त्याला कधी हसायचो नाही. त्याबद्दल तो माझा आभारी असायचा. मी त्याच्या गोष्टी सहानुभूतीने ऐकायचो. त्यामुळे त्याला कोणी कसा त्रास दिला याच्या साद्यंत कथा तो मला ऐकवायचा. त्या एवढ्या विचीत्र असायच्या की त्याची कींव यायची. पण जेवढी कींव जास्त तेवढं हसूही जास्त यायचं.
  तो चित्रकार म्हणून कितीही सामान्य असला तरी त्याची कलेची अभिरूची मात्र अतिशय उच्च दर्जाची होती. त्याच्या बरोबर आर्ट गॅलेरींना भेट देणं हा एक संपन्न अनुभव असे. प्रदर्शनाला जाताना त्याचा उत्साह उतू जायचा. त्याची चित्रांची पारख अचूक असे. तो धर्माने कॅथॉलिक होता. ओल्ड मास्टर्सचं महत्व तो जाणून होता आणि आधुनिक कलेबद्दल त्याला सहानुभूती होती. तो चांगला गुणग्राहक होता. एखाद्या कलाकृतीत जर काही स्फुल्लिंग असेल तर त्याला ते ताबडतोब ओळखता येई. तो स्तुती करताना हात आखडता घेत नसे. एवढी अचूक पारख असलेला दुसरा कोणी मला आजतागायत भेटलेला नाही. इतर चित्रकारांच्या तुलनेत तो जास्त सुशिक्षित होता. बहुतेक कलाकारांना आपली कलाशाखा सोडली तर इतर कलाशाखांमधलं काहीही माहित नसतं. त्याचं तसं नव्हतं. साहित्य आणि संगीतातील रूचीमुळे त्याच्या चित्रकलेच्या आकलनात एक वेगळीच खोली होती. माझ्यासारख्या नवशिक्या तरूणाला तर त्याचा सल्ला आणि मार्गदर्शन अतिशय मोलाचं होतं.
मी रोम सोडल्यानंतरही त्याच्या संपर्कात होतो. दोन एक महिन्यातून त्याचं मोडक्या-तोडक्या इंग्लीशमधून लिहीलेलं लांबलचक पत्र मला येई. त्याचं पत्र वाचताना उत्साहाने फसफसत, हातवारे करत बोलणारी त्याची छबी नजरेसमोर यायची. मी पॅरीसमध्ये यायच्या अगोदर त्याचं लग्न झालं होतं. त्याने मोंमार्त्रमध्ये स्टुडियो थाटला होता. मी गेल्या चार वर्षात त्याला भेटलो नव्हतो. त्याच्या बायकोला मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते.

1 comment:

  1. डर्क स्ट्रोव्ह च व्यक्तिमत्त्व वर्णन सुरेख !

    ReplyDelete