Wednesday, February 7, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३४

स्ट्रिकलँड आणि ब्लांशच्यामध्ये काहीतरी अनर्थ घडेल याची मला स्ट्रोव्ह इतकीच खात्री होती. तरीही त्याचा शेवट अशा शोकांतिकेत होईल असं वाटलं नव्हतं. उन्हाळा सुरू झाला होता. हवा दमट आणि उष्ण झाली होती. रात्रीसुद्धा हवेत थंडावा नसायचा. दिवसभराच्या उन्हाने तापलेले रस्ते रात्री तीच उष्णता बाहेर फेकत. रस्त्यावरून चालणारी थकलेली माणसं पाय ओढत कशीबशी चालत. स्ट्रिकलँड मला बऱ्याच दिवसांत दिसला नव्हता. इतर गोष्टींमध्ये गुंतल्यामुळे त्या प्रकरणाचा मला विसर पडला होता. डर्कचं तेच ते रडगाणं ऐकून मला कंटाळा आला होता. त्याला भेटायचं मी टाळत होतो. त्या प्रकरणात आणखी वेळ फुकट घालवायची माझी इच्छा नव्हती.
एके दिवशी मी सकाळीच काम करीत बसलो होतो. माझ्या विचारांची गाडी भरकटू लागली. मला स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या ब्रिटनीच्या किनाऱ्याची, समुद्रकाठच्या ताज्या हवेची आठवण झाली. माझ्या शेजारी कॅफे  उ ले तून मागवलेला रिकामा कप होता. नुकत्याच खाऊन संपवलेल्या क्रोइसाँ चा सुवास अजून दरवळत होता. दुसऱ्या खोलीत बाथ टबमध्ये पाणी ओतल्याचा आवाज येत होता. तेवढ्यात घंटा घंणघणली आणि मी दरवाजा उघडायला उठलो. तेवढ्यात डर्क स्ट्रोव्हचा आवाज ऐकू आला. मी त्याला आत यायला सांगितलं. तो ताबडतोब आत शिरला आणि मी बसलो होतो त्या टेबलाजवळ आला.
‘‘तिने जीव दिला.’’
‘‘काय म्हणतोस?’’
तो बोलत असल्यासारखे त्याचे ओठ हलत होते पण आवाज बाहेर येत नव्हता. तो वेडपटासारखं ततपप करत होता. का कोण जाणे माझं हृदय धडधडू लागलं. मी संतापलो.
‘‘भल्या माणसा जरा ताळ्यावर ये आणि तुला काय बोलायचं आहे ते मला नीट समजेल असं सांग.’’
त्याने हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याची दातखिळी बसलेली असण्याची शक्यता होती. माझ्या अंगात काय संचारलं ते मला कळलं नाही. मी खांदे धरून त्याला गदगदा हलवलं. आदल्या रात्रीच्या जागरणामुळे माझं डोकं चालेनासं झालं होतं. मी ताळ सोडून वागल्यामुळे माझ्यावर चिडलो.
‘‘मला जरा बसूं दे.’’ तो दम घेत म्हणाला.
मी एक ग्लास सँ गॅमिएच्या मिनरल वॉटरने भरून त्याला दिला. लहान मुलाला पाणी पाजावं तसा ग्लास मी त्याच्या तोंडाजवळ धरला. पाणी पिताना थोडं पाणी त्याच्या शर्टावर सांडलं.
‘‘कोणी जीव दिला?’’
मी तसं का विचारलं ते मला कळलं नाही. त्याला काय म्हणायचं आहे ते मला कळलं होतं. त्याने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.
‘‘काल रात्री त्यांचं जोरदार भांडण झालं. त्यानंतर तो निघून गेला.’’
‘‘ती आहे की गेली?’’
‘‘ती जिवंत आहे. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय.’’
‘‘मग तू असं का बोलत आहेस,’’ मी ओरडून विचारलं. ‘‘तिने जीव दिला असं तू का म्हणतोस?’’
माझा मनस्ताप काबूत ठेवण्यासाठी मी हाताच्या मुठी वळल्या. मी हसण्याचा प्रयत्न केला.
‘‘माझं चुकलं. तू तुझं काम कर. घाईचं कारण नाही. ते तिची चांगली काळजी घेत आहेत.’’
त्याचे टपोरे निळे डोळे भकास दिसत होते. त्याने घातलेल्या जाढ भिंगांच्या चष्म्यामुळे ते अधिकच भयंकर वाटत होते.
‘‘कन्सर्ज सकाळी पत्र द्यायला गेला तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. त्याला कोणी तरी कण्हत असल्याचा आवाज ऐकू आला. दरवाजाला कडी लावलेली नव्हती. त्यामुळे तो आत गेला. ब्लांश पलंगावर पडली होती. ती अतिशय आजारी असल्यासारखी दिसत होती. ऑक्झॅलीक अ‍ॅसिडची बाटली बाजूच्या टेबलावर पडली होती.’’
स्ट्रोव्हने त्याचा चेहेरा दोन्ही हातात लपवला. तो मागे पुढे होत कण्हत होता.
‘‘ती शुद्धीवर होती का?’’
‘‘होय. तिला किती त्रास होत आहे ते तुला कळणार नाही. तिचं तळमळणं मला सहन होत नाही.’’
त्याचा आवाज चिरकायला लागला.
‘‘तू का उगाच तळमळत आहेस,’’ मी ओरडलो. ‘‘तिलाच ते सगळं सहन करावं लागणार आहे.’’
‘‘तू एवढा निष्ठूर कसा होऊ शकतोस?’’
‘‘तू तिच्यासाठी काय केलंस.’’
‘‘त्यांनी डॉक्टरला आणि मला बोलावलं आणि पोलीसांना कळवलं. मी कन्सर्जला वीस फ्रँक दिले आणि काही झालं तर मला कळवायला सांगितलं.’’
मी त्याच्याकडे पाहिलं. त्याला जे सांगायचं होतं ते वेगळंच होतं आणि त्याला ते सांगायचा धीर होत नव्हता.
‘‘मी तिला भेटलो तेव्हा ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाही. तिने कन्सर्जकरवी मला बाहेर जायला सांगितलं. मी सगळं विसरायला तयार आहे असं मी शपथ घेऊन सांगत होतो पण ती ऐकायलाच तयार नव्हती. मी जात नाही हे बघून तिने भिंतीवर डोकं आपटायला सुरवात केली. मी तिथे थांबणं योग्य होणार नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं. त्यांना बाहेर पाठवाअसा धोशा तिने लावला होता. मी बाहेर गेलो आणि स्टुडियोत जाऊन वाट बघत बसलो. जेव्हा अँब्युलन्स आली आणि स्ट्रेचरवरून तिला घेऊन जात होते तेव्हा मी तेथे आहे हे तिला कळू नये म्हणून त्यांनी मला स्वयंपारघरात पाठवलं.’’
मी कपडे करत होतो. स्ट्रोव्हने मला त्याच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली. सर्वसाधारण वॉर्ड ऐवजी त्याने आपल्या बायकोसाठी स्पेशल रुमची सोय केली होती. वाटेत त्याने हॉस्पिटलमध्ये मी उपस्थित असणं का गरजेचे आहे ते सांगितलं. तिने त्याला भेटायला नकार दिला तर कदाचित ती मला भेटू देईल. त्याचं तिच्यावर अजूनही प्रेम आहे, तो तिला कोणताही दोष देऊ इच्छित नाही, त्याच्या मनात तिला फक्त मदत करायची आहे, त्याचा तिच्यावर कोणताही अधिकार नाही, बरं वाटल्यावर तो तिला आपल्याकडे येण्याचा आग्रह करणार नाही, तिला जे काही करायचं असेल ते करायला ती स्वतंत्र आहे. हे सगळं मी तिला पुन्हा एकदा सांगावं अशी त्याने मला विनंती केली.
आम्ही हॉस्पिटलसमोर येऊन उभे राहिलो. त्या भकास इमारतीच्या दर्शनानेच आजारी पडायला झालं असतं. एकीकडून दुसरीकडे टोलवत, लांबलचक कॉरीडॉर ओलांडून, बरेच जिने वर खाली चढउतार झाल्यावर शेवटी एकदाचा ड्युटीवर असलेला डॉक्टर आम्हाला सापडला. त्याने आम्हाला सांगितलं की रूग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर असून आजतरी कोणीही तिला भेटू शकणार नाही. डॉक्टरच्या समोर रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. तो सगळ्यांशी ठामपणे बोलत होता. त्याच्या दृष्टीने ही केस एक सर्वसामान्य घटना होती. आपल्या प्रियकराशी भांडण झाल्यानंतर एका बाईने रागाच्या भरात विष घेऊन केलेला आत्महत्येचा प्रयत्न. या पलिकडे त्याला फार महत्व नव्हतं. अशा घटना नेहमी घडत असतात. सुरूवातीला त्याला वाटलं की डर्कमुळेच हे झालं आहे. मी जेव्हा खुलासा केला की हा तिचा नवरा आहे आणि तो झालं गेलं सगळं विसरून जायला तयार आहे तेव्हा त्याचं कुतुहल जागं झालं. त्याला वाटलं की आम्ही त्याची मस्करी करत आहोत. त्याने डर्ककडे एकवार आपादमस्तक पाहिलं आणि खांदे उडवले.
‘‘ताबडतोब धोका नाही, ती अ‍ॅसिड किती प्याली असेल ते काही आपल्याला कळणार नाही. भिती गेल्यावर ती बरी होईल. स्त्रिया नेहमी प्रेमाच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न करतात. पण बहुधा त्यात यशस्वी न होण्याची त्या काळजीही घेतात. त्यांना फक्त दुसऱ्याची सहानुभूती मिळवायची असते किंवा त्याला घाबरवायचं असतं.’’

त्याच्या आवाजात सूक्ष्म उपहास होता. त्याच्या दृष्टीने ब्लांश स्ट्रोव्ह म्हणजे पॅरीसमधील या वर्षातील आत्महत्येच्या आकडेवारीत भर घालण्याचा एक अंक होता. त्यामुळे त्याने आमच्यावर अधिक वेळ फुकट घालवला नाही. त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. ब्लांशला जर बरं वाटत असेल तर तिच्या नवऱ्याला तिला भेटण्याची परवानगी मिळाली असती.

1 comment: