Monday, February 12, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ४९

मी हॉटेल डी ला फ्लाऊ येथे राहत होतो. हॉटेलची मालकिण मिसेस जॉन्सन हातातून गेलेल्या संधी विषयी अजूनही हळहळत होती. स्ट्रिकलँडच्या मृत्युनंतर त्याच्या मालकीच्या काही सामानाचा पपीएतच्या बाजारात लिलाव झाला होता. त्या चीजवस्तूंतील एक अमेरीकन स्टोव्ह तिला हवा होता. तिने त्यासाठी सत्तावीस फ्रँक मोजले होते.
‘‘तिथे दहा बारा चित्रं होती,’’ ती मला म्हणाली. ‘‘त्यांना फ्रेम केलेली नव्हती त्यामुळे ती कोणालाच नको होती. त्यातली काही बरी होती ती दहा फ्रँकला गेली, पण बहुतेकांना पाच सहा फ्रँकपेक्षा जास्त आले नाहीत. विचार करा त्यातलं एक जरी चित्र घ्यायची मला त्यावेळी बुद्धी झाली असती तर आज मी किती श्रीमंत झाले असते.’’
पण श्रीमंती तिअर जॉन्सनच्या नशीबात नव्हती. ती फाटक्या हाताची होती. स्थानिक आदिवासी स्त्री आणि ताहितीत स्थाईक झालेल्या इंग्लीश दर्यावर्दी कॅप्टनची ती मुलगी. माझी आणि तिची ओळख झाली तेव्हा ती पन्नाशीची होती. ताडमाड उंच आणि तशीच जाडजूड. तिचा चेहेरा प्रेमळ नसता तर तिला पाहून भितीच वाटली असती. मांसाच्या लगद्यासारखे हातपाय, कोबीच्या मोठ्या गड्ड्यासारखे स्तन, रूंद मांसल चेहेरा, लोंबणाऱ्या एका हनुवटीला चिकटलेली दुसरी हनुवटी. तिच्या या अगडबंब देहाचा बोज सांभाळणारा थुलथुलीत पार्श्वभाग. ती नेहमी गुलाबी रंगाचा पायघोळ झगा घालायची. तिच्या डोक्यावर दिवसभर गवती हॅट असायची. तिने केस मोकळे सोडले की ते काळेभोर आणि कुरळे आहेत ते कळायचं. तिच्या डोळ्यातून आपुलकी आणि उत्साह उतू जायचा. तिचं हसणं लक्षात राहण्यासारखं होतं. अगदी हळूवारपणे आतून सुरू झालेलं हसू बाहेर पडताना स्फोट होऊन तिचं प्रचंड शरीर गदागदा हलायला लागायचं. तिला तीन गोष्टी आवडायच्या, विनोदी चुटका, वाईन आणि देखणे पुरुष. तिच्याशी ओळख असणं हा ताहितीच्या रहिवाशांना एक बहुमान वाटायचा. तिच्या हातचा स्वैंपाक ताहितीत सर्वोत्कृष्ट समजला जात असे. सकाळ पासून रात्रीपर्यंत ती स्वैयंपाकघरात छोट्या स्टूलावर बसून असायची. तिच्या भोवती एक चिनी मुलगा आणि तीन स्थानिक मुली मदतीला असत. त्यांना सूचना देत, गप्पागोष्टी करत, हसत, गाणं गुणगुणत, मध्येच एखादा पदार्थ चाखून बघ असं करत दिवस निघून जाई. जेव्हा एकादा खास पाहुणा असे तेव्हा ती स्वत:च्या हाताने जेवण बनवी. आदरातिथ्य करणं हे तिच्या स्वभावातच होतं आणि ते ती अगदी मनापासून करी. जेव्हा हॉटेल डी ला फ्लाऊमध्ये खास मेजवानीचा बेत असे तेव्हा बेटीवरील कोणालाही तेथे जेवल्याशिवाय जाण्याची वेळ येत नसे. पैसे दिले नाहीत म्हणून ती कोणाही गिऱ्हाईकाला उपाशी पाठवत नसे. त्यांना जेव्हा जमेल तेव्हा ते पैसे देतील यावर तिचा विश्वास असे. एका माणसावर अगदी वाईट परिस्थिती ओढवली होती. त्याला तिने कित्येक महिने आसरा दिला. जेव्हा लाँड्रीवाल्या चिनी माणसाने त्याचे कपडे पैसे दिल्याशिवाय धुवायला नकार दिला तेव्हा तिने त्याचे कपडे स्वत:च्या कपड्यांबरोबर धुवायला दिले. त्या गरीब बिचाऱ्या गिऱ्हाईकाने मळके कपडे घालावेत हे तिला पसंत पडलं नव्हतं. ती त्याला तंबाखू घेण्यासाठी दिवसाचा एक फ्रँक द्यायची. जी गिऱ्हाईकं तिचं बिल दर आठवड्याला चुकतं करीत त्यांच्या सारखीच वागणूक तिने त्यालाही दिली. वय आणि अतिस्थूलपणामुळे तिला स्वत:ला प्रेमात पडणं शक्य नव्हतं. पण इतर तरूण तरूणींच्या प्रेमप्रकरणात ती रस घेई. स्त्री-पुरूषांचा संभोग ही एक नैसर्गिक गोष्ट आहे असं ती मानत असे. प्रत्येक वेळी ती स्वत:च्या अनुभवावरून काहीतरी उदाहरण देत असे.
‘‘माझे कोणाशी तरी संबंध आहेत याचा माझ्या वडिलांना पत्ता लागला तेव्हा मी पंधरा वर्षांची होते,’’ ती सांगत होती. ‘‘तो ट्रॉपिक बर्डवर थर्ड मेट होता. कसला चिकना होता तो.’’
तिने एक निश्वास सोडला. असं म्हणतात की स्त्रिया त्यांचं पहिलं प्रेम कधीच विसरत नाहीत.
‘‘माझे वडिल एक विचारी गृहस्थ होते.’’
‘‘त्यांनी काय केलं?’’
‘‘त्यांनी मला नखशिखांत फोडून काढलं आणि नंतर माझं कॅप्टन जॉन्सनशी लग्न लावून दिलं. ते वयाने थोडे मोठे होते पण दिसायला चांगले होते. मी विरोध केला नाही.’’
तिच्या वडिलांनी तिचं तिअर हे नाव एका पांढऱ्या फुलावरून ठेवलं होतं. असं म्हणतात की त्या फुलाचा एकदा वास घेतलेला माणूस आयुष्यभर कुठेही भटकला तरी पुन्हा ताहितीवर आल्याशिवाय राहत नसे. तिला स्ट्रिकलँड व्यवस्थित आठवत होता.
‘‘तो कधी कधी इकडे यायचा. तो मला पपीएतमध्ये फिरताना दिसायचा. मला त्याचं नेहमी वाईट वाटायचं. तो इतका बारीक झाला होता की विचारू नका. त्याच्या खिशात कधीही पैसे नसायचे. जेव्हा मला कळायचं की तो गावात आला आहे तेव्हा मी मुला बरोबर निरोप पाठवून त्याला जेवायला बोलवून घ्यायची. एक दोन वेळा मी त्याला कामही मिळवून दिलं होतं. पण तो कुठेही फार दिवस टिकून राहत नसे. थोडे दिवस गेले की त्याला जंगलाची ओढ लागायची. सकाऴी उठून बघावं तर तो गायब झालेला असे.’’
मास्येझ सोडल्यानंतर सहा महिन्यांनी स्ट्रिकलँड ताहितीला जाऊन पोचला होता. ऑकलंडवरून सॅन फ्रान्सस्किोला जाणाऱ्या बोटीवर त्याने जागा मिळवली. बरोबर त्याने एक रंगांचा खोका, ब्रश, इझल आणि एक डझनभर कॅनव्हास घेतले होते. सिडनीमध्ये त्याला जे काम मिळालं होतं त्याचे काही पौंड त्याच्या खिशात होते. त्याने शहराबाहेरील एका स्थानिक रहिवाश्याच्या घरातील एक खोली भाड्याने घेतली. मला वाटतं ताहितीत आल्याबरोबर त्याला घरी आल्यासारखं वाटलं असेल. तो तिअरला काय म्हणाला होता ते तिने मला सांगितलं:
‘‘मी बोटीवर डेक ब्रशने घासत असताना एक जण मला म्हणाला: तिकडे बघ काय दिसतंय ते.मी वर पाहिलं. मला क्षितीजावर बेटाचा किनारा दिसला. दिसताक्षणी मला जाणवलं की आयुष्यभर आपण ज्याचा शोध घेत होतो ते हेच आहे. आम्ही आणखी जवळ आलो. मग मला ओळखता आलं. कधी कधी फिरताना सगळं ओळखीचं वाटू लागतं. जणू काही मी पूर्वी येथे येऊन गेलो असलो पाहिजे.’’

‘‘कधी कधी असं होतं,’’ तिअर म्हणाली. ‘‘मला काही पुरूष माहित आहेत. जहाज माल भरायला तास दोन तास बंदरात आलं असताना जे किनाऱ्यावर उतरले, ते जहाजावर कधीच परत गेले नाहीत. काही जण इथे एका वर्षापुरते बदली म्हणून आले होते. त्यांनी एक वर्ष इथल्या जागेला फक्त नावं ठेवण्यात घालवलं. जीव गेला तरी बेहत्तर पण पुन्हा या बेटावर पाऊल टाकायचं नाही अशी शपथ घेऊन ते परत गेले. पण अवघ्या सहा महिन्यातच ते परत आले. ते म्हणत दुसरीकडे कुठेही त्यांचा जीव रमणं शक्य नाही. असेही लोक मला माहित आहेत.’’
Artist: Paul Gauguin
Title: When Will You Marry? Date: 1892,
Medium: oil on canvas, Dimensions: 101 × 77 cm (39.8 × 30.3 in)
Current Loaction: Private collection, Source: wikidata: Q7993068

3 comments:

  1. ह्या पेंटींगमधल्या दोन मुलींनी डोक्यात तिअरची फुलं घातलेली आहेत. ताहितीयन प्रथेप्रमाणे लग्नाला आलेल्या तरूणी डोक्यात तिअरची फुले घालून सजतात. गोगँने हे पेंटींग त्याच्या हयातीत एका प्रदर्शनात पाठवताना त्याची किंमत फक्त १५०० फ्रँक एवढी ठेवली होती. पण तरीही त्याकाळी ते विकले गेले नाही. शेवटी १९१७ मध्ये जिनीव्हा मधील एका प्रदर्शनात स्टॅचेलीन नामक युरोपियन संग्राहकाने ते विकत घेतले. शंभर वर्षांनी २०१५ मधील एका लिलावात त्याच्या वारसदारांनी ते विकायला काढले तेव्हा एका अरब शेखने ते २१० दशलक्ष यूएस डॉलरला विकत घेतले. कोणत्याही पेंटींगला आलेली ती तोपर्यंतची सर्वोच्च किंमत होती.

    ReplyDelete
    Replies
    1. वाह , क्या बात है ! छान आहे ही माहिती .

      Delete