Monday, February 5, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३०

दिवाणावर झोपणं एवढं त्रासदायक होतं की मला झोप लागणं शक्य नव्हतं. त्या बिचाऱ्या डचमनने मला जे सांगितलं त्यावर मी विचार करत होतो. ब्लांश स्ट्रोव्हच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं नव्हतं. त्यात फक्त शारिरीक आकर्षणाचा भाग होता. तिला तिच्या नवऱ्याबद्दल कधी काही वाटलं असेल की नाही याचा मला संशय होता. माझ्या मते स्त्रियांचं प्रेम म्हणजे कित्येक वेळा त्यांना मिळालेला आधार आणि ऐहिक सुखसोईंना त्यांनी दिलेला प्रतिसाद असतो. बहुतेक स्त्रिया यासाठीच ओळखल्या जातात. कोणत्याही झाडाच्या आधारे वाढणाऱ्या द्राक्षाच्या वेलीला झाडाबद्दल जे वाटतं तशाच त्यांच्या भावना असतात. निष्क्रीय आणि तटस्थ. म्हणून जगातील शहाण्यासुरत्या लोकांची लग्नात मुलींकडून हीच अपेक्षा असते. पुरूष जेव्हा स्त्रीशी लग्न करतो तेव्हा त्याला लग्नानंतर ती त्याच्यावर प्रेम करेल याचं आश्वासन तिच्याकडून हवं असतं. लग्नामुळे मिळणारी सुरक्षा, संपत्ती आणि आपण कोणाला तरी हवे आहोत यातून मिळणारं समाधान यामुळे प्रेमभावनेची निर्मिती होते. स्त्रियांनी प्रेमाला उगाचच अध्यात्मिक उंचीवर नेऊन ठवलं आहे. मनोविकारांच्या तीव्र उद्रेकापुढे प्रेमभावना दुर्बळ ठरते. ब्लांश स्ट्रोव्ह स्ट्रिकलँडचा जो आत्यंतिक तिरस्कार करत असे त्यात लैंगिक आकर्षणाचा थोडासा भाग असावा असा मला दाट संशय होता. माणसाच्या लैंगिक वर्तनामागील गूढ उकलणारा मी कोण. स्ट्रोव्हचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी तिचं त्या बाबतीत समाधान करायला ते अपूरं होतं. स्ट्रिकलँडकडे ती शक्ती होती याची तिला नकळत जाणीव झाली असली पाहिजे. म्हणूनच ती त्याचा इतका तिरस्कार करत असावी. त्याला स्टुडियोत आणायला असलेला तिचा विरोध हा खरोखर मनापासूनचा होता. मला वाटतं पुढे जे अघटीत घडणार होतं त्याची तिच्या अबोध मनाला जाणीव झाली असावी. तिला त्याची जी भिती वाटत होती ती वास्तवात तिच्या स्वत:च्याच भितीची पडछाया होती. त्याचा अवतार एखाद्या जंगली श्वापदासारखा हिंस्र होता. तो कोणाचाही तमा न बाळगणारा, बेमुर्वतखोर आणि उद्धट होता. नजरेतील अलिप्तपणा आणि ओठातील कामातूर आव्हान. त्याचा देह आडदांड आणि मजबूत होता. तो एका रासवट कामशक्तीचं प्रतिक होता. कदाचित तिलाही त्या आदिम पापवासनेने स्पर्श केला असावा. अवघ्या चराचर सृष्टीला व्यापून टाकणाऱ्या त्या सृजनशक्तीचा विचार माझ्या मनात आला. त्या शक्तीने जर तिला झपाटलं असेल तर दोन टोकाच्या शक्यता संभवतात. आत्यंतिक तिरस्कार किंवा जीवापाड प्रेम.
आजारपणात त्याची सेवा करता करता तिचं मतपरिवर्तन झालं असावं. तिने त्याला भरवलं असेल, भरवताना त्याची खरखरीत लाल दाढी तिच्या हाताला खुपली असेल, अंग पुसताना त्याच्या शरीरावरच्या दाट केसांनी तिला गुदगुल्या झाल्या असतील. आजारपणात तो अशक्त झाला असला तरी त्याचे हात बळकट होते, बोटे कलाकारासारखी लांबसडक होती. तिच्या मनात काय खळबळ माजली असेल त्याची मला कल्पना आली. तो अगदी हूं का चूं न करता मेल्यासारखा शांतपणे झोपायचा. सावजाचा पाठलाग करून थकून पहुडलेल्या जंगली श्वापदासारखा. त्याला काय स्वप्नं पडत असतील. वनात विहार करणाऱ्या अप्सरेचा (Nymph) पाठलाग करणारा यक्ष (Satyr). अचपळ अप्सरा पळत आहे, तिच्या पाठी लागलेला यक्ष पावला पावलाने तिला गाठत आहे. कधी संपूच नये असं वाटणारा, काळाची गती खंडित करणारा, त्याचा उष्ण श्र्वास तिच्या पाठीलाजाणवे पर्यंत चाललेला जीवघेणा, अथक, अखंड पाठलाग. त्याने तिला कवेत पकडलं तेव्हा ती जीवाच्या आकांताने घाबरली असेल की अत्यानंदाने तिला उचंबळून आलं असेल.
ब्लांश स्ट्रोव्ह एका सापळ्यात सापडली होती. कदाचित ती अजूनही स्ट्रिकलँडचा तिरस्कार करत असावी पण तिचा कामाग्नी शांत करण्यासाठी तो तिला हवा होता. त्यासाठी ती आजपर्यंतच्या आयुष्यात जे कमावलं त्यावर पाणी सोडायला तयार होती. ती आता एक साधी पण गुंतागुंतीची, प्रेमळ पण एवढ्या तेवढ्या वरून भांडणारी, सहसा विचारी तसेच प्रसंगी अविचारी अशी सर्वसामान्य स्त्री राहिली नव्हती. तिचं रुपांतर पुराणकथेतल्या मीनॅडसारख्या वासना नामक एका राक्षसीणीत झालं होतं.
हा कल्पनाविलास फारच ताणल्यासारखा होईल. कदाचित ती तिच्या बावळट भोळ्या नवऱ्याला कंटाळली असेल. स्ट्रिकलँडकडे ती निव्वळ कुतुहलापोटी आकर्षित झाली असेल किंवा प्रत्यक्षात तिला त्याच्या विषयी काहीच वाटत नसेल. आजारपणात त्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यामुळे तिला त्याच्याविषयी आपुलकी  वाटायला लागली असेल किंवा ते तिच्या रिकाम्या डोक्यात शिरलेलं खूळ असेल. स्वत:च लावलेल्या सापळ्यात सापडल्यावर बाहेर कसं पडायचं ते समजलं नसण्याचीही शक्यता होतीच. तिच्या डोक्यात कोणते वादळ घोंघावत होतं किंवा गहिऱ्या डोळ्यात काय भाव दडले होते ते मला कळायला काही मार्ग नव्हता.
 तरीही ब्लांश स्ट्रोव्हच्या वर्तनाचा खुलासा एका प्रकारे करता येणं शक्य आहे. पण स्ट्रिकलँडच्या बाबतीत माझं डोकं चालेना. माझ्या मेंदूचा भुगा झाला पण त्याचं वर्तन माझ्या अंदाजाच्या अगदी विरूद्ध होतं. त्याने अत्यंत निष्ठूरतेने आपल्या मित्राचा विश्वासघात केला. स्वत:च्या लहरीखातर दुसऱ्याला किती दु:ख होईल याची त्याने कधीच पर्वा केली नव्हती. त्याच्यामध्ये कृतज्ञता आणि सहानुभूतीचा लवलेशही नव्हता. सर्वसामान्य लोकांच्यात ज्या भाव-भावना असतात त्या त्याच्याकडे नावालासुद्धा नव्हत्या. त्याला दोष देणं म्हणजे वाघाला त्याच्या क्रौर्याबद्दल दोष देण्यासारखं आहे. क्रौर्य हे त्याच्या स्वभावाचा एक भाग होता असं एक वेळ म्हणता येईल, पण क्रूरातील क्रूर जनावरसुद्धा लहरी नसतं. म्हणूनच स्ट्रिकलँडचा लहरीपणा माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता.
स्ट्रिकलँड ब्लांश स्ट्रोव्हच्या प्रेमात पडला असेल यावर माझा मुळीच विश्वास नव्हता. एवढंच नव्हे तर तो कधी कोणावर प्रेम करू शकेल असंही मला वाटत नव्हतं. प्रेमासाठी मन हळूवार असावं लागतं. स्ट्रिकलँडच्या मनात हळूवारपणाला मुळीच स्थान नव्हतं. स्वत:साठी तसेच दुसऱ्यासाठीही. प्रेमात दौर्बल्याचा अंश असतो, परस्परांना सांभाळून घ्यावं लागतं. या गोष्टी स्ट्रिकलँडमध्ये नावालासुद्धा सापडल्या नसत्या. प्रेमात माणूस स्वत:ला विसरून जातो. प्रेम शाश्वत आहे हे ठाऊक असूनही तो ते अशाश्र्वत आहे असं मानत असतो. त्यामुळे त्याला आभास होतात. ते आभास आहेत हे माहित असूनही तो त्याला वास्तव समजत असतो. तो शेफारतो आणि शरणही जातो. तो स्वत:चा राहत नाही. स्वत:च्या अहमपेक्षा भिन्न अशा एका वस्तूत त्याचं रुपांतर होतं. भावनाप्रधानता हा प्रेमाचा अविभाज्य भाग असतो. स्ट्रिकलँडएवढा भावनाशून्य माणूस मी दुसरा पाहिला नव्हता. प्रेमाच्या बंधनात अडकल्यावर होणाऱ्या गोड यातनांचा अनुभव त्याला कधी तरी घेता येईल यावर माझा विश्वास बसत नव्हता. जोखडाच्या ओझ्याखाली राहणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. आपल्या हृदयातील सल मुळासकट उखडून टाकण्याची ताकद त्याच्यापाशी होती याची मला खात्री होती. स्ट्रिकलँड कसा होता याचं गुंतागुंतीचं चित्रं उभं करण्यात मी यशस्वी झालो आहे का? तसं असेल तर स्ट्रिकलँड प्रेम करायला एकाच वेळी अगदी योग्य आणि क्षुद्र होता असं म्हटलं तर ते फारसं गैर होणार नाही.

प्रत्येकाची आवड-निवड त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे ती व्यक्तिगणिक भिन्न असते. स्ट्रिकलँडची प्रेम करण्याची पद्धत ही त्याच्यासारखीच एकमेकाद्वितीय होती आणि त्याच्या भाव-भावनांचं विश्लेषण करणं निरर्थक होतं.

1 comment: