Wednesday, February 7, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३६

पुढचा आठवडा भयंकर होता. डर्क दिवसातून दोन वेळा बायकोच्या चौकशीला हॉस्पिटलला जाई. तिचा नकार ठरलेला असायचा. प्रकृतीत चढ उतार होत होते. आशा निराशेचा खेळ चालला होता. नर्सला त्याची दया यायची पण तिच्या हातात काही नव्हतं. ब्लांश न बोलता बिछान्यात पडलेली असे. तिची नजर शून्यात लागलेली असे. जणू काही पावलापावलाने जवळ येणारा मृत्यु तिला दिसत असावा. एक दोन दिवसांचाच प्रश्न असेल. एका संध्याकाळी उशीरानेच स्ट्रोव्ह मला भेटायला आला तेव्हा ती गेली आहे हे सांगायला तो आला आहे हे मी ओळखलं. तो अगदी गळून गेला होता. त्याची बोलती बंद झाली होती. माझ्या सोफ्यावर तो बसकन बसला. त्याचं सांत्वन करायला मला शब्द सुचेनात. त्याला बोलण्याचा धीर येईपर्यंत मी वाचत बसलो तर ते बरं दिसणार नाही म्हणून मी खिडकी जवळ जाऊन पाईप ओढायला लागलो.
‘‘तू मला शेवट पर्यंत मदत केलीस,’’ शेवटी त्याचं तोंड उघडलं. ‘‘तुझे आभार मानावे तेवढे थोडेच होतील.’’
‘‘काही तरीच काय बोलतोस,’’ मला थोडं अवघडल्यासारखं झालं.
‘‘हॉस्पिटलमध्ये मी गेलो तेव्हा त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं. त्यांनी मला खुर्ची दिली. मी दरवाज्याबाहेर बसलो. तिची शुद्ध हरपल्यावर त्यांनी मला आत जायला दिलं. तिचं तोंड अ‍ॅसिडने काळठिक्कर पडलं होतं. तिच्या नाजूक, सुंदर शरीराची भयंकर अवस्था बघवत नव्हती. तिला अगदी शांतपणे मृत्यु आला. नर्सने मला सांगेपर्यंत मला कळलंही नव्हतं.’’
रडण्यासाठी सुद्धा त्याच्यात ताकद उरली नव्हती. शक्तिपात झाल्यासारखा तो नुसता पडून राहिला. त्याला गाढ झोप लागली होती. आठवडाभरात पहिल्यांदाच. निसर्ग जेवढा क्रूर असतो तेवढाच कधी कधी दयाळूही होतो. मी त्याच्या अंगावर पांघरूण घातलं आणि दिवे मालवले. मी सकाळी उठलो तेव्हाही तो झोपलेलाच होता. त्याने कुससुद्धा बदलली नव्हती. त्याचा सोनेरी काड्यांचा चष्मा तसाच त्याच्या नाकावर होता.

6 comments:

  1. जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी ब्लाँश ने एवढं वाईट का वागावं ते खरच कळत नाही। कदाचित नंतर कळेल

    ReplyDelete
    Replies
    1. नंतर काही कळणार नाही . ते प्रकरण संपलं. आता पुन्हा स्ट्रिकलँड ...😉😁

      Delete
    2. 41 व्या प्रकरणात थोडासा खुलासा होऊ शकेल।

      Delete
  2. वा, आत्तापर्यंतचा कथाभाग खूप interesting होता. व्यक्ती चित्रणे मस्त आहेत. काल आणि आज सगळे भाग सलग वाचले. त्यामुळे जास्त मजा आली.

    ReplyDelete
  3. धन्यवाद. तुलूज लोत्रेकच्या जीवनावर आधारीत आणखी एक प्रोजेक्ट आहे. तुमच्यासारख्या वाचकांनी रस दाखवला तर तोही पूर्ण करायला जोर येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं लेखन वाचायला उत्सुक आहोत आम्ही.
      तोही प्रोजेक्ट येऊ द्या लवकरच . 👍

      Delete