Saturday, January 13, 2018

मून अँड सिक्सपेन्स - १


चार्ल्स स्ट्रिकलँडला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा पुढे भविष्यकाळात तो केवढा मोठा प्रसिद्ध माणूस होणार आहे याची यत्किंचीतही चुणूक मला त्याच्यात दिसली नव्हती, ही गोष्ट इथे मी कबूल करतो. पण आज बघायला गेलं तर त्याच्या मोठेपणाबद्दल कोणाचेही फारसे दुमत होणार नाही. एखादा राजकीय पुढारी किंवा पराक्रमी सेनानी जेव्हा वरच्या पदाला जाऊन पोचतो आणि त्याला लोक मोठा समजू लागतात तेव्हा त्यात बर्याच वेळा त्याच्या कर्तुत्वापेक्षा तो ज्या पदावर बसला आहे त्या पदाचा भाग जास्त असतो. नशीबाचे फासे कसे पडतात त्यावर सर्व काही अवलंबून असतं. पंतप्रधानसुद्धा एकदा आपल्या पदावरून पायउतार झाला की त्याची भाषणबाजी पोकळ वटवटीसारखी वाटू लागते. आणि सैन्याशिवाय सेनापती म्हणजे एखाद्या गल्लीतील दादासारखा. पण चार्ल्स स्ट्रिकलँडचं मोठेपण अगदी वेगळ्या प्रकारचं म्हणावं लागेल. तो एक मनस्वी आणि कलंदर पण अलौकिक प्रतिभेचं दैवी देणं लाभलेला चित्रकार होता. माणूस म्हणून भला विक्षिप्त असेल पण कलाकार म्हणून पहाल त्याची शैली स्वतंत्र अगदी शंभर ट्क्के अस्सल होती. त्याची चित्रं, पेंटींग कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत पण एक एक अव्वल दर्जाची चित्रकला म्हणून त्यांचा विचार केल्या शिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याच्या कलाकृती आपलं लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात. एके काळी स्ट्रिकलँड आणि त्याच्या कलाकृती चेष्टेचा विषय व्हायच्या, आणि त्याची चित्रं त्याच्या सारखीच विकृत आहेत अशी टीका व्हायची. कोणी त्याची बाजू घेउन जरा त्याच्या विषयी बरं बोललं तर त्या बाजू घेणार्याचं डोकं फिरलंय असं म्हटलं जाईल. कोणी त्याच्या चित्रांविषयी थोडी जरी सहानभूती दाखवली तरी तो त्या चित्रांच्या कर्त्यासारखाच विकृत असला पाहिजे असं समजलं जाई. पण तु काळ आता मागे पडला आहे. आता स्ट्रिकलँडच्या दोषांकडे त्याच्या गुणवत्तेचा एक अपरिहार्य भाग म्हणून बघितलं जातं. कलाविश्वात त्याचे स्थान कोणते यावर समिक्षकांमध्ये चर्चा होते. त्याच्या कलेचे मुल्यमापन करताना समीक्षकांनी केलेली प्रशंसा त्याच्यावरील टीकेपेक्षा जास्त अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी त्याला अलौकिक प्रतिभेचं देणं मिळालं होतं यावर कोणाचं दुमत होणार नाही. माझ्या मते एखाद्या कलाकृतीपेक्षा ती निर्माण करणार्या कलाकाराचं व्यक्तिमत्व हे जास्त महत्वाचं असतं आणि जर असं व्यक्तिमत्व जर एकमेकाद्वितीय असेल तर त्याला हजार गुन्हे माफ करायला हरकत नसते. सर्वसाधारणपणे वेलास्केजला एल ग्रेकोपेक्षा मोठा चित्रकार समजलं जातं. पण मला मात्र एल ग्रेकोच जास्त आवडतो. कारण एल ग्रेको मायकेल अँजेलोच्या सावलीतून जाणीवपूर्वक बाहेर आला आणि त्याने आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केली. चित्रकार, शिल्पकार, कवी आणि संगीतकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपल्याला एक उत्कट अनुभूती देत असतात. ती अनुभूती एक प्रकारे लैंगिक अनुभूतीसारखी असते. त्यातील सृजन आणि विध्वंसक शक्ति सकट. कलाकार आपल्या प्रतिभेतून केलेली निर्मिती रसिकांसमोर ठेवतो. त्या कलाकृतीच्या निर्मितीमागील कारणमीमांसा जाणून घेणे एखाद्या गुप्तहेर कथेतील रहस्याची उकल करण्याएवढे उत्कंठावर्धक असू शकते. पण बर्याच वेळा त्यामागील सर्व कारणं आपल्याला अज्ञात रहातात. चार्ल्स स्ट्रिकलँडच्या एखाद्या नगण्य चित्रातूनसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वातील विक्षिप्तपणा, त्याचा सल, त्याच्या वेदना आपल्याला थोड्यातरी दिसून येतील. त्यामुळेच त्याची चित्र ज्यांना आवडत नाहीत त्यांनासुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. या वैशिष्ट्यामुळेच बर्याच जणांना त्याची जीवनकहाणी, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचा कलाप्रवास यात त्यांना रस वाटू लागतो.
मॉरीस ह्युरेने स्ट्रिकलँडच्या मृत्यु पश्चात चार एक वर्षांनी मर्क्युर द फ्रान्समध्ये लिहीलेल्या एका लेखामुळे तो पर्यंत विस्मृतीत गेलेल्या या चित्रकाराकडे लोकांचं लक्ष गेलं. एवढेच नव्हे तर त्याच्यावर काही ना काही लिहीण्याची एक प्रकारे रीघच लागली. फ्रान्समध्ये बर्याच वर्षांनी अहमिकेने लिहायला लोकांना एक नवा विषय मिळाला होता. मॉरीस ह्युरेच्या लेखत थोडी फार अतिशोयक्ती असली तरी त्याची छाप पडल्या वाचून रहात नव्हती. पण जस जसे अधिक पुरावे मिळू लागले, अधिक सखोल आणि चौफेर समिक्षा होऊ लागली तशी त्याच्या दाव्याला पुष्टी मिळत गेली. त्यामुळे दिवसें दिवस चार्ल्स स्ट्रिकलँडची ख्याती जगभर पसरत गेली. त्याची किर्ती ज्या वेगाने वाढत गेली तो कलेच्या इतिहासातील एक अद्भूत अध्याय म्हणता येईल. तो चित्रकार म्हणून केवढा थोर आहे ते सिद्ध करण्याच्या फंदात मी पडणार नाही. मी त्याच्या कलाप्रवासाविषयी सांगणार आहे. सर्वसामान्य लोकांना कलेतील काहीच कळत नाही. चित्रांचं प्रदर्शन पहायला आलेल्यांनी गप्प बसणं हाच त्यांचा शहाणपणा. चित्र आवडलं तर सरळ पैसे मोजून विकत घ्यावं नाही तर तोंड फिरवून तेथून काढता पाय घ्यावा पण कोणत्याही परीस्थितीत आपलं तोंड उघडू नये. आपल्या चित्रांबद्दल इतरांना काय वाटतं याला कस्पटा एवढीसुद्धा किंमत न देणार्या आढ्याताखोर चित्रकारांशी मी सहमत आहे अशातला भाग नाही. कलेचे आकलन कलाकारांशिवाय दुसर्या कोणालाही जास्त चांगल्या रीतीने करता येणं शक्य नाही हा कलाकारांचा प्रचलित पूर्वग्रह म्हणजे एक मोठा गैरसमज आहे. कलेचा आविष्कार हा भावनांच्या उद्रेकातून होत असतो आणि कलाकृतीत जर भावना उतरल्या असतील तर त्या लपून रहात नाहीत. त्या सर्वांपर्यंत पोचतात. ज्या समीक्षकांना कलेच्या तांत्रीक अंगांची नीट माहिती नसते त्यांच्या मताला फारशी किंमत कोणी देत नाही याची मला कल्पना आहे. माझे चित्रकलेचे ज्ञान तसे यथातथाच आहे. त्यामुळे त्याच्या कलेची समीक्षा करण्याच्या फंदात मी पडणार नाही. माझ्या सुदैवाने या राखिव प्रांतात मुशाफिरी करण्याच्या धाडसाची जोखिम अंगावर घेण्याची मला गरज पडली नाही. कारण माझे एक दुसरे जाणकार लेखक मित्र मि.एडगर लेगॅट यांनी चार्ल्स स्ट्रिकलँडवर एक छोटीशी पुस्तिका लिहून माझं काम सोपं केलं. लेगॅट स्वत: एक बर्यापैकी चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारच्या शैलीदार लिखाणाची परंपरा इंग्लंडच्या मानाने फ्रान्समध्ये चांगली जोपासलेली आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.
लोकांना कलाकारांच्या खाजगी आयुष्यात खूप रस असतो. लोकांचं कुतुहल किंचीत भागेल इतपतच स्ट्रिकलँडचं खाजगी आयुष्य मॉरीस ह्युरेने आपल्या लेखात आणलं आहे. त्याला चित्रकलेत एक कला म्हणून रस होता. स्ट्रिकलँडच्या कलेकडे एक कलाप्रकार म्हणून तटस्थपणे पहाण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. एखादी नवनिर्मिती त्याच्या बघण्यात आली तर त्याच्याकडे जाणकार रसिकांचं लक्ष वेधून घ्यायला त्याला आवडतं. तो पत्रकार म्हणून चांगला असला तरी मानवी स्वभावाचं त्याचं ज्ञान तोकडे असल्याने स्ट्रिकलँडवरचा त्याचा लेख जेवढा प्रभावी व्हायला हवा होता तेवढा प्रभावी झाला नाही. पण त्याच्या लेखाचा एक चांगला म्हणता येईल असा एक परीणाम मात्र झाला. तो परीणाम म्हणजे स्ट्रिकलँडला ओळखणारे लंडन मधील काही लेखक, मोंमार्त्रमधल्या कॅफेमध्ये नेहमी पडीक असणारी स्वत:ला महान समजणारी चित्रकार मंडळींना आपण इतके दिवस ज्याला एक भुक्कड भणंग चित्रकार समजत होतो तो किती प्रतिभावान होता हे समजून आश्चर्याचा धक्का बसला. अशा लोकांनी फ्रान्स आणि अमेरीकेतल्या नियतकालीकांत एका मागून एक असे लेख लिहिण्याचा सपाटा लावला. त्यातले काही लेख त्याची बेफाट स्तुती करणारे होते तर काहीत त्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यामुळे एकाच वेळी स्ट्रिकलँडच्या किर्ती आणि अपकिर्तीत सारखीच भर पडली आणि त्यामुळे वाचकांचे कुतुहल शमण्याऐवजी वाढलेच.
एखाद्या गोष्टी भोवती अद्भूततेचं वलय निर्माण करण्यात लोक वस्ताद असतात. कथित आणि कल्पित अशा प्रत्येक घटनेत विस्मय आणि रहस्य यांचे असे काही मिश्रण होते की मग त्यातून एक दंतकथा तयार होऊ लागते. कालांतराने लोकांचा त्यावर ठाम विश्वास बसतो. कंटाळवाण्या जीवनक्रमात विरंगुळा म्हणून मारलेल्या गावगप्पांतून हळू हळू एका आख्यायिकेचा जन्म होतो. एकदा आख्यायिका तयार झाली की तिचा नायक अमर झालाच म्हणून समजा. एक थोर तत्ववेत्ता गमतीने म्हणायचा, की इंग्लंडचा राष्ट्रध्वज अमेरीकेत फडकवण्यात सर वॉल्टर रॅले यांचा कितीही मोठा हात असला तरी आज त्यांच्या अमेरीकेतील प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीपेक्षा त्यांनी व्हर्जिन मेरीला वस्त्रे अर्पण केली ही किरकोळ घटनाच लोकांच्या जास्त लक्षात राहिली आहे. तसा चार्ल्स स्ट्रिकलँड कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर रहात असे. आपल्या आयुष्यात त्याने मित्रांपेक्षा शत्रूच जास्त निर्माण केले. त्यामुळे ज्यांनी स्ट्रिकलँडवर लिहीले त्यांनी त्याच्या विषयीच्या ऐकीव कथांना आपल्या पदरच तिखट मीठ लावून त्यात भर घातली यात नवल ते काय. या असल्या सांगोपांगी गोष्टींमुळे चटकदार लेखनाला आयतीच सामुग्री मिळाली असावी. ते काही असले तरी त्याचे आयुष्य अगदी विलक्षण होते हे मात्र निर्विवाद सत्य. तो एवढा पराकोटीचा माणूसाघाणा होता की त्याची पुढे जी काही दुर्दशा झाली, जे भयंकर भोग त्याच्या वाटेला आले त्याबद्दल कोणालाही सहानभुती वाटणं शक्य नव्हतं. हळू हळू त्याच्या आख्यायिकेवर शहाण्यासुरत्या माणसांचाही विश्वास बसू लागला आणि मग त्या आख्यायिका इतिहासात समाविष्ट झाल्या.
त्याचे सुपुत्र रेव्ह.रॉबर्ट स्ट्रिकलँड यांनी आपल्या वडिलांबद्दल पसरलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून एक त्यांचे एक छोटेखानी चरित्र लिहीले. कारण त्या गैरसमजामुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बाधा येत होती. त्या चरित्रात त्यांनी ते गैरसमज दूर करण्याचा त्यांच्यापरीने चांगला प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रतिष्ठीत कुटुंबाची कुचंबणा होईल अशा अनेक गोष्टी चार्ल्स स्ट्रिकलँडविषयी प्रचलित होत्या. मी ते पुस्तक मोठ्या चिकाटीने वाचले. अशा अर्थाने की ते अगदी रटाळ आणि कंटाळवाणे होते. रेव्ह. स्ट्रिकलँडनी आपल्या वडिलांचे चित्र एक आदर्श पती, आदर्श पिता, कुटुंबवत्सल आणि कर्तव्यतत्पर सद्गृहस्थ वगैरे वगैरे असे खूप तपशीलात जाऊन रंगविले होते. पाद्र्यांना एखाद्या अडचणीत आणणार्या गोष्टीचा खुलासा करायचा झाला तर तो लोकांना खरा वाटावा यासाठी कसा अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करावा याचं शिक्षण देत असावेत की काय याची मला हल्ली शंका यायला लागली आहे. या पाद्रीबाबांनी आपल्या पिताश्रींची जीवन कहाणी आदर्शवत भासावी अशी रंगवली खरी पण त्यांना पित्याच्या आयुष्यातील काही गैरसोईच्या घटनांचा सोईस्कर विसर पडला होता. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांची लवकरच आर्चबिशपच्या जागेवर बढती होण्याचा संभव आहे असं मला वाटतं. स्ट्रिकलँड एक आदर्श पिता वाटण्यासाठी त्याच्या चरित्रात थोडे फार फेरफार करण्याचा प्रयत्न तो चरित्रनायक आपला पिताच असल्याने एक वेळ स्तुत्य मानता येईल पण त्यात एक मोठा धोका संभवतो. कारण कित्येकांना चार्ल्स स्ट्रिकलँड हा माणूस म्हणून अजिबात आवडत नसे इतका की त्यांना त्याची घृणा येई. पण त्याचा जो करूण व भीषण शेवट झाला त्यामुळे त्यांना त्याची दयाही येई. तिरस्कार व सहानभूती या दोन पराकोटीच्या भावनांमुळे बर्याच जणांचे त्याच्या चित्रांकडे लक्ष गेले हेही तितकेट खरे आहे. मुलाने फेरफार करून पुनर्मांडणी केलेल्या पित्याच्या चरित्रामुळे चार्ल्स स्ट्रिकलँडच्या चहाते अस्वस्थ झाले. हे चरित्र प्रसिद्ध झाल्या झाल्या बर्याच चर्चा व वादविवाद झाले. परिणामी पाठोपाठ झालेल्या सॉदबीच्या लिलावात स्ट्रिकलँडच्या ‘वुमन ऑफ ताहिती’ या  ऑईल पेंटींगला अवघे २३५ पौंड मिळाले. फक्त नऊ महिन्यापूर्वी झालेल्या याच पेंटींगच्या लिलावात एका प्रख्यात संग्राहकाने विक्रमी बोली लावली होती. जगावेगळ्या गोष्टींचे लोकांना एक आकर्षण असतं. स्ट्रिकलँड चरित्राच्या या सुधारित आवृत्तीत त्याला चाकोरीतून जाणार्या एखाद्या सर्वसामान्य संसारी स्थासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चाकोरीबाह्य, मुलखावेगळं असं काही नव्हतं. कदाचित त्यामुळे संग्राहक, खरेदीदार वगैरे मंडळींची निराशा झाली असावी. स्ट्रिकलँडची शैली कितीही स्वतंत्र आणि वेगळी वाट शोधणारी असली तरीही लोकांच्या निराशेची रसिकांच्या गैरसमजाचे निराकरण झाले.
मानवी स्वभाव कल्पना करता येणार नाही इतका विचीत्र असतो असे मानणार्यांपैकी डॉ.वेब्रेख्ट हे एक आहेत. काही इतिहासकारांना इतिहासातील थोर व्यक्तिंना सर्वसामान्या संसारी जनांचे घरेलू सद्गुण उगाच चिकटवण्यात एक प्रकारचं विकृत समाधान मिळत असावं असं माझं मत आहे. अशाने वाचकांचे थोडे बहुत रंजन होते, पण प्रबोधन मात्र डॉ.वेब्रेख्ट सारख्या रोखठोक माणसांच्या लिखाणानेच होत असते. ऐतिहासिक दृष्ट्या तपासायला गेलं तर अँटनी आणि क्लिओपात्रा यांचे एकमेकांशी संबंध होते एवढेच सिद्ध होऊ शकेल. ते प्रेमसंबंध होते हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आजमितीला तरी मिळू शकलेले नाहीत म्हणून ते संबंध फक्त आर्थिक व्यवहारापुरतेच होते असं मानायला मलासुद्धा आवडणार नाही. पाद्रीबाबांनी सुधारीत चरित्रात आपल्या वडिलांचे एक सरळमार्गी आणि कुटुंबवत्सल गृहस्थ असे जे चित्र रंगवले होते त्याचा समाचार डॉ.वेब्रेख्टनी आपल्या लेखात असा काही घेतला आहे की त्या बिचार्या पाद्रीबाबांची कोणालाही किंव यावी. पाद्रीबाबांचा मितभाषीपणा ही एक मुद्दाम पांघरलेली झूल आहे, त्यांनी जेथे पाल्हाळ लावला होता तेथे त्यांना काहीतरी लपवायचे होते आणि त्यांनी ज्या बाबतीत मौन बाळगले आहे त्याल तर बदमाशी शिवाय दुसरं काही नाव देता येणार नाही. मुलाने आपल्या वडिलांच्या बाबतीत काही खोटेपणा केला तर ते एक वेळ चालू शकेल पण हाच खोटेपणा लेखकाला मात्र अक्षम्यच असतो. नाही तरी आपले अँग्लो-सॅक्सन लोक ढोंगीपणा, लबाडी, धूर्तपणा आणि बेचव स्वयंपाक याबद्दल प्रसिद्धच आहेत. पाद्रीबाबांच्या माता-पित्यांचे संबंध मुळीच चांगले नव्हते. तरीही ते चांगले होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांनी पॅरीसमधून लिहीलेल्या एक पत्राचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी ‘माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे’ असं लिहीलं होतं. ही त्यांची मोठी घोडचूकच ठरली. कारण डॉ.वेब्रेख्टना ते मूळ पत्र सापडलं आणि त्यांनी त्या पत्राचे मुद्राचित्रच वृत्तपत्रात प्रसिद्ध केलं. आपल्या मित्राला लिहीलेल्या त्या पत्रात स्ट्रिकलँडने आपल्या पत्नीचा उल्लेख करून असं लिहीलं होतं ‘कोण म्हणतं माझी पत्नी एक चांगली गृहीणी आहे. देवा का बरं असली बाई माझ्या वाट्याला दिलीस. तिचं तळपट होवो.’ चर्चची जेव्हा चलती होती त्या काळात त्यांनी आपल्याला गैरसोईच्या वाटणार्या पुराव्यांची अशीच वासलात लावली असेल.

डॉ.वेब्रेख्टना चार्ल्स स्ट्रिकलँड चित्रकार म्हणून अतिशय प्रिय होता. त्यांची निरीक्षणशक्ति अतिशय विलक्षण होती. एखादी चुकीची गोष्ट मग ती कितीही साळसूदपणे केलेली असो त्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नसे. ते स्वत: एक मनोविकार तज्ञ होते शिवाय चित्रकलेचे अभ्यासक. त्यांच्या सुक्ष्म दृष्टीला वर वर साध्या गोष्टीत लपलेला गूढ अर्थ दिसायचा आणि त्यांच्यातील मानोविकार तज्ञ लगेच त्याचे शब्दांकन करायचा. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी ज्या कठोरतेने मीमांसा केली आहे ते पहाण्यासारखं आहे. ज्या प्रसंगातून चार्ल्स स्ट्रिकलँडचा दुष्टपणा अथवा त्याची क्षुद्रवृत्ती दिसत असेल तो प्रसंग वर्णन करायला चित्रकारावरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना मनापासून जरी आवडत नसले तरी ते एक लेखक म्हणून असेलेले आपले कर्तव्य पार पाडायला चुकले नाहीत. पाद्रीबाबांनी पितृप्रेमापोटी केलेल्या चलाख्या जेव्हा त्यांना पुराव्यासकट सापडल्या तेव्हा ते त्यांच्यावर केवढ्या त्वेषाने तुटून पडले ते पहाणं मोठं गमतीचं होतं. अगदी क्षुल्लक गोष्ट सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती, मग ते चार्ल्स स्ट्रिकलँडचं एखादं लाँड्रीचं बिल असो की त्याने उधार घेतलेला एखादा क्राऊन असो.


Title: Two women of Tahiti, Artist: Paul Gauguin, Year 1891
Medium: oil on canvas, Dimensions: 69 cm × 91 cm (27.2 in × 35.8 in)
Location - Musée d'Orsay, Paris, Source: Wikimedia 

1 comment:

  1. सहजसुंदर अनुवाद . स्ट्रिक लँड विषयी भरपूर उत्सुकता जागवण्याच काम पहिल्या प्रकरणांना चांगलं साधलं आहे . मस्तच

    ReplyDelete