Saturday, February 3, 2018

मून अँड सिक्सपेन्स – २६

दुसऱ्याच दिवशी आम्ही स्ट्रिकलँडला घेऊन आलो. येण्यासाठी त्याला तयार करायला आम्हाला याहून जास्त चिकाटी दाखवावी लागली. स्ट्रोव्हची आर्जवं आणि माझी जबरदस्ती यांचा विरोध करायला त्याच्यात शारिरीक ताकद उरली नव्हती. त्याची कुरबुर चालू असतानाच आम्ही त्याला कपडे घातले, जिन्यावरून खाली नेलं आणि कॅबमध्ये बसवून सरळ स्ट्रोव्हच्या स्टुडियोत नेलं. स्टुडियोत पोचेपर्यंत तो एवढा थकला होता की एक शब्दही न बोलता आम्ही घातलेल्या बिछान्यात तो आडवा झाला. तो सहा आठवडे अंथरूणाला खिळून होता. मध्ये एकदा तो काही तासांचाच सोबती असावा असं वाटत होतं. त्या डचमनच्या अथक प्रयत्नांमुळेच तो त्यातून बाहेर आला याची मला खात्री आहे.
त्याच्या एवढा नाठाळ रुग्ण मी पाहिला नव्हता. याचा अर्थ असा नाही की तो ऐकत नव्हता. उलट त्याने कसलीच तक्रार चुकूनही केली नव्हती. त्याच्या कसल्याही मागण्या नव्हत्या. त्या दृष्टीने तो अगदी शांत असे. पण आम्ही त्याची जी शुश्रुषा करत होतो त्याची त्याला चीड येत असे. त्याला काही विचारलं तर तो ते हसण्यावारी नेई, नाक मुरडे नाहीतर चेष्टा करून उडवून लावी. मला त्याची अगदी किळस आली होती. तो थोडा बरा झाल्यावर मी त्याला सरळ तसं सांगितलंही.
‘‘गो टू हेल.’’ त्याने त्याची प्रतिक्रिया थोडक्यात व्यक्त केली.
डर्क स्ट्रोव्ह स्वत:चं सगळं काम सोडून स्ट्रिकलँडच्या शुश्रूषेत अहोरात्र गुंतला होता. त्याने मोठ्या सहानुभूतीने सगळी काळजी घेतली. त्याच्या हाताला गुण होता. डॉक्टरने सांगितलेली सगळी औषधं तो मोठ्या युक्ती-प्रयुक्तीने त्याला पाजे. त्याची कोणतीही गोष्ट करण्यात त्याला त्रास वाटला नाही. स्वत:च्या गरजांपुरते त्याच्याकडे पुरेसे पैसे असले तरी वायफळ खर्च त्याला परवडण्यासारखा नव्हता. पण स्ट्रिकलँडसाठी तो वारेमाप पैसे खर्च करीत असे. स्ट्रिकलँड खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी लहरी होता. त्याच्या मनाला आलं तर असावं म्हणून तो महागडी फळफळावळ आणून ठेवी. त्याला चांगला पौष्टिक आहार तो अगदी नेटाने खाऊ घाली. स्ट्रिकलँडचा सगळा उद्धटपणा त्याने खपवून घेतला. तो नुसताच धुसपुसत असेल तर तो लक्ष देत नसे. फारच झालं तर तो हसण्यावारी नेई. जर एखाद्या दिवशी त्याची तब्येत जरा बरी असेल तर त्याला स्ट्रोव्हच्या फिरक्या घ्यायला उत यायचा. स्ट्रोव्हसुद्धा त्याला फिरक्या घ्यायला आपण होऊन निमित्त पुरवायचा आणि पेशंटमध्ये किती सुधारणा झाली आहे ते दाखवायला तो माझ्याकडे बघून डोळे मिचकवायचा. स्ट्रोव्हने त्याच्यासाठी जे केलं त्याला तोड नव्हती.
पण ब्लांशने मात्र कमाल केली होती. तिने आपण एक चांगली नर्स आहोत हे सिद्ध केलं. एवढंच नव्हे तर ती आपलं काम अगदी मन लावून करत होती. स्ट्रिकलँडला घरी आणण्याच्या ती एवढ्या विरोधात होती हे कोणाला सांगून खरं वाटलं नसतं. ती त्याचा बिछाना नीट करायची, त्याला आंघोळ घालायची. आजाऱ्यासाठी जे काही करणं गरजेचं होतं ते सगळं ती आपण होऊन करत असे. ती स्ट्रिकलँडचा एवढा तिरस्कार करत होती हे तिने आपल्या वागण्यातून चुकूनसुद्धा दाखवलं नाही. रात्री ती नवऱ्याबरोबर आळीपाळीने स्ट्रिकलँडच्या उशाशी बसून राही. रात्रीच्या अंधारात तिला काय वाटत असेल. स्ट्रिकलँडची हाडं वर आली होती आणि त्याच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्याचे पांढरेफटक डोळे प्रेतवत दिसत होते.
‘‘तो रात्री कधी तुझ्याशी बोलतो का.’’
‘‘कधीही नाही.’’
‘‘तुला पूर्वीइतकाच त्याचा राग येतो?’’
‘‘जास्तच.’’
तिने थंडपणे माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहेरा एवढा शांत होता की ती पूर्वी एकदा रागाने बेभान झाली होती यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.
‘‘त्याने तुझे कधी साधे आभार तरी मानले आहेत का?’’
‘‘नाही.’’ ती हसून म्हणाली.
‘‘तो माणूसघाणा आहे.’’
‘‘त्याची मला किळस वाटते.’’
स्ट्रोव्ह मात्र तिच्यावर खूश होता. त्याने जबरदस्तीने जे ओझे तिच्यावर लादले होते ते ती काम ती मनापासून करत होती. त्याचं उतराई कसं व्हावं ते त्याला कळत नव्हतं.
पण ब्लांश आणि स्ट्रिकलँडच्या वागण्यातील बदलाने तो थोडा बुचकळ्यात पडला होता.
‘‘तुला महित आहे का, कित्येक तास ती दोघं एकमेकांसमोर बसून असतात, एकही शब्द न बोलता.’’
स्ट्रिकलँडची तब्येत चांगलीच सुधारली होती. एकदा मी त्यांच्या स्टुडियोत गेलो होतो. डर्क आणि मी गप्पा मारत होतो. ब्लांश काहीतरी शिवत होती. मला वाटतं तिच्या हातात बहुतेक स्ट्रिकलँडचा शर्ट असावा. तो उताणा पडून होता. अगदी गप्प होता.
त्याची नजर ब्लांशवर खिळली होती. काही तरी विचीत्र खेळ चालू असावा असं मला जाणवलं. तो आपल्याकडे बघत आहे हे जाणवल्यावर तिने तिची नजर वर केली आणि एक क्षणभर सरळ त्याच्या नजरेला नजर भिडवली. तिच्या डोळ्यातील विलक्षण चमकेचा अर्थ मला कळला नाही. धोक्याची जाणीव ...? दुसऱ्या क्षणी स्ट्रिकलँडने त्याची नजर काढून घेतली आणि तो छताकडे पाहू लागला. पण ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याचा अर्थ लावणं कठीण होतं.
थोड्या दिवसात स्ट्रिकलँड उठून उभा राहू लागला. त्याचा हाडांचा सापळा झाला होता. त्याच्या अंगावरचे कपडे बुजगावण्याला पांघरलेल्या चिंध्यांसारखे लोंबकळताना दिसत होते. वेडीवाकडी वाढलेली दाढी, लांब केस. आडव्या बांध्याच्या देहावरील मांस झडून गेल्यामुळे त्याची अंगकाठी डोळ्यात भरत असे. पण त्या अवस्थेतही तो फारसा कुरूप दिसत नव्हता ही एक आश्चर्याची गोष्ट होती. त्या अवतारातसुद्धा त्याचा मूळचा डौल लपत नव्हता. त्याला बघून माझ्या मनात काय आलं ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. त्याच्या डोळ्यात सरळ सरळ आव्हान होतं. निव्वळ शारिरीक वासनेच्या पलीकडे जाणारं. कोणत्या तरी आदिम शक्तींनी त्याचा ताबा घेतला असावा. निसर्गातील गूढ शक्तींचं दैवतीकरण सटीर आणि फॉनसारख्या अर्ध मानवी आणि अर्ध पाशवी देवतांच्या रुपात ग्रीकांनी आपल्या पुराणकथात केलं होतं. त्या शापित गूढ शक्ती त्याच्या शरीरात वास करून असाव्यात. मला मास्र्या या ग्रीक पुराणातील देवतेची आठवण झाली. बांसरी वादनात अपोलोला आव्हान दिल्यामुळे त्याने मास्र्याला जिवंत सोलून त्याचं कातडं पाईनच्या झाडाला टांगून ठेवलं होतं. ते बांसरीचे व्याकूळ स्वर स्ट्रिकलँडला साद घालत असावेत. ज्या वाटेने गेल्यास शेवटी यातना आणि निराशाच पदरी पडणार होती अशी अनवट वाट त्याला खुणावत होती. सुष्ट काय आणि दुष्ट काय हे ओळखता येत नाही अशा आदिम शक्तीने त्याचा संपूर्ण ताबा घेतला होता.
चित्र काढण्या इतपत त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. तो स्टुडियोत शांतपणे बसलेला असे. तो कोणती स्वप्नं पाहत असावा, त्याच्या मनात काय विचार येत असावेत ते एक परमेश्र्वरालाच ठाऊक. तो वाचायचा ती पुस्तकंसुद्धा असंबद्ध विषयांवरची असत. वाचताना तो लहान मुलांसारखा ओठ हलवत पुटपुटत असे. स्ट्रोव्हच्या स्टुडियोत चांगली आरामखुर्ची असताना तो तिपाईवर किंवा बिनहातांच्या खुर्चीवर बसलेला असे.

शारिरीक सुखसोर्इं बद्दल एवढा उदासीन मनुष्य यापूर्वी माझ्या पाहण्यात आला नव्हता.

1 comment: