Saturday, February 17, 2018

मून अँड सिक्सपेन्स - उपसंहार

ह्या कादंबरीत मॉमने सत्य, ऐकीव आणि कल्पित यांचे अद्भूत मिश्रण केले आहे. विकीपिडियावर पॉल गोगँचे संक्षिप्त चरित्र उपलब्ध आहे. या कादंबरीत मॉमने गोगँच्या चरित्रापासून खूपच फारकत घेतली आहे हे खरं असलं तरी विकीपिडिया नियमित अपडेट होतो आणि मॉमला 1919 साली बऱ्याच अंशी ऐकीव माहितीवर अवलंबून रहावे लागले याचे भान वाचकांनी ठेवले पाहिजे. मॉम जेव्हा एखाद्या चित्रकाराचा किंवा चित्राचा उल्लेख करतो तेव्हा त्याचा उद्देश कादंबरीतील त्याचे प्रतिपादन अधिक स्पष्ट करणे हा असतो. मॉमने उल्लेखल्लेय् चित्रकारांचा आणि चित्रांचा परिचय असल्याशिवाय त्याने उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यंजना हा प्रकार किती प्रभावीपणे हाताळला आहे हे कळणे कठीण जाईल. मूळ कादंबरीत फोटो दिलेले नव्हते. पण आता इंटरनेटमुळे जिज्ञासू वाचकांना ते संदर्भ बघणे शक्य आहे. त्यात माझीही थोडीशी भर घालून विकीपीडिया पब्लिक डोमेनवरून मी ब्लॉगवर उद्धृत केले आहेत. माझी भर कोणती आणि मॉमने मूळ उल्लेख केलेले कोणते हे कादंबरी वाचताना सहज कळून येईल. पेंटीग देताना मी त्याचा कोणताही खुलासा किंवा टीप न दिलेली नाही, ती आता कादंबरीच्या शेवटी देत आहे.
1.  कादंबरीतील कथानकाचा काळ हा साधारण एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध (1870 ते 1900) आणि लेखनकाळ हा 1919 हा आहे हे कादंबरीतील आशयाचं आकलन होण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे.
2.   प्रकरण 2 – मला वेलाक्वेजपेक्षा (1599-1660) एल ग्रेको (1541-1614) आवडतो – यात एल ग्रेकोची पेंटींग पाहिली की लक्षात येईल की एल ग्रेको, वेलास्क्वेझपेक्षा मागच्या पीढीतील असूनही त्याची शैली कशी आधुनीकतेकडे झुकणारी होती. पिकासोलासुद्धा ओल्ड मास्टर्सपैकी एल ग्रेको सगळ्यात जास्त आवडायचा. पिकासोच्या काही पेंटींगवर एल ग्रेकोचा प्रभाव जाणवतो. एल ग्रेकोचा प्रभाव तीनशे वर्षानंतर उदयाला आलेल्या नवचित्रकारांवर दिसून येतो यातच त्याचं महानपण आहे. पिकासोवर एल ग्रेको प्रमाणे गोगँचाही खूप प्रभाव होता. पिकासोच्या  Les Demoiselles d'Avignon  (1907) या सुप्रसिद्ध पेंटींगवर गोगँचा प्रभाव दिसून येतो. Please click underlined link to view
3.  प्रकरण 19 - स्ट्रोव्हला ब्लांशला बघून शेदाँच्या पेंटींगची आठवण होते कारण शेदाँची बेनेडिसिते आशिर्वाद या मालिकेतील घरगुती प्रसंगावर आधारित पेंटींग.
4.    प्रकरण 39 – येथे वेलास्क्वेजचं इनोसंट एक्स – यथार्थदर्शन शैलीतील पेंटींग. वेलास्क्वेजने राजे महाराजे, पोप वगैरे उच्चपदस्थांची पेंटींग केलेली आहेत. वेलास्क्वेज हा त्या काळचा एक महान चित्रकार होताच पण दोनशे वर्षांनीही तीच शैली घोटवून पेंटींग करण्यात नवनिर्मीती, नाविन्य ते कोणते असं मॉमला येथे सुचवायचं आहे. शेदॉँची (1791) पेंटींग म्हणजे आपल्या य. गो. जोशींच्या शैलीत 1970 मध्ये सुद्धा लिहीण्यासारखं आहे.
5.  प्रकरण 42 – एदुआर्द मानेची लंशन ऑन ग्रास आणि ऑलिंपिया या पेंटींगवर अश्लील म्हणून झोड उठली होती. आपल्याकडे ओलेती या ठाकूरसिंगांच्या पेंटींगवर झालेली टीका आणि खटल्याची आठवण व्हावी तसाच हा प्रकार होता. सगळे डोंगर इकडून तिकडून सारखेच असं म्हणतात त्याची प्रचिती यावी. अधिक माहितीसाठी चिन्हचा नग्नता हा विशेषांक वाचावा.
6.  प्रकरण 44 – क्लॉद मॉने (1840-1926) हा या कादंबरीतील समकालीन चित्रकार. हा इंम्प्रेशनीझमचा पितामह म्हणून ओळखला जातो. स्ट्रोव्ह जेव्हा मला मॉने आवडतो असं म्हणतो तेव्हा त्याला चिडवण्यासाठी म्हणून स्ट्रिकलँड मुद्दाम होऊन त्याच्या मागच्या पिढीतील विंटरहॉल्टर (1805-1873) मला आवडतो असं म्हणतो. म्हणजे 1970 साली एखाद्याने तुला किशोर कुमार आवडतो का असं विचारल्यावर मला पंकज मलिक आवडतो असं म्हणण्यासारखं आहे. लेखकाला पॉल गोगँ आणि एल ग्रेकोमध्ये साम्य आहे असं वाटतं तर स्ट्रिकलँडला ब्रुघेल द एल्डर आवडत असतो. चित्रांचे विषय आणि चित्रप्रतिमा यांचा विचार केला तर ताहितीत गेल्यानंतर गोगँच्या शैलीमध्ये कोणता बदल होणार आहे याची चाहूल लेखकाला यातून सूचित करायची आहे.
7.  प्रकरण 49 - ह्या पेंटींगमधल्या दोन मुलींनी डोक्यात तिअरची फुलं घातलेली आहेत. ताहितीयन प्रथेप्रमाणे लग्नाला आलेल्या तरूणी डोक्यात तिअरची फुले घालून सजतात. गोगँने हे पेंटींग त्याच्या हयातीत एका प्रदर्शनात पाठवताना त्याची किंमत फक्त १५०० फ्रँक एवढी ठेवली होती. पण तरीही त्याकाळी ते विकले गेले नाही. शेवटी १९१७ मध्ये जिनीव्हा मधील एका प्रदर्शनात स्टॅचेलीन नामक युरोपियन संग्राहकाने ते विकत घेतले. शंभर वर्षांनी २०१५ मधील एका लिलावात त्याच्या वारसदारांनी ते विकायला काढले तेव्हा एका अरब शेखने (कतार म्युझियम) ते २१० दशलक्ष यूएस डॉलरला विकत घेतले. एखाद्या पेंटींगला तो पर्यंत मिळालेली ती सर्वोच्च किंमत होती.
8.  प्रकरण 56 - गोगँ सिम्बिलिस्ट चित्रकारांमधील एक प्रमुख चित्रकार होता. तसेच पुढे प्रिमिटीव्हीजम आणि सिन्थेसिस्ट या नावाने ओळखू लागलेल्या शैलींचा तो प्रणेता होता. Where Do We Come From? What Are We? Where Are We Going? ही पॉल गोगँची सर्वात महत्वाची आणि गाजलेली दृष्टांतात्मक कलाकृती. ह्या प्रचंड आकाराच्या पेंटींगमध्ये पॉल गोगँला जे काही सांगायचे होते ते त्याने सांगितल आहे असं त्याने स्वत:च लिहून ठेवले आहे. हे पेंटींग करून झाल्यावर माझा मृत्यु होईल असं त्याने जाहीर केलं होतं. पॉल गोगँच्या इतर महत्वाच्या पेंटींग विषयी अधिक माहिती माझ्या ब्लॉगवरील नेव्हरमोअर (मौज दिवाळी 2014) या लेखामध्ये मिळेल. Please click  underlined link to view

मून अँड सिक्सपेन्स – ५८


ताहितीतून जायची माझी वेळ आली. बेटावरच्या प्रथेप्रमाणे ज्या व्यक्तिंशी माझा परिचय झाला होता आणि संबंध आला होता त्या सर्वांनी मला काहीना काही तरी अहेर केला. नारळाच्या झावळ्यांनी विणलेल्या टोपल्या, गवती चटया, शोभेचे पंखे. तिअरने मला तीन मोती आणि स्वत:च्या गुबगुबीत हातांनी केलेला पेरूचा गोड मुरांबा दिला होता. वेलिंग्टनहून सॅन फ्रॅन्सिस्कोला टपाल घेऊन जाणाऱ्या बोटीचा ताहितील चोवीस तासांचा मुक्काम आटोपल्यावर परत जाताना भोंगा वाजवला. तिअरने मला तिच्या भरदार छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिचे लालचुटुक ओठ माझ्या ओठांवर टेकले. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आमची बोट लगून मधून बाहेर पडली. खडकांच्या रांगांमधून मोठ्या कौशल्याने सुकाणू हाकत खुल्या समुद्रात आली आणि मला दाटून आलं. वातावरणात अजूनही जमिनीवरचा सुखद सुगंध दरवळत होता. ताहिती खूप दूर आहे. मला कधीही परत यायला मिळणार नाही याची मला खात्री होती. माझ्या आयुष्यातील एक प्रकरण संपलं आणि मला अटळ मृत्यु जवळ आल्यासारखं वाटलं.
मी एका महिन्यात लंडनला पोचलो. माझी निकडीची कामं आटोपली. मिसेस स्ट्रिकलँडला तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षांची माहिती जाणून घेण्यात रस असेल असं मला वाटलं. म्हणून मी तिला पत्र लिहीलं. युद्धापूर्वी बऱ्याच वर्षात आमची भेट झाली नव्हती म्हणून टेलीफोनच्या डिरेक्टरीतून मी तिचा पत्ता मिळवला. तिने भेटीची वेळ दिली. मी कॅम्पडेन हिलवरच्या तिच्या छोट्या घराचा पत्ता शोधून काढला. ती आता साठ वर्षांची झाली होती, पण तिचं वय दिसून येत नव्हतं. कोणालाही ती फार तर पन्नास एक वर्षांची वाटली असती. तिचा चेहेरा लहान होता, त्यावर फारशा सुरकुत्या नव्हत्या. अशा चेहेऱ्याच्या माणसांचं वय दिसून येत नाही. त्यामुळे ती तरूण असताना खूप सुंदर असावी असं वाटायचं. तिचे फारसे न पिकलेले केस तिने व्यवस्थित विंचरले होते. तिने घातलेला काळा गाऊन आधुनिक फॅशनचा होता. तिची बहीण मिसेस मॅक-अँड्र्यु तिच्या नवऱ्यापेक्षा दोन वर्ष जास्त जगली होती आणि त्यानंतर तिने तिचा पैसा मिसेस स्ट्रिकलँडच्या नावे केला होता ते ऐकल्याचं मला आठवलं. तिच्या घराची सजावट आणि दरवाजा उघडणाऱ्या शिडशिडीत नोकराणीला बघून तिचं एकंदरीत बरं चालंल असावं असं दिसत होतं.
नोकराणीने मला बैठकीच्या खोलीत नेलं तेव्हा तेथे एक पाहुणा अगोदरच बसला होता. तो कोण आहे हे मला कळलं तेव्हा मला त्याच वेळी बोलावण्यात तिचा काही तरी हेतू असला पाहिजे याचा सुगावा लागला. तेथे आलेल्या अमेरीकन पाहुण्याचं नाव व्हॅन ब्युश्च टेलर असं होतं. मिसेस स्ट्रिकलँडने हसत हसत त्याची माहिती मला दिली.
‘‘आम्ही इंग्लीश लोक अगदी बावळट असतो. मला माफ करा हं, मला तुमच्याबद्दल यांना थोडं सांगायचं आहे.’’ असं बोलून ती माझ्याकडे वळली. ‘‘मि.व्हॅन ब्युश्च टेलर हे एक मोठे अमेरीकन समीक्षक आहेत. यांनी लिहीलेली पुस्तकं आपण जो पर्यंत वाचत नाही तो पर्यंत आपल्या शिक्षणाला काही अर्थ नाही. यांना चार्लींवर काही तरी लिहायचं आहे. त्यासाठी ते माझी मदत मागायला आले आहेत.’’
मिस्टर व्हॅन ब्युश्च टेलर हा एक बारीक चणीचा, हडकुळा आणि टकल्या माणूस होता. त्याच्या निस्तेज चेहेऱ्यावर सुरकुत्या होत्या. त्याच्या मोठ्या डोक्यापुढे त्याचा चेहेरा लहान दिसत होता. तो शांत आणि अतिशय नम्र होता. त्याच्या बोलण्यात न्यु इंग्लंडची झाक होती. त्याच्या आविर्भावावरून तो अगदी शांत प्रवृत्तीचा असावा असं दिसत होतं. हा का बरे स्ट्रिकलँडवर लिहीण्याच्या फंदात पडला असावा असा मला प्रश्न पडला. तिने ज्या हळूवारपणे तिच्या नवऱ्याचा उल्लेख केला होता त्याने माझं कुतुहल चाळवलं. त्या दोघांचं बोलणं चालू असताना आम्ही ज्या बैठकीच्या खोलीत बसलो होतो त्या वरून मी एक नजर फिरवली. काळाप्रमाणे मिसेस स्ट्रिकलँड बदलली होती. अ‍ॅशले गार्डनमधल्या तिच्या घराच्या सजावटीत वापरलेला मॉरीस वॉल-पेपर येथे नव्हता, क्रेटनचे फुलाफुलांचे पडदे गायब झाले होते, भिंतीवर फ्रेम करून लावलेले अरुंडेल प्रिंट नव्हते. त्या ऐवजी तिच्या घराच्या भिंतींना छानपैकी रंग लावलेला होता. तिने घराला लावलेल्या रंगाची छटा प्रचलित व्हायला प्रशांत महासागराच्या दक्षिणेला असलेल्या हजारो मैलावरील एका लहानशा बेटावरचा एक चित्रकार कारणीभूत झाला होता याची तिला कल्पना होती का असा मला प्रश्न पडला. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिने स्वत:च दिलं.
‘‘काय सुंदर उशा आहेत या,’’ मि.व्हॅन ब्युश्च टेलर म्हणाला.
‘‘तुम्हाला आवडल्या का?’’ ती हसत म्हणाली. ‘‘बाक्स्ट या रशियन डिझाईनरच्या आहेत.’’
आणखी एक गोष्ट होती. बर्लिनच्या एका चित्रविक्रेत्याने छापलेले स्ट्रिकलँडच्या चित्रांचे फ्रेम केलेले प्रिंट भिंतीवर लावलेले होते.
‘‘तुम्ही त्या चित्रांकडे बघत आहात का,’’ माझ्या नजरेकडे बघत ती म्हणाली. ‘‘अर्थात मूळ चित्रं काही मला परवडण्यासारखी नाहीत. कमीत कमी प्रिंट तरी आहेत. प्रकाशकांनी आपण होऊन मला पाठवून दिले. आता त्यावरच मी समाधान मानायचं ठरवलं आहे.’’
‘‘घरात असे प्रिंट फ्रेम करून लावल्यावर किती बरं वाटतं.’’ मि.व्हॅन ब्युश्च टेलर म्हणाला.
‘‘मुळात ते किती सुंदर आहेत.’’
‘‘माझ्या मते शोभादायकता हे कलेच्या महानतेचं प्रमुख लक्षण आहे.’’ मि.व्हॅन ब्युश्च टेलर म्हणाला.
भिंतीवरच्या चित्रात एक नग्न स्त्री मांडीवरच्या मुलाला दुध पाजत होती, त्यांच्या बाजूला गुडघे टेकून असलेल्या मुलगी तिच्या हातालं फुल दुसऱ्या एका मुलाला दाखवत होती. एक सुरकुत्या पडलेली जख्खड म्हातारी त्यांच्याकडे बघत होती. स्ट्रिकलँडने कुटुंबव्यवस्थेचे पावित्र्य त्याच्या दृष्टीतून त्यात दाखवलं होतं. ते चित्र काढण्यासाठी त्याने तारावाओमधल्या आपल्या घराचा उपयोग केला असावा. ती स्त्री आणि मूल म्हणजे आटा आणि त्याचा मोठा मुलगा. मिसेस स्ट्रिकलँडला हे कितपत माहित असेल असा प्रश्न मला पडला.
संभाषण पुढे चालू राहिलं. मिस्टर व्हॅन ब्युश्च टेलरने अडचणीचे वाटतील असे विषय ज्या खुबीने टाळले त्याला तोड नव्हती. एकही असत्य शब्द न बोलता मिसेस स्ट्रिकलँड आडवळणाने तिचे आणि नवऱ्याचे संबंध कसे चांगले होते हे ज्या कौशल्याने सुचवत होती त्याला दाद दिलीच पाहिजे. सरते शेवटी मिस्टर व्हॅन ब्युश्च टेलर जायला उठला. यजमानीण बार्इंशी आदराने वाकून त्याने हस्तांदोलन केलं. औपचारीकतेचं काटेकोर पालन करत त्याने आभार मानले आणि तो निघून गेला.
‘‘तुम्हाला त्याचा कंटाळा तर आला नाही ना,’’ दरवाजा बंद झाल्यावर तिनं विचारलं. ‘‘कधी कधी याचा खूप त्रास होतो, पण काय करणार, चार्ली विषयी जेवढी माहिती मला देता येईल ती देणं मला भाग आहे. एका प्रतिभावान कलाकाराची पत्नी म्हणून ते माझं कर्तव्यच आहे.’’
तिने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं. वीस वर्षांपूर्वी तिचे डोळे जेवढे सुंदर आणि प्रेमळ होते तेवढेच आजही होते. ती मला मूर्ख तर बनवत नसावी असा मला संशय आला.
‘‘तुम्ही तुमचा व्यवसाय बंद केला असेलच, नाही का.’’ मी विचारलं.
‘‘केव्हाच,’’ तिने एका क्षणात उडवून लावलं. ‘‘तो व्यवसाय मी वेळ घालवायचा एक छंद म्हणून करत होते. माझ्या मुलांनी सांगितलं की तू स्वत:ला उगाच खूप त्रास करून घेत आहेस. त्यांनी मला तो व्यवसाय विकून टाकायला सांगितलं.’’
संसार चालवण्यासाठी आपण कधीतरी कष्ट उपसले होते ही तिला कमीपणा आणणारी गोष्ट ती पूर्णपणे विसरून गेली होती. उच्चकुलीन स्त्रीने दुसऱ्याच्या कमाईवर जगणं यातच तिची इज्जत असते असं तिला मनापासून वाटत होतं.
‘‘आता मुलं आली आहेत,’’ ती म्हणाली. ‘‘त्यांच्या वडिलांच्या आठवणी त्यांना तुमच्या तोंडून ऐकायला फार आवडेल. रॉबर्ट तुम्हाला आठवतो ना? मिलीटरी क्रॉससाठी त्याच्या नावाची शिफारस झाली आहे हे सांगायला मला किती बरं वाटतंय.’’
ती दरवाजात गेली आणि तिने त्यांना बोलावलं. खाकी वर्दीतील एक उंच, देखणा, रूबाबदार तरूण आत आला. त्याचे कपडे अगदी कडक इस्त्रीचे असले तरी त्याचे डोळे लहानपणी होते तसे निर्मळ होते. त्याच्या मागोमाग त्याची बहिण आली. तिच्या आईची आणि माझी ओळख झाली तेव्हा ती ज्या वयाची होती तेवढ्याच वयाची ती असावी. ती दिसायलाही तिच्या सारखीच होती.
‘‘मला वाटतं तुम्हाला फारसं आठवत नसेल,’’ मिसेस स्ट्रिकलँड अभिमानाने म्हणाली. ‘‘माझी मुलगी आता मिसेस रोनाल्डसन आहे. तिचा नवरा गनर्समध्ये मेजर आहे.’’
‘‘त्यांना शिपाईगिरी एवढी आवडते की ते पक्के शिपाईगडी होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच ते आतापर्यंत फक्त मेजरच राहिले.’’ मिसेस रोनाल्डसन आनंदाने म्हणाली.
ती सैन्याधिकाऱ्याशीच लग्न करेल अशी मला केव्हापासून अटकळ होती. तसं होणं अटळ होतं. अधिकाऱ्याच्या पत्नीत असावे लागतात ते सर्व गुण तिच्यामध्ये होते. ती मनमिळाऊ, चारचौघात वावरणारी होती. पण आपण इतरांसारखे नाही हे ती लपवू शकत नसे. रॉबर्ट आनंदी आणि खेळकर होता.
‘‘तुम्ही आलात तेव्हा मी नशीबाने लंडनमध्ये आहे. मला फक्त तीन दिवसांची रजा मिळाली आहे.’’ तो म्हणाला.
‘‘तो परत रूजू व्हायला तळमळत आहे,’’ त्याची आई म्हणाली.
‘‘मला कबूल करायला हरकत नाही. आघाडीवर माझा वेळ मजेत जातो. माझे भरपूर दोस्त आहेत. तेथलं जीवन अगदी उत्कृष्ट असतं. अर्थात युद्ध आणि तशा गोष्टी म्हटल्या की त्या केव्हाही भयंकरच असतात. पण त्यात माणूस तावून सुखालून निघतो आणि त्याच्यातील सर्वोच्च गुण बाहेर येतात हे नाकरण्यात अर्थ नाही.’’
त्यानंतर चार्ल्स स्ट्रिकलँडची जी माहिती मला ताहितीत कळली होती ती सर्व माहिती मी त्यांना सांगितली. आटा आणि तिच्या मुलांबद्दल त्यांना सांगण्यची आवश्यकता आहे असं मला वाटलं नाही. पण बाकी सगळं जितक्या अचूकपणे मला सांगता आलं तितकं मी सांगितलं. त्याच्या शोचनीय मृत्युबद्दल सांगून झाल्यानंतर मी थांबलो. एक दोन मिनीटं आम्ही शांत होतो. नंतर रॉबर्ट स्ट्रिकलँडने काडी ओढून सिगारेट शिलगावली.
‘‘दैवगती किती विचित्र असते. देवाघरच्या न्यायाला उशीर होतो पण जेव्हा न्याय मिळतो तेव्हा हिशेब पूर्णपणे चुकता होतो.’’
हे अवतरण पवित्र बायबल मधलं असावं या समजाने मिसेस स्ट्रिकलँड आणि मिसेस रोनाल्डसन या मायलेकींची नजर जमिनीवर खिळली होती. रॉबर्ट स्ट्रिकलँडचाही तसा समज नसेलच याची मला खात्री नव्हती. मला स्ट्रिकलँडला आटापासून झालेल्या मुलाची त्यावेळी का आठवण झाली ते सांगता येणार नाही. तो एक सळसळत्या उत्साहाचा आनंदी तरूण आहे असं मला ताहितीत समजलं होत. तो ज्या जहाजावर नोकरी करत होता त्याच्या डेकवर तो फक्त डुंगरी-अर्धी विजार घालून उभा आहे असं चित्र मी मनातल्या मनात रंगवलं. रात्रीच्या वेळी जहाज मंद वाऱ्यावर संथपणे मार्गक्रमण करत असताना खलाशी वरच्या डेकवर गोळा झालेले आहेत. कॅप्टन पाईप ओढत आरामखुर्चीत पहुडला आहे. त्या वेळी कॉन्सर्टिनाच्या खरखर करणाऱ्या संगीताच्या तालावर तो मुलगा स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन मुक्तपणे नृत्य करत आहे. डोक्यावरच्या काळ्याशार आकाशात तुरळक तारे लुकलुकत आहेत, सभोवती प्रशांत महासागराचा अथांग विस्तार पसरला आहे.
बायबल मधलं एक अवतरण माझ्या ओठांवर आलं पण मी स्वत:ला आवरलं. कारण माझ्यासारख्या पामराने धर्मगुरूंच्या राखीव कुरणात प्रवेश केला असता तर त्यांना ती इश्वरनिंदा झाल्यासारखं वाटलं असतं. माझे हेन्री काका गेले सत्तावीस वर्ष व्हिस्टेबलचे पाद्री आहेत. ते म्हणायचे की सैतान देखील त्याचा फायदा होणार असेल तर बायबलमधील अवतरण द्यायला कमी करणार नाही. ज्या काळी एतद्देशीय माणसं पैशाला पासरी मिळत असत ते दिवस अजून त्यांच्या लक्षात आहेत.

Paul Gauguin
BIRTH 7 Jun 1848 Paris, City of Paris, Île-de-France, France
DEATH 8 May 1903 Atuona, Marquesas Islands, French Polynesia
BURIAL  Atuona Cemetery  Atuona, Marquesas Islands, French Polynesia

Notes: Three plaster casts of the Oviri figure were made, of which one now belongs to the Musée départemental du Prieuré in Saint-Germaine-en-Laye. This was used to make a series of bronze casts, one of which was placed on Gauguin's grave in Atuona.



मून अँड सिक्सपेन्स – ५७


तेवढ्यात मादाम कोत्रास आल्याने आमच्या गोष्टीत खंड पडला. वाऱ्याने तट्ट फुगलेल्या शिडाच्या जहाजासारखी ती आमच्या बैठकीत शिरली. तिचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. ती उंच आणि स्थूल होती. तिने घातलेल्या घट्ट कॉर्सेट मुळे तिचा लठ्ठपणा अधिक उठून दिसत होता. तिचं नाक बाकदार होतं. एकावर एक आलेल्या तीन हनुवट्यांनी तिची मान झाकली गेली होती. उष्ण कटीबंधातील लोकांत असते तशी मरगळ अजून तिच्या अंगात आलेली दिसत नव्हती. किंबहुना थंड प्रदेशातील लोकांपेक्षा ती जास्तच उत्साही दिसत होती. ती प्रचंड बडबडी असावी. कारण आल्याबरोबर तिने त्या दिवसभरातल्या घटना आणि त्यावरची तिची मतं घडाघडा सांगायला सुरवात केली. आम्ही जे बोलत होतो ते कुठल्या कुठे मागे पडलं.
डॉ. कोत्रास माझ्याकडे वळून म्हणाले.
‘‘स्ट्रिकलँडने दिलेलं पेंटींग अजून माझ्याकडे आहे. तुम्हाला बघायचं आहे का?’’
‘‘अलबत.’’
आम्ही उठलो. त्यांच्या मागोमाग व्हरांड्यातून जाताना आम्ही त्यांच्या बागेतील रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी थांबलो.
‘‘स्ट्रिकलँडने पाना फुलांच्या ज्या विलक्षण आकारांचं त्याच्या घराच्या भिंतीवर चित्रण केलं होतं ते बरेच दिवस माझ्या मनात घोळत होतं.’’ डॉक्टर विचार करून म्हणाले.
माझ्याही मनात तोच विचार होता. स्ट्रिकलँडने स्वत:चं संपूर्ण अस्तित्वच त्यात पणाला लावलेलं होतं. ही त्याची शेवटची संधी आहे हे त्याला ठाऊक होतं. त्याला जीवनासंबंधी जे सांगायचं होतं ते सगळं त्याने त्याच्या कलाकृतीत ओतलं होतं. त्याला जे समाधान हवं होतं ते त्याला मिळालं असावं याची मला खात्री होती. त्याला ज्या शक्तिने झपाटलं होतं त्यातून तो मुक्त होऊन त्याचा अतृप्त आत्मा शेवटी शांत झाला असावा.
जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्यावर आलेल्या मृत्युचा स्वीकार त्याने आनंदाने केला असावा.
‘‘चित्राचा विषय काय आहे?’’
‘‘मला सांगता येणार नाही. तो विलक्षण आणि अद्भूत आहे. या विश्वाची सुरवात कशी झाली असावी याची कल्पना त्यात केली आहे. एडनची बाग, आदम आणि इव्ह. क्वी सेज - किंवा तसंच काही तरी. मानवाकृतीतील ते एक काव्य आहे. स्त्री पुरूष आणि त्याचं निसर्गप्रेम, कामवासना आणि उदात्तीकरण, सौंदर्य आणि क्रौर्य. नग्नतेतील आदिम सहज-प्रवृत्ती पाहिली की भिती वाटू लागते कारण ते आपलंच प्रतिबिंब असतं.’’
‘‘अवकाश आणि काळाची अनंतता. त्याची चित्रं पाहिल्यानंतर माझ्या रोजच्या पाहाण्यातल्या ताड-माड, वड, केळी, पळस या सारख्या वृक्षवल्लींचे आकार आणि रंग मला वेगळेच दिसायला लागले. एवढंच नव्हे तर गंधही बदलले. चित्र काढताना कॅनव्हासवर उतरवलेला आकार आणि रंग मला प्रत्येक वेळी वेगळा वाटतो ही किमया अद्भूतच म्हटली पाहिजे. काही तरी दैवी शक्तिचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही.’’
डॉ. कोत्रासनी खांदे उडवले आणि ते हसले.
‘‘तुम्ही मला हसाल. मी जडवादी आहे. त्यात माझा हा असा अवतार, जाड्या ढोल. काव्यातील तरलता माझ्या तोंडी शोभत नाही. पण मी एवढा भारावून जाईन असं चित्र, कलाकृती मी या पूर्वी पाहिली नव्हती. तेने... एक मिनीट थांबा. मी रोममध्ये सिस्टीन चॅपेल बघायला गेलो होतो तेव्हा माझ्या मनात अशाच भावना आल्या होत्या. तेव्हासुद्धा ज्या कलाकाराने त्या भव्य घुमटावर चित्रं रंगवली त्या कामाच्या भव्यतेतील दिव्यत्त्वाच्या जाणीवेने माझा थरकाप उडाला होता. त्याच्या समोर माझं अस्तित्व क्षुल्लक होतं. पण मायकेल अँजेलोच्या थोरवीची आपल्याला कल्पना असते त्यामुळे आपण एवढे दचकून जात नाही. पण तारावाओच्या जंगलातील, नागरी संस्कृती पासून हजारो मैल दूर, एका आदिवासीच्या झोपडीत तुम्हाला असं काही बघायला मिळतं तेव्हा त्याचा तुम्हाला केवढा धक्का बसतो. मायकेल अँजेलो हाती पायी तरी धड होता, चर्चचा त्याला पाठिंबा होता. पण इथे ज्याच्या हाताची बोटं झडून गेली आहेत, डोळ्यांच्या खाचा झाल्या आहेत, समोर मृत्यु उभा ठाकला आहे, सर्वांनी ज्याला बहिष्कृत केलं आहे अशा कलाकाराने तेवढीच भव्य आणि दिव्य कलाकृती निर्माण केली होती या विचाराने तुमचा थरकाप उडतो. तुमचं क्षुल्लक अस्तित्व अर्थहीन होऊन जातं. त्यामुळेच त्या कलाकृती नष्ट झाल्या तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही.’’
‘‘नष्ट झाल्या?’’ मी ओरडलो.
‘‘मे उई - होय. तुम्हाला माहित नव्हतं?’’
‘‘कसं ठाऊक असणार? या कामाविषयी मी फारसं काही ऐकलं नव्हतं. पण असं काही असलंच तर ते एखाद्या खाजगी संग्राहकाच्या हाती पडलं असेल असं मला वाटत होतं. अजून तरी स्ट्रिकलँडच्या पेंटींगची अधिकृत यादी कोणी बनवलेली नाही.’’
‘‘तो जेव्हा आंधळा झाला तेव्हा तो त्या दोन खोल्यात जाऊन त्याने रंगवलेल्या भित्तीचित्रांकडे तासन् तास त्याच्या दृष्टीहीन डोळ्यांनी बघत बसायचा. कदाचित त्याला आयुष्यात जे दिसलं नसेल ते त्याला आता दिसत असेल. आटा म्हणाली की त्याच्या नशीबी जे आलं होतं त्याबद्दल त्याची कसलीही तक्रार नसायची. त्याचा धीर कधीही सुटला नव्हता. शेवट पर्यंत त्याचं मन शांत होतं. पण त्याने तिच्याकडून एक वचन घेतलं होतं की त्याला पुरून झाल्यानंतर - मी तुम्हाला सांगितलं होतं का की त्याची कबर मी माझ्या हातांनी खोदली. गावातील कोणीही त्या संसर्गीत घराच्या जवळ यायला तयार नव्हतं. आटा आणि मी मिळून दोघांनी त्याला पुरलं. तीन परेओ एकत्र शिवून केलेलं प्रेतवस्त्र पांघरून त्याला आंब्याच्या झाडाखाली पुरलं. त्याने तिच्याकडून वचन घेतलं होतं की त्याला पुरून झाल्यानंतर ती त्यांचं घर संपूर्णपणे जाळून टाकेल, एक काडीही शिल्लक राहिली नाही याची खात्री करून नंतरच तेथून जाईल.’’
थोडा विचार करून झाल्यावर मी म्हणालो:
‘‘तो शेवट पर्यंत बदलला नाही.’’
‘‘तिला घर जाळण्यापासून परावृत्त करणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं.’’
‘‘तुम्ही जे सांगितलं त्या नंतरसुद्धा तुम्हाला असं वाटलं.’’
‘‘होय. कारण ती झोपडी एका प्रतिभावान कलाकाराची असामान्य कलाकृती आहे याची मला कल्पना होती. जगाला या कलाकृती पासून वंचित ठेवण्याचा कोणताही हक्क आपल्याला पोचत नाही. पण आटा माझं ऐकायला तयार नव्हती. त्या रानटी कृत्याचा साक्षीदार होण्याची माझी इच्छा नव्हती. तिने ते जाळून टाकलं हे मला मागाहून कळलं. तिने लाकडी तक्तपोशी आणि गवती चटयांवर पॅराफिन टाकलं आणि त्याला आग लावली. थोड्याच वेळात आगीच्या ज्वाला भडकल्या आणि त्या आगीत त्या महान कलाकृतींचा मागमूसही शिल्लक राहिला नाही.’’
‘‘मला वाटतं स्ट्रिकलँडला आपण महान कलाकृती निर्माण केली आहे याची कल्पना असावी. त्याला जे हवं होतं ते त्याने मिळवलं होतं. त्याचं आयुष्य सफल झालं होतं. त्याने आपल्या प्रतिभेने एक वेगळं जग निर्माण केलं. गर्वाने आपल्या निर्मितीकडे एकदा पाहून झाल्यानंतर त्याने ते तुच्छतेने नष्ट केलं.’’
‘‘माझ्याकडचं पेंटींग तर तुम्हाला दाखवतो.’’ डॉ. कात्रोस म्हणाला.
‘‘आटा आणि त्या मुलाचं काय झालं?’’
‘‘ते मार्क्वेजला गेले. तेथे तिचे काही नातेवाईक राहतात. मी ऐकलंय की तो मुलगा कॅमेरूनच्या जहाजावर काम करतो. लोक म्हणतात की दिसायला तो अगदी त्याच्या वडिलांसारखा आहे.’’
व्हरांड्यातून कन्सल्टींग रूमकडे जाणाऱ्या दरवाजात ते थबकले आणि हसत म्हणाले, ‘‘हे एक फळांचं चित्र आहे. डॉक्टरच्या कन्सल्टींग रूममध्ये लावण्यात तसा अर्थ नाही. पण माझी बायको मला ते दिवाणखान्यात लावू देत नाही. तिच्या मते ते अश्लील आहे.’’
‘‘फळांचं चित्र आणि अश्लील!’’ मी आश्चर्याने ओरडलो.
आम्ही आत गेल्यावर ताबडतोब माझं त्या चित्राकडे लक्ष गेलं. मी ते बराच वेळ बघत होतो.
त्या चित्रात आंबे, केळी आणि संत्र्यांचा एक ढीग दाखवला होता. पहिल्या दृष्टीक्षेपात ते एक सामान्य निरागस चित्र वाटतं. पोस्ट-इंप्रेशनीस्टांच्या प्रदर्शनात सर्वसामान्य माणसाला ते चांगलं वाटलं असतं पण पोस्ट-इंप्रेशनीस्टांचं म्हणता येईल असं एखादं वैशिष्ट्य काही त्यात सापडलं नसतं. पण प्रदर्शन बघून झाल्यानंतरही कदाचित ते लक्षातही राहिलं असतं, पण का लक्षात राहिलं ते सांगता आलं नसतं. ते अगदिच विसरणं कठीण होतं.
त्यात वापरलेले रंग अगदी अनोखे होते. विशेषत: लेपिझ लझुली – फिरदोसीच्या रत्नप्रभेची आठवण करून देणारा निळा रंग. त्या रंगाने जागृत होणाऱ्या भावना शब्दाने वर्णन करून सांगणं कठीण होतं. मध्येच सडलेल्या मांसासारख्या दिसणारा जांभळा रंग – रोमन सम्राट हेलिओगॅब्युलसच्या दुष्कृत्यांची आठवण करून देणारा – आणि लाल रंगांच्या असंख्य छटा,  चेरीची आठवण करून देणाऱ्या लालचुटुक रंगाने तर इंग्लंडमधील नाताळ, बर्फवृष्टी आणि मुलांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहीची आठवण यावी. तर मध्येच बर्फासारखा, कबुतराच्या छातीसारखा वरखाली होणारा, शुभ्र पांढरा. डोंगरातून वाहत येणाऱ्या निर्झराच्या हिरव्या रंगात बुडलेला जर्द पिवळा. अ‍ॅडमने इव्हला दिलेल्या सफरचंदाची आठवण करून देणारी ही पॉलिनेशियाच्या मळ्यात बहरलेली रसाळ फळं. त्यांची चव चाखणाऱ्याला एक मोठा धोका अजाणता पत्करावा लागला असता. फळ खाणारा एक तर देवत्वाला जाऊन पोचला असता नाही तर पशुत्वाला. जाणतअजाणता असा धोका पत्करण्यामधेच मनुष्यपण असतं. ज्ञानवृक्षावरील चांगलं फळ कोणतं आणि वाईट फळ कोणतं हे चाखल्या शिवाय कसं कळणार.
चित्र बघून झाल्यावर मी बाजूला वळलो. स्ट्रिकलँडबरोबर त्याची गुपितंही त्याच्या कबरीत गाडली गेली आहेत असं मला वाटलं.
‘‘व्होयाँ, रेने, मॉन अ‍ॅमी, रेने मी आले,’’ मादाम कात्रोसची मोठ्याने मारलेली हाक ऐकू आली. ‘‘इतका वेळ तिकडे काय करत आहात? अ‍ॅपरीतीफ तयार आहेत. क्विनक्विना ड्युबोनेटचा एक एक पेला घ्यायला येता का, मस्यना विचारा.’’
‘‘व्हॉलंतीर, मादाम. मी आलोच,’’ मी उत्तर दिलं आणि व्हरांड्यात गेलो.
माझी तंद्री भंग पावली.

Paul Gauguin, Fruits, 1888
Oil on canvas, 58x43 cm
Pushkin Museum, Moscow


Friday, February 16, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५६


आणखी दोन वर्ष गेली. कदाचित तीन असतील. ताहितीत दिवस कसे जातात ते कळतच नाही. मोजदाद ठेवायला कठीण जातं. पण एके दिवशी स्ट्रिकलँड अखेरच्या घटका मोजतोय असा निरोप आला. आटाने पपीएतला टपाल घेऊन येणाऱ्याला सरळ डॉक्टरांकडे निरोप द्यायला बजावून ठेवले होते. पण जेव्हा निरोप आला तेव्हा डॉक्टर बाहेर गेले होते. निरोप कळला तेव्हा खूप रात्र झाली होती, म्हणून डॉक्टर पहाटेच निघाले. तारावाओला पोचायला दुपार झाली होती. त्यांना सात किलोमीटर पुन्हा एकदा पायी तुडवत जायचं होतं पण ती त्यांच्या आयुष्यातील ती शेवटची पायपीट होती. रस्त्यात झाडोरा खूप वाढला होता. आता या पुढे बरीच वर्ष तरी या रस्त्यावरून कोणी जाण्याची शक्यता दिसत नव्हती. रस्ता अधिकच दुस्तर झाला होता. वाटेत वारंवर अडथळे येत होते. कधी ओढ्याच्या पाण्याला खेच, तर कधी वाटेत माजलेलं तण. कधीकधी काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत होता. वाट काढताना डोक्यावर लटकणाऱ्या मधमाशांच्या पोळ्यांचीही काळजी घ्यावी लागत होती. कसं ही असो, पण त्या अंतर्भागातील शांतता मोठी विलक्षण होती.
शेवटी ते मोडकळीला आलेलं घर आलं आणि त्यांनी एक निश्वास टाकला. इथेसुद्धा ती असह्य शांतता होती. एक लहान मुलगा उन्हात खेळत होता. त्यांची चाहूल लागल्यावर तो पळून लांब गेला. डॉ. कोत्राना संशय होता की झाडामागे लपून तो पहात असावा. त्या मुलाच्या लेखी अनोळखी माणूस म्हणजे शत्रू. दरवाजा सताड उघडा होता. त्यांनी हाक मारली पण कोणीच ओ दिली नाही. तो आत गेला आणि त्यांनी दार ठोठावलं. त्यांनी आत पाऊल टाकलं. जी दुर्गंधी येत होती त्याने त्यांच्या पोटात ढवळून आलं. त्यांनी नाकाला रूमाल लावला आणि धीर करून आत पाऊल टाकलं. आत अंधूक प्रकाश होता. बाहेरच्या लख्ख उन्हातून आल्यामुळे सुरूवातीला त्यांना काही दिसत नव्हतं. थोडा वेळाने सरावल्यानंतर त्यांना आपण कुठे आहोत तेच कळेना. एका अनोख्या विस्मयकारक विश्वात त्यांनी प्रवेश केला होता. प्रचंड वृक्षवेलींचे प्राचीन अरण्य आणि त्यात मुक्त विहार करणारे नग्न आदिवासी स्त्री पुरूष. नंतर त्यांना कळलं की ते भिंतींवर रंगवलेलं चित्र आहे.
‘‘माँ दयू, अरे देवा मला वाटलं की उन्हाने डोळे दिपल्यामुळे मला भास होतोय.’’ ते स्वत:शीच पुटपुटले.
त्यांना कोपऱ्यात काहीतरी हालचाल दिसली. आटा उकीडवी बसून मुकपणे रडत होती.
‘‘आटा, आटा.’’ त्यांनी हळूच हाक मारली.
तिचं लक्ष नव्हतं. तो घाणेरडा दर्प पुन्हा त्यांच्या नाकात घुसला. त्यांना भोवळ येईल असं वाटलं. त्यांनी चिरूट शिलगावला. त्यांची नजर अंधाराला सरावली. त्या भिंतींवर रंगवलेली चित्रं पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांना चित्रकलेतील काही कळत नव्हतं. पण त्या चित्रात असं काही विलक्षण होतं की त्याने त्यांना झपाटल्यासारखं झालं. जमिनी पासून छप्परापर्यंत निसर्गातील विवीध घटकांच्या वेगवेगळ्या रचना केल्या होत्या. त्यातील गूढ सौंदर्य केवळ अवर्णनीय होतं. त्यांच्या भावना उचंबळून आल्या. विश्वाच्या निर्मीतीचं रहस्य कळल्यामुळे एकाच वेळी ते आनंदित आणि भयकंपित झाले. निसर्गाच्या छुप्या रहस्यांचा शोध आपल्या प्राणांची बाजी लावून घेतलेल्या एका माणसाचं ते काम होतं. ज्या गोष्टींचं ज्ञान त्याला व्हायला नको होतं अशा गोष्टी त्याने पापापुण्याची पर्वा न करता जाणून घेतल्या होत्या. हे काही तरी अमानवी असावं अशी अंधूक शंका त्यांना आली.
‘‘माँ दयू, अरे देवा हा तर प्रतिभेचा अस्सल आविष्कार!’’ त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
त्यांची नजर दुसऱ्या कोपऱ्यातल्या गवती बिछान्याकडे गेली. तेथे त्यांना सगळे अवयव झडलेल्या स्ट्रिकलँडच्या शरीराची मुटकुळी दिसली. तो केव्हाच मेला होता. ते धीर करून जवळ गेले आणि त्यांनी त्या सडलेल्या देहाकडे वाकून पाहिलं. कोणतरी मागे उभं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांचा थरकाप उडाला. ती आटा होती. ती कधी उठून उभी राहिली ते त्यांना कळलं नव्हतं. ती त्यांच्या मागे उभी राहून ते जे बघत होते ते बघत होती.
‘‘अरे बाप रे, तू मला एवढं घाबरवलंस.’’
त्यांनी चार्ल्स स्ट्रिकलँड नावाच्या माणसाच्या त्या निष्प्राण देहाकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि ते भितीने खचून मागे फिरले.
‘‘तो तर आंधळा होता.’’
‘‘एक वर्ष झालं त्यांचे डोळे गेल्याला.’’

Artist: Paul Gauguin
Title: D'où venons-nous? Que sommes-nous? Où allons-nous?
Where Do We Come From? What Are We? Where Are We Going? 
Date: 1897, Medium: oil on canvas, Dimensions: 139.1 × 374.6 cm (54.8 × 147.5 in)
Current location: Museum of Fine Arts, Boston, Source: wikidata:Q890678


Thursday, February 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स – ५५


डॉ.कोत्राज अवाढव्य शरीराचे एक वयस्कर फ्रेंच गृहस्थ होते. पुढे आलेलं पोट, लालबुंद चेहेरा, पांढरेशुभ्र केस, समाधानाने ओसंडून जाणारे निळे डोळे. त्यांच्याकडे बघताच त्यांची दया येई. त्यांनी आम्हाला घरात घेतलं. त्यांचा दिवाणखाना जुन्या काळातल्या फ्रेंच पद्धतीचा होता. तेथे ठेवलेल्या दोनतीन पॉलीनेशियन शोभेच्या वस्तू घराच्या एकूण फ्रेंच सजावटीत उपऱ्या वाटत होत्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या वागण्यातल्या वरवरच्या आपुलकी मागे असलेला धूर्तपणा लपत नव्हता. त्यांनी कॅप्टन ब्रुनोशी हस्तांदोलन केलं. मादाम ए लेझ आँफाँ, मॅडम आणि त्यांच्या मुलांची नम्रतेनी विचारपूस केली. स्थानिक बातम्या, खोबरं आणि व्हॅनिलाचं पीक अशा गोष्टींवर गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही माझ्या भेटीच्या प्रयोजना विषयी बोलायला सुरूवात केली.
डॉ.कोत्राजांनी जे सांगितलं ते मी त्यांच्या शब्दात न देता माझ्या शब्दात देण्याचा प्रयत्न करणार नाही कारण ते ज्या उत्साहाने सांगत होते ते माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत नीट पोचवणं कठीण आहे. त्यांचा धीरगंभीर आणि खर्जातला आवाज त्यांच्या भव्य देहयष्टीला शोभणारा होता. शिवाय त्यांना नाट्यमयतेची देणगी होती. त्यांचं बोलणं ऐकणं म्हणजे एखादं नाटक बघण्यासारखं होतं आणि तेसुद्धा आपण नेहमी पाहतो त्या नाटकांपेक्षा कितीतरी चांगलं. त्याचं असं झालं की एक दिवस डॉ.कोत्राज गावातील एका म्हाताऱ्या मुखियाला तपासण्यासाठी गेले होते. मग त्यांनी ती सगळी कहाणी सांगितली. मुखियाला तपासताना एक जाडी म्हातारी बाई काळ्या लोकांच्या गर्दीत एका मोठ्या पलंगावर धूम्रपान करत पहुडली होती. तपासून झाल्यानंतर ती डॉक्टरांना जेवणासाठी बाजूच्या खोलीत घेऊन गेली. कच्चे मासे, तळलेली केळी आणि कोंबडी - क्वी सेज - आणि जे काही असेल ते. आँदिजेन – स्थनिक आदिवासी लोकांचं नेहमीचं जेवण. ते जेवत असताना त्यांना एक रडवेली लहान मुलगी दरवाजाआडून त्यांच्याकडे बघताना दिसली. तेव्हा त्याला काही वाटलं नाही, पण नंतर ते त्यांच्या घोडागाडीत बसून घरी जायला निघाले तेव्हा त्यांना ती पुन्हा दिसली. ती एका बाजूला उभी राहून त्यांच्याकडे दु:खद नजरेने बघत होती. तिचे गाल अश्रूंनी भिजले होते. त्यांनी कोणाला तरी तिला काय झालं म्हणून विचारलं. तिच्या घरातला एक गोरा मनुष्य आजारी आहे. त्याला तपासायला याल का हे विचारायला ती जंगलाच्या अंतर्भागातून खूप लांबून आली होती. त्यांनी तिला डॉक्टरांना त्रास देऊ नकोस म्हणून सांगितलं होतं म्हणून ती गप्प होती. त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि तिला काय पाहिजे म्हणून आपण होऊन विचारलं. तिनं सांगितलं की तिला आटाने पाठवलं आहे. आटा हॉटेल डी ला फ्लाऊ मध्ये पूर्वी काम करत होती म्हणून त्यांना माहित होती. तिने डॉक्टरांना तिच्या घरातील रेड वनला तपासायला बोलावलं होतं. तिने त्याच्या हातात वर्तमानपत्राच्या कागदाची एक पुडी दिली. त्यांनी ती पुडी उघडली. त्यात शंभर फ्रँकची एक चुरगळलेली नोट होती.
‘‘हा रेड वन कोण आहे?’’ त्यांनी शेजारच्या माणसाला विचारलं.
त्याने सांगितलं की तो एक इंग्लीश माणूस आहे. तो चित्रकार असून तो आटाबरोबर त्या जंगलात राहतो. त्याचं घर तेथून सुमारे सात एक किलोमीटरवर आहे. त्याने केलेल्या वर्णनावरून तो स्ट्रिकलँड आहे हे डॉक्टरांना कळून चुकलं. पण तेथे जायचं तर चालतच जाणं भाग होतं. त्यांना स्वत:ला तेथे जाणं कठीण असल्यामुळे त्यांनी त्या मुलीला परत पाठवलं.
‘‘मी खरं सांगतो,’’ डॉक्टर माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘खराब रस्त्यावरून चौदा किलोमीटरचा पायी प्रवास करायची मला भिती वाटली, मी त्याच रात्री पपीएतला परत येऊ शकेन याचा खात्री नव्हती. शिवाय स्ट्रिकलँडचं आणि माझं जमत नसे. तो एक आळशी आणि नालायक इसम होता. आमच्या सगळ्यांप्रमाणे मेहनत करून स्वत:ची रोजीरोटी कमावण्याऐवजी तो त्या स्थानिक आदिवासी मुलीच्या जीवावर पोट भरत होता. माँ द्यू - अरे देवा, एक दिवस असामान्य प्रतिभावान कलाकार म्हणून जगभर त्याची किर्ती पसरणार आहे हे मला कळायला काही मार्ग नव्हता. तो माझ्याकडे येऊ शकेल का? मी त्या मुलीला विचारलं. त्याला काय झालं आहे, काय त्रास होतो वगैरे चौकशीही केली. ती काही बोलेना. मी खोदून खोदून विचारलं तर ती खाली बघून रडायला लागली. मी खांदे उडवले. शेवटी मला माझं कर्तव्य पार पाडणं भाग होतं. मी तिला रागानेच रस्ता दाखवायला सांगितलं.’’
ते जाऊन पोचले तेव्हासुद्धा गुश्यातच होते. शिवाय जंगलवाटेने केलेल्या पायपीटीने घामाघूम आणि तहानेने व्याकुळ झाले होते. आटा अर्ध्या रस्त्यात येऊन त्यांची वाट बघत होती.
‘‘मला अगोदर पाणी द्या, तहानेने माझा जीव चाललाय. पुअर लामूर द द्यू - कृपा करून मला एक शहाळं द्या.’’
तिने हाक मारताच एक मुलगा धावत आला. तो सुरकन झाडावर चढला आणि त्याने दोन तीन शहाळी खाली टाकली. आटाने एका शहाळ्याला भोक पाडलं आणि डॉक्टरांना दिलं. शहाळ्याचे पाणी घटाघटा पिऊन एक सिगारेट शिलगावल्यावर त्यांच्या जीवात जीव आला.
‘‘रेड वन कुठे आहे.’’
‘‘ते घरात चित्र काढत आहेत. तुम्ही येणार ते मी त्यांना सांगितलं नव्हतं. आत जा आणि त्यांना तपासा.’’
‘‘त्यांची तक्रार तरी काय आहे? त्यांना जर चित्र काढण्याइतकी ताकद असेल तर तारावाओला यायला त्यांना काय धाड भरली होती. एवढी पायपीट करण्याचा माझा त्रास तरी वाचला असता. त्यांच्या वेळेपेक्षा माझ्या वेळेला कमी किंमत आहे अशातला भाग नाही.’’
आटा एक शब्दही बोलत नव्हती. पण त्या मुलाच्या पाठोपाठ ती घराच्या दिशेने गेली. ज्या मुलीने डॉक्टरांना बोलावून आणलं ती व्हरांड्यात बसली होती. तिथे एक म्हातारी बाई भिंतीला टेकून विड्या वळत बसली होती. आटाने दरवाजाकडे बोट दाखवलं. डॉक्टरांना त्यांच्या विचित्र वागण्याचा अर्थ कळेना. ते आत गेले. स्ट्रिकलँड पॅलेट साफ करत होता. इझलवर एक कॅनव्हास होता. कंबरेला फक्त परेओ गुंडाळलेला होता. तो दरवाजाकडे पाठ करून उभा होता. बुटांचा आवाज ऐकताच तो मागे वळला. त्याच्या नजरेत वैतागल्याचं चिन्ह दिसत होतं. डॉक्टरांना बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्यांचं असं अचानक येणं त्याला आवडलेलं दिसलं नाही. डॉक्टर त्याच्याकडे निरखून बघत होते. त्यांचे पाय जमिनीला खिळले. त्यांनी एक सुस्कारा सोडला. त्यांना असं काही बघायला मिळेल याची अपेक्षा नव्हती. त्यांचा भयाने थरकाप उडाला.
‘‘तुम्ही कोणत्याही औपचारीकतेशिवाय आलात,’’ स्ट्रिकलँड म्हणाला. ‘‘बोला, काय सेवा करू?’’
डॉक्टरांनी स्वत:ला सावरलं. खूप प्रयत्नाने त्यांच्या तोंडातून शब्द फुटला. त्यांचा सगळा राग गेला. ए बियाँ, ओई, जू ने ले नी पा - मला त्याची कींव आली हे मी नाकारत नाही.
‘‘मी तारावाओला एका रोग्याला तपासायला आलो होतो. आटाने मला तुम्हाला तपासण्यासाठी बोलवून घेतलं.’’
‘‘ती वेडी आहे. माझं थोडं अंग दुखत होतं, थोडा ताप होता, त्यात काय एवढं घाबरायचं. जाईल तो. पुढच्या खेपेला कोणी पपीएतला जाणारा असला तर थोडंसं क्विनाईन मागवून घेणार होतो.’’
‘‘तुम्ही जरा आरशात स्वत:कडे नीट पाहा.’’
स्ट्रिकलँड हसला आणि भिंतीवर लावलेल्या लाकडी फ्रेममधील पारा उडालेल्या आरशात स्वत:चं प्रतिबिंब पाहिलं.
‘‘ठीक तर आहे.’’
‘‘तुमच्या चेहेऱ्यात झालेला विचित्र बदल तुम्हाला दिसत नाही का? तुमचा चेहेरा सुजवट दिसत आहे. तुम्हाला कसं सांगू. वैद्यकीय पुस्तकात याला सिंहाचा चेहेरा असं म्हणतात. माँ पुअर अ‍ॅमी, माझ्या मित्रा, तुम्हाला एक भयंकर रोग झाला आहे.’’
‘‘मला?’’
‘‘तुम्ही निरखून पाहिलंत तर महारोग्याच्या चेहेऱ्यावर दिसतात तशी चिन्हं तुम्हाला तुमच्या चेहेऱ्यावर दिसतील.’’
‘‘तुम्ही मस्करी तर करत नाही?’’
‘‘देवा ही मस्करी असती तर किती बरं झालं असतं.’’
‘‘मला महारोग झालाय असं तर तुम्हाला म्हणायचं नाही?’’
‘‘दुर्दैवाने त्यात काही संशय नाही.’’
डॉक्टर कोत्रासनी बऱ्याच जणांच्या मृत्युचं भाकित केलं होतं. ते सांगताना भितीने अंगावर जो काटा उभा रहातो त्याच्यावर मात त्यांना करणं जमलं नव्हतं. तो दुर्दैवी माणूस नकळत त्याच्या तुलनेत निरोगी असलेल्या डॉक्टरांशी स्वत:ची तुलना करतो. मृत्यु त्याच्या समोर उभा ठाकलेला असतो तर डॉक्टर जीवनाचा आनंद लुटत असतात. डॉक्टर नेहमीच अशा लोकांच्या तिरस्काराचे आणि क्षोभाचे धनी होतात. स्ट्रिकलँडने त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं. त्या भयंकर रोगाने दडदडीत झालेल्या त्याच्या चेहेऱ्यावर भावनांचा लवलेशही दिसत नव्हता.
‘‘त्यांना माहित आहे का?’’ व्हरांड्यात शांतपणे चूप बसलेल्या लोकांकडे बोट दाखवून त्याने विचारलं.
‘‘या आदिवासी लोकांना याच्या खाणाखुणा चटकन ओळखता येतात.’’ डॉक्टर म्हणाले. ‘‘ते तुम्हाला सांगायला घाबरत होते.’’
स्ट्रिकलँड दारात गेला आणि त्याने बाहेर पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यात काहीतरी भयंकर दिसत असलं पाहिजे. कारण त्या झोपडीत जमलेले ते सगळे जण दचकले आणि दु:खाने रडू लागले. त्यांचा रडण्याचा भेसूर आवाज टीपेला पोचला. स्ट्रिकलँड एक शब्दही बोलला नाही. त्यांच्याकडे एक क्षणभर दृष्टीक्षेप टाकून तो आत गेला.
‘‘मी किती दिवस जगेन असं तुम्हाला वाटतं?’’
‘‘सांगता येणार नाही. कधी कधी दहा वीस वर्ष सुद्धा जातात. पण त्यात देहाची विटंबना होते, खूप यातना होतात. त्यामुळे जेवढं लवकर संपेल तेवढं भाग्यच समजलं पाहिजे.’’
स्ट्रिकलँड इझल जवळ गेला आणि त्याने नुकत्याच पूर्ण केलेल्या पेंटींगकडे पाहिलं.
‘‘तुम्ही खूप लांबून आला आहात. महत्वाची बातमी आणणाऱ्या माणसाला तसंच बक्षीस मिळायला हवं. हे पेंटींग तुम्ही ठेऊन घ्या. सध्या त्याची तुम्हाला काही किंमत मिळणार नाही. पण कोणी सांगावं एखाद्या दिवशी तुम्हाला हे पेंटींग ठेऊन घेतल्याचं समाधान मिळेल.’’
डॉक्टर कोत्रासनी कोणतेही पैसे घ्यायला नकार दिला. आटाने दिलेले शंभर फ्रँक त्यांनी आल्या आल्याच परत दिले होते. पण स्ट्रिकलँडने पेंटींग घेण्याचा आग्रह केला. नंतर ते व्हरांड्यात बरोबर गेले. तेथे बसलेले लोक स्पुंदून स्फुंदून रडत होते.
‘‘आटा शांत हो, तुझे डोळे पुस,’’ स्ट्रिकलँड म्हणाला. ‘‘फार काही होणार नाही. मी लवकरच येथून निघून जाईन.’’
‘‘ते तुम्हाला घेऊन जाणार आहेत का?’’ तिने रडत रडत विचारलं.
त्यावेळी बेटांवर महारोग्यांसाठी अलग वसाहत केलेली नव्हती. महारोग्यांनी ठरवलं तर ते स्वतंत्र राहू शकत.
‘‘मी डोंगरात जाऊन राहीन.’’
आटा त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.
‘‘ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ दे. पण मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही माझे आहात आणि मी तुमची आहे. तुम्ही मला सोडून गेलात तर मी देवा शप्पथ जीव देईन.’’
ती जे बोलत होती ते अगदी ठामपणे बोलत होती. आता ती एक लहान आदिवासी मुलगी राहिली नव्हती, ती एका निश्चयी, पोक्त स्त्रीसारखी बोलत होती. तिच्यात विलक्षण बदल झाला होता.
‘‘तुला माझ्या बरोबर राहण्याची गरज नाही. वाटल्यास तू पपीएतला परत जा. तुला दुसरा एखादा गोरा माणूस मिळेल. मुलांची काळजी तुझी म्हातारी घेईल. तिअर तुला परत आनंदाने नोकरीवर ठेवेल.’’
‘‘तुम्ही जेथे जाल तेथे मी येणार.’’
स्ट्रिकलँडचा धीरोदात्तपणा क्षणभर कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि गालांवर ओघळले. नंतर तो नेहमीसारखा तिरकसपणे हसला.
‘‘बायका फार विचित्र असतात,’’ तो डॉक्टरांकडे वळून म्हणाला. ‘‘तुम्ही त्यांना कुत्र्यासारखं वागवा, हातदुखे पर्यंत मारा, पण तरीही त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कमी होत नाही.’’
‘‘तुम्ही डॉक्टरांना काय सांगत आहात? तुम्ही त्यांच्या बरोबर जाणार तर नाही?’’ आटाने संशयाने विचारलं.
‘‘तुला हवं असेल तर मी राहीन.’’
आटा त्याच्या समोर गुडघे टेकून बसली आणि तिने त्याच्या हातांचं चुंबन घेतलं. स्ट्रिकलँडने डॉक्टरांकडे बघून मंद स्मित केलं.
‘‘सरते शेवटी त्यांचा विजय होतो, त्यांच्या पुढ्यात तुमचं काही चालत नाही. गोरे, काळे, सावळे. सगळे शेवटी सारखेच असतात.’’
या भयंकर प्रसंगी औपचारिकरित्या शोकप्रदर्शन करणं डॉक्टरांना अप्रस्तुत वाटलं म्हणून ते निघून गेले. स्ट्रिकलँडने एका मुलाला त्यांच्या सोबतीला पाठवलं. डॉक्टर थोडावेळ थांबून मला म्हणाले.
‘‘तो मला मुळीच आवडत नसे. त्याचं माझं जमत नसे हेही तुम्हाला सांगून झालं आहे. पण तरीही मानवजातीच्या वाट्याला आलेल्या महाभयंकर रोगाचा त्याने ज्या धैर्याने सामना केला त्याचे कौतुक मला वाटल्याखेरीज राहिलं नाही. तारावाओची वाट चालत असताना तेच विचार माझ्या मनात होते. जेव्हा तो मुलगा गेला तेव्हा मी त्याला सांगितलं की थोडी फार औषधं मी त्याला अधेमधे पाठवून देत जाईन. ती औषधं तो कितपत घेईल याची मला शंका होतीच. त्यांचा त्याला कितपत उपयोग होईल हीसुद्धा शंका जास्त सतावत होती. काही लागलं तर मला बोलावणं पाठव असा निरोप मी आटाला ठेवला. जीवन कठोर असतं आणि कोणाला काय भोगावं लागेल याची कधीच खात्री देता येत नाही. मोठ्या जड अत:करणाने मी पपीएतला पोचलो.’’
बराच वेळ आमच्यापैकी कोणीही बोललं नाही.
‘‘पण आटाने मला कधीच निरोप पाठवला नाही,’’ डॉक्टरांनी त्यांची गोष्ट पुढे चालू केली. ‘‘आणि बेटाच्या त्या भागात जाण्याची माझ्यावरसुद्धा परत वेळ आली नाही.
स्ट्रिकलँड विषयी मला काहीच समजत नव्हतं. आटा पपीएतला रंग आणि इतर साहित्य विकत घ्यायला एक दोनदा वेळा येऊन गेली हे माझ्या कानावर आलं. पण माझी आणि तिची गाठ पडली नाही. मी तारावाओला गेलो होतो त्याला दोन वर्ष होऊन गेली. मी त्या म्हाताऱ्या मुखियाला भेटायला पुन्हा एकदा तारावाओला गेलो. मी त्यांच्याकडे स्ट्रिकलँडची चौकशी केली. त्याला महारोग झाला आहे हे तोपर्यंत सगळ्यांना कळलं होतं. त्याच्या घरातील सगळी माणसं एक एक करून दुसरीकडे निघून गेली होती. फक्त आटा आणि त्यांची मुलं उरली होती. त्यांच्या मळ्याकडे कोणीही फिरकत नसे. महारोगाविषयी स्थानिक आदिवासींच्या मनात प्रचंड भिती होती. पूर्वी अशा रोग्याला ठार मारलं जाई. कधी कधी गावातल्या मुलांना तो रानात फिरताना दिसे. त्याला पाहिल्या बरोबर ती घाबरून पळून जात. कधी कधी आटा रात्री गावात येई आणि गावातल्या वाण्याला उठवून तिला हव्या त्या गोष्टी घेऊन जाई. तिला माहित होतं की स्थानिक लोक तिच्याकडेसुद्धा त्याच दृष्टीने बघत आणि त्यामुळे तिला टाळत असत. एकदा गावातल्या बायकांनी तिला ओढ्यामध्ये कपडे धुताना पाहिलं तेव्हा त्यांनी तिला दगड मारून पळवून लावलं. गावकऱ्यांनी तिला पुन्हा ओढ्यात कपडे धुऊ नको असं बजावलं. नाहीतर त्यांनी तिचं घर जाळून टाकलं असतं.’’
‘‘नीच कुठले.’’ मी म्हणालो.
‘‘मे नॉन, माँ शेर मस्यु. तसं नसतं महाराज, माणसं कुठूनही सारखीच असतात. भितीमुळे माणुसकी विसरली जाते. मी स्ट्रिकलँडला भेटायचं ठरवलं. म्हातारीला तपासून झाल्यानंतर मी एका मुलाला रस्ता दाखवायला सांगितलं. पण माझ्या बरोबर यायला कोणीच तयार नव्हतं. मला एकट्यालाच रस्ता शोधणं भाग पडलं.’’
स्ट्रिकलँडचा शेतमळा जसा जवळ आला तसं डॉक्टरांना अस्वस्थ वाटायला लागलं. चालून चालून त्यांना उकडत होतं, तरीही त्यांच्या अंगात शिरशिरी आली. वातावरणात काही तरी विचित्र होतं. त्यामुळे ते थोडे थबकले. एक अदृश्य शक्ति त्यांना अडवत होती, त्यांचे पाय मागे खेचत होती. खाली पडलेले नारळसुद्धा कोणी उचलले नव्हते. सर्वत्र एक भयाण सन्नाटा पसरला होता. मळ्यात रान माजत चाललं होतं. अनादी काळातील अरण्यातून जो मळा निर्माण करण्यात कित्येक वर्षांचे अपार कष्ट खर्ची पडले होते तो मळा, ती प्राचीन सृष्टी पुनश्च गिळंकृत करत होती. त्या सर्व परिसरात एक आदिम वेदना व्यापून राहिली आहे असं त्यांना वाटलं. तिथल्या चिडीचूप निशब्द शांततेमुळे त्याला सर्वजण घर सोडून गेले असावेत असं वाटलं. पण त्यांना आटा दिसली. ती उकिडवी बसून काही तरी शिजवत होती. बाजूला तिचा लहान मुलगा मातीत खेळत होता. तिने डॉक्टकरांना पाहिलं तरीही ती हसली नाही.
‘‘मी स्ट्रिकलँडना बघायला आलो आहे.’’
‘‘मी आत जाऊन त्यांना सांगेन.’’
ती व्हरांड्याच्या पायऱ्या चढून घरात गेली. डॉ. कोत्रास तिच्या पाठोपाठ गेले पण तिने केलेल्या इशाऱ्यामुळे बाहेरच थांबले. तिने दरवाजा उघडताच महारोग्यांना येणाऱ्या किंचीत गोडूस वासाचा पोट ढवळणारा भपकारा आला. आतून आटाचा आवाज त्यांनी ऐकला. स्ट्रिकलँडने काहीतरी उत्तर दिलं. पण त्याचा आवाज ओळखता येणार नाही इतका घोगरा झाला होता. डॉ. कोत्रासनी भुवया उंचावल्या. रोगाने स्ट्रिकलँडच्या स्वरयंत्रावर विपरीत परीणाम झाला होता. आटा बाहेर आली.
‘‘ते तुम्हाला भेटायला तयार नाहीत. तुम्हाला परत जावे लागेल.’’
डॉ. कोत्रासनी पुन्हा पुन्हा सांगून पाहिलं, पण ती त्यांना आत जाऊ द्यायला तयार नव्हती. डॉ. कोत्रासनी खांदे उडवले. एक क्षणभर विचार करून ते मागे फिरले. ती त्यांच्या बरोबर गेली. त्यांना वाटलं की तिच्या मनातसुद्धा त्यांना फुटवायचं असावं.
‘‘मला करता येण्या सारखं काहीच नाही का?’’
‘‘जमलं तर रंग पाठवा, त्यांना दुसरं काही नको आहे.’’
‘‘त्यांना अजून चित्र रंगवता येतात?’’
‘‘त्यांनी आता घराच्या भिंतींवर चित्र रंगवायला घेतली आहेत.’’
‘‘मुली तुझ्यावर किती भयंकर परिस्थिती ओढवली आहे.’’
शेवटी ती अस्फुट का होईना हसली. तिच्या डोळ्यातून माया ओसंडून जात होती. डॉ. कोत्रासना आश्चर्य वाटलं. तिच्या निस्सीम प्रेमामुळे ते भारावून गेले. अधिक बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं.
‘‘ते माझे आहेत.’’ ती म्हणाली.
‘‘तुझं दुसरं मूल कुठे दिसत नाही. मागच्या वेळेला आलो तेव्हा मी पाहिलं होतं.’’
‘‘ते गेलं. आम्ही त्या आंब्याखाली त्याला पुरलं.’’
आटा त्यांच्या बरोबर चार पावलं चालत गेली. तिला परत फिरणं भाग होतं. डॉ. कोत्रासना वाटलं होतं त्याप्रमाणे गावकऱ्यांच्या नजरेला पडण्याच्या भितीमुळे ती जास्त पुढे गेली नाही. तू निरोप पाठवताच मी येईन हे त्यांनी पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं.