Sunday, February 4, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २८

एका आठवड्याने उलगडा झाला. रात्रीचे दहा वाजले होते. जवळच्या रेस्तोराँमध्ये नुकतेच जेवल्यानंतर घरी येऊन काहीतरी वाचत बसलो होतो. तेवढ्यात घंटेच्या किणकिणाटाने मी दचकलो. मी कॉरीडॉरमध्ये जाऊन दरवाजा उघडला. स्ट्रोव्ह समोर उभा होता.
‘‘मी आत येऊ का?’’
जिन्यातील अंधूक प्रकाशात मला तो नीट दिसत नव्हता. पण त्याच्या बोलण्यावरून तो दारू प्याला असावा असं वाटत होतं. तो मितपान करणारा आहे हे मला माहित होतं त्यामुळे मला धक्का बसला. मी त्याला घेऊन आत गेलो आणि त्याला बसायला सांगितलं.
‘‘बरं झालं तू घरी सापडलास.’’
‘‘काय झालं?’’ त्याच्या घाईने मी चकित झालो होतो.
आत आल्यावर मी त्याला नीट पाहू शकलो. त्याची राहणी तशी नीटनेटकेपणाची होती. पण आज मात्र त्याचे कपडे चुरगळलेले होते. तो दारू पिऊन आला असावा याची माझी खात्री झाली आणि मी हसलो. त्याच्या या अवस्थेवर मी त्याची फिरकी घेणार होतो.
‘‘कुठे जावं ते मला कळत नाही,’’ तो एकदम बोलला. ‘‘मी एकदा येऊन गेलो पण तू नव्हतास.’’
‘‘मी जेवायला उशीरा जातो.’’
माझं मत बदललं. त्याच्यावर जो परिणाम झाला होता तो दारूमुळे नव्हता. त्याचा चेहेरा सहसा गुलाबी असायचा. आज तो पांढरा फटक पडला होता. त्याचे हात कापत होते.
‘‘काय विशेष झालं?’’
‘‘माझी बायको मला सोडून गेली.’’
त्याच्या तोंडातून शब्द पुâटत नव्हता. त्याने थोडा दम घेतला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय बोलावं ते मला कळेना. त्याच्या स्ट्रिकलँडवरच्या उतू जाणाऱ्या अतिरेकी प्रेमामुळे असं घडण्याची कधीतरी शक्यता होतीच. त्यात त्याच्या माणूसघाण्या, कृतघ्न वृत्तीमुळे तिच्या सहनशक्तिचा एक दिवस कडेलोट झाला असावा आणि रागाच्या भरात तिने स्ट्रिकलँडला बाहेर काढायला सांगितलं असावं. ती वरवर शांत वाटत असली तरी अति झाल्यावर शिंगावर घेण्याची हिंमत तिच्यात होती. स्ट्रोव्हने हट्टाने नकार दिल्यावर परत न येण्याची शपथ घेऊन ती सरळ स्टुडियोतून बाहेर पडली असेल. तो बिचारा जाड्या एवढा बावरून गेला होता की हसणं मला प्रशस्त वाटलं नाही.
‘‘मित्रा एवढा हताश होऊ नकोस. ती परत येईल. बायका चिडल्यावर जे बोलतात ते एवढं मनावर घ्यायचं नसतं.’’
‘‘तुझ्या नीट लक्षात आलेलं दिसत नाही. तिचं स्ट्रिकलँडवर प्रेम बसलंय.’’
‘‘काय म्हणतोस?’’ आता मात्र मला धक्का बसला होता. ही कल्पनाच एवढी विचित्र होती की असं काही होईल यावर विश्र्वास बसणं कठीण होतं. ‘‘तुला वेड लागलं आहे का? स्ट्रिकलँडवर तू जळत तर नाहीस ना?’’ मी हसत हसत विचारलं. ‘‘तुला ठाऊक आहे की तिला तो मुळीच आवडत नाही.’’
‘‘मी काय म्हणतो ते तुला समजत नाही.’’
‘‘तू एक महामूर्ख आहेस,’’ मी थोडं भडकूनच म्हणालो. ‘‘मी तुला थोडी व्हिस्की आणि सोडा देतो तो घे, बरं वाटेल.’’
स्वत:ला आत्मपीडा, मनस्ताप करून घेण्यात लोकांना काय आनंद मिळतो देव जाणे. त्यासाठी लोक काय काय शक्कल लढवत असतात. आता या मूर्खाच्या डोक्यात गेलं होतं की त्याच्या बायकोचं स्ट्रिकलँडवर प्रेम आहे. घोडचुका करण्यात त्याचा हात कोणी धरला नसता. त्यानेच तसं तिला तोंडावर सांगितलं असेल तर तिचं डोकं फिरणं साहजिकच होतं. कदाचित त्याच्या मनातील संशयाला तिने जाणूनबुजून खतपाणी घातलं असेल.
‘‘हे बघ, आपण स्टुडियोत जाऊ या. तूझी जर काही चूक झाली असेल तर तू जरा पडतं घे. मला वाटतं तू तुझ्या बायकोची अशी बदनामी करयला गेलास तर तिला ते सहन होणार नाही.’’
‘‘मी स्टुडियोत परत कसा जाऊ?’’ तो चिंतेने म्हणाला. ‘‘ती दोघं तिथे आहेत. मी स्टुडियो त्यांना दिला आहे.’’
‘‘याचा अर्थ बायको तुला सोडून गेली असा नसून तू तुझ्या बायकोला सोडून दिलं आहेस असा होतो.’’
‘‘कृपा करून माझ्याशी असं तोडून बोलू नकोस.’’
अजूनही त्याचं म्हणणं मी गांभीर्याने घेत नव्हतो. तो काय म्हणत आहे ते क्षणभर माझ्या लक्षात आलं नव्हतं. तो खरोखरच गंभीर पेचात सापडलेला दिसत होता.
‘‘तू माझ्याशी बोलायला इकडे आला आहेस ना. तर मग मला सगळं सांगून टाक काय झालं ते.’’
‘‘आज दुपारी हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. मी सरळ स्ट्रिकलँडकडे गेलो आणि त्याला सांगितलं. तू आता आपल्या घरी जाण्याइतपत बरा झाला आहेस. मला माझा स्टुडियो हवा आहे.’’
‘‘स्ट्रिकलँड सोडून दुसरा कोण असता तर एवढं स्पष्ट सांगण्याची वेळच आली नसती,’’ मी म्हणालो. ‘‘यावर तो काय म्हणाला?’’
‘‘तो पहिल्यांदा थोडा हसला; तो कसा हसतो ते तुला माहितच आहे. त्याला गंमत वाटते म्हणून नव्हे तर समोरच्याला मूर्ख समजून तो हसत असतो. त्याने त्याचं सामान गोळा करायला सुरवात केली. त्याला ज्या गोष्टींची गरज लागेल असं मला वाटलं त्या गोष्टी मी त्याला आतल्या खोलीतून आपण होऊन आणून दिल्या. तिकडे ढुंकुनही न बघता त्याने ब्लांशला हाक मारून तिच्याकडे एक मोठा कागद आणि दोरा मागितला.’’
स्ट्रोव्ह श्वास घ्यायला थांबला. त्याला चक्कर वगैरे येत असावी असं मला वाटलं. गोष्टी या थराला गेल्या असतील असं मला मुळीच वाटलं नव्हतं.
‘‘ती पांढरी फटक पडली होती. तिने कागद आणि दोरा आणला. त्याने त्याच्या चीज वस्तू कागदात बांधून घेतल्या. तो एक शब्दही बोलला नाही. तो फक्त शीळ घालत होता. त्याने आम्हा दोघांकडे ढुंकुनही पाहिलं नाही. त्याच्या डोळ्यात मिश्कील हसू होतं. माझ्या पोटात गोळा आला होता. काहीतरी अघटीत होईल अशी मला भीती वाटत होती. मी त्याला बोललो ते बोलायला नको होतं असं मला राहून राहून वाटायला लागलं. त्याने त्याची हॅट कुठे आहे ते पाहिलं. नंतर ब्लांश बोलली; ‘मी स्ट्रिकलँडबरोबर जात आहे, मला तुमच्याबरोबर राहायचं नाही.मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द फुटेना. जे काही होत आहे त्याच्याशी आपला संबंधच नाही अशा रितीने तो शीळ घालत होता.’’
स्ट्रोव्हने दम खाल्ला आणि घाम पुसला. मी अजूनही काही बोललो नव्हतो. तो जे काय बोलत होता त्याच्यावर आता माझा विश्वास बसायला लागला. मला जबरदस्त धक्का बसला. पण तो काय सांगतोय त्याचा मला थांग लागत नव्हता.
त्याच्या गालावरून अश्रू ओघळायला लागले. आवाज कापू लागला. तो तिच्या जवळ गेला, त्याने तिचे हात हातात घेतले पण तिने त्याला झिडकारलं. तिने जाऊ नये म्हणून त्याने तिची आर्जवं केली, तिच्या नाकदुऱ्या काढल्या, त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगितलं. तिच्या प्रेमासाठी केलेल्या गोष्टींची, आयुष्यातील सुखद क्षणांची आठवण करून दिली. त्याला ना तिचा राग येत होता ना तिला दोष द्यायचा होता.
‘‘कृपा करून मला शांतपणे जाऊं दे. माझं स्ट्रिकलँडवर प्रेम आहे हे तुम्हाला समजत नाही का? ते जेथे जातील तेथे त्यांच्या पाठोपाठ मी जाणार आहे.’’
‘‘त्याच्याबरोबर जाऊन तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस याचा तू विचार केला आहेस का? स्वत:च्या भल्यासाठी तरी त्याच्याबरोबर जाऊ नकोस. त्याच्याबरोबर गेलीस तर तुझ्या नशीबात काय वाढून ठेवलं आहे याची तुला कल्पना नाही.’’
‘‘हा सगळा तुमचाच दोष आहे. तुम्हीच त्यांना अट्टाहासाने येथे घेऊन आलात.’’
नंतर त्याने आपला मोर्चा स्ट्रिकलँडकडे वळवला.
‘‘तिच्यावर दया कर. हा वेडपटणा तिला करू देऊ नकोस.’’
‘‘तिला जे वाटेल ते करायला तिची ती मुखत्यार आहे. मी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.’’ स्ट्रिकलँड म्हणाला.
‘‘माझा निर्णय झालेला आहे.’’ ती हळू आवाजात म्हणाली.
स्ट्रिकलँडच्या शांतपणामुळे स्ट्रोव्हचा स्वत:वरील उरला सुरला ताबा सुटला. काय होत आहे ते कळण्याच्या आत त्याने स्ट्रिकलँडच्या अंगावर झेप घेतली. स्ट्रिकलँड धडपडला. आजारी होता तरी तो मुळचा मजबूत होता. त्याने एका क्षणात त्याला चिलटासारखं झटकून टाकलं. दुसऱ्या क्षणी स्ट्रोव्ह जमिनीवर आडवा झालेला होता.
‘‘ए येडपट, गंमत वाटली की काय तुला?’’ स्ट्रिकलँड म्हणाला.
स्ट्रोव्ह सावरून उठला. त्याने पाहिलं. त्याची बायको शांतपणे उभी होती. तिच्या देखत त्याचं हसं झाल्यामुळे त्याच्या अपमानात भर पडली. धडपडीत त्याचा चष्मा उडाला होता. चष्मा डोळ्यावर नसल्याने तो कुठे पडला आहे ते त्याला दिसेना. ती पुढे झाली आणि तिने शांतपणे चष्मा उचलून त्याच्या हातात दिला. त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची त्याला एकदम जाणीव झाली. रडल्याने आपण जास्तच हास्यास्पद दिसू याची त्याला कल्पना होती तरीही त्याला हमसाहमशी रडू पुâटलं. त्याने आपलं तोंड दोन्ही हातात लपवलं. ब्लांश आणि स्ट्रिकलँड न बोलता आपापल्या जागी उभे होते.
‘‘ओ माय डियर,’’ तो स्फुंदत स्फुंदत म्हणाला, ‘‘माझ्यावर थोडी तरी दया कर.’’
‘‘डर्क, माझा नाईलाज आहे.’’
‘‘कोणावर नव्हे इतकं मी तुझ्यावर प्रेम केलं. माझ्या हातून काही चुकलं असेल तर मला तसं का सांगितलं नाहीस? मी सुधारणा केली असती. मला जे शक्य होतं ते सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे.’’
तिने उत्तर दिलं नाही. तिचा चेहरा अविचल होता. त्याच्या रडगाण्याचा तिला कंटाळा आला आहे हे त्याच्या लक्षात आलं. तिने तिचा कोट आणि हॅट घातली. ती दरवाज्याकडे गेली. दुसऱ्या क्षणी ती निघून जाईल हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पटकन पुढे होऊन तिची वाट अडवली आणि स्वत:चा उरला सुरला आत्मसन्मान गुंडाळून ठेवत तिचे हात हातात घेऊन तिच्या समोर गुडघे टेकून बसला.
‘‘माझ्या लाडके, जाऊ नकोस. तुझ्याशिवाय जगणं मला अशक्य होईल. मी मरून जाईन. माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ कर. मला आणखी एक संधी दे. तुला सुखी करण्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे.’’
‘‘मिस्टर डर्क स्ट्रोव्ह, कृपा करून उठून उभे राहा. आणखीन शोभा करून घेऊ नका.’’
तो लटपटत उभा राहिला, पण तरीही तो तिला जाऊ द्यायला तयार नव्हता.
‘‘तुम्ही कुठे जात आहात?’’ तो घाईघाईत म्हणाला. ‘‘स्ट्रिकलँड राहातो ती जागा कशी आहे ते तुला माहित नाही. तू तेथे एक क्षणसुद्धा राहू शकणार नाहीस. त्यापेक्षा नरक परवडला.’’
‘‘मला त्याची पर्वा नाही तर तुम्ही का एवढी चिंता करता.’’
‘‘एक मिनीट थांब. मला बोलूं दे. मला शेवटची संधी देशील ना.’’
‘‘त्याचा काही फायदा होणार नाही. माझा निर्णय पक्का आहे. तुम्ही काहीही सांगितलंत तरी त्यात बदल होणार नाही.’’
त्याने आवंढा गिळला. हात छातीवर ठेवले.
‘‘मी तुला तुझा निर्णय बदलायला सांगत नाही. पण एक मिनीट मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. एक शेवटची विनंती आहे, नाही म्हणू नकोस.’’
ती थबकली. तिने त्याच्याकडे एकवार पाहिलं. तिची एरवीची पारदर्शी नजर आज कोरडी होती. ती स्टुडियोत आली आणि टेबलावर हात टेकून उभी राहिली.
‘‘हं. बोला, काय ते.’’
स्ट्रोव्हने मोठ्या मुश्किलीने स्वत:ला सावरलं.
‘‘नुसती हवा खाऊन राहता येत नाही याचा तू थोडा विचार कर. स्ट्रिकलँडकडे एक दमडीसुद्धा नाही.’’
‘‘मला माहित आहे.’’
‘‘तुझी उपासमार होईल. त्याला बरं व्हायला इतके दिवस का लागले माहित आहे? त्याला दोन वेळ खायचेसुद्धा फाके पडत होते. तो अर्धपोटी होता.’’
‘‘मी पैसे कमवीन.’’
‘‘कसे?’’
‘‘मला ठाऊक नाही, काही तरी रस्ता सापडेल.’’
त्या डचमनच्या डोक्यात एक भयंकर विचार येऊन गेला आणि त्या कल्पनेने तो शहारला.
‘‘मी आता जाऊ का?’’
‘‘आणखी एक सेकंद थांब.’’
त्याने स्टुडियोवरून एक नजर फिरवली. त्याचं त्या स्टुडियोवर मनापासून प्रेम होतं. तिच्या अस्तित्वाने त्या स्टुडियोला घरपण आलं होतं. त्याने क्षणभर डोळे मिटून घेतले. नंतर त्याने तिच्याकडे एक दीर्घ दृष्टीक्षेप टाकला. जणू काही तो तिची प्रतिमा आपल्या नजरेत साठवून ठेवत होता. तो उठला आणि त्याने आपली हॅट घेतली.
‘‘त्यापेक्षा मीच जातो.’’
‘‘तुम्ही?’’
ती गोंधळली. त्याच्या म्हणण्याचा अर्थच तिला कळेना.
‘‘त्या घाणेरड्या, अंधाऱ्या पोटमाळ्यावर तुला राहवं लागेल ही कल्पनाच मला सहन होत नाही. हे घर जेवढं माझं आहे तेवढंच तुझंही आहे. इथे तुला कसलाही त्रास होणार नाही. कमीत कमी तुझी उपासमार तरी होणार नाही.’’
तो कपाटाकडे गेला आणि खणातून त्याने पैशाच्या काही नोटा काढल्या.
‘‘माझ्याकडे असलेल्या पैशातील अर्धे तुला घे.’’
त्याने पैसे टेबलावर ठेवले. त्याची बायको किंवा स्ट्रिकलँड कोणीच काही बोललं नाही. त्याने आणखी काही गोष्टी गोळा केल्या.
‘‘माझ्या कपड्यांचं गाठोडं बांधून कन्सर्जकडे ठेव. मी उद्या येऊन घेऊन जाईन.’’
त्याने हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ‘‘गुड बाय माय डियर. आजपर्यंत जे काही सुखाचे क्षण मला दिलेस त्याबद्दल तुझा आभारी आहे.’’

तो दरवाजा लावून बाहेर पडला. बंद दरवाज्याआड स्ट्रिकलँडने हातातील हॅट टेबलावर ठेवून शांतपणे सिगरेट फुंकायला सुरवात केली असेल असं दृष्य माझ्या मन:चक्षूंसमोर तरळू लागलं.

Artist: Paul Gauguin Title: Portrait de Madeleine_Bernard, Date: 1888,
Medium: oil on canvas, Source: Wikipedia

5 comments:

  1. हे वाचल्यावर मती गुंग होते। स्ट्रीकलँड कलाकार म्हणून सरस असेल पण माणूस म्हणून घटिया होता असं माझं तरी मत झालंय

    ReplyDelete
    Replies
    1. स्ट्रिकलँड वरून पॉल गोगँविषयी मत बनवण्यात मोठा धोका आहे. मॉमने भरपूर लेखन स्वातंत्र्य घेतलंय. यात चरित्र कमी आणि कादंबरी जास्त. त्यामुळे त्याने गोगँचे नाव नाव बदलले.

      Delete