Friday, February 9, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४०

पुढचा महिनाभर मी माझ्या उद्योगात मग्न होतो. त्याकाळात त्या दु:खद प्रकरणाशी संबंधीत कोणीही मला भेटलं नाही आणि त्यामुळे मला त्यात डोकं घालावं लागलं नाही. पण एके दिवशी भटकत असताना अचानक मला चार्लस् स्ट्रिकलँड दिसला. त्याला बघितल्यावर जी भयंकर घटना मी विसरू पाहत होतो त्याची मला आठवण झाली आणि त्या घटनेला तो कारणीभूत असल्याने एक तिडीक माझ्या मस्तकात गेली. त्याला टाळून पुढे जाणं पोरकट वाटलं असतं म्हणून ओळखीचं स्मित करून मी पुढे सटकलो. पण पाठीमागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला.
‘‘फार घाईत दिसतोस.’’ त्याने नम्रपणे विचारलं.
त्याला भेटायला जो तयार नसे त्याच्याशी तो अत्यंत अदबीने वागे हे त्याचं एक वैशिष्ट होतं. मी ज्या थंडपणे त्याला प्रतिसाद दिला त्यावरून मी त्याला भेटू इच्छित नाही हे त्याला कळलं असावं.
‘‘मी खरंच घाईत आहे.’’ मी थोडक्यात कटवण्याचा प्रयत्न केला.
‘‘मी तुझ्या बरोबर चालत येतो.’’
‘‘कां?’’ मी विचारलं?
‘‘तुझ्या सहवासात मला बरं वाटतं म्हणून.’’
मी उत्तर दिलं नाही. तो माझ्या बाजूने शांतपणे चालत होता. आम्ही दोन फर्लांग तरी तसे चालत असू. मला तो सगळा प्रकार हास्यास्पद वाटू लागला. वाटेत एक स्टेशनरीचं दुकान लागलं आणि मी वर्तमानपत्र विकत घ्यायचा विचार केला. त्या निमित्ताने त्याला फुटवण्यासाठी एक कारणही मिळालं असतं.
‘‘मला इकडे एक काम आहे. गुड बाय.’’
‘‘मी तुझी वाट पाहिन.’’
मी खांदे उडवले आणि दुकानात गेलो. त्या दुकानात मिळणारं फ्रेंच वृत्तपत्र काही चांगलं नव्हतं. मला नको असलेल्या गोष्टीसाठी उगाच खर्च करायला मला आवडलं नाही त्यामुळे माझा उद्देश सफल झाला नाही. तिथे जी गोष्ट मिळणार नाही याची मला खात्री होती ते मी मागितलं आणि एका मिनिटात मी बाहेर आलो.
‘‘तुला हवं होतं ते मिळालं का?’’
‘‘नाही.’’
आम्ही बराच वेळ न बोलता चालत होतो. शेवटी आम्ही जेथून अनेक रस्ते फुटत होते अशा एका नाक्यावर आलो.
‘‘तुला कुठे जायचं आहे?’’
‘‘तू जाशील तिथे.’’
‘‘मी घरी चाललो आहे.’’
‘‘मी तुझ्या घरी येईन आणि पाईप ओढत बसेन.’’
‘‘त्यासाठी मी बोलवेपर्यंत तुला वाट बघावी लागेल.’’ मी थंडपणे उत्तर दिलं.
‘‘आमंत्रण मिळण्याची शक्यता असती तर मी थांबलोही असतो.’’
‘‘तुला तुझ्या समोरची ती भिंत दिसत आहे का?’’ मी बोट दाखवत म्हणालो.
‘‘दिसत आहे.’’
‘‘तसं असेल तर मला वाटतं की तुला बोलवायची मला इच्छा नाही हे ही तुला समजायला हरकत नसावी.’’
‘‘मला तशी शंका आली होती.’’
मला हसल्यावाचून राहवलं नाही. जो मला हसवतो त्याचा मी दुस्वास करू शकत नाही हा माझा एक दुबळेपणा आहे. तरीही मी ओढून धरलं.
‘‘तू अगदी हलकट आणि नीच आहेस. तुझ्यासारख्या जंगली जनावराशी माझी गाठ पडली हे माझं मोठं दुर्दैव. जो तुझा एवढा तिरस्कार करतो त्याला तुला का भेटायचं आहे?’’
‘‘माझ्या मित्रा, तुला माझ्याबद्दल काय वाटतंय याची मी पर्वा करतोय असं तू का गृहीत धरून चालला आहेस.?’’
‘‘ते सगळं गेलं उडत,’’ मी जोरात म्हणालो, कारण माझा हेतू तडीस जाणार नाही याची मला भिती वाटायला लागली, ‘‘मला ते सांगायचं नाही.’’
‘‘मी तुला बिघडवेन अशी तुला भिती तर वाटत नाही ना?’’
त्याच्या आवाजातील मिश्कीलीमुळे मी हास्यास्पद ठरलो. तो माझ्याकडे बघून उपरोधाने मनातल्या मनात हळूच हसत असावा याची मला खात्री होती.
‘‘तुला पैशाची कडकी लागली असेल.’’ मी अगदी उद्धटपणाने विचारलं.
‘‘मागच्या अनुभवावरून तुझ्यासारख्याकडून पैसे उधार मिळतील अशी अपेक्षा ठेवायला मी काही मूर्ख नाही.’’
‘‘स्तुतीचे चार शब्द ऐकण्यासाठी तू हपापलेला असशील.’’
तो दात विचकत हसला.
‘‘चांगूलपणा विसरायची संधी मी तुला जो पर्यंत देत आहे तो पर्यंत तरी तू माझा मनापासून तिरस्कार करणार नाहीस याची मला खात्री आहे.’’
मी मोठ्या मुश्कीलीने हसू दाबून ठेवलं.
तो जे म्हणाला त्यात एक तथ्य होतं. माझ्या स्वभावातला तो एक दोष आहे. माणूस कितीही दुष्ट आणि नीच असला तरी जो मला जशास तसं उत्तर देतो तो मला आवडतो.

स्ट्रिकलँडचा मला जो तिरस्कार वाटायचा तो कितीही ताणून धरलं तरी फार काळ टिकणं कठीण होतं. हा माझा नैतिक दुबळेपणा आहे. मी त्याला जी दुषणं देत होतो ते वरवरचं होतं आणि हे त्याला कळलं होतं. तो मनातून नक्कीच मला हसत असणार. गप्प बसण्यापलीकडे करता येण्यासारखं माझ्याकडे काही नव्हतं. मी खाली मान घालून चालत राहिलो.

1 comment: