Wednesday, January 24, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ११

पॅरीसच्या प्रवासात मी अंगावर घेतलेल्या कामगिरीविषयी माझ्या मनात नाही नाही त्या दुष्ट शंका येऊ लागल्या. आता दु:खाने पोळलेली मिसेस स्ट्रिकलँड माझ्यासमोर नव्हती. त्यामुळे मी या प्रकरणाचा शांतपणे विचार करू शकत होतो. तिच्या वागण्यातील विरोधाभासाने मी कोड्यात पडलो. ती स्वत: दु:खात चूर होती तरीही माझ्या सहानुभूतीला हात घालण्यासाठी स्वत:च्या दु:खाचे भांडवल करण्याइतपत भान तिला होतं. ती रडण्याची तयारी करूनच बसली होती आणि त्यासाठी लागणारे रुमाल तिने अगोदरच गोळा करून ठेवले होते. तिच्या दूरदृष्टीचं मला कौतुक वाटलं. त्यामुळे तिच्या अश्रूपाताचा माझ्यावर परिणाम फारसा झाला नाही. तिला तिचा नवरा परत यायला का हवा होता ते मला नीटसे पटले नाही. तिचं त्याच्यावर प्रेम होतं की तिला तिच्या मैत्रीणींच्या वळवळणार्या जिभांची जास्त भिती वाटत होती. तिचं प्रेम तिच्या नवर्याने एका पळाचाही विचार न करता लाथाडलं होतं. त्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला धक्का पोचला होता. नवरा सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा अपमानाचंच दु:ख अधिक असावं. मानवी स्वभाव केवढ्या विरोधाभासाने भरलेला असतो ते तेव्हा मला नीट कळलं नव्हतं. कळकळीतील नाटकीपणाचा भाग, मोठ्या व्यक्तितील क्षुद्रपणा आणि दुष्ट व्यक्तितील चांगुलपणा या सगळ्यातील संगती मला तेव्हा लागायची होती.
माझ्या पॅरीसच्या भेटीत साहसाचा भाग अधिक होता. पॅरीस आलं आणि माझ्या अंगात उत्साह संचारला. माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीतील नाट्यमय भाग मला दिसू लागला. एका मैत्रीणीने तिच्या पळून गेलेल्या नवर्याला परत आणण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकली होती. नवरा नांदायला परत आला तर त्याला मोठ्या मनाने माफ करायला ती तयार आहे असं आश्वासन तिने मला दिलं होतं. मी स्ट्रिकलँडला लगेच दुसर्या दिवशी संध्याकाळी भेटायला जायचं असं ठरवलं. भेटण्याची वेळ फार काळजीपूर्वक निवडायला हवी याची मला कल्पना होती. कोणाच्या भावनेला आव्हान करायचं असेल तर ते दुपारच्या जेवणापूर्वी केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. मी स्वत: प्रेमाला कितीही प्राधान्य देत असलो तरी चर्चेचा विषय जर वैवाहिक बाबींवरचा असेल तर अशी चर्चा दुपारच्या चहाच्या आधी करण्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही.
माझ्या हॉटेलवर मी चार्ल्स स्ट्रिकलँड रहात होता ते हॉटेल दी बेल्झ कुठे आहे याची चौकशी केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कन्सर्जने त्या हॉटेलचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं. मिसेस स्ट्रिकलँडने मला ते रू द रिव्होलीवरील एक प्रशस्त हॉटेल आहे असं सांगितलं होतं. आम्ही डिरेक्टरीमध्ये पाहिलं. त्या नावाचं एक हॉटेल रू द मॉईनमध्ये सापडलं. पॅरीसचा तो भाग अगदी दळीद्री आणि भिकार असा होता. मी डोक्याला हात लावला.
“हे हॉटेल नक्कीच नाही.”
कन्सर्जलासुद्धा जास्त माहिती नव्हती. पॅरीसमध्ये त्या नावाचं दुसरं हॉटेल नव्हतं. मला वाटलं की स्ट्रिकलँडने खोटा पत्ता दिला असावा. कदाचित आपल्या भागिदाराला खोटा पत्ता देऊन त्याला त्याची दिशाभूल करायची असेल. त्या पत्त्यावर विसंबून तो चिडलेला ब्रोकर मूर्खासारखा पॅरीसला आला असता तर एका आड गल्लीतील ते फालतू हॉटेल बघून त्याची फजिती झाली असती. दुसर्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता एक कॅब घेऊन मी रू द मॉईनला गेलो. कॅब गल्लीच्या कोपर्यावर सोडून दिली आणि पुढे चालत जायचं ठरवलं. गल्लीत दुतर्फा गरीब लोकांच्या दैनंदीन गरजा पुरवणारी लहान सहान दुकानं होती. गल्लीच्या मध्यावर डाव्या हाताला हॉटेल दी बेल्झ सापडलं. मी रहात होतो ते हॉटेल एक साधारणसंच होतं पण या हॉटेलच्या मानाने त्याला राजमहालच म्हणावं लागलं असतं. हे हॉटेल म्हणजे एक उंच घाणेरडी इमारत होती. सगळ्या खिडक्या बंद होत्या. गेल्या कित्येक वर्षात इमारतीला रंग लागला नसावा. हॉटेलची इमारत इतकी घाणेरडी होती की आसपासची गलीच्छ म्हणता येतील अशी घरंसुद्धा त्या हॉटेलच्या तुलनेत स्वच्छ आणि नीटनेटकी वाटावीत. ज्या कोणा सुंदरी करता चार्ल्स स्ट्रिकलँडला आपलं घरदार, व्यवसाय, कर्तव्य, इभ्रत या सगळ्यावर पाणी सोडावं असं वाटलं तिला घेऊन तो असल्या जागी एका गुन्हेगारासारखा लपून बसेल हे कसं शक्य आहे? त्याने आपल्याला मूर्ख बनवलं असेल या विचाराने माझा मनस्ताप झाला आणि मी अधिक चौकशी न करता तेथून परत फिरणार होतो. पण मिसेस स्ट्रिकलँडला मी प्रयत्नांची किती पराकाष्ठा केली ते दाखवायला माझ्याकडे सांगण्यासारखे काही तरी असावं म्हणून मी पुढे गेलो.
हॉटेलचा दरवाजा एका दुकानाच्या बाजूला होता. दरवाजा उघडा होता. आत गेल्यावर ब्युरो प्रीमिए (ऑफिस पहिल्या मजल्यावर) अशी पाटी होती. मी तो अरूंद जिना चढून वर गेलो. एका कोपर्यात काचेच्या मागे एक टेबल आणि दोन खुर्च्या मांडलेल्या होत्या. बाहेर एक बाकडं टाकलेलं होतं. मला वाटलं रात्रपाळीचा पोर्टर त्या बाकड्यावर आडवा होऊन कशीबशी रात्र काढत असला पाहिजे. तेथे कोणीही नव्हतं, पण एक घंटा ठेवलेली होती. त्या घंटे खाली लिहीलं होतं गारकाँ (बॉय). मी घंटा वाजवली आणि वेटर आला. त्याची नजर चोरटी आणि उदास होती. त्याने साधा शर्ट आणि सपाता घातल्या होत्या.
मी शक्य तितका सहजपणा दाखवत चौकशी केली.
“मस्य स्ट्रिकलँड येथे रहातात का?”
“सहाव्या मजल्यावर बत्तीस नंबर.”
मला इतकं आश्चर्य वाटलं की क्षणभर माझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही.
“ते आत आहेत का?”
वेटरने ब्युरोच्या भिंतीवर लावलेल्या फळीकडे एक दृष्टीक्षेप टाकला.
“त्यांनी चावी ठेवलेली दिसत नाही. तुम्ही वर जाऊन बघा.”
आणखी एक प्रश्न मला विचारावासा वाटला.
“मादाम एस्त ला?” (बाईसाहेबसुद्धा आहेत का?)
 “मस्य एस्त सेल्य.” (साहेब एकटेच आहेत.)
मी वर जात असताना वेटर माझ्याकडे संशयाने बघत होता. वर जाण्याचा जिना काळोखी आणि कोंदट होता. एक प्रकारचा उग्र घाणेरडा वास मारत होता. तिसर्या मजल्यावरून वर जाताना माझी चाहूल लागल्याने विस्कटलेल्या केसांच्या, चुरगळलेला ड्रेसिंग गाऊन घातलेल्या एका बाईने तिच्या खोलीचा दरवाजा उघडून मुरका मारत माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. शेवटी एकदाचा मी सहाव्या मजल्यावर जाऊन पोचलो आणि बत्तीस क्रमांकाची पाटी असलेला दरवाज्यावर ठोठावले. दरवाजा अर्धवट उघडा होता पण आतून आवाज येत नव्हता. चार्ल्स स्ट्रिकलँड माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मला पाहून तो एक शब्दही बोलला नाही. त्याने बहुधा मला ओळखलं नसावं.
मी माझं नाव सांगितलं. आवाजात शक्य तितका मोकळेपणा आणत मी बोललो.
“तुम्हाला आठवत नाहीसं दिसतंय. गेल्या जुलै महिन्यात आपल्या पंक्तिला भोजन करण्याचा बहुमान मला मिळाला होता.”
“आत या,” तो आनंदाने म्हणाला. “तुम्ही आलात ते एक बरं झालं.”
मी आत गेलो. ती एक अगदी छोटी खोली होती. खोलीत ज्याला फ्रेंच लोक लुई फिलीप म्हणतात त्या काळातलं जुनं पुराणं फर्नीचर एकाला एक खेटून कसतरी ठेवलेलं होतं. एक मोठा लाकडी पलंग, त्यावर पसरलेली बदकाच्या पिसांची जाडसर दुलई, एक वॉर्डरोब, एक गोल टेबल, उसवलेल्या गादीच्या दोन खुर्च्या. फर्नीचर म्हणून जे काही होतं ते अत्यंत जुनाट, मोडकळीला आलेलं आणि घाणेरडं होतं. कर्नल मॅक-अँड्रयुनी च्या ऐषोआरामी गोष्टींचा उल्लेख केला होता त्यांचा कुठे मागमूसही नव्हता. खुर्चीवर जे कपडे पडले होते ते स्ट्रिकलँडने उचलून एका कोपर्यात भिरकावून दिले आणि ती खुर्ची माझ्यापुढे केली.
“बोला, आपली काय सेवा करू.”
त्या छोट्याश्या खोलीत मला पूर्वी वाटलं होतं त्यापेक्षा तो जास्त धिप्पाड वाटला. त्याने एक जुनं नॉरफोकचं जॅकेट घातलं होतं. दाढी कित्येक दिवसात केलेली दिसत नव्हती. मागच्या खेपेला मी त्याला भेटलो होता तेव्हा त्याचा जो पोषाख मला गबाळा वाटला होता तो आजच्या मानाने बरा म्हणायची पाळी होती. तरीही तो त्यावेळेपेक्षा आज जास्त मोकळा आणि मजेत दिसत होता.
“मी तुमच्या पत्नीच्या वतीने तुम्हाला भेटायला आलो आहे.”
“जेवायच्या अगोदर एक ड्रिंक घ्यायला मी बाहेर जाणार होतो. तुम्हीसुद्धा माझ्या बरोबर आलात तर मला आवडेल. तुम्हाला ऍबसिंथ चालेल का?”
“मी पिऊ शकेन असं मला वाटतं.”
“चला तर मग.”
त्याने बाऊलर हॅट घातली. त्या हॅटला बर्याच काळात ब्रशचा स्पर्श झालेला दिसत नव्हता.
“आपण बरोबरच जेवायला जाऊ. तुम्ही मला एक जेवण देऊ लागता, आठवतंय ना?”
“आठवतंय ना. तुम्ही एकटेच आहात ना?”
तो महत्वाचा प्रश्न अगदी सहजगत्या विचारता आला म्हणून माझी मीच पाठ थोपटून घेतली.
“एकटाच आहे. गेले तीन दिवस मी कोणाशी एक शब्दही बोललो नाहीय. तसं माझं फ्रेंचही फार चांगलं आहे अशातला भाग नाही.
त्याच्या मागोमाग खाली जाताना मी कोड्यात पडलो होतो. त्या टी शॉपमधल्या सुंदरीचं काय झालं असावं. त्यांचं भांडण झालं की त्यांच्या प्रेमाचा पहिला झटका आता ओसरला. पण ज्याअर्थी पळून जाण्याच्या बेताची वर्षभर तयारी चालली होती त्याअर्थी असं काही होण्याची इतक्या लवकर शक्यता नव्हती. आम्ही ऍव्हेन्यू द क्लिशी पर्यंत चालत गेलो आणि एका कॅफेसमोरील पदपथावर मांडलेल्या टेबलावर जाऊन बसलो.

2 comments:

  1. खूपच बारकाव्यानिशी वर्णन केलंय.. एकूण रंगत वाढत चाललीये ... छान !

    ReplyDelete