Wednesday, January 24, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १२

त्यावेळी ऍव्हेन्यू द क्लिशीवर खूप गर्दी होती. त्या चौकातून जा ये करणार्या मंडळींवर नजर टाकली असता तेथे शरीरसुख विकण्याचा व्यवसाय जोरात चालू आहे हे कळलं असतं. तेथे कोण नव्हतं? सरकारी कचेरीतील कारकून दुकानातील विक्रेत्या मुलींना बरोबर घेऊन आले होते. बरेच जण तर बाल्झाकच्या कादंबरीतून थेट ऍव्हेन्यू द क्लिशीवर उतरल्यासारखे वाटत होते. लोकांच्या नैतिक दौर्बल्यामुळे ज्यांच्या व्यवसायाला बरकत येते अशी माणसं तेथे जिकडे तिकडे वावरताना दिसत होती. पॅरीसच्या ह्या गरीब वस्तीत नेहमी गजबजाट असतो, काहीतरी अनपेक्षित घटना कोणत्याही क्षणी घडू शकेल असं दडपण नवख्या माणसावर सतत येत रहातं.
“तुम्हाला पॅरीसची कितपत माहीती आहे?” मी विचारलं.
“फारशी नाही. मी लग्नानंतर हनीमूनला आलो होतो, त्यानंतर पहिल्यांदाच येतोय.”
“हे हॉटेल तुम्ही कुठून शोधून काढलंत?”
“मला अगदी स्वस्तातलं हॉटेल हवं होतं. चौकशी करत करत येथे येऊन पोचलो.”
ऍबसिंथ आली. आम्ही ऍबसिंथ पिण्याचा चमचा घेऊन त्यात खडीसाखरेचा खडा ठेवला आणि मोठ्या गांभिर्याने रीतीनुसार त्या खड्यावरून ऍबसिंथच्या ग्लासात बाटलीतील ऍबसिंथची धार सावकाश ओतली.
 “मी येथे का आलो आहे ते तुम्हाला एकदा सांगून टाकलेलं बरं.” मी एकदाचं त्याला सांगून टाकलं खरं पण सांगताना मला अगदी अवघडल्यासारखं झालं होतं.
त्याचे डोळे चमकले.
“एक ना एक दिवस कोणीतरी येऊन टपकेल याची मला कल्पना होती. मला ऍमीची बरीच पत्रं आली आहेत.”
“म्हणजे मला काय सांगायचंय ते तुम्हाला सगळं कळलंय तर.”
“मी त्यातलं एकही पत्र अजून उघडलेलंसुद्धा नाही.”
बोलण्यापूर्वी थोडा वेळ घेण्यासाठी मी सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला. आता पुढे कसं जावं ते मला कळेना. एक म्हणजे नम्र भाषेत विनंती करायची नाहीतर दुसरं म्हणजे चीडीला येऊन धमकी द्यायची या डावपेचांनुसार जी शब्दयोजना मनात केली होती त्यानुसार बोलणं ऍव्हेन्यु द क्लिशीमध्ये अस्थानी ठरलं असतं. तो अचानक गालात हसला.
“तुमचं काम मोठं कठीण दिसतंय.”
“कोणत्या शब्दात सांगावं ते कळत नाहीय.”
“हे बघा. काय सांगायचं ते एकदाचं सांगून टाका. मग आपण आजची संध्याकाळ साजरी करायला मोकळे होऊ.”
मी द्विधा मनस्थितीत सापडलो.
“तुमची पत्नी किती भयंकर दु:खी झाली आहे हे तुम्हाला एकदा तरी जाणवलंय का?”
“ती त्यातून बाहेर येईल.”
त्याने ज्या निष्ठूर थंडपणाने हे उत्तर दिलं त्याचं शब्दात वर्णन करून सांगणं कठीण आहे. मी अस्वस्थ झालो. माझी अस्वस्थतता त्याच्यापासून लपवण्यासाठी मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. माझे पाद्री असलेले एक काका चर्चसाठी वर्गणी मागताना जो सूर लावतात तो सूर लावण्याचा मी प्रयत्न केला.
“मी जर तुमच्याशी मोकळेपणाने बोललो तर तुमची हरकत नाही ना?”
त्याने हसत हसत मान डोलावली.
“तुम्ही तिच्याशी असं वागावं असं तिने काय केलं आहे?”
“काही नाही.”
“तिच्याबद्दल तुमची काही तक्रार आहे का?”
“नाही.”
“असं असेल तर सतरा वर्षांच्या संसारानंतर तिचा काही दोष नसताना तिला असं उघड्यावर टाकून जाणं राक्षसी वाटत नाही का?”
“तुम्ही म्हणता तसं हे राक्षसी आहे खरं.”
मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. माझे सगळे मुद्दे त्याने सरळ सरळ मान्य केल्याने माझ्या फुग्यातील हवाच निघाली. माझी परीस्थिती अगदीच हास्यास्पद झाली होती असं काही म्हणता आलं नसतं पण बिकट झाली होती हे मात्र खरं. आग्रह, विनंती, विनवण्या, नाकदुर्या, युक्तिवादाने मतपरिवर्तन, भावनांना आव्हान, कळकळीचा उपदेश, कानउघडणी, रागावणे, शिव्या देणे, उपहास आणि अपमान या सगळ्या युक्त्या-प्रयुक्त्यांचा आवश्यकतेनुसार वापर करण्याचं मी ठरवलं होतं. पण पाप्याने आपल्या पापांचा पहिल्या झटक्यातच सरळ सरळ कबुलीजबाब देऊन टाकला तर पाद्रीबाबांना काम काय राहिलं? अशा परीस्थितीत काय करायचं याचा कसलाच अनुभव माझ्या गाठीला नव्हता. मी त्याच्या जागी असतो तर सगळं नाकबूलच केलं असतं.
“पुढे काय?”
मी तोंडाचा चंबू केला.
“आता तुम्हीच कबूल करताय की सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही.”
“तुम्ही म्हणता ते खरं आहे.”
मला वाटतं की मी माझं कर्तव्य पार पाडण्यात फारशी हुशारी दाखवू शकलो नव्हतो. आता प्राप्त परीस्थितीला धैर्याने तोंड देण्यावाचून गत्यंतर नव्हते.
“ते सगळं खड्ड्यात जाऊं दे. हे पहा. आपल्या बायकोसाठी एकही छदाम मागे न सोडता तिला असं कोणी टाकू शकत नाही.”
“का नाही?”
“ती काय खाईल?”
“मी तिचा सतरा वर्ष सांभाळ केला. आता बदल म्हणून तिने स्वत:चा सांभाळ करायला काय हरकत आहे?”
“तिला शक्य होणार नाही.”
“तिला प्रयत्न तर करू दे.”
या मुद्यावर मी बराच प्रतिवाद करू शकलो असतो. अर्थव्यवस्थेतील स्त्रियांचे स्थान, लग्न करून पुरूषाने स्विकारलेली जबाबदारी, त्याचे सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर असे अनेक पैलू होते. पण मला सर्वात महत्वाचा वाटणारा एकच मुद्दा मी मांडला.
“तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटत नाही का?”
“काहीही नाही.”
प्रकरण खूप गंभीर होतं. सर्वांच्याच दृष्टीने. पण विचारलेल्या सर्व प्रश्नांची तो उध्दटपणे हसत हसत अशी खिल्ली उडवत होता की माझं हसू आवरायला मला ओठ दाबून ठेवावे लागत होते. त्याचं वागणं अतिशय नींदनीय आहे असं मी स्वत:ला सारखं बजावत होता. नैतिक संतापाने माझ्या अंगाची लाही लाही झाली होती.
“सगळं गेलं तेल लावत. कमीत कमी तुमच्या मुलांचा तरी विचार करा.”
“आतापर्यंत त्यांना बर्याच सुखसोई मिळाल्या आहेत. सर्वसामान्य मुलांना मिळतात त्यापेक्षा कितीतरी जास्तच. त्यांची काळजी घेणारे इतर अनेक नातेवाईक आहेत. तशीच वेळ आली तर कर्नल मॅक-अँड्रयुनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायला हरकत नाही.”
“तुमचं मुलांवर प्रेम आहे की नाही. किती चांगली चुणचुणीत मुलं आहेत ती. तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?”
“मुलं लहान होती तेव्हा मला ती आवडत असत. आता ती मोठी झालीयत. त्यांच्याबद्दल विशेष असं काय वाटायचं?”
“हे अमानवी आहे.”
“असेल.”
“तुम्हाला जरासुद्धा लाज वाटत नाही असं दिसतंय.”
“नाही वाटत.”
मी संभाषणाचे रूळ बदलून पाहिले.
“तुम्ही एक डुक्कर आहात असं लोकांना वाटेल.”
“वाटूं दे.”
“लोक आपला तिरस्कार करतात, त्यांना आपली किळस वाटते याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही?”
“नाही.”
त्याची एकाक्षरी उत्तरं देण्याची पद्धत एवढी संतापजनक होती की त्यापुढे मी विचारलेले प्रश्न अगदीच अर्थहीन वाटू लागले. मी एक दोन मिनीटं विचार केला.
“सगळे आप्तस्वकिय आपला तिरस्कार करत आहेत यामुळे सद्सद्विवेकबुद्धीला जी टोचणी लागेल त्याने तुम्हाला सुखाने झोप लागू शकेल का? उद्या तुमचं मन तुम्हाला खाणार नाही याची तुम्हाला खात्री आहे? थोडी फार सद्सद्विवेकबुद्धी प्रत्येकाकडे असतेच. आज ना उद्या तुम्हाला त्याची जाणीव होईल. समजा तुमच्या पत्नीचं अकाली निधन झालं तर पश्चातापाच्या टोचणीने तुमचा छळ होणार नाही का?”
त्यानं काहीही उत्तर दिलं नाही. तो काही तरी बोलेल म्हणून मी थोडा वेळ थांबलो. शेवटी शांततेचा भंग मलाच करावा लागला.
“मी बोललो त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?”
“तुम्ही एक मुर्ख इसम आहात, दुसरं काय म्हणणार?”
“तुमच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तुमच्यावर जबरदस्तीने कारवाई करावी लागेल,” मी वैतागून टोचून म्हणालो. “मला वाटतं कायदा त्यांच्या बाजूचा आहे हे विसरू नका.”
“कायदा झाला तरी कफल्लक माणसाकडून काय वसूल करता येईल असं तुम्हाला वाटतं? मला अगदी झाडून काढलं फार फार तर शंभर एक पौंड निघतील.”
मी अधिकच कोड्यात पडलो. त्याच्या हॉटेलवरून त्याच्या आर्थिक परीस्थितीचा अंदाज येतच होता.
“ते संपल्यावर काय करायचा विचार आहे तुमचा?”
“जास्त कमवायचे.”
तो अगदी शांत होता. माझ्या बोलण्याची तो जी हसत हसत थट्टा करत होता त्याच्यापुढे मी अगदीच बावळटासारखा वाटू लागलो. पुढचा मुद्दा कसा मांडावा याची जुळवाजुळव करण्यासाठी मी थोडा थांबलो, पण माझ्या आधी तोच म्हणाला.
“ऍमी दुसरं लग्न का करत नाही. तशी ती तरूण आहे, आकर्षक नाही असं म्हणता येणार नाही. लागलंच तर ती एक गृहकृत्यदक्ष अशी गृहीणी आहे अशी शिफारससुद्धा मी द्यायला तयार आहे. तिला घटस्फोट हवा असेल तर तिला हवं ते कारण तिने द्यायला माझी हरकत नाही.”
आता हसण्याची पाळी माझी होती. तो अतिशय धूर्त होता. त्याचा उद्देश हाच असावा. आपण एका बाईबरोबर पळून आलो आहोत हे त्याला काही कारणासाठी लपवायचं असावं. ती बाई कोण आणि ती कुठे आहे हे कोणाला कळू नये याची तो अतिशय काळजी घेत असावा. मी त्याला ठणकावून सांगितलं.
“मला तुमच्या पत्नीने तुम्हाला बजावून सांगायला सांगितलंय की काही झालं तरी ती तुम्हाला घटस्फोट देणार नाही. तिचा निर्णय पक्का आहे. तसा काही विचार तुम्ही करत असाल तर ते डोक्यातून काढून टाका.”
त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो नक्कीच अभिनय नसावा. त्याच्या ओठीच हसू लुप्त झालं. तो अतिशय कळकळीने म्हणाला.
“माझ्या मित्रा मी त्याची पर्वा करत नाही. तिने घटस्फोट घेतला की नाही घेतला त्याने मला एका पेनीचाही फरक प़डत नाही.”
मी हसलो.
“सोडा ते. आम्ही एवढे मुर्ख आहोत असं तुम्हाला वाटतंय की काय. तुम्ही एका बाईचा हात धरून इकडे पळून आला आहात ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे.”
तो थोडा वेळ गप्प होता आणि नंतर त्याला एकाएकी हसू कोसळलं. तो इतक्या जोरात हसत होता की आमच्या आजूबाजूला बसलेले लोक आमच्याकडे माना वळवून बघायला लागले, आणि उगाचच तेही त्याच्या हसण्यात सामिल झाले.
“यात एवढं हसण्यासारखं काय आहे?”
“बिचारी ऍमी.” तो दात विचकत म्हणाला. त्याचा चेहेरा तिरस्काराने कडवट झाला.
“स्त्रियांचं मन किती क्षुद्र असतं. प्रेम! त्यांना नेहमी प्रेमाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. त्यांना वाटतं की पुरूष जेव्हा आपल्या बायकोला सोडून जातो तेव्हा त्याच्यामागे दुसर्या स्त्रीचे आकर्षण एवढं एकच कारण असतं. एका स्त्रीसाठी मी एवढा मुर्खपणा करीन असं तुम्हाला वाटतं का?”
“तुम्ही तुमच्या पत्नीला सोडून इथे पॅरीसला आला आहात त्यामागे दुसरी स्त्री नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?”
“अर्थातच नाही.”
“तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायचा का?”
मी असं का विचारलं असावं ते मला सांगता आलं नसतं. मी स्वत: छक्के पंजे करत नाही आणि इतरांनी केलेले मला आवडत नाहीत.
“अलबत.”
“मग तुम्ही तिला असं वार्यावर सोडून का दिलंत?”
“मला चित्रकार व्हायचंय.”
मी थोडा वेळ त्याच्याकडे बघतच राहिलो. मला कळत नव्हतं. मला वाटलं त्याला वेड लागलं असलं पाहिजे. येथे एक लक्षात घ्या, त्यावेळी मी अगदी तरूण होतो आणि माझ्या लेखी तो एक मध्यमवयीन गृहस्थ होता. मला त्याची गंमतच वाटायला लागली.
 “तुमचं वय आता चाळीस एक वर्षांचे तरी असेल.”
“त्यामुळेच मला आता जास्त उशीर करून चालणार नाही. म्हणूनच मी माझा निर्णय पक्का केला.”
“तुम्ही यापूर्वी कधी पेंटींग केलंय का?”
“मी लहान होतो तेव्हा मला चित्रकार व्हायचं होतं. पण माझ्या वडिलांनी मला नोकरी धंद्याला उपयोगी असं शिक्षण घ्यायला भाग पाडलं. कारण चित्रकलेत चार पैसे मिळतील याची खात्री नव्हती. मी गेलं वर्षभर चित्रकला शिकत आहे. मागच्या वर्षापासून मी एका रात्रीच्या वर्गात जात होतो.”
“मिसेस स्ट्रिकलँडना तुम्ही एका क्लबमध्ये ब्रिज खेळायला जाता असं जे सांगितलं होतं तो हा चित्रकलेचा वर्ग होता का?”
“बरोबर.”
“मग तुम्ही त्यांना तसं का सांगितलंत नाही.”
“मला ते माझ्यापुरतंच ठेवायचं होतं.”
“तुम्हाला चित्रकला येते?”
“अजून नाही जमत. पण एक ना एक दिवस जमेल. म्हणूनच मी येथे आलो आहे. लंडनमध्ये मला जे हवं ते करायला शक्य होत नव्हतं. कदाचित इथे मनासारखं करता येईल.”
“तुमच्या वयाच्या माणसाने नव्याने काही करायला सुरवात केली तर त्याला ते करणं जमू शकेल असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्यांना पेंटींग शिकायचं आहे त्यांनी अगदी उशीरात उशीर म्हटलं तरी आपल्या वयाच्या अठरा वर्षांच्या आत सुरवात केलेली असते.”
“अठरा वर्षांचा असताना शिकलो असतो त्यापेक्षा आता जास्त लवकर शिकायला पाहिजे. कारण त्या वयात मला जो वेळ मिळाला असता त्याच्या तुलनेत आता खूपच कमी वेळ माझ्याकडे आहे.”
“तुमच्यामध्ये काही कलागुण आहेत असं तुम्हाला कशावरून वाटतं?”
पूरी पाच मिनीटं तो गप्प होता. त्याची नजर रस्त्यावरून जाणार्या येणार्या माणसांकडे होती. मला नाही वाटत की त्याचं लक्ष तिकडे होतं. काहीही उत्तर द्यायचं नाही हेच त्याचं उत्तर होतं.
“मला चित्रकारच व्हायचं आहे.”
“तुम्ही एक मोठा जुगार खेळत आहात असं नाही तुम्हाला वाटत?”
त्यानं माझ्याकडे नजर रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचीत्र चमक होती.
“तुमचं वय काय? तेवीस.”
त्याने विचारलेला प्रश्न अप्रस्तुत होता. एखादा धोका पत्करणं माझ्यासाठी अगदी नैसर्गिक अशी गोष्ट होती. त्याचं तारूण्य केव्हाच ओसरलेलं होतं. तो एक शेअर दलाल होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला दोन मुलं होती. एक सन्माननीय नागरीक म्हणून त्याचं आयुष्य सुरळीत चाललेलं होतं. माझ्या वयात धोका पत्करणं ही एक सहज नैसर्गीक प्रवृत्ती असते पण अर्ध आयुष्य उलटून गेल्यावर असा धोका कोणी पत्करला तर ते कोणालाही विचित्र वाटणं सहाजिकच होतं.
“कदाचित एखादा चमत्कार होईलही आणि तुम्ही एक मोठे चित्रकार म्हणून प्रसिद्ध व्हाल. पण असं होण्याची शक्यता किती आहे? फार तर लाखात एक. या वयात एवढी जोखीम पत्करून, एवढी यातायात करूनही तुम्हाला ते जमलं नाही तर ते स्विकारायला किती जड जाईल याचा तुम्ही विचार केला आहे का?””
“चित्रकला हेच माझं विधीलिखीत आहे.”
“समजा, तुम्ही मुळातच एक फालतू, सामान्य आणि तिसर्या दर्जाचे चित्रकार असाल तर त्यासाठी हातात आहे ते सगळं सोडून ही जोखीम घेणं कितपत योग्य होईल. सर्वोत्तम नसल्याने जीवनाच्या इतर कोणत्याही क्षेत्रात फारसा फरत पडत नाही. पोटापुरते पैसे मिळतात, वेळ निभावून जाते. पण कलेच्या क्षेत्रात फार फरक पडतो. तुम्हाला उत्कृष्टच असावंच लागतं नाहीतर कुत्रा हाल खात नाही. येथे दुय्यम दर्जाच्या कलाकारांची किमत शून्य असते.”
“मूर्ख माणसा, गप्प बसायला काय घेशील?
“जे सत्य आहे ते सांगणं हा मुर्खपणा कसा होऊ शकतो?”
“मी पुन्हा एकदा बजावून सांगतो, मला आयुष्यात चित्रकारच व्हायचं आहे. जेव्हा माणूस पाण्यात पडतो तेव्हा तो चांगला पोहतो की वाईट पोहतो हे महत्वाचं नसतं. त्याने पलीकडचा काठ कसंही करून गाठला पाहिजे नाहीतर तो बुडून मरेल.”
तो उत्कटतेने बोलत होता. मला त्याचा अत्यंत तिरस्कार वाटत होता, तरीही त्याच्या बोलण्याचा माझ्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहिला नाही. त्याच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा हिंस्रपणा जाणवत होता. कोणत्यातरी प्रभावी शक्तिने त्याच्यातील अभिव्यक्तिला दाबून ठेवलं असावं. मला नक्की काय ते कळत नव्हतं. तो झपाटल्यासारखा दिसत होता. त्याला झपाटणार्या पाशवी शक्तिने कोणत्याही क्षणी त्याला उध्वस्त केलं असतं. मी त्याच्याकडे टक लावून पहात होतो तरीही त्याची किंचीतही चलबिचल झाली नाही. जुनं पुराणं जॅकेट, धुळीने माखलेली बाउलर हॅट, ढगळ पँट, अस्वच्छ हात, अर्धवट वाढलेल्या दाढीचे खुंट अशा अवतारात त्याला त्या भिकारड्या कॅफेमध्ये बसलेलं कोणी पाहिलं असतं तर त्याला काय वाटलं असतं ते मला सांगता आलं नसतं. छोटे डोळे, लांब नाकावर स्वार झालेला उद्धटपणा, रुंद जिवणी, जाड ओठ. त्यावेळी तरी मला कलाकाराचं एकही लक्षण त्याच्या व्यक्तिमत्वात दिसलं नाही.
“तुमच्या पत्नीकडे परत जाण्याचा तुमचा विचार आहे की नाही?” मी शेवटचं विचारलं.
“कधीही नाही.”
“झालं गेलं सगळं विसरून पुन:श्च नव्याने सुरवात करायला ती तयार आहे. ती तुम्हाला एका शब्दानेही विचारणार नाही.”
“उडत गेली ती.”
“लोक तुमचा उल्लेख एक हलकट माणूस आहे असा करतील याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुमच्या बायको-मुलांवर दोन वेळच्या जेवणासाठी भीक मागण्याची पाळी आली तरी तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही?”
“काहीही वाटणार नाही.”
माझ्या पुढच्या वाक्याला जोर यावा म्हणून मी थोडा वेळ गप्प बसलो. शक्य तितक्या स्पष्टपणे एक एक शब्दावर जोर देत मी म्हणालो.
“तुम्ही एक जातीवंत दुष्ट, नीच आणि हलकट आहात.”

“तुमच्या मनात जे होतं ते एकदाचं बाहेर पडलं ना. चला आता जेवायला जाऊ या.”


GAUGUIN: "Avenue de Clichy, 1887, Paris, Source: Wiki image https://in.pinterest.com/pin/563231497125846752/?lp=true



 Ritual of Absinth pouring, Photograph, Source: Wikipedia

2 comments:

  1. आता पॅरिसची बारीक बारीक वर्णने सुरू झालीयेत.छानच चालू आहे सगळं ... 👌👍💐

    ReplyDelete
  2. Scene आवडला। character मस्त उभं राहिलंय

    ReplyDelete