Saturday, January 27, 2018

मून अँड सिक्सपेन्स – १५

मी लंडनला जाऊन पोचतो न पोचतो तोच एक तातडीची सूचना माझी वाट पहात होती. मिसेस स्ट्रिकलँडने जेवण झाल्यावर ताबडतोब मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. तिच्याकडे कर्नल मॅक-अँड्रयु आपल्या पत्नीला घेऊन आला होता. मिसेस स्ट्रिकलँडची बहीण तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी होती, दिसायला साधारणत: तिच्यासारखीच पण थोडीशी निस्तेज, चेहेर्यावर सगळं ब्रिटीश साम्राज्य आपल्या खिशात आहे असा आविर्भाव. बहुतेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बायकांना आपण आकाशातून पडलो आहोत असं वाटत असते. तिच्या शिष्टाचारांवरून आणि बोलण्यातील ढंगावरून तिचे उच्चकुलीन संस्कार आणि सैनिकी पेशावरचं प्रेम लपून रहात नव्हतं. पण तिने घातलेला गाऊन किंमती असला तरी याप्रसंगी तो गबाळ्यासारखा वाटत होता.
मिसेस स्ट्रिकलँड अस्वस्थ दिसत होती.
“तुम्ही काय बातमी आणली आहेत ती मला पहिल्यांदा सांगा.”
“मी तुमच्या पतीराजांना भेटलो. मला वाटतं परत यायचं नाही हा त्यांचा निर्धार पक्का आहे.” मी थोडं थांबून पुढे बोललो. “त्यांची चित्रकार होण्याची इच्छा आहे.”
“तुम्हाला काय म्हणायचंय?” मिसेस स्ट्रिकलँड आश्चर्याने किंचाळली. तिचा विश्वास बसत नव्हता.
“त्यांना अशा गोष्टीत रस आहे याची तुम्हाला पूर्वी कल्पना नव्हती का?”
“तो वेडपट असल्याशिवाय असं म्हणणार नाही.” कर्नल ओरडला.
मिसेस स्ट्रिकलँडच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती काही तरी आठवण्याचा प्रयत्न करत होती.
“आता मला आठवतंय. आमच्या लग्नाच्यापूर्वी ते रंगपेटी घेऊन काहीतरी करायचे. पण ती रिकामपणाची कामगिरी म्हणतात ना तसलं काही तरी होतं. कसेतरी रंग फासलेले असायचे. त्यावरून आम्ही त्यांच्या खूप फिरक्या घ्यायचो. कला वगैरे असल्या गोष्टीत त्यांना मुळीच गती नव्हती.”
“मला चित्रकार व्हायचंय म्हणे. काही तरी सांगायचं म्हणून त्यांनी ठोकून दिलं असेल.”
मिसेस स्ट्रिकलँड बराच वेळ विचार करत होती. मी तिला जे सांगितलं ते तिच्या मनाला पटत नव्हतं. तिच्यावर कोसळलेल्या आपत्तीनंतर मी पहिल्यांदा तिच्या घरी गेलो तेव्हा घरात जो अस्ताव्यस्तपणा दिसत होता तो जाऊन सगळ्या वस्तू जागच्या जागी लावलेल्या होत्या. तिच्यातील गृहिणीने तिच्या दु:खावर मात केलेली दिसत होती. मी स्ट्रिकलँडला पॅरीसमध्ये नुकताच भेटलो होतो. तिथे तो कोणत्या परीस्थितीत रहात होता त्याची कल्पना येथे लंडनमधल्या त्याच्या घरी बसून येणं शक्य नव्हतं. तसेच त्याच्या व्यक्तिमत्वातील, स्वभावातील परस्परविरोधही येथे बसून लक्षात आले नसते.
“त्यांना जर चित्रकारच व्हायचं होतं तर तसं त्यांनी आम्हाला कधीच का सांगितलं नाही?” मिसेस स्ट्रिकलँडने विचारलं. “तशा प्रकारची महत्वाकांक्षा असती तर मी तरी त्याला विरोध केला नसता.”
मिसेस अँड्रयुने तिचे ओठ घट्ट आवळून धरले होते. मला वाटतं तिला तिच्या बहिणीचा कलाकारांकडे बघण्याचा सहानुभूतीचा दृष्टीकोन आवडत नसावा. तिच्या मते कलाकार असणं हा चेष्टेचा विषय असतो.
मिसेस स्ट्रिकलँड पुढे म्हणाली:
“जर यांना चित्रकलेत थोडी जरी गती असती तर मीच त्यांना उत्तेजन दिलं नसतं का? त्यासाठी काहीही त्याग करायला माझी तयारी होती. शेअर ब्रोकरची पत्नी म्हणवून घेण्यापेक्षा एका चित्रकाराची पत्नी म्हणवून घ्यायला मला जास्त अभिमान वाटला असता. जर मुलांची जबाबदारी नसती तर कोणत्याही तडजोडी करायला माझी हरकत नसती. या फ्लॅटमध्ये मी जेवढी सुखी आहे तेवढ्याच सुखात मी चेल्सीमधल्या एखाद्या लहानशा स्टुडियोत राहून संसार केला असता.”
“बहिणाबाई, तुझ्या इतका संयम माझ्याकडे नाही,” मिसेस अँड्रयु म्हणाली. “म्हणे मला चित्रकार व्हायचंय. या सगळ्या थापांवर तुझा विश्वास बसलाय की काय.?”
“मला वाटतं की ते सगळं खरं असावं,” मी पुटपुटलो.
मी एखादा विनोद केला असावा अशा नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं.
“कोणताही पुरूष एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याशिवाय वयाच्या चाळीसाव्या वर्षी नोकरी, धंदा, घरदार, बायको, मुलं यांना सोडून चित्रकार व्हायला जाणार नाही. मला वाटतं तुझ्या एखाद्या कलाकार मैत्रीणीने त्याच्या डोक्यात काहीतरी भरवून दिलं असेल आणि झाले असतील हे घोड्यावर स्वार.”
मिसेस स्ट्रिकलँडचे गाल मत्सराग्नीने लाल झाले होते.
“ती दिसायला कशी आहे?”
मी क्षणभर थांबलो. मला माहित होतं की मी जे सांगणार होतो त्याने बॉम्बगोळा फुटणार होता.
“त्यांच्या बरोबर कोणतीही स्त्री होती असं मला तरी आढळलं नाही.”
मी जे सांगितलं त्याच्यावर मॅक अँड्रयु पति-पत्नीचा मुळीच विश्वास बसला नाही. मिसेस स्ट्रिकलँड उठून उभी राहिली.
“तुम्हाला असं म्हणायचंय का की ती बया तुम्हाला त्यांच्या बरोबर दिसली नाही.”
“तेथे कोणीही नव्हतं. ते एकटेच रहातात.”
“माझा यावर विश्वास बसत नाही.” मिसेस मॅक-अँड्रयु जवळपास ओरडल्याच.
“मला स्वत:लाच जायला हवं होतं. मी पैजेवर सांगतो. मी असतो तर तिला पाताळातूनही शोधून काढलं असतं.” कर्नल म्हणाला.
“तुम्हीच गेला असता तर फार बरं झालं असतं.” मी त्याला झोंबावं म्हणून बोललो. “तुमची सगळी गृहीतकं चुकलेली आहेत. ते कोणत्याही महागड्या हॉटेलात रहात नसून ते दरिद्री वस्तीतीतल एका लहानशा हॉटेलमध्ये अगदी भिकार्ड्यासारखे रहात आहेत. ते पॅरीसला जाऊन मौज मजा करत आहेत असं वाटत नाही. बहुधा त्यांच्या जवळ फारसे पैसेसुद्धा नसावेत.”
“यामागे आपल्याला माहित नाही असं एखादं कारण असेल असं तुम्हाला वाटतं का? उदाहरणार्थ पोलिसांचा ससेमिरा चुकवायला तर ते पॅरीसला जाऊन लपले नसतील?”
या कल्पनेने सगळ्यांच्या मनात एक आशेचा किरण लुकलुकला. पण मी त्यात नव्हतो.
“पण तसं असतं तर त्यांनी त्यांच्या भागीदाराला आपला पत्ता दिला नसता.” मी कडवटपणे म्हणालो. “ते काहीही असलं तरी मला एका गोष्टीची खात्री आहे ती म्हणजे ते कोणाचाही हात धरून पळून गेलेले नाहीत. तसेच ते कोणाच्याही प्रेमात पडले नसावेत. त्यांच्या बोलण्यावरून तरी तसं जाणवत नव्हतं.”
माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधी सर्वजण थोडा वेळ थांबले.
“तुम्ही म्हणता ते खरं असेल तर मला वाटत होतं तेवढं हे प्रकरण सुधारण्याच्या पलीकडे गेलं आहे असं काही म्हणता येणार नाही.” मिसेस अँड्रयु म्हणाली.
मिसेस स्ट्रिकलँडने आपल्या बहिणीकडे पाहिलं पण ती काहीच बोलली नाही. ती पांढरी फटक पडली होती. डोळ्यांखाली काळी वर्तूळ आली होती. तिच्या चेहर्यावरचे भाव मला वाचता आले नाहीत. मिसेस अँड्रयु पुढे म्हणाली:
“काही नाही, त्यांना फक्त एक झटका आला असेल. एक ना एक दिवस येईल डोकं ताळ्यावर.”
“ऍमी तू स्वत:च का जात नाहीस.” कर्नलने सुचना केली. पॅरीसमध्ये तुला एखादं वर्ष रहायला काय हरकत आहे. मुलांचा सांभाळ आम्ही करू. तो कंटाळेल आणि आज ना उद्या लंडनला यायला तयार होईल. तुझ्या पॅरीसला जाण्याने फारसं काही नुकसान होणार नाही झाला तर फायदाच होईल.”
“तसं करणं बरोबर होणार नाही.” मिसेस अँड्रयु म्हणाली. “त्यांना हवं ते सगळं मनासारखं करूं दे. एक दिवस ते स्वत:च कंटाळतील. मग बघा कसे कुत्र्यासारखे कुल्ल्यात शेपटी घालून झक्कत घरी परत येतील ते.” तिने तिच्या बहिणीकडे थंड नजरेने पाहिलं. “संसार करताना तू फारशी हुशारी दाखवली नाहीस. सगळे पुरूष मूर्ख असतात. फक्त त्यांना कसं हाताळायचं ते ठाऊक असलं की झालं.”
मिसेस अँड्रयुने सर्व स्त्री जातीचं लाडकं मत मांडलं. पुरूष आपल्या प्रिय स्त्रीला सोडून जाताना नेहमीच रानटीपणाने वागतात. पण या बाबतीत दोष द्यायचा तर तो स्त्रियांनाच द्यावा लागेल. प्रेमाला काही कारण नसतं हेच कारण प्रेमामागे असतं.
मिसेस स्ट्रिकलँडने एक एक कडून सगळ्यांकडे पाहिलं.
“ते कधीच परत येणार नाहीत.”
“आता आपण काय ऐकलं ते नीट लक्षात घे. त्यांना इथल्या आरामशीर जीवनाची सवय झाली आहे. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी विनासायास मिळत होत्या, सभोवती काळजी घेणारी माणसं उभी होती. त्या तसल्या दळीद्री हॉटेलमध्ये ते किती दिवस काढतील? शिवाय त्यांच्याकडे पैसेही नाहीत. त्यांना परत यावेच लागेल.” मिसेस अँड्रयु.
“ते जर एखाद्या बाईबरोबर गेले असते तर ते परत येण्याची शक्यता होती. दोन नाही तर तीन महिन्यात ते तिला कंटाळतील. पण जर ते प्रेमात पडल्यामुळे गेले नसतील तर काही खरं नाही.” मिसेस स्ट्रिकलँड.
“अरे बापरे. हा खूपच गुंतागुंतीचा मामला दिसतोय.” कर्नल म्हणाला. ज्या गोष्टी सैनिकीपेशाशी संबंधित नसतील त्या गोष्टींबाबत त्याची नावड त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. “डोरोथीने सांगितलेलं तुला पटत नाही का? ती म्हणाल्याप्रमाणे तो एक ना एक दिवस परत येईल. तो जे काही करतोय त्याच्या कृत्यांचा घडा भरल्याशिवाय रहाणार नाही.”
“पण मला ते परत यायला नको आहेत.”
“ऍमी!”
मिसेस स्ट्रिकलँडच्या संतापाचा उद्रेक झाला. तिचा चेहेरा पांढरा फटक पडला. भराभर बोलल्याने तिला श्वास लागला होता.
“ते जर कोणा स्त्रीच्या प्रेमात पडून असते आणि तिचा हात धरून पळून गेले असते तर एक वेळ मी त्यांना माफ केलं असतं. संसाराच्या अर्ध्यावर पुरूषांचं दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडून भरकटणं स्वाभाविक आहे असं मी समजले असते. त्यासाठी मी त्यांना फारसा दोषही लावला नसता. म्हटलं असतं की नवरा थोडा भरकटत गेलाय. पुरूष या बाबतीत अगदी दुबळे असतात. उलट स्त्रिया मात्र पक्कया बनेल असतात. हा स्त्री आणि पुरूषातील महत्वाचा फरक असतो. पण हे प्रकरण वेगळंच दिसतंय आणि त्याचीच मला प्रचंड चीड येतेय. आता मात्र मी त्यांना कधीही माफ करायचं नाही असं ठरवलंय.”
कर्नल आणि त्याची पत्नी तिची समजूत घालत होते. तिच्या बोलण्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिची मनस्थिती ठीक नसावी अशी त्यांना शंका आली. काय बोलावं त्यांना काही समजेना.
“मी काय म्हणतेय ते तुम्हाला कळतंय ना?” मिसेस स्ट्रिकलँड स्फुंदत स्फुंदत मला म्हणाली.
“सांगता येणं कठीण आहे. नवरा एखाद्या स्त्रीच्या मागे लागला तर एक वेळ पत्करलं पण तो एखाद्या ध्येयाच्या वगैरे नादी लागला तर बघायला नको. बाईची भानगड परवडते, तिच्या झिंज्या तरी उपटता येतात पण या ध्येय वगैरे भानगडींचं आपण काय वाकडं करू शकतो असंच ना?”
मिसेस स्ट्रिकलँडने ज्या नजरेने माझ्याकडे बघत होती ती मैत्रीची होती असं म्हणता येणार नाही. पण तिने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. कदाचित मी तिच्या वर्मावर बोट ठेवलं असावं. ती खालच्या आवाजात थरथरत बोलत होती.
“त्यांचा मला प्रचंड तिटकारा वाटतोय. आयुष्यात कोणाचाही एवढा तिरस्कार करण्याचा प्रसंग माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. तुम्हाला माहित नसेल, हे प्रकरण कितीही लांबत गेलं तरीही शेवटी त्यांच्या हृदयात मीच असेन असं वाटून इतके दिवस मी माझं समाधान करून घेत होते. मला वाटायचं आयुष्याची अखेर जवळ आल्यावर जरी त्यांना माझी आठवण झाली तरी मी त्यांच्याकडे एका पायावर गेले असते. एखाद्या आईने करावा तसा मी त्यांचा सांभाळ केला आहे. काहीही झालं तरी माझं त्यांच्यावरचं प्रेम कायम आहे आणि शेवटपर्यंत ते तसंच राहील हे मी त्यांना पत्रात लिहून कळवलं होतं. मी त्यांना मनाने कधीच माफ केलं होतं.”
आपली प्रिय व्यक्ति मृत्युशैयेवर शेवटचा श्वास घेत असताना स्त्रियांना चांगलं वागण्याचं नेहमीच भरतं येतं. अशा वेळी माझी थोडी फसगत होते. आयुष्याची दोरी थोडी लांबल्यामुळे अशी संधी जर हुकली तर त्यांना चुकल्यासारखं वाटेल.
“पण आता सगळं संपल्यात जमा आहे. माझ्या लेखी ते आता एखाद्या परक्या इसमासारखे आहेत. निष्कांचन अवस्थेत, उपाशी पोटी तडफडून, एकाकी अवस्थेत, एखाद्या महाभयंकर रोगाने सडून त्यांना मरण आलं तर किती बरं होईल असं आता मला वाटायला लागलंय.”
यावर स्ट्रिकलँडने जे सुचवलं होतं ते तिला सांगणं योग्य होईल असं मला वाटलं.
“जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला त्यांची हरकत नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व करायला ते तयार आहेत.”
“मी त्यांना का म्हणून मोकळं सोडू?”
“त्यांना स्वत: होऊन घटस्फोट हवा आहे असं नाही. उलट घटस्फोट घेणं तुम्हाला सोईस्कर असेल असं त्यांना वाटतंय.”
मिसेस स्ट्रिकलँडने मान डोलावली. माझ्या बोलण्याने तिची थोडी निराशाच झाली असावी. त्याकाळी मला माणसं बाहेरून दिसतात तशीच वागतात असं वाटायचं. एरवी सुंदर आणि आनंदी दिसणारी स्त्री सूडभावनेने पेटून उठलेली पाहून माझी निराशा झाली. क्षुद्रता आणि उदात्तता, दुस्वास आणि औदार्य, दुष्टावा आणि प्रेम हे गुण एकाच व्यक्तित एकाच वेळी वास करून असतात हे कळायला मला इतकी वर्ष लागली.
मिसेस स्ट्रिकलँडचा अपमानाने झालेला मनक्षोभ शांत करण्यासाठी काही तरी प्रयत्न करून बघावा असं मला वाटलं.
“हे बघा. तुमच्या पतिराजांना कोणत्यातरी अज्ञात अशा बाह्य शक्तिने झपाटलं आहे. ते त्यांचे राहिलेले नाहीत. ती शक्ति तिचे उद्देश पूर्ण करून घेण्यासाठी त्यांचा वापर करून घेत आहे. ते जे काही करत आहेत त्यासाठी त्यांना जबाबदार धरणं कितपत योग्य ठरेल याची मला शंका आहे. त्या झपाटलेपणाने त्यांची अवस्था कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखी झाली आहे. कोणीतरी त्यांना भारलेलं आहे. या बाबतीत काही विचीत्र गोष्टी माझ्या वाचनात आलेल्या आहेत. त्यात एक व्यक्तिमत्व दुसर्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरातील मुळच्या व्यक्तिमत्वाला हाकलून लावतं. त्या शरीरातील आत्म्याची घुसमट होते. पूर्वीच्या काळी असा प्रकार झाला असता तर चार्ल्स स्ट्रिकलँडना सैतानाने झपाटलं आहे असं म्हटलं गेलं असतं.”
मिसेस अँड्रयुने तिच्या गाऊनच्या चुण्या झटकून सारख्या केल्या. तसं करताना तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घरंगळून तिच्या मनगटावर आल्या.
“हे खूपच ताणल्यासारखं वाटतंय,” ती फणकार्याने म्हणाली. “ऍमी नवर्याला फारच गृहीत धरून चालत होती. तिने आपल्यापाठी एवढे उपद्व्याप लावून घेतले नसते तर तिला थोडा तरी संशय आलाच असता. आता ऍलेकच्या मनात वर्षभर काहीतरी खदखदत आहे आणि मला त्याची साधी कुणकुणसुद्धा लागली नाही असं कधी तरी होऊ शकेल का?”
कर्नल शून्यात नजर लावून बसला होता आणि मी तो वरून दिसतो तेवढा खरंच भोळा असेल का याचा विचार करत होतो.
“तुम्ही काहीही म्हणा, त्याने चार्ल्स एक हृदयशून्य पशू आहेत हे सत्य बदलत नाही.” मिसेस अँड्रयु माझ्याकडे रोखून पहात होती. “ते आपल्या बायकोला सोडून का गेले ते मी सांगते तुम्हाला. स्वत:चा शुद्ध स्वार्थ. दुसरं काही नाही.”
“असा खुलासा करणं अगदीच सोपं आहे.” मी म्हणालो खरा, पण मला वाटतं याने कसलाही खुलासा होत नव्हता. नुकताच प्रवासातून आल्याने मी खूप थकलो होतो. मी जाण्यासाठी उठलो. मिसेस स्ट्रिकलँडने मला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

1 comment:

  1. मानवी भाव भावनांचा खेळ ...

    ReplyDelete