Tuesday, January 23, 2018

मून अँड सिक्सपेन्स - १०

एक दोन दिवसांनी मला मिसेस स्ट्रिकलँडची चिठी आली. त्या चिठीत आज संध्याकाळी डिनंरनंतर मला भेटायला जमेल का असं विचारलं होतं. मी गेलो तेव्हा ती घरी एकटीच होती. तिने साधे काळ्या रंगाचे शोकप्रदर्शक कपडे परीधान केले होते. असं करण्यात आपल्याला मनापासून काय वाटत आहे यापेक्षा अशा प्रसंगी कोणते कपडे करणं सयुक्तिक होईल याचा विचार जास्त होता याचं मला आश्चर्य वाटलं.
“काही मदत हवी असेल तर तुम्ही करायला तयार आहात असं तुम्ही मला मागे म्हणाला होता ना.”
“होय.”
“तुम्ही पॅरीसला जाऊन माझ्या वतीने चार्ल्सना भेटाल?”
“कोण, मी?”
मी उडालोच. यापूर्वी मी त्याला फक्त एकदाच भेटलो होतो. तिला मी पॅरीसला जाऊन काय करायला हवं आहे त्याचा मला अंदाज येत नव्हता.
“फ्रेड जायला निघाला आहे.” फ्रेड म्हणजे कर्नस मॅक-अँड्रयु. “पण या कामासाठी तो योग्य आहे असं मला वाटत नाही. तो परीस्थिती आहे त्यापेक्षा बिघडवून टाकील. दुसर्या कोणाला विचारावं तेही मला कळत नाहीय.”
तिच्या आवाजात थोडा कंप होता. म्हणून तिला नाही म्हणणं मला क्रूरपणाचं वाटलं.
“पण मी त्यांच्याशी आतापर्यंत चार शब्दसुद्धा बोललेलो नसेन. ते मला धड ओळखणारही नाहीत. कदाचित सरळ हाकलूनही देतील.”
“माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन कराल ना?” तिने हसत विचारलं.
“त्यांना भेटून मी नक्की काय करायला हवंय.”
माझ्या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर सरळ नव्हतं.
“मला वाटतं की ते तुम्हाला ओळखत नाहीत हा कदाचित एक फायदाच ठरेल. हे बघा फ्रेड आणि त्यांचं कधी पटलंच नाही. त्यांच्या मते फ्रेडला काही अक्कल नाही. सैन्यातील लोक कसे असतात हे त्यांनी समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. फ्रेड भावनेच्या भरात काही तरी बोलेल आणि मला काही मदत होण्या ऐवजी तेच दोघं एकमेकांशी भांडत बसतील. तुम्ही माझ्यातर्फे आला आहात असं तुम्ही सांगितलं तर ते तुमचं म्हणणं ऐकायला नकार देणार नाहीत.”
“माझी आणि तुमचीसुद्धा फार ओळख आहे अशातला भाग नाही. ज्याला ह्या प्रकरणाची फारशी माहिती नाही असा माणूस हे प्रकरण कसं काय हाताळू शकेल. माझा ज्याच्याशी संबंध नाही अशा बाबतीत मी उडी मारावी असं मला वाटत नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वत:च का नाही जात?”
“तुम्ही एक विसरताय. ते एकटे नाहीत.”
मी जीभ चावली. माझ्या कल्पनाचक्षूंसमोर एक दृष्य तरळू लागले. मी चार्ल्स स्ट्रिकलँडला भेटायला गेलो आहे. माझं कार्ड मी आत पाठवलं, तो कार्ड हातात धरून बाहेर आला आणि त्याने मला विचारले:
“या गरीबावर एवढी मेहरबानी कशासाठी?”
“तुमच्या पत्नीच्या वतीने मी तुम्हाला भेटायला आलो आहे.”
“खरंच की काय? तुम्ही वयाने थोडे वाढलात की तुमची अक्कलसुद्धा थोडी वाढण्याची शक्यता आहे आणि मग दुसर्याच्या खाजगी बाबतीत नाक खुपसू नये एवढं तरी कळू लागेल. आता या घटकेला तुम्ही तुमचं ते रिकामं डोकं थोडं त्या बाजूला वळवलंत तर तुम्हाला तेथे एक दरवाजा दिसेल. तो उघडा आणि चालू लागा.”
अशा परीस्थितीत आपला मान राखून बाहेर पडणं कठीण होईल हे लक्षात आलं. मिसेस स्ट्रिकलँडचं डोकं शांत होण्याच्या आत आपण लंडनला परतायला नको होतं असं आता वाटायला लागलं. मी हळूच तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. ती मोठ्या विचारात पडली असावी. तिने माझ्याकडे नजर वळवली आणि मोठा सुस्कारा टाकून म्हणाली,
“हे सगळं इतकं अचानक झालंय म्हणून सांगू. आमच्या लग्नाला सतरा वर्षं झाली आहेत. चार्लीना कोणा मुलीची भुरळ पडेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. आमचा संसार अगदी सुरळीत चालला होता. अर्थात संसार सोडला तर मला इतर बर्याच गोष्टींत रस आहे त्यांना कशातही नाही एवढी एक बाब सोडली तर.”
“कोण आहे ती,”...कोणत्या शब्दात विचारावं ते कळत नव्हतं...“तिचं नाव काय, ती काय करते, ती दोघं पॅरीसमध्ये कुठे गेले आहेत?”
“त्यांच्या बद्दल कोणाला काहीही पत्ता नाही. केवढं विचीत्र वाटतं. जेव्हा स्त्री-पुरूष प्रेमात पडतात तेव्हा ते आसपासच्या माणसांना समजल्याशिवाय रहात नाही. जेवताना किंवा चहा पिताना ते कोणाच्या तरी नजरेस पडतातच. मग त्याच्या बायकोला तिच्या मैत्रीणींकडून कळायचं ते कळतंच.”
एवढं बोलून ती बिचारी रडायलाच लागली. मला तिचं वाईट वाटलं. पण थोड्याच वेळात ती सावरली आणि डोळे पुसत म्हणाली,
“असं वेड्यासारखं रडून मला चालणार नाही. या परीस्थितून सगळ्यात चांगला मार्ग माझा मलाच शोधून काढावा लागणार आहे.”
ती तिच्या आयुष्यातील घटनांबद्दल सांगत होती, काही वर्तमानातल्या तर काही भूतकाळातल्या. त्यांची पहिली भेट कुठे झाली, लग्न कसे झाले वगैरे गोष्टी तिने थोडक्यात सांगितल्या. त्यातून त्यांच्या संसाराचं चित्र बरचस स्पष्ट होऊ लागलं. माझा जो अंदाज होता तो फारसा चुकीचा नव्हता. मिसेस स्ट्रिकलँड एका इंडियन सिव्हील सर्वंटची मुलगी होती. तिचे वडिल निवृत्तीनंतर अंर्भागात जाऊन स्थाईक झाले. दर वर्षी हवापालट म्हणून त्यांचे कुटुंब इस्टबोर्नला रहायला जात असत. ती वीस वर्षांची असताना तेथे तिची चार्ल्स स्ट्रिकलँडशी ओळख झाली तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता. ओळख झाल्यावर ते वारंवार भेटू लागले. फिरायला, खेळायला, चर्च कॉयरला जोडीने एकत्र जाऊ लागले. त्याने तिला रीतसर मागणी घालण्याच्या एक आठवडा आधीच तिने आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याचा स्वीकार करायचं ठरवलं होतं. लंडनमध्ये सुरवातीला ते हॅम्पस्टीड येथे रहात होते. आर्थिक परीस्थिती सुधारल्यावर ते शहरात रहायला आले. यथावकाश त्यांना दोन मुलं झाली.
“त्यांचा मुलांवर खूप जीव होता. कितीही थकले असले तरी ते मुलांनां मस्ती बंद करा असं कधीच सांगत नसत. माझा विश्वासच बसत नाहीय. अजूनही मला हे खरं आहे असं वाटत नाही.”
शेवटी तिने ते पत्र मला दाखवलं. मला ते वाचायची उत्सुकता होतीच पण मागायचा धीर होत नव्हता.
प्रिय ऍमी,
मला वाटतं आपल्या फ्लॅटमधील सर्व वस्तु तुला जागच्या जागी मिळाव्यात. तुझ्यासाठी सगळ्या सूचना मी ऍनला दिल्या आहेत. तू आणि मुलं याल तेव्हा जेवण तयार ठेवलेलं असेल. फक्त तुम्हाला भेटायला मी उपस्थित नसेन. मी तुला कायमचं सोडून जायचा निर्णय घेतला आहे. मी सकाळी पॅरीसला जात आहे. हे पत्र मी पॅरीसला पोचल्यावर पोस्टात टाकणार आहे. मी परत येणार नाही. माझा निर्णय पक्का आहे तो बदलणार नाही.
सदैव तुझाच,
चार्ल्स स्ट्रिकलँड.
“एका शब्दाचाही खुलासा नाही की दिलासा देणारा शब्दही नाही. किती भयंकर आहे ना.”
“जे झालं ते त्या परीस्थितीत अगदी विचित्र वाटेल असं आहे खरं.”
“याचा एकच खुलासा पटण्यासारखा वाटतो. त्यांच्यावर कसलं तरी भूत स्वार झालं असलं पाहिजे. पण त्यांना अशी झपाटणारी भवानी कोण असेल ते सांगता येत नाही. पण त्यातून बाहेर यायला बराच वेळ लागेल असं दिसतंय.”
“असं तुम्हाला का वाटतं?”
“फ्रेडने ते शोधून काढलंय. चार्ल्स मला एकदा म्हणाले होते की मी आठवड्यातून तीन चार दिवस एका क्लबमध्ये ब्रिज खेळायला जातो. त्या क्लबचा एक सभासद फ्रेडच्या ओळखीचा आहे. फ्रेडने एकदा चार्ल्सचा त्याच्याकडे उल्लेख केला तर तो बुचकळ्यात पडला. तो म्हणाला की त्यानं कार्ड रूममध्ये चार्ल्सना आलेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्याने सगळ्याचा उलगडा झाला. जेव्हा मला ते क्लबमध्ये ब्रिज खेळायला गेले आहेत असं वाटायचं तेव्हा ते नक्कीच त्या बयेबरोबर मजा मारत असणार.”
मी गप्प बसलो. माझ्या मनात तिच्या मुलांचा विचार आला.
“हे सगळं रॉबर्टला समजावून सांगणं किती कठीण होणार आहे.”
“मी त्या दोघांना अजून काहीही सांगितलेलं नाही. शाळा सुरू होण्याच्या अगदी आदल्या दिवशीच आम्ही लंडनमध्ये आलो होतो. त्यांना सांगितलं की वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत आणि वेळ मारून नेली.”
हे गुपित मनात ठेऊन आनंदी आणि बेफिकीर रहाण्याचं नाटक करणं कठीण होतं. तसंच या परीस्थितीत मुलांची तयारी वगैरे करून घेऊन त्यांना शाळेत पाठवणंही तितकच कठीण काम होतं. तिच्या घशात परत आवंढा अडकला.
“आता मुलांचं कसं होणार? आम्ही जगायचं तरी कसं?”
ती थरथरत होती. तिने स्वत:वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तिने हाताची मूठ घट्ट आवळून धरली होती. तिची ती अवस्था बघणं फार क्लेशकारक होतं.
“माझ्या पॅरीसला जाण्याने तुमचा काही फायदा होणार असेल तर मी जाईन. पण तिथे जाऊन मी नक्की काय करायला हवं आहे.”
“मला माझा नवरा परत यायला हवा आहे.”
“कर्नल म्रॅक-अँड्रयु म्हणत होते की तुम्ही घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे.”
“मी त्यांना कधीही घटस्फोट देणार नाही,” अचानक तिचा आवाज चढला. “त्यांना माझा निरोप सांगा. त्यांच्या मनात त्या बयेशी लग्न करायचं असेल तर ते मी कधीही होऊ देणार नाही. ते जेवढे जिद्दी आहेत तेवढीच मीही जिद्दी आहे. मला माझ्या मुलांचा विचार करायला हवा.”
तिची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणून तिने एवढा खुलासा केला असावा. पण मला वाटतं त्यात आईच्या मायेपेक्षा त्या बाईच्या हेव्याचं प्रमाण जास्त असावं.
“अजूनही तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे का?”
“मला सांगता येणार नाही. पण ते परत आले पाहिजेत एवढंच मी सांगू शकते. जर ते परत आले तर झालं ते झालं असं समजून मी सगळं विसरून जायला तयार आहे. शेवटी मी लग्नाची बायको आहे. आमचा सतरा वर्षांचा संसार झालाय. मी मोठ्या मनाची स्त्री आहे. त्यांनी जे केलं ते एक वेळ माझ्या दृष्टीआड राहिलं असतं तर मला चाललं असतं. त्यांना हे कळलं पाहिजे. असली प्रेम प्रकरणं फार काळ टिकत नसतात. ते जर परत आले तर सगळं काही व्यवस्थित होईल. काय झालं आणि काय नाही ते कोणाला कळणारही नाही.”
मिसेस स्ट्रिकलँड तिच्या नवर्याबद्दल उठलेल्या वावडींची एवढी काळजी करत होती की मी चक्रावून गेलो. आपल्या विषयी इतर काय बोलतात याचा स्त्रिया केवढा विचार करतात हे त्यावेळी मला माहित नव्हतं. एरवी भावनाप्रधान असलेल्या स्त्री-स्वभावाला यामुळे ढोंगीपणाचा दोष लागतो.
स्ट्रिकलँड पॅरीसमध्ये कुठे रहात असावा ते कोणालाच माहित नव्हतं. त्याच्या व्यवसायातल्या भागिदाराने चिडून जाऊन बँकेला लिहीलेल्या पत्रात स्ट्रिकलँड लपून बसला आहे असा टोमणा मारला होता. त्यामुळे स्ट्रिकलँडने उत्तरा दाखल लिहीलेल्या पत्रात त्याचा पॅरीसचा पत्ता दिला होता. तो पत्ता एका हॉटेलचा होता. 
“मी अशा हॉटेलचं नाव ऐकलं नव्हतं. पण फ्रेड म्हणाला की ते एक अतिशय महागडे हॉटेल आहे.” ती रागाने लालबुंद झाली होती. तिला वाटत होतं की तिचा नवरा पॅरीसमधल्या एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जीवाची चैन करत आहे, उंची रेस्टॉरंटमध्ये मेजवानी झोडतोय, संध्याकाळी एखाद्या नाट्यगृहात, नाहीतर रेसकोर्सवर पैसे उधळतोय.
“या वयात असं वागून चालत नाही. ते चाळीशीला आले आहेत. एखाद्या तरूणाने असं काही केलं तर मी समजू शकते. पण ज्याची मुलं मोठी झाली आहेत, वयाची चाळीशी आली आहे अशा माणसाने असं वागणं केवढं भयंकर आहे. त्यांच्या प्रकृतीला ते झेपेल का.”
तिच्या मनात दाटलेलं दु:ख संतापाच्या रुपाने बाहेर पडत होतं.
“त्यांना सांगा की घरातील सर्व मंडळी त्यांची वाट बघत आहेत. म्हटलं तर सगळ्या गोष्टी होत्या तशाच आहेत पण म्हटलं तर सगळं काही बदललेलंही आहे. त्यांच्याशिवाय रहाणं मला शक्य नाही. लवकरच मी माझ्या जीवाचं काही तरी बरं वाईट करून घेईन. आम्ही जो काळ त्यांच्या सहवासात घालवला त्याची त्यांना आठवण करून द्या. मुलांनी मला विचारलं तर मी त्यांना काय सांगणार. ते गेले तेव्हा त्यांची खोली जशी होती तशीच ती आजही ठेवलेली आहे. आम्ही सगळे त्यांची वाट बघत आहोत.”
मी तिच्या नवर्याला काय सांगायला हवं ते तिने मला अगदी शब्दश: पढवलं.
“माझ्यासाठी शक्य असेल ते सर्व तुम्ही कराल ना?” मला तिची दया आली. “माझी काय अवस्था झाली आहे ते त्यांना सांगा.”
मला शक्य असतील ते सर्व मार्ग वापरून मी तिच्या नवर्याच्या भावनेला हात घालावा, त्याच्या सहानुभूतीला आवाहन करावं अशी तिची अपेक्षा होती. ती ओक्साबोक्शी रडत होती. मला भरून आलं. स्ट्रिकलँडच्या निष्ठुरपणाची चीड आली. त्याला परत आणण्यासाठी जे काही मला करता येणं शक्य असेल ते करून मी त्याला परत आणीन असं आश्वासान मी तिला दिलं. मी दुसर्याच दिवशी निघेन आणि माझ्या हाती काहीतरी लागे पर्यंत पॅरीसमध्येच मुक्काम ठोकून राहीन असंही वर कबूल केलं. बोलता बोलता उशीर झाला होता आणि आम्ही दोघंही भावनांच्या उद्रेकाने पार थकून गेलो होतो म्हणून मी तिचा निरोप घेतला.

2 comments:

  1. स्ट्रिकलँडविषयी गूढ वाढतंय

    ReplyDelete
  2. वाह , फारच सुंदर ! गुंतायला होतंय कादंबरीत ... 👌👍💐

    ReplyDelete