Wednesday, February 7, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ३५

तो दिवस कसा गेला ते मला सांगता आलं नसतं. स्ट्रोव्हला एकटं सोडण्यात अर्थ नव्हता. त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या प्रयत्नात मी थकून गेलो. मी त्याला लुवरला घेऊन गेलो. तिथली चित्रं बघण्याचं नाटक तो करत होता, पण त्याच्या डोक्यातून बायकोचा विचार जात नव्हता. मी त्याला जबरदस्तीने जेऊ घातलं. जेवणानंतर मी त्याला आडवं पडायला लावलं, पण त्याला झोप लागली नाही. मी त्याला थोड्या दिवसांसाठी माझ्याकडे राहयचं आमंत्रण दिलं, ते त्याने तात्काळ स्वीकारलं. मी त्याला पुस्तक वाचायला दिलं पण एक दोन पानं उलटून त्याने पुस्तक मिटून ठेवलं आणि तो शून्यात नजर लावून बसला. संध्याकाळी आम्ही बराच वेळ पत्ते खेळत होतो. मी नाराज होऊ नये म्हणून त्याला त्यात रस आहे असं तो दाखवत होता. शेवटी त्याला झोपेच्या औषधाचा एक घोट दिल्यानंतर तो गाढ झोपी गेला.
आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. नर्सने आम्हाला ब्लांश थोडी बरी आहे असं सांगितलं. आमचा निरोप घेऊन ती आत गेली. तिच्या खोलीतून मोठ्याने आरडाओरडा ऐकू आला. नर्सने बाहेर येऊन आम्हाला सांगितलं की तिला तिच्या नवऱ्याला भेटायचं नाही. मी तिला भेटू शकेन का असं विचारल्यावरही तिचा नकार कायम होता. डर्कचे ओठ कापू लागले.
‘‘आग्रह करणं ठीक होणार नाही. ती अजूनही बरी झालेली नाही. एक दोन दिवसात आणखी बरं वाटल्यावर ती तिचं मन बदलेल.’’ नर्स म्हणाली.
‘‘तिला आणखी कोणाला भेटण्याची इच्छा आहे का?’’ डर्कने अगदी हळू आवाजात विचारलं.
‘‘ती म्हणाली की मला कोणी त्रास देऊ नका.’’
डर्कचे लोंबकळणारे हात विचित्रपणे हलू लागले.
‘‘तिला सांगा की तिला जर कोणाला भेटायची इच्छा असेल तर मी त्या व्यक्तीला घेऊन येईन. तिला बरं वाटवं एवढीच माझी इच्छा आहे.’’
नर्सने जगातील अनेक दु:खद प्रसंग पाहिले होते. तिने सहानुभूतीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली:
‘‘थोडं बरं वाटल्यावर मी तिला तुमचा निरोप नक्की देईन.’’
डर्कला भरून आलं. त्याने आपला निरोप तिला सांगण्याचं पुन्हा पुन्हा विनवलं.
‘‘तुम्ही माझा निरोप तिला आत्ताच द्याल तर तिला लवकर बरं वाटेल.’’
ती किंचीत हसली आणि आत गेली. तिने हळू आवाजात तिला निरोप दिला. त्यानंतर एक अनोळखी किरटा आवाज आला.
‘‘नाही, नाही, नाही.’’
नर्स मान हलवत बाहेर आली.
‘‘तो आवाज तिचाच होता का? किती विचित्र होता.’’ मी विचारलं.
‘‘तिने प्यालेल्या अ‍ॅसिडमुळे तिचं स्वरयंत्र जळालं असावं.’’
डर्क कळवळला. मला नर्सशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी त्याला प्रवेशद्वाराजवळ जाऊन माझी वाट बघायला सांगितलं. तो एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे निमूटपणे गेला. त्याची विचारशक्तीच नष्ट झाली होती.
‘‘तिने असं का केलं ते तिने तुम्हाला सांगितलं का?’’
‘‘नाही. ती काहीच बोलत नाही. ती शांतपणे पडून आहे. ती तासंतास कसलीही हालचाल न करता पडून असते. ती सारखी रडत असते. अश्रूंनी तिची उशी ओली चिंब झाली आहे. ती एवढी अशक्त झाली आहे की रूमालाने डोळे पुसण्याचीही ताकद तिच्यात राहिलेली नाही.’’
माझं मन द्रवलं. स्ट्रिकलँड समोर असता तर मी त्याचा जीवच घेतला असता. मी तिचा निरोप घेतला तेव्हा माझा आवाज कापत होता.

डर्क माझी वाट पाहत उभा होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हाताला हळूच स्पर्श करेपर्यंत त्याला मी आलेलो कळलंच नव्हतं. आम्ही न बोलता चालत होतो. त्या बिचारीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल त्याचा मी विचार करत होतो. काय झालं हे स्ट्रिकलँडला ठाऊक असावं. कारण पोलीसांपैकी कोणी तरी त्याची गाठ घेतली असेलच. त्यांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असेल. तो कुठे राहत होता ते मला ठाऊक नव्हतं. तो बहुधा त्याच्या पोटमाळयावरच्या त्या जागेत परत गेला असावा. तिला त्यालाही भेटण्याची इच्छा नव्हती हे विलक्षण होतं. तिने त्याला भेटायला ये असा निरोप दिला असता तर तो आला नसता याची कदाचित तिला कल्पना असावी. तिच्या दैवाने निष्ठूरपणाची परिसिमा गाठली होती. आयुष्याच्या अंतिम क्षणी ह्या शारिरीक आणि मानसिक यातना भोगाव्या लागल्याने तिच्या जीवाचा किती थरकाप उडाला असेल या विचाराने माझ्या अंगावर काटे उभे राहिले.

1 comment: