Thursday, January 25, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १३

जेवणाचं आमंत्रण मी नाकारायला हवं होतं. कमीत कमी माझी चीड, माझा राग त्याला दाखवून द्यायला हवा होता. असल्या नीच आणि हलकट इसमाच्या बरोबर एकाच टेबलावर बसून जेवण घ्यायला मी नकार दिला एवढं जरी मी कर्नल मॅक-अँड्रयुना सांगू शकलो असतो तरी त्यांना माझा अभिमान वाटला असता. हातात घेतलेलं काम मी तडीला नेऊ शकणार नाही या भितीमुळे माझी नैतिक भूमिका नेहमीच डळमळीत होते. आणि या प्रकरणात तर भावनात्मक दबावाचा स्ट्रिकलँडवर काहीच परिणाम होणार नव्हता म्हणून मी जास्त काही बोलण्याच्या फंदात पडलो नाही. कातळावर लावलेल्या फुलझाडांना पाणी घालत राहिलं तर कधी ना कधी तरी त्यांना फुलं येतील अशी अपेक्षा फक्त संत महात्मे किंवा कवी लोकच करू शकतील.
मी घेतलेल्या दारूचे पैसे दिले आणि नंतर आम्ही एका स्वस्त पण मस्त रेस्तोराँमध्ये जेवण घेतले. तेथे खूप गर्दी आणि गोंगाट होता, पण मजा आली. मी तरूण असल्याने आणि त्याने सद्सद्विवेकबुद्धीवर पाणी सोडलेलं असल्याने आम्हा दोघांना चांगलीच भूक लागली होती. नंतर आम्ही कॉफी आणि लिक्युअर्सचा आस्वाद घेण्यासाठी एका तावेर्नामध्ये गेलो.
मी ज्या कामासाठी म्हणून पॅरीसला गेलो होतो त्या प्रकरणात सांगण्यासारखं जे होतं ते सगळं सांगून झालं आहे. माझी ज्या माणसाशी गाठ पडली होती तो इतका बेपर्वा होता की त्यामुळे या प्रकरणात आणखी पाठपुरावा करण्यात काही अर्थ नाही असं मी ठरवलं. मिसेस स्ट्रिकलँडशी थोडी प्रतारणा केल्यासारखं होईल खरं पण माझा नाईलाज होता. तीच गोष्ट तीन तीन वेळा त्याच उत्साहाने करण्यासाठी स्त्रियांची चिकाटी अंगी असावी लागते. या सगळ्या खटाटोपातून स्ट्रिकलँडच्या मनात काय खळबळ चालू आहे ते शोधून काढता आलं तर लेखक म्हणून माझा थोडा फार फायदा होईल अशी मी स्वत:ची समजूत काढली. किंबहूना माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीपेक्षा त्यातच मला जास्त रस वाटू लागला. पण हे सोपं नव्हतं. कारण स्ट्रिकलँड फारसा बोलत नसे. शब्दांच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करणं त्याला आवडत नसावं किंवा जमत नसावं. त्याचं मन जाणून घेण्यासाठी त्याच्या शिव्या, दोन शब्दांमधील स्तब्धता, त्याचे हावभाव, हातवारे याचा अर्थ लावावा लागला असता. त्याने आतापर्यंत फार महत्वाचं म्हणता येईल असं काहीही सांगितलं नव्हतं. तो फारसं बोलायचाही नाही. तरीही त्याच्यात काहीतरी असं होतं की त्यामुळे त्याला पुन्हा भेटावंसं वाटायचं. कदाचित त्याच्या मनातील तळमळ, त्याला चित्रकेलबद्दल त्याच्यात असलेली आंच हे कारण असू शकेल. तो आयुष्यात पॅरीसमध्ये पहिल्यांदाच येत होता तरीही त्याला त्या जगप्रसिद्ध शहराचं काहीच अप्रूप नव्हतं. यात तो हनीमूनला पॅरीसला आला होता ते मी धरलेलं नाही. पॅरीसमधील सुप्रसिद्ध स्थळं पहातानाही त्याला काही वाटत नसे. मी पॅरीसमध्ये शेकडो वेळा आलो असेन तरीही प्रत्येक वेळी मी थरारून जातो. साधं रस्त्यावरून चालतानासुद्धा काही तरी नवीन अनुभव घेत असल्यासारखा मी हुरळून जातो. स्ट्रिकलँड मात्र अगदी शांत असायचा. आता मागे वळून बघताना असं वाटतं की अंतर्मनातील स्वप्नांच्या जगात मश्गूल असल्यामुळे इतरांसारखं चर्मचक्षूंनी दिसणारं जग त्याला दिसतच नसावं.
दरम्यान एक विचीत्र घटना घडली. आम्ही एका तावेर्नात बसलो होतो. तेथे बरेच स्त्री-पुरूष येत असत, त्यात काही वेश्याही असत. काही टेबलांवर स्त्री-पुरूषांच्या जोड्या बसल्या होत्या तर काही जण एकटेच होते. एक एकटीच बसलेली बाई आमच्याकडे टक लावून बघत होती. स्ट्रिकलँडकडे लक्ष गेल्यावर ती त्याच्याकडे बघून हसली. त्याचं तिच्याकडे लक्ष आहे असं वाटत नव्हते. थोड्या वेळाने ती बाहेर गेली. परत येताना ती सरळ आमच्या टेबलाकडे आली आणि तिच्यासाठी एखादं ड्रिंक मागवण्याची तिने विनंती केली. मी ड्रिंक मागवलं. ती आमच्या टेबलवर बसली आणि मी तिच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. पण तिला स्ट्रिकलँडमध्ये रस होता हे थोड्याच वेळात स्पष्टपणे दिसून आलं. मी तिला सांगितलं की त्याला फ्रेंच येत नाही अगदी दोन शब्द बोलण्या इतपतही. तिने खाणाखुणांच्या भाषेत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिला जे दहा पंधरा इंग्लीश शब्द येत होते ते वापरून तिने त्याच्याशी मोडक्या-तोडक्या फ्रेंचमध्ये बोलायला सुरवात केली. असं मधे मधे एखाद दुसरा इंग्लीश शब्द पेरलेलं मोडकं-तोडकं फ्रेंच बोललं तर त्याला कळेल असा तिचा समज का झाला होता ते मला कळलं नाही. शेवटी तिला जे बोलायचं होतं त्याचं तिने मला इंग्लीशमध्ये भाषांतर करायला सांगितलं. त्याने उत्तर देताच मोठ्या उत्सुकतेने ती त्याचा अर्थ मला विचारत होती. त्याला त्या सगळ्याची गंमत वाटत होती. पण त्याला तिच्यात रस नसावा हेही त्याच्या बोलण्यातून कळत होतं.
“मला वाटतं तिला तुम्ही आवडता आहात.”
“मला त्याच्यात काही मोठेपणा वाटत नाही.”
त्याच्या जागी मी असतो तर मी अवघडून गेलो असतो आणि त्याच्या एवढा शांतपणे बसूही शकलो नसतो. तिचे डोळे हसरे होते, जिवणी सुरेख होती. ती तरूण होती. स्ट्रिकलँडमध्ये तिला एवढं काय दिसलं कोण जाणे. तिची इच्छा ती लपवत नव्हती. भाषांतर करून सांगणं माझं कर्तव्य होतं.
“ती म्हणतेय की मला तुमच्या घरी यायला आवडेल.”
“मी तिला कुठेही घेऊन जाणार नाही.”
त्याने दिलेल्या उत्तराचे शक्य तितक्या सरळ शब्दात भाषांतर करून मी तिला सांगितलं. अशा प्रकारच्या आमंत्रणाला उडवून लावणं मला प्रशस्त वाटलं नाही. त्याच्या नकारामागचे खिशात पैसे नाहीत हे एक कारण असावं.
“मला ते आवडले आहेत. मी त्यांच्या प्रेमात पडले आहे.”
मी याचं भाषांतर केलं तेव्हा स्ट्रिकलँडने घाई घाईने तोंड मुरडलं.
“तिला सांगा उडत जा म्हणून.”
त्याचं उत्तर त्याच्या अविर्भावावरुनच कळत होतं, भाषांतराची गरज नव्हती.
‘’मस्य, नी पा पोली.” मिस्टर सभ्यपणा तुम्हाला ठाऊक नाही असं दिसतंय. ती चिडून म्हणाली आणि ती तावेर्नामधून तरातरा चालत बाहेर गेली. मला या घटनेचा थोडा रागच आला.
“ती तुम्हाला एवढा मान देत असताना तिचा असा अपमान करण्याची गरज नव्हती.”
“अशा गोष्टींची मला किळस येते.” तो उद्धटपणे म्हणाला.
मी त्याच्याकडे मोठ्या कुतुहलाने पाहिलं. त्याच्या चेहर्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. पण त्याच्यात एक कामूक आकर्षण आहे हे लपून रहात नव्हतं. मला वाटतं त्याच्या राकट पुरूषी व्यक्तिमत्वाची तिच्यावर भुरळ पडली असावी.
“मला हवी असलेली कोणतीही स्त्री मला लंडनमध्ये मिळू शकत होती. मी सगळं पाठीमागे सोडून पॅरीसला आलो आहे तो त्यासाठी नाही.”

1 comment: