Sunday, February 11, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ४६


ताहितीत आल्या आल्या माझी कॅप्टन निकोल्सशी गाठ पडली. मी हॉटेलच्या सज्जात बसून सकाळची न्याहारी घेत असताना तो आला आणि त्याने स्वत:ची ओळख करून दिली. मला चार्ल्स स्ट्रिकलँडमध्ये रस आहे हे त्याच्या कानावर आलं होतं. तो त्याच्या विषयी बोलायला आला आहे हे त्याने आल्या आल्याच सांगितलं. इंग्लंड मधल्या एखाद्या लहानश्या खेडेगावातल्या लोकांना जसा गावगप्पांमध्ये रस असतो तेवढाच रस ताहितीकरांना सुद्धा होता. मी स्ट्रिकलँडच्या चित्रांविषयी एक दोघांकडे जी चौकशी केली ती चार दिवसात गावभर झाली. मी त्या अनोळखी इसमाला न्याहारी केली आहे का ते विचारलं.
‘‘होय. मी कॉफी सकाळी थोडी लवकरच घेतली आहे,’’ त्याने उत्तर दिलं. ‘‘पण आता थोडीशी व्हिस्की घ्यायला हरकत नाही.’’
मी चिनी वेटरला बोलावलं.
‘‘प्यायला खूपच लवकर होतंय असं वाटत नाही का तुम्हाला?’’ कॅप्टननं उलटं मलाच विचारलं.
‘‘ते तुमच्या आणि तुमच्या यकृताच्या ताकदीवर अवलंबून आहे.’’
‘‘मी तसा जवळपास मद्यपान करत नाही,’’ तो कॅनेडियन क्लब या व्हिस्कीचा एक मोठा पेला भरत म्हणाला.
बोलताना त्याचे तुटके आणि डागाळलेले दात दिसत होते. त्याची अंगकाठी अगदी शिडशिडीत होती. मध्यम उंची, बारीक कापलेले पांढरे केस, मिशीचे पांढूरके खुंट, नीट न धुतलेले अस्वच्छ हात. तीन चार दिवसांची वाढलेली दाढी. उन्हात रापलेला चेहेरा, कपाळावर सुरकुत्यांचं जाळं. त्याचे छोटेसे निळसर डोळे सारखे भिरभिरत होते. माझी लहान सहान हालचालसुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नव्हती. त्याचा एकूण आविर्भाव एखाद्या अट्टल गुंडासारखा होता. पण त्या क्षणी तरी तो अगदी मित्रत्वाने आणि सभ्यपणे वागत होता. त्याने खाकी रंगाचा गणवेश परीधान केला होता.
‘‘मी स्ट्रिकलँडला चांगलाच ओळखत होतो,’’ तो खुर्चीवर मागे रेलून बसला आणि त्याने मी दिलेली सिगार शिलगावली. ‘‘तो ताहितीत माझ्यामुळे आला.’’
‘‘ तुम्हाला तो कुठे भेटला?’’
‘‘मास्येझ.’’
‘‘तुम्ही तेथे काय करत होता?’’
तो माझ्याकडे बघून अघळपघळ हसला.
‘‘मी समुद्र किनाऱ्यावर भटकत होतो तेव्हा तो मला भेटला.’’
माझ्या मित्राच्या अवतारावरून तो आजही समुद्रकिनाऱ्यावर भटकायला आला असावा असं वाटत होतं. त्याच्याशी मैत्री करण्यासाठी मी मनाची तयारी केली. अशा भटक्या लोकांशी मैत्री करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं नेहमीच चीज होत असतं. त्यांच्याशी सहज मैत्री होते. ते बोलघेवडे असतात, फारसे आढेवेढे घेत नाहीत. त्यांना आपलंसं करायला फारसे श्रम पडत नाहीत. त्यांचा विश्वास सहज संपादन करता येतो. त्यांचं बोलणं थोड्या सहानुभूतीने ऐकलं की ते तुमचे ऋणी राहतात. गप्पागोष्टी करणं हा त्यांच्या आयुष्यातील एक मोठा आनंद असतो. त्यांना त्यात मोठेपणा मिरवायचा असतो. त्यामुळे गोष्टी ऐकून घेणारा श्रोता मिळाला तर त्यांना तो हवाच असतो. त्यांच्या थापा-बाता त्यांच्या कल्पनाशक्तीची मर्यादा ओलांडत नाहीत. असे लोक अगदी भोळे भाबडे असतात असं काही म्हणता येणार नाही. पण शक्यतो कायद्यांचा ते आदर करतात. विशेष करून ज्या कायद्यांच्या पाठीमागे बडगा उभा असतो अशा कायद्यांचा तर जास्तच. अशा लोकांच्याबरोबर पोकर खेळणं खूप धोकादायक होऊ शकतं. पण त्यांच्या खेळातल्या चलाखीने या जगप्रसिद्ध खेळाची रंगत वाढली होती हे मात्र खरं. मी ताहितीतून जाण्याच्या खूप आधीच माझी कॅप्टन निकोल्सशी ओळख झाली हे माझं मोठं भाग्यच म्हणायला पाहिजे. त्याने माझ्या पैशांनी सिगार ओढल्या, व्हिस्की प्याला (तो मद्यपान करीत नसल्याने तो कॉकटेल घेत नसे), अधे मध्ये थोडेसे डॉलर माझ्यावर उपकार करतोय या नम्र भावनेने उधार घेतले. जे पैसे माझ्या खिशातून एकदा गेले ते कधीच परत आले नाहीत हे जरी खरं असलं तरी त्या पैशांच्या बदल्यात माझ्या ज्ञानात आणि मनोरंजनात जी भर पडली ती मोबदला म्हणून विचार केला तर खूपच अधिक होती. त्या दृष्टीने उलटा मीच त्याचा ऋणी आहे. विषयांतर होत आहे म्हणून मी त्याला दोन वाक्यात उडवून टाकलं तर ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला टांचत राहिल.
कॅप्टन निकोल्स इंग्लंड सोडून ताहितीत का आला त्याचं खरं कारण मला कधी कळलं नाही. त्या बाबतीत तो मौन धारण करून असायचा. त्याच्या सारख्या माणसाला सरळ प्रश्न विचारायची सोय नसते. इंग्लंड सोडून परागंदा व्हायचं कारण केवळ दुर्दैव असं मोघमपणे त्याने सांगितलं होतं. त्याच्या मते तो एका घोर अन्यायाचा बळी होता. एखाद्या अफरातफर किंवा खूनासारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकल्याने त्याच्यावर इंग्लंडमधून पळ काढण्याची पाळी आली असावी असा मला दाट संशय होता. त्याच्या मायदेशातील काही हटवादी सरकारी अधिकाऱ्यांनी कालबाह्य नियमांचा अर्थ लावताना तांत्रिक किस पाडला असं तो एकदा ओझरतं म्हणाला होता. तेव्हा त्याला सहानुभूती दाखवण्यावाचून माझ्याकडे गत्यंतर नव्हतं. मातृभूमीत असताना काही दु:खद प्रसंग त्याच्यावर कोसळले होते तरीही त्याची देशभक्ती तीळमात्रही कमी झाली नव्हती. इंग्लंड हा जगातील एक सर्वोत्तम देश आहे हे तो वेळो वेळी सांगत असे आणि हवाई बेटातील मूळ कनाकाज रहिवासी, अमेरीकन, फ्रेंच, डच या सर्वांपेक्षा इंग्लीश लोक श्रेष्ठ आहेत असं तो हिरीरीने सांगत फिरे.
पण एकूण पाहता तो फारसा सुखी आणि समाधानी असावा असं वाटत नव्हतं. त्याला अपचनाचा त्रास होत असे. तो नेहमी पेपीनची गोळी चघळत असायचा. सकाळी त्याला भूक लागत नसे. पण त्याच्या दु:खाचं कारण निव्वळ शारिरीक पीडा हे नव्हतं. याहून दुसरं एक कारण होतं. आठ वर्षांपूर्वी त्याने घाईघाईने लग्न केलं होतं. दैवगती किती विचित्र असते. काही जणांच्या नशीबातच अविवाहित राहणं लिहिलेलं असतं. अशांनी स्वेच्छेने किंवा परिस्थितीवशात लग्न केलं तरी त्यांच्या कपाळी लिहीलेला सटवीचा शाप काही पुसला जात नाही. विवाहित माणसाचं ब्रह्मचर्य हे फारच दुर्दैवी म्हटलं पाहिजे. कॅप्टन निकोल्स हा अशा दुर्दैवी लोकांपैकी एक होता. मी त्याच्या बायकोला भेटलो आहे. ती अठ्ठावीस वर्षांची होती. काही जणांचं वय दिसत नाही अशांपैकी ती एक होती. ती वीस वर्षांची होती तेव्हासुद्धा अशीच दिसत असेल आणि ती जेव्हा चाळीशीला येईल तेव्हासुद्धा अशीच दिसेल. तिला पाहातच ती खूपच कडक स्वभावाची असावी असं वाटायचं. तिची चेहेरेपट्टी, अंगकाठी, कपडे या सगळ्यातून तिचा कडकपणा उठून दिसे. कॅप्टनने तिच्याशी लग्न का केलं असावं आणि एकदा लग्न केल्यावर तिला सोडून का दिले नाही हा दुसरा त्याहून मोठा प्रश्न मला नेहमी पडे. एकामागून एक आलेल्या अपयशाने त्याला पळ काढावा लागला होता. तो जीवाला पुरता वैतागून गेला होता. त्यात या लग्नाची भर. यातून पळ काढणार तरी कोठे. आणि पळ काढला असता तरी मिसेस निकोल्सने त्याला जगाच्यापाठीवरून कुठूनही शोधून काढलं असतंच.
गुंड आणि कलाकार हे एका वेगळ्याच वर्गात मोडतात. ते कोणाचीही भीडमुर्वत ठेवत नाहीत. राजाला भेटायला जातानासुद्धा ते न दबता जातात. हल्ली कनीष्ठ मध्यम वर्ग म्हणून ओळखला जाणारा असा एक नवीनच वर्ग उदयाला आला आहे. मिसेस निकोल्स या नव्या वर्गातून आली होती. तिचे वडिल पोलीसांत होते. ते एक यशस्वी अधिकारी असावेत याची मला खात्री आहे. कॅप्टनवर तिने काय मोहिनी घातली होती ते मला ठाऊक नाही. पण ते प्रेम असावं असं मला वाटत नाही. तिच्याशी बोलण्याची वेळ माझ्यावर कधी आली नव्हती. कसेही असो, पण कॅप्टन निकोल्स तिला जाम टरकून असायचा. कधी कधी आम्ही हॉटेलच्या सज्जात बसून गप्पा मारीत असताना ती खाली रस्त्यावरून जात असायची. तिला पाहिल्यावर कॅप्टन चूळबूळ करायला लागायचा. ती काही त्याला हाक मारून बोलवत नसे तरीही तो अस्वस्थ होऊन त्याच्या घड्याळाकडे बघत एक निश्वास टाकायचा.
‘‘आता मला निघायला पाहिजे.’’
गप्पा किंवा पेयपान कितीही रंगात आलेलं असो, एखादा चुटका किंवा व्हिस्कीचा घोट कशासाठीही तो थांबत नसे. त्याने आयुष्यात कितीतरी तुफानी वादळं पाहिली होती.
हातात रिव्हॉल्वर असताना तो दहा बारा धिप्पाड आफ्रिकनांशी सामना करायला डगमगला नसता. कधी कधी मिसेस निकोल्स तिच्या सात वर्षांच्या अशक्त बापूडवाण्या मुलीला हॉटेलवर पाठवी.
‘‘आईने तुम्हाला बोलावलंय,’’ असा तिच्या रडक्या आवाजातला निरोप मिळाला रे मिळाला की तो ताडकन उठे आणि ‘‘मी आलोच हां.’’ असं सांगून मुलीबरोबर निघून जाई.
आपल्या नशीबात काही केलं तरी अपयशच लिहिलं आहे या भावनेतून तो कुढत राही. इच्छाशक्तिने मोहावर मिळवलेल्या विजयाचं हे एक उदाहरण म्हणता येईल. माझ्या विषयांतरातून किंचित का होईना बोध झाला हे ही नसे थोडके.

Artist: Paul Gauguin
Title: By the Seashore, Martinique, Date:  1887
Medium: oil on canvas, Dimensions: 54 × 90 cm (21.3 × 35.4 in)
Current location: Ny Carlsberg Glyptotek, Source: wikidata:Q37693



2 comments:

  1. टांचत राहिल ऐवजी डांचत राहील. असे हवे का ?
    स्ट्रोव्ह नंतर आता कॅप्टन निकोल्स हे व्यक्तिमत्व आलंय मधेच उत्कंठा वाढवायला ...👌👍🌷🌷🌷🌷🌷

    ReplyDelete
    Replies
    1. टोचणी वरून टाचत. डाचतही ठीक होईल.

      Delete