Tuesday, January 30, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १९

मी पॅरीसला आल्याचं स्ट्रोव्हला कळवलं नव्हतं. त्याच्या स्टुडियोच्या दारावरची घंटा वाजवली तेव्हा दार उघडायला स्वत: डर्क स्ट्रोव्ह आला. एक क्षणभर त्याने मला ओळखलंच नाही. नंतर तो आनंदाश्चर्याने ओरडला आणि मला आत घेतलं. एवढ्या उत्साहात स्वागत झाल्याने मी थोडा खूश झालो. त्याची बायको शेगडीजवळ बसून पायमोज्याला रफू करत होती. मला बघून ती झटकन उठून उभी राहिली. त्याने तिची ओळख करून दिली.
“तुला आठवतं ना? मी ज्याच्याबद्दल नेहमी बोलायचो तो हा माझा मित्र.” नंतर माझ्याकडे वळून म्हणाला: “तू येणार आहेस ते मला का नाही कळवलंस.? इथे येऊन किती दिवस झाले? किती दिवस रहाणार आहेस? एक तासभर आधी आला असतास तर बरोबरच जेवलो असतो.”
त्याने माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याने मला खुर्चीवर बसवलं. मी टेकायचा तक्क्या असल्यासारखा माझ्या पाठीवर थपडा मारल्या. माझ्या पुढ्यात केक, सिगार आणि वाईन ठेवली. तो मला काही बोलूच देत नव्हता. त्याच्याकडे व्हिस्की नसल्याचं त्याला वाईट वाटत होतं. त्याला माझ्यासाठी कॉफी बनवायची होती. आणखी काय काय करता येईल या विचाराने त्याने डोकं खाजवलं. आनंदातिशयाने त्याचा चेहेरा खुलला आणि तो हसायला लागला. उत्साहाच्या भरात माझा पाहूणचार करण्यात त्याची एवढी तारांबळ झाली की त्याच्या रंध्रा रंध्रातून घामाच्या धारा वाहू लागल्या.
“तू जरा सुद्धा बदललेला नाहीस.” मी हसत हसत म्हणालो.
त्याचा एकूण अवतार पूर्वीसारखाच दिसत होता. तो जाडा आणि ठेंगू होता. तरूण होता. तिशीच्या आतला. पण अकाली टक्कल पडलेलं होतं. गोल चेहेरा, गोरापान रंग, गोबरे गाल आणि लालचुटूक ओठ. निळे टपोरे डोळे त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा. त्याच्या भुवया एवढ्या बारीक होत्या की त्या जवळ जवळ दिसतच नसत. त्याला बघून रूबेन्सच्या पोर्ट्रेट मधल्या जाड्या, गोलमटोल डच बनियांची आठवण व्हायची.
मी जेव्हा त्याला सांगितलं की माझा पॅरीसमध्ये थोड्या काळासाठी स्थयिक होण्याचा विचार आहे आणि त्यासाठी मी एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे तेव्हा मी त्याला माझा बेत अगोदरच का सांगितला नाही म्हणून तो माझ्यावर रागावला. त्याने मला याहून चांगलं घर बघून दिलं असतं, त्याचं फर्नीचर मला वापरायला दिलं असतं, मी फर्नीचर विकत घेण्याची गरज नव्हती, त्याने मला घर लावायला मदत केली असती वगैरे वगैरे. मी त्याला मला मदत करण्याची संधी दिली नाही हे काही खऱ्या मित्रत्वाचे लक्षण नव्हे म्हणून तो माझ्यावर लटकेच रागावला. इतका सगळा वेळ मिसेस स्ट्रोव्ह तिचं शिवण-टिपण करत बसली होती. त्याचं बोलणं ऐकताना ती गालातल्या गालात हसत होती.
“माझं लग्न झालंय पाहिलंस का. माझी बायको कशी आहे?”
तो तिच्याकडे पाहून हसला. त्याने चष्मा सावरून नीट नाकावर ठेवला. घामामुळे तो सारखा नाकाखाली घसरत होता.
“मी काय सांगणार तुझी बायको कशी आहे ती?” मी हसत हसत म्हणालो.
“डर्क. काही तरीच काय.” मिसेस स्ट्रोव्ह किंचीत लाजत हसली.
“आहे की नाही माझी बायको छान. माझ्या मित्रा माझं ऐक. वेळ फुकट घालवू नकोस. शक्य तितक्या लवकर लग्न करून घे. मी जगातील सर्वात सुखी मनुष्य असेन. ती तिथे कशी बसलीय बघ. एक छान पैकी चित्र काढता येईल. शेदाँ? मी जगातील सगळ्या सुंदर स्त्रियांना पाहिलं आहे. पण मादाम डर्क स्ट्रोव्हहून जास्त सुंदर एकही नाही.”
“तुम्ही जर गप्प बसला नाहीत तर मी निघून जाईन हं.”
“मों पेतीत शॉ.” माझी छकुली ती ... तो म्हणाला.
ती थोडीशी लाजली. त्याच्या आवाजातील आर्जवाने तिला अवघडल्यासारखं झालं होतं. त्याच्या पत्रातून तो त्याच्या बायकोच्या अतिशय प्रेमात आहे हे मला कळलं होतं. त्याची तिच्यावरची नजर हटत नव्हती. तिचं त्याच्यावर प्रेम होतं की नाही ते तिच्या नजरेत दिसत नव्हतं. या बिचाऱ्या पात्राच्या कोणी प्रेमात पडणं तसं कठीणच होतं. तिच्या हसऱ्या डोळ्यांवरून तरी ती प्रेमळ असावी असं वाटत होतं. पण ती अबोल असावी असं वाटत होतं. तिच्या अबोलपणाच्या आत खोल कुठेतरी तिच्या खऱ्या भावना लपल्या असण्याची शक्यता होती. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे त्याला ती अति सुंदर दिसत होती. पण त्याला वाटत होतं तेवढं तिचं सौंदर्य उन्मादक वगैरे काही म्हणता आलं नसतं. ती उंच होती. तिचा करड्या रंगाचा ड्रेस साधा असला तरी अंगासरशी बेतलेला असल्यामुळे तिचं सौष्ठव उठून दिसत होतं. तिची देहयष्टी शिंप्यापेक्षा शिल्पकाराला जास्त आवडली असती. नुकतेच विंचरून मोकळे सोडलेले गडद तपकीरी रंगाचे दाट केस, नितळ कांती, शांत करडे डोळे. ती नाकी डोळी नीटस असली तरी तिच्यात खास असं काही नव्हतं. रूढार्थाने तिला सुंदर खचितच म्हणता आलं नसतं. ती सुरेखही नव्हती. पण स्ट्रोव्हने शेदाँचा जो उल्लेख केला होता तो विनाकारण केला नसावा. तिच्यावरून मला शेदाँने एप्रन आणि हॅट घातलेल्या ज्या साध्या-सुध्या गृहीणींना आपल्या पेंटींगमधून अमर केलं आहे त्याची आठवण झाली. स्वयंपाक, भांडीकुंडी, कपडे धुणं, केर-वारा अशा दिवसभराच्या घरकामात ती ज्या गंभीरपणाने मग्न असायची त्यामुळे त्या घरकामाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं होतं. ती बुद्धीमान किंवा बहुश्रुत असावी असं दिसत नव्हतं. ती अबोल आणि गंभीर होती. त्याच्यामागे काही तरी रहस्य दडलेलं असावं असं मला सतत वाटत होतं. तिने डर्क स्ट्रोव्हशी लग्न केलं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटलं. ती मूळची इंग्लीश होती. पण तिच्याकडे पाहून ती नक्की कोणत्या सामाजिक स्तरातून आली असावी ते सांगता येत नव्हतं. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी, लग्नाआधी ती काय करत होती वगैरे गोष्टी मी मुद्दाम होऊन चौकशी केल्याशिवाय मला ठाऊक होणं शक्य नव्हतं. ती अगदी कमी बोलत होती. पण जेव्हा ती बोलत होती तेव्हा ती अगदी मंजूळ आवाजात बोलत होती. तिच्या बोलण्यात एक उपजत निरागसता होती.
मी स्ट्रोव्हला तो काय काम करतो ते विचारलं.
“नोकरी? छ्या. मी फक्त पेंटींग करतो. पूर्वी कधी केली नव्हती एवढ्या पेंटींगचं काम सध्या माझ्या हातात आहे.”
आम्ही त्याच्या स्टुडियोत बसलो होतो. त्याने इझलवर लावलेल्या एका पेंटींगकडे निर्देश करून मला ते बघायला सांगितलं. मी ते बारकाईने पाहू लागलो. त्यात रोमन चर्चच्या पायऱ्यांवर बसलेल्या इटालियन शेतकऱ्यांचं चित्रण केलं होतं. इटलीच्या कम्पाना प्रांतात ऐतिहासिक काळी जशी वेशभूषा प्रचलित होती तसे कपडे त्या शेतकऱ्यांनी घातलेले दाखवले होते. 
“तू सध्या याच्यावर काम करत आहेस?”
“रोमसारखी मॉडेल काय इथेही मिळतात. फक्त तशी वेशभूषा केली की झालं.”
“हे पेंटींग फारच छान जमलंय.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.
“माझ्या या अडाणी बायकोला वाटतं की मी एक मोठा चित्रकार आहे.”
तो ओशाळून हसला. तरीही त्याच्या हसण्यातून त्याला झालेला आनंद लपत नव्हता. त्याची नजर इझलवर लावलेल्या कॅनव्हासवर रेंगाळली. जो स्वत: इतका जाणकार होता, दुसऱ्यांच्या कामाबद्दल त्याचे मत सहसा चुकत नसे, अशा माणसाला स्वत:चं काम किती फालतू आणि टुकार दर्जाचे आहे ते कळू नये हे आश्चर्यकारक होतं.
“तुमची बाकीची पेंटींग दाखवा ना.” ती म्हणाली.
“दाखवू?”
त्याचे मित्र त्याची एवढी टिंगल करत तरीही त्याच्या पेंटींगची कोणी तारीफ केली तर ती ऐकायला तो उत्सुक असे. म्हणून तो आपली पेंटींग पाहुण्यांना दाखवण्याचा कधी आळस करत नसे. त्याने गोट्या खेळणाऱ्या, कुरळ्या केसांच्या, दोन लहान मुलांचं पेंटींग आणलं.
“किती गोड मुलं आहेत ना?”
नंतर त्याने मला आणखी पेंटींग दाखवली. पॅरीसमध्ये आल्यावरसुद्धा तो रोममध्ये वर्षानुवर्ष काढायचा तशीच जुन्या कालबाह्य शैलीतील, बेगडी, बटबटीत, कलाबूत लावल्यासारखी कलाकुसर असलेली पेंटींग काढायचं त्याने थांबवलं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. आजूबाजूच्या वास्तवाकडे डोळेझाक करून विकली जातात म्हणून फक्त रंजनप्रधान, कल्पनारम्य चित्र रंगवत बसणं हा तद्दन खोटेपणा होता. ही सगळी कलाकुसर वरवरची होती. पण तरीही डर्क स्ट्रोव्ह एवढा सज्जन आणि प्रामाणिक माणूस शोधून सापडला नसता. यातील विरोधाभासाचा उलगडा कसा करणार.
हे विचारावं असं मला कसं सुचलं ते सांगता येत नाही.
“चार्ल्स स्ट्रिकलँड नावाच्या चित्रकाराशी तुझी कधी गाठ पडली आहे का?”
“तो तुझ्या ओळखीचा आहे?” स्ट्रोव्ह ओरडला.
“तो एखाद्या हलकट जनावरासारखा आहे.” त्याची बायको म्हणाली.
स्ट्रोव्ह हसला.
“मा पुर्व्ह शेरी.” माय पुअर डार्लिंग. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. “तिला तो आवडत नाही. तू स्ट्रिकलँडला ओळखतोस. किती विचित्र योगायोग आहे हा.”
“मला असंस्कृत माणसं आवडत नाहीत.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.
डर्क हसत हसत माझ्याकडे वळला आणि त्याने खुलासा केला.
“त्याचं असं झालं. मी एके दिवशी त्याला माझी पेंटींग बघायला बोलावलं. तो आल्यावर त्याला मी माझ्याकडची सगळी पेंटींग दाखवली.” स्ट्रोव्ह क्षणभर घुटमळला. स्वत:च्या फजितीची गोष्ट त्याने मला सांगायला सुरवातच का केली ते मला कळलं नाही. एकदा सांगायला सुरवात केलेली गोष्ट पुढे सांगताना त्याला अवघडल्यासारखं झालं. “त्याने एक एक करून माझी सगळी पेंटींग पाहिली... त्याने एक शब्दही तोंडातून काढला नाही. मला वाटलं त्याने त्याचं मत सगळी पेंटींग बघून झाल्यावर शेवटी सांगण्यासाठी म्हणून राखून ठेवलं असावं. शेवटी मी म्हणालो ही एवढीच पेंटींग आहेत. त्यावर शांतपणे तो म्हणाला मी तुझ्याकडे वीस फ्रँक उधार मागायला आलो होतो.”
“आणि यांनी खरंच त्याला पैसे काढून दिले.” त्याची बायको संतापाने म्हणाली.
“मी एकदम उडालोच. मला नाही म्हणवेना. त्याने मी दिलेले पैसे खिशात घातले, मान डोलावली आणि आभार मानून सरळ निघून गेला.”
ही गोष्ट सांगणाऱ्या डर्क स्ट्रोव्हचा कोरा करकरीत, अचंबित, मूढ चेहेरा बघून हसू आवरणं कठीण होतं.
“त्याने माझ्या पेंटींगना भिकार आहेत असं म्हटलं असतं तरी मला त्याचं काही वाटलं नसतं. पण तो काहीच म्हणाला नाही. त्याने त्याचं कोणतेच मत व्यक्त केलं नाही. एका शब्दानेही.”
“आणि तरी तुम्ही ही गोष्ट सांगत बसला आहात.” त्याची बायको म्हणाली.
स्ट्रिकलँड स्ट्रोव्हशी ज्या अपमानास्पद रीतीने वागला त्याची चीड येण्याऐवजी स्ट्रोव्हच्या फजितीचं हसू मला अधिक येत होतं हे अधिक शोचनीय होतं.
“त्या माणसाचं तोंडसुद्धा मी पुन्हा बघणार नाही.”
स्ट्रोव्ह मान डोलवत हसला. त्याची विनोदबुद्धी परत आली होती.
“पण तो एक मोठा चित्रकार आहे. फार मोठा आहे हे सत्य काही बदलणार नाही.”
“स्ट्रिकलँड?” मी ओरडलो. “मी जो स्ट्रिकलँड म्हणतोय तो हा असणं शक्यच नाही.”
“तांबूस दाढी. थोडा आडव्या अंगाचा. इंग्लीशमन.”
“मी जेव्हा पाच वर्षांपूर्वी त्याला पाहिलं होतं तेव्हा त्याला दाढी नव्हती. पण त्याने दाढी राखली तर ती तांबूस रंगाची असू शकेल. मी ज्याच्या विषयी तुला विचारत होतो तो पेंटींग करायला लागलेल्याला फार तर पाच एक वर्ष झाली असतील.”
“तोच तो. फार मोठा चित्रकार आहे तो.”
“अशक्य.”
“माझी पारख कधी चुकली आहे का?” डर्कने मला विचारलं. “तो एक विलक्षण प्रतिभेचा चित्रकार आहे. माझी खात्री आहे. आजपासून शंभर वर्षांनी आपल्या दोघांच नाव घेतलं गेलंच तर ते आपण चार्ल्स स्ट्रिकलँडला ओळखत होतो म्हणून घेतलं जाईल.”
मी थक्क झालो. त्याच वेळी मी उत्तेजितही झालो होतो. मला त्याच्याबरोबरचं माझं बोलणं आठवलं.
“त्याचं काम आपल्याला बघायला मिळेल का?” मी विचारलं. “त्याला काही यश मिळालं, त्याचं नाव झालं का? तो कुठे रहातो?”
“यश म्हणशील तर त्याला अजून ते मिळालेलं नाही. त्याचं एकही पेंटींग अजून विकलं गेलं नसावं. त्याच्याबद्दल कोणाशी बोललं तर लोक हसतात. पण तो फार मोठा कलाकार आहे याची मला खात्री आहे. हेच लोक एकेकाळी मॅनेलासुद्धा हसायचे. कोरॉचं तर शेवटपर्यंत एकही पेंटींग विकलं गेलं नव्हतं. तो कुठे रहातो ते मला माहित नाही. पण त्याला भेटायचं असेल तर ते आपल्याला शक्य आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास तो ऍव्हेन्यु द क्लिशीवरच्या एका कॅफेमध्ये असतो. जर तुला वेळ असेल तर आपण उद्या जाऊ.”
“मला भेटायला त्याला आवडेल की नाही ते सांगता येत नाही. तो एक गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची आठवण त्याला करून द्यायचा माझा विचार आहे. ते काहीही असो. मी येईन. त्याची पेंटींग बघायला मिळण्याची काही शक्यता आहे का?”
“त्याच्याकडची पेंटींग बघायला मिळण्याची शक्यता विचारशील तर बहुधा नाहीच. पण माझ्या माहितीचा एक छोटा चित्रविक्रेता आहे. त्याच्याकडे त्याची दोन तीन पेंटींग बघायला मिळतील. पण तू माझ्या शिवाय एकटा जाऊ नकोस. तुला कळणार नाहीत. मी स्वत: तुला दाखवीन.”
“डर्क. तुम्ही माझ्या सहनशक्तीचा अंत बघत आहात.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली. “ज्याने तुमचा एवढा अपमान केला त्याच्या पेंटींगची एवढी तोंड फाटेस्तोवर स्तुती तुम्ही करताच कशी?” ती माझ्याकडे वळून म्हणाली. “तुम्हाला माहित आहे? काही डच माणसं आमच्याकडे यांची पेंटींग घ्यायला आली होती. तेव्हा यांनी त्यांना स्ट्रिकलँडची पेंटींग घ्यायचा आग्रह केला. ते त्याची पेंटींग दाखवायला स्वत: होऊन त्यांना घेऊन गेले होते.”
“त्याची पेंटींग तुम्हाला कशी वाटतात?” मी हसत हसत विचारलं.
“भयंकर.”
“लाडके. तुला त्यातलं काही कळत नाही.”
“तरी एक बरं झालं. तुमची ती डच माणसंच भडकली. त्यांना वाटलं तुम्ही त्यांची मस्करी करत आहात.”
डर्क स्ट्रोव्हने त्याचा चष्मा काढून पुसला. त्याच्या चेहेऱ्यावरून उत्साह उतू जात होता.
“सौंदर्य ही जगातील एक अमूल्य गोष्ट आहे. ती वाटेत जाता येता सहज मिळेल अशी रस्त्यावर पडलेली सापडेल असं लोकांना का वाटतं? कलाकार त्याच्या आजूबाजूला पडलेल्या पसाऱ्यातून सौंदर्याची निर्मिती मोठ्या जाणीवपूर्वक करत असतो. त्याच्यासाठी त्याला खूप कष्ट पडतात. त्याच्या हातून जी निर्मिती होते त्याचं आकलन करणं हे येरा गबाळ्याचं काम नसतं. कलेची समज येण्यासाठी कलाकार ज्या निर्मिती प्रक्रियेतून गेला असेल त्या प्रक्रियेतून रसिकाला तावूनसुलाखून जावं लागतं. कलाकाराने संगीताची एक सुरावट तुमच्यासमोर सादर केलेली असते. तुमच्यापाशी जर तरल कल्पनाशक्ति आणि संवेदनशीलता नसेल तर ती ऐकू येणं कठीण आहे.”
“तुमची पेंटींग मला कां आवडतात? अगदी पहिल्याप्रथम पाहिली तेव्हापासून मला ती आवडत आहेत.” मिसेस स्ट्रोव्ह म्हणाली.

“लाडके, तू आता झोपायला जा. मी याला जरा सोडून येतो.”


Artist: Jean-Baptiste Chadrin
Title: Maid, Date: circa 1791
Medium: oil on canvas,

Source: Wikipadia

3 comments:

  1. यातला चित्रकलेविषयीचा दोघांचा संवाद आजही कला विद्यार्थ्यांनी मनन करावा असा आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या ओळखीच्या इतर ग्रुपवर शेअर करा. मी चिन्हवर शेअर करतो.

      Delete
    2. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा हासुद्धा माझ्या लेखन प्रपंचाचा एक उद्देश आहेच. मूळ उद्देश चित्रकलेविषटी लोकांमध्ये जाण निर्माण व्हावी. मुलँ रूजमध्ये सुद्धा हेच लक्ष ठेवले होते. उद्देश महान असला तरी माझी कुवत मर्यादित आहे याची मला जाणीव आहे. तरीही शक्य जमेल तेवढा प्रयत्न करून पहातो आहे. प्रयत्नात मला आनंद मिळतो तसाच वाचकांनाही मिळावा.

      Delete