Friday, January 26, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १४

इंग्लंडला जाताना परतीच्या प्रवासात माझ्या मनात स्ट्रिकलँडचा विषय घोळत होता. त्याच्या पत्नीला काय सांगावं याचा विचार मी करत होतो. मी जे सांगेन त्याने तिचं समाधान होईल की नाही याची मला खात्री नव्हती. माझंही समाधान कुठे झालं होतं. स्ट्रिकलँडने मला कोड्यात टाकलं होतं. त्याचा उद्देश मला कळत नव्हता. आपण चित्रकार व्हावं असं त्याला का वाटतंय, असं मी त्याला विचारलं तेव्हा तो मला काहीच सांगू शकला नाही किंवा त्याला सांगायचं नसावं. त्याला आपण चित्रकार व्हावं असं वाटायला काय कारण असावं हे मीही शोधू शकलो नव्हतो. त्याच्या मनाच्या अंतर्भागात खोलवर काहीतरी खदखदत शिजत असावं. तरीही आपल्या संथ, एकमार्गी आयुष्याविषयी त्याने कुरकुर केलेली कधी कोणी ऐकली नव्हती. जर कंटाळवाणेपण असह्य होऊन त्याने चित्रकार व्हायचं ठरवलं असेल तर ते समजण्यासारखं होतं. बरेच जण आयुष्यात असं काहीतरी करतात. पण तो त्यातला नव्हता. ही कारणमीमांसा मी ओढून-ताणून शोधली होती. मी देखील स्वत: एक स्वप्नाळू असल्याने मला तरी ती योग्य वाटत होती. त्याच्यामध्ये मुळातच सृजनशील निर्मितीचे एखादे स्फुल्लींग धुमसत असावे. परीस्थितीच्या दडपणामुळे त्याच्यावर जमलेल्या राखेच्या थराखाली ते लपलं होतं तरी त्यातील अग्नी विझला नव्हता. कर्करोगाच्या पेशीप्रमाणे त्याचा कणाकणाने विस्तार होत राहिला. हळूहळू त्याने शरीरातील सर्व मांसपेशींना ग्रासून टाकलं. योग्य वेळ येताच रोगाने त्याच्या सार्या शरीराचा ताबा घेतला आणि त्याला कृती करण्यास भाग पाडलं. कोकिळा दुसर्या पक्ष्याच्या घरट्यात अंड घालते. अंड उबून कोकिळेचं पिल्लू बाहेर येताच ते इतर पिल्लांना घरट्यातून बाहेर ढकलून देतं. पूर्ण वाढ झाल्यावर ज्या घरट्याने त्याचं संगोपन केलं ते घरटं मोडून ते खुल्या आकाशात भरारी घेण्यासाठी पंख पसरून उडून जातं.
एका सामान्य, अरसिक शेअर ब्रोकरला निर्मीतीच्या स्फुल्लींगाने झपाटून टाकावं, त्याच्या आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याचा विचका करून टाकावा हे केवढं विलक्षण म्हटलं पाहिजे. एखादा गर्भश्रीमंत, सर्व सुखात लोळणारा पुरूष जेव्हा दैवी शक्तिने झपाटला जातो आणि आपल्या सर्व आप्तस्वकीयांचा आणि ऐहिक सुखांचा त्याग करून एखाद्या मठात जाऊन व्रतस्थ जीवन जगायचं ठरवतो ते काही यापेक्षा वेगळं नसतं. असा बदल निरनिराळ्या स्वरूपात  वेगवेगळ्या मार्गांनी होत असतो. काही जणांच्या बाबतीत एखाद्या पाणलोटाखाली प्रचंड शिळेचा चक्काचूर होऊन जावा तसा आकस्मित संकटासारखा येऊन कोसळतो, तर काही जणांच्या बाबतीत एखादा खडक वरून थेंब थेंब ठिबकणार्या पाण्याच्या धारेखाली झिजून जावा तसा तो अगदी हळू हळू होतो. स्ट्रिकलँडमध्ये एखाद्या धर्मवेड्याचे क्रौर्य आणि अनुयायाचा कडवेपणा यांचा मिलाफ झाला होता.
त्याच्या आयुष्याचे कितीही धिंडवडे निघोत मला रस होता तो त्याच्या विलक्षण प्रतिभेतून निर्माण होणार्या कलाकृतीत. तो लंडनमध्ये ज्या कलावर्गात शिकायला जात होता तेथील इतर विद्यार्थ्यांचे त्याच्याविषयी काय मत होते हे जेव्हा मी त्याला विचारलं होतं तेव्हा तो हसत हसत म्हणाला होता:
“त्यांना माझी चित्र म्हणजे एक विनोद वाटे.”
“येथे पॅरीसमध्ये आल्यावर तुम्ही स्टुडियोत जायला सुरवात केली आहे का?”
“होय. ब्लायटर आज सकाळी आला होता. तुम्हाला माहिती आहे ना तो. त्याने माझी पेंटींग पाहिली आणि भुवया उंचावून तो निघून गेला.”
स्ट्रिकलँड गालातल्या गालात हसला. तो मुळीच नाऊमेद झाला नव्हता. त्याच्याबद्दल इतरांचे मत काय आहे याची त्याला मुळीच पर्वा नव्हती.
त्याच्याशी वागताना त्याच्या याच स्वभावगुणामुळे मी अस्वस्थ होत असे. जेव्हा लोक म्हणतात की मी इतरांच्या मताची पर्वा करत नाही तेव्हा बर्याच वेळा ते स्वत:लाच फसवत असतात. खरं पहायला गेलं तर त्यांना आपल्या मनासारखं वागायचं असतं. आपल्या मनाचा कल काय आहे ते कोणाला कळू नये अशी त्यांची ईच्छा असते. ते जेव्हा बहुमताला किंमत देत नसतात तेव्हा आपल्याला काही मित्रांचा पाठिंबा आहे हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. जगाच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही अपारंपारिक असता तेव्हा अपारंपारिकता हीच तुमची पारंपारिकता होऊन जाते. अशा वेळी एखाद्याला फाजिल आत्मविश्वास असला तरी तो परवडू शकतो. धोका न पत्करताही धाडस केल्याचं समाधान मिळतं. सुसंकृत जगात सर्वांनाच आपल्याला मान्यतेचा शिक्कामोर्तब मिळावा अशी ईच्छा असते. अपारंपारिक वाट चोखाळल्यामुळे बर्याच जणांना टीका सहन करावी लागली आहे. पण हेच लोक मानसन्मान मिळण्याची शक्यता दिसताच ज्या तत्परतेने स्वत:ची तत्वे गुंडाळून ठेवतात तेवढी तत्परता दुसरं कोणी दाखवत नसेल. आपण दुसर्यांच्या मतांना एका पेनीचीही किंमत देत नाही असं जे म्हणतात त्यांच्यावर माझा विश्वास नाही. ही फुशारकी मूर्खपणाची आहे. जे टीकेला घाबरत नाही असं सांगतात त्यांना आपल्या चुका क्षुल्लक आहेत आणि त्या कोणाला सापडणार नाहीत याची खात्री असते.
पण हा माणूस दुसरे काय म्हणतात याला खरंच घाबरत नव्हता. त्यामुळेच सामान्यांचे नियम त्याला लागू पडत नव्हते. तो अंगाला तेल चोपडलेल्या मल्लासारखा होता. त्याची पकड करणं कठीण होतं. त्यामुळे तो काहीही करायला मोकळा होता, आणि मला चीड येत होती ती याचीच. पॅरीसमध्ये असताना मी त्याला हे बोलल्याचं मला आठवतंय:
“हे बघा, सर्वजण तुमच्यासारखं वागायला लागले तर जगरहाटी बंद पडेल.”
“हे विधान अगदी मुर्खपणाचं आहे. माझ्यासारखा चक्रमपणा करण्याच्या वाटेला दुसरं कोण जाणार आहे? बहुतेकजण आपापल्या वाटेला आलेलं आयुष्य कितीही सामान्य आणि फालतू असलं तरी विनातक्रार जगत असतात.”
पुन्हा एकदा मला उपहासाचा आधार घ्यावासा वाटला.
“माणसाने आपले वर्तन असे चोख ठेवले पाहिजे की जगरहाटीचे नियम त्याच्या आदर्शावरून ठेवले गेले पाहिजेत असं जे म्हटलं जातं ते तुम्हाला पटत असेल असं वाटत नाही.”
“मी हे यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. असो, पण हे अगदीच फालतू वाक्य आहे.”
“हे कांटचं वाक्य आहे.”
“कोणाचं का असेना. फालतू ते फालतूच आहे.”
अशा इसमाच्या माणूसकीला केलेल्या आव्हानातून काहीही निष्पन्न होणार नाही. मानवी समाजाच्या संरक्षणासाठी म्हणून काही नियम उत्क्रांत झाले आहेत. माणसाची सद्सद्विवेकबुद्धी या नियमांचं पालन करत असते. सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे आपण कोणत्याही नियमाचं उल्लंघन करत नाही हे पहाणारा आपल्या मनातील अदृश्य पोलीस. माणसाच्या अहंभावावर नजर ठेवणारा एक गुप्तहेर. आपण करीत असलेल्या कृतीला आपल्या सहकार्यांची मान्यता असावी यासाठी माणसाची आंच एवढी तीव्र असते, टीकेचं भय एवढं भयंकर असतं की त्याने सद्सद्विवेकबुद्धी नावाच्या काल्पनिक शत्रूची आपल्या मनात स्थापना केली आणि आता तो शत्रू त्याच्यावर बारीक नजर ठेऊन असतो. या शत्रूवर त्याच्या मालकाने एक काम सोपवलेलं असतं. कळपातून बाहेर जाण्याची इच्छा झालीच तर ती चिरडून टाकण्याचं काम. हे काम तो शत्रू डोळ्यात तेल घालून करत असतो. त्यामुळे समाजाच्या हितापुढे स्वत:च्या इच्छा-आकांक्षांच बलिदान करण्याची जबरदस्ती त्याच्यावर होते. या शृंखलेने व्यक्ति समाजाशी बांधली गेलेली असते. समाजाचं हित स्वत:च्या हितापेक्षा मोठं आहे अशी कल्पना करून दिल्याने माणूस समाजाचा गुलाम झाला आणि त्याने समाजाचा उत्कर्ष केला. ज्याप्रमाणे राजदरबारातील मानकर्याला आपल्या खांद्यावर लावलेल्या फितीचा अभिमान वाटतो त्याप्रमाणे माणसाला त्याच्या सद्सद्विवेकाचा अभिमान वाटू लागला. सद्सद्विवेकाचं वर्चस्व मान्य नसणार्यांवर कठोर टीका होऊ लागली. सद्सद्विवेकापुढे आपलं काही चालत नाही हे त्याला कळून चुकलं. स्ट्रिकलँडच्या वागण्यामुळे त्याला जी टोचणी लागायला पाहिजे होती त्याबद्दल त्याला अजिबात पर्वा वाटत नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला तो मानवरूपधारी मायावी राक्षसासारखा वाटू लागला आणि माझ्या अंगावर शहारे आले.
मी पॅरीसमधून निघताना त्याचा निरोप घेतला तेव्हा त्याचे शेवटचे शब्द असे होते:
“ऍमीला सांगा माझ्यापाठी येण्यात काही अर्थ नाही. मी माझं हॉटेल आता बदलणारच आहे तेव्हा तिला ते सापडायची शक्यता नाही.”
“मला वाटतं त्यांनी तुम्हाला केव्हाच बाद करून टाकलं आहे.”
“माझ्या मित्रा, तिनं तसच करायला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्याल याची मला आशा वाटते. पण बायकांकडे शहाणपण असतं तर त्या बायका कसल्या.”

1 comment: