Sunday, January 21, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ८

मी स्ट्रिकलँड दाम्पत्याविषयी आतापर्यंत जे लिहीलं आहे ते वाचून ते प्रत्यक्षात कसे होते याची नीट कल्पना येणार नाही याची मला जाणीव आहे. कादंबरीतील पात्रं विश्वसनीय वाटण्यासाठी त्यांना सहसा ज्या लकबी चिकटवल्या जातात तसं मी काहीही मी केलेलं नाही. यात जर काही दोष असलाच तर तो माझा आहे. ती पात्रं जिवंत वाटण्यासाठी त्यांची काही स्वभाववैशिष्ट्य दाखवता येतील का हे आठवण्यासाठी मी मेंदूला बराच ताण दिला. मला वाटलं वागण्या-बोलण्यातील एखादा ढंग किंवा खोड, तर्हेवाईक स्वभाव त्यांना बहाल केला तर त्यांचं चित्रण वैशिष्ट्यपूर्ण होऊ शकेल. सद्यस्थितीत ते दांपत्य चित्रपटाच्या पडद्यावरील दृष्यासारखं सपाट वाटत होतं. जरा दुरून पाहिलं तर आकार पाठीमागच्या दृष्यात मिसळून गेलेले असतात आणि उरलेली असते फक्त रंगांची आकारहीन मनोवेधक उधळण. माझ्या मन:पटलावर त्यांचं उमटलेलं चित्रच मुळी असं होतं. कदाचित त्यामुळेच मी शब्दात पकडलेलं त्यांचं चित्रणसुद्धा तसच अंधूक अस्पष्ट उतरलं असावं. ज्यांचं आयुष्य विशाल जनप्रवाहात मिसळून गेललं असतं अशी असंख्य माणसं आपल्या आसपास असतात, शरीरातील मांसपेशी सारखी, जोपर्यंत त्या निरोगी असतात तोपर्यंत आपण त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत नाही. स्ट्रिकलँड दांपत्याचं आयुष्य हे एका मध्यमवर्गीय सुखी कुटुंबासारखं होतं. एक मध्यमवयीन सुंदर गृहीणी, छोट्या मोठ्या लेखकांना अधून मधून बोलावून मेजवान्या देण्याची निरूपद्रवी हौस असलेली. तिचा पती एक सद्गृहस्थ, तिच्या हौसेला प्रतिसाद न देणारा अरसिक, पण नियतीने त्याच्यावर सोपवलेली भूमिका इमानेइतबारे वठवणारा. दोन छानशी गोंडस मुलं. सामान्य माणूस म्हणतात तो यापेक्षा अधिक वेगळा नसतो. लक्ष वेधावं असं काहीही या दांपत्याकडे मला त्यावेळी आढळलं नव्हतं.
आज मागे वळून पहाताना मला असं वाटतं की त्यावेळी मी खूपच मठ्ठ असलो पाहिजे. नाहीतर चार्ल्स स्ट्रिकलँड पुढे जाऊन एक असामान्य कलाकार होणार आहे याची एक तरी खूण मला त्या वेळी आढळली असती. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला मनुष्यस्वभावाची चांगली ओळख झाली आहे. पण स्ट्रिकलँड आजही मला भेटला असता तरीही त्याच्यातील सुप्तावस्थेतील असामान्यत्व ओळखण्यात मी किती यशस्वी झालो असतो याची शंकाच आहे. मानवी जीवन कशी वळणे घेईल याचा थांगपत्ता लागणं कठीण असतं हे आता मला चांगलंच उमगलं आहे. त्यामुले शरद ऋतुच्या सुरूवातीला लंडनमध्ये पाऊल टाकताच माझ्या कानावर जे आलं त्याचं मला फार आश्चर्य वाटलं नाही.
मी लंडनमध्ये आलो त्याच दिवशी जेर्मीन स्ट्रीटवर माझी रोज वॉटरफोर्डशी गाठ पडली.
“तुम्ही एकदम मजेत दिसताय. काय विशेष?”
ती हसली. तिचे डोळे चमकले. तिला कोणाची तरी भानगड समजली असावी आणि ती मला सांगण्यासाठी ती अगदी अधीर झाली असावी हे मी माझ्या अनुभवावरून ओळखलं.
“तुम्हाला चार्ल्स स्ट्रिकलँडला भेटला होता ना?”
तिचा उत्साह उतू जात होता हे तिच्या चेहेर्यावरूनच नव्हे तर तिच्या देहबोली सांगत होती. मी मान डोलावली. मला वाटलं त्या बिचार्याचं शेअर बाजारात दिवाळं वाजलं असावं किंवा त्याला रस्त्यावरून चालताना ओम्नीबसने उडवलं असावं.
“तो बायकोला टाकून पळाला. किती भयंकर आहे ना.”
या विषयाला जर्मेन स्ट्रीटच्या नाक्यावर उभं राहून अधिक न्याय देता येणार नाही म्हणून तिने एखाद्या कसलेल्या नाटककाराप्रमाणे मला थोडीशी माहिती दिली आणि मला यापेक्षा अधिक काही ठाऊक नाही असं जाहीर केलं. ही हसण्यावर नेण्याएवढी क्षुल्लक गोष्ट नसल्यामुळे मी तिच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मला जास्त काही ठाऊक नाही यावर ती ठाम होती.
“मला खरंच काही ठाऊक नाही.” मी वैतागून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाली. “मला वाटतं शहरातल्या एका टी शॉपमध्ये काम करणारी मुलगीसुद्धा बेपत्ता झाली आहे.”
तिने माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि मला डेंटीस्टकडे जायचं असल्याचं कारण सांगून तिने हसत हसत काढता पाय घेतला. मला वाईट वाटलं होतं, पण त्यापेक्षाही माझं कुतुहल जास्त चाळवलं गेलं होतं. त्याकाळी माझ्या गाठीला आयुष्याचा प्रत्यक्ष अनुभव फार कमी होता. एखाद्या कादंबरीत घडावी अशी घटना माझ्या परीचयातील व्यक्तिंबाबत घडली की सुरवातीला माझा उत्साह उतू जाई. नंतर अशा अनेक घटना घडत गेल्या आणि मला त्याची सवय झाली. पण तरीही त्यावेळी मला त्याचा धक्का बसला होता. स्ट्रिकलँड त्याच्या वयाच्या चाळीशीत होता आणि या वयाच्या माणसाने प्रेमात पडून असं वहावत जाणं घृणास्पद होतं. एखाद्या पुरूषाला प्रेमात पडायचं असेल तर वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत हरकत नसते अशी वयोमर्यादा त्याकाळी मी माझ्या तारूण्यातील उथळपणामुळे घालून घेतली होती. या बातमीमुळे मी अस्वस्थ का झालो याला दुसरं एक कारण होतं. मिसेस स्ट्रिकलँडला मी पत्र लिहून लंडनला माझा परत येण्याचा दिवस कळवला होता आणि वर लिहीलं होतं की तुमची हरकत नसेल तर एके दिवशी संध्याकाळच्या चहाला मी तुमच्या घरी येणार आहे. तो दिवस आजच होता. तिच्याकडून अजून काहीच निरोप आला नव्हता. मी तिला यायला हवा होतो की नाही? या अस्वस्थ मनस्थितीत माझ्या पत्राचा तिला विसर पडलेला असण्याचीही शक्यता होती. मी न जावं हेच शहाणपणाचे ठरण्याची शक्यता होती. दुसरीही एक शक्यता होती. तिला हे प्रकरण शक्य तो कोणाला कळू द्यायचं नसावं. मी न गेल्याने ही बातमी माझ्या कानावर आली आहे हे आपोआप जाहीर झालं असतं. तसं असेल तर माझं न जाणं बरोबर दिसलं नसतं. मी पेचात पडलो. तिचं दु:ख हलकं करण्यासाठी मी काहीही करू शकत नसताना उगाच तेथे जाऊन तिच्या दु:खात मला भर घालायची नव्हती. तिच्या दु:खाला ती कसं तोंड देत आहे ते आपण जाऊन बघावं असं तेव्हा मला आतून वाटत होतं याची आता मला लाज वाटते. त्यावेळी मात्र आपण नक्की काय करावं हे मला कळेनासं झालं होतं.
शेवटी मी विचार केला की काहीच घडलं नाही असं भासवून आपण ठरल्याप्रमाणे जावं आणि नोकराणीकडून आपण आल्याचा निरोप पाठवल्यावर काय होतंय याची वाट बघावी. असं केल्याने मी यायला नको असेन तर मला परत पाठवण्याची तिला संधी मिळाली असती. पण प्रत्यक्षात मी मनात योजलेला निरोप नोकराणीला सांगताना मला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. पॅसेजमधल्या अंधारात उभं राहून वाट पहाताना हा दरवाजा कधीच उघडू नये असं मला राहून राहून वाटत होतं. नोकराणी परत आली. मालकिणीवर कोसळलेल्या कौटुंबीक संकटाची तिला पूर्ण जाणीव असावी असं तिच्या देहबोलीतून जाणवत होतं. 
“आत या साहेब.”
मी तिच्या पाठोपाठ बैठकीच्या खोलीत गेलो. ब्लाईंड्स खाली ओढून घेतल्याने खोलीत अर्धवट प्रकाश पडला होता. मिसेस स्ट्रिकलँड प्रकाशाकडे पाठ करून बसली होती. तिचा मेहूणा, कर्नल मॅक अँड्रयू फायर प्लेसकडे पाठ करून उभा होता. मला आत जाताना प्रचंड अवघडलो होतो. मला वाटलं होतं की माझ्या येण्याचं त्यांना आश्चर्य वाटेल. किंवा मिसेस स्ट्रिकलँडनी मला चुकून आत घेतलं असावं. कर्नलना तर मी आल्याची चीडच आली असावी.
“मी येईन असं तुम्हाला वाटत होतं की ते कळत नव्हतं.” मला काही कळलं आहे हे न दाखवता मी म्हटलं.
“अर्थात तुम्ही याल अशी खात्री होती. ऍन थोड्या वेळात चहा आणेल.”
मिसेस स्ट्रिकलँडचे डोळे रडून सुजले असावेत हे त्या अंधारातसुद्धा कळत होतं. तिचे गाल तर लाल झालेले अंधूक प्रकाशातही दिसत होते.
“हे माझे मेव्हणे, तुम्ही ओळखता यांना. सुट्टी लागायच्या आधी एका डिनरला तुम्ही आला होता तेव्हा यांच्याशी ओळख करून दिली होती.”
आम्ही हस्तांदोलन केलं. काय बोलावं हे न सुचल्यामुळे मी ओशाळून गेलो होतो. पण त्या परीस्थितीतून मिसेस स्ट्रिकलँडनेच माझी सुटका केली. मी उन्हाळ्याच्या सुटीत काय केलं याची तिने चौकशी केली. म्हणून चहा येईपर्यंत मला कशीतरी वेळ मारून नेता आली. कर्नलनी स्वत:साठी व्हिस्की आणि सोडा घेतला.
“ऍमी. तू सुद्धा थोडी व्हिस्की घेऊन बघ.”
“नको. मी चहाच घेईन.”
काही तरी विपरीत घडलं असावं याची ही पहिली खूण होती.
काहीच दखल न घेता मी मिसेस स्ट्रिकलँडला संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. फायरप्लेसच्या जवळ उभ्या असलेल्या कर्नलच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तेथून सभ्यपणे शक्य तितक्या लवकर कसे सटकता येईल याचा मी विचार करत होतो. मिसेस स्ट्रिकलँडने मुळात मला घरात येऊ का दिलं तेच मला कळत नव्हतं. नेहमीच्या जागी फुलं ठेवलेली दिसत नव्हती. सुट्टीत बाहेरगावी जाताना आवराआवर करून ठेवलेल्या वस्तू अजून त्यांच्या नेहमीच्या जागेवर ठेवलेल्या दिसत नव्हत्या. जी बैठकीची खोली एरवी अगदी हवेशीर वाटायची ती आज कोंदट वाटत होती. काहीतरी बिघडलं होतं खास. कोणीतरी गेलेलं असावं आणि मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवला असावा असं वाटत होतं. मी चहा संपवला.
“तुम्हाला सिगरेट हवी आहे का?”
तिने इकडे तिकडे पाहिलं पण सिगरेटचं पाकिट काही मिळालं नाही.
“मला वाटतं संपल्या असाव्यात.”
तिला अचानक रडू कोसळलं आणि ती बैठकीच्या खोलीतून निघून गेली.
मी गोंधळून गेलो. सिगरेट संपल्या की आणून ठेवण्याचं काम नेहमी तिचा नवरा करत असावा. मला वाटलं सिगरेट शोधताना त्याची आठवण झाली आणि तिला दु:खाचा उमाळा आला असावा. या पुढे तिला अशा छोट्या छोट्या गैरसोईंच्या सामना एकट्याने करायचा होता. जुना आयुष्यक्रम आता संपला होता. रीती रिवाजांचं ढोंग पुढे चालू ठेवणं आता कठीण होतं.
“मला वाटतं मी आता जावं हे बरं.” मी उठून कर्नलना विचारलं.
“तो हलकट हिला सोडून गेला हे तुम्हाला कळलं असेलच.” तो जवळपास किंचाळत म्हणाला.
मी जायचा थांबलो.
“लोक कश्या वावड्या उठवतात तुम्हाला कल्पना असेलच. कुठेतरी पाणी मुरत होतं एवढंच माझ्या कानावर आलं होतं.”
“त्याने आम्हाला मोठा धक्का दिला. तो एका बाई बरोबर पॅरीसला पळून गेलाय. बरं जाताना त्याने आपल्या कुटुंबासाठी एक पेनीसुद्धा मागे ठेवली नाही.”
“मला खरंच वाईट वाटतंय.” आणखी काय बोलावं ते मला सुचलं नाही.
कर्नलने व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला. कर्नल अक्कडबाज मिशी राखलेला, करड्या केसांचा, पन्नाशीचा, उंच आणि सडपातळ बांध्याचा इसम होता. त्याची जिवणी पातळ होती आणि डोळे निळसर होते. मागच्या भेटीतील काही गोष्टी मला आठवत होत्या. चेहेर्यावरून तो अगदी बथ्थड असावा असं वाटत होतं. सैन्यातील नोकरी सोडून त्याला दहा वर्षं झाली होती. सैन्यात असताना आठवड्यातून तीन दिवस तो पोलो खेळायचा हे तो मोठ्या प्रौढीने सांगत असे.
“मिसेस स्ट्रिकलँडना या क्षणी त्रास द्यावा असं मला वाटत नाही. मला किती वाईट वाटतंय ते त्यांना कळवा. त्यांना कसली गरज लागली तर मला तसं कळवा. मला मदत करायला आवडेल.”
कर्नलचं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.
“तिचं काय होणार आहे मला कळत नाही. त्यात तिला दोन मुलं आहेत. ती काय हवा खाऊन जगणार आहेत. सतरा वर्ष.”
“सतरा वर्षांच काय?”
“त्यांच्या लग्नाला सतरा वर्ष झाली आहेत. मला तो कधीच आवडायचा नाही. अर्थात तो माझा मेव्हणा होता हे खरं आहे. आमचं नातं सांभाळायचा मी माझ्या परीने चांगला प्रयत्न करत होतो. तुम्हाला चार्ल्स सभ्य माणूस वाटायचा का? मला विचाराल तर तिने त्याच्याशी लग्नच केलं नसतं तर फार बरं झालं असतं.”
“त्यांचा निर्णय अगदी पक्का आहे का?”
“यापुढे तिला करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे. ते म्हणजे त्याला घटस्फोट देणं. तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मी तिला तेच सांगत होतो. ऍमी घटस्फोटाची नोटीस पाठव. तुला स्वत:च्या आणि मुलांच्या हितासाठी हे केलंच पाहिजे. तो माझ्या समोर आला तर त्याला जन्माची अद्दल घडेल असा बदडून काढीन.”
कर्नल मॅक-अँड्रयूला तसं करणं खूप जड गेलं असतं. कारण स्ट्रिकलँड त्याच्यापेक्षा चांगलाच तगडा होता असा विचार माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही. पण मी गप्प राहिलो. शिक्षा करण्याचं सामर्थ्य नसेल तर केवळ नैतिक भूमिकेवरून आलेला क्रोध हास्यास्पद ठरण्याची शक्यता असते. मी तेथून सटकण्याची आणखी एकदा विचार करत असतानाच मिसेस स्ट्रिकलँड आली. तिने तिचे डोळे पुसले होते आणि चेहेर्याला थोडी पावडर लावली होती.
“मला रहावलं नाही. माफ करा. तुम्ही तेवढ्यात गेला नाहीत ते एक बरं केलंत.”
ती खाली बसली. काय बोलावं ते मला मुळीच सुचत नव्हतं. संबंध नसलेल्या गोष्टीत माझं मत व्यक्त करायला मला नेहमी संकोच वाटतो. संकटाने घेरलेल्या स्त्रिया त्यांचं ऐकून घेणारा कोणी मिळाला तर कोणाही तिर्हाईताला त्यांच्या खाजगी गोष्टी सांगायला किती उत्सुक असतात हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. मिसेस स्ट्रिकलँड तिचं मन मोकळं करण्याची तयारी करत होती.
“लोक या विषयी काय बोलत आहेत का?”
तिचं सर्वस्वी खाजगी असं गुपीत मला ठाऊक असेल हे तिने ज्या सहजतेने गृहित घरलं होतं त्याने मला धक्का बसला.
“मी नुकताच लंडनमध्ये आलोय. मला फक्त एकच व्यक्ति भेटली ती म्हणजे मिसेस वॉटरफोर्ड.”
मिसेस स्ट्रिकलँडने हाताच्या मुठी वळल्या.
“ती नक्की काय म्हणाली मला नीट सांगा.” मी कांकू करत होतो पण तिने हट्टच धरला.
“लोक कसं बोलतात तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तिनं जे सांगितलं त्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ती म्हणाली की तुमचे पती तुम्हाला सोडून गेले आहेत.”
“फक्त एवढंच?”
रोज वॉटरफोर्ड काय म्हणाली ते मी काही सगळंच शब्दश: सांगितलं नाही. विशेषत: जाता जाता तिने टी शॉप मधल्या मुलीचा तिने जो उल्लेख केला होता ते मी तिच्यापासून लपवलं.
“माझा नवरा कोणा बरोबर पळून गेला असावा त्याबद्दल ती काहीच म्हणाली नाही?”
“नाही” मी खोटंच दडपून दिलं.
“मला तेवढंच जाणून घ्यायचं होतं.”
मी कोड्यात पडलो. पण सगळा विचार करता आता तेथून काढता पाय घेणं श्रेयस्कर आहे या निष्कर्षाप्रत मी आलो. मिसेस स्ट्रिकलँडशी निरोपाचं हस्तांदोलन करताना मी तिला मदत करायची तयारी दर्शवली आणि तिचा निरोप घेतला. ती क्षीणपणे हसली.
“मी तुमची आभारी आहे. माझ्यासाठी एवढं कोणी केलं नसतं.”
संकोचामुळे सहानुभूतीचे दोन अधिक शब्द बोलायला मला सुचलं नाही. मी निरोप घेण्यासाठी कर्नलकडे वळलो. पण त्याने माझा हात हातात घेतला नाही.
“मी सुद्धा निघतोय. तुम्ही जर चालत जाणार असाल तर व्हिक्टोरिया स्ट्रीटपर्यंत मी तुमची सोबत करीन.”

“ठीक आहे, चला तर मग.”

2 comments:

  1. कथानकाविषयी उत्सुकता वाढतेय

    ReplyDelete
  2. मूळ लेखनातला मूड किंवा कादंबरीचा एक विशिष्ट टोन छान पकडून ठेवलाय आतापर्यंत . त्यातून कादंबरीच्या कालखंडाची जाणीव होत रहाते हे विशेष ... ! 👍

    ReplyDelete