Friday, January 19, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ६

शेवटी एकदाची माझी चार्ल्स स्ट्रिकलँडशी भेट झाली. पण वेळ अशी होती की फक्त ओळख करून घेण्यापलीकडे काही झालं नाही. एके दिवशी सकाळीच मला मिसेस स्ट्रिकलँडची चिठी आली. तिने संध्याकाळी मला डिनर पार्टीला बोलावलं होतं. तिच्या एका पाहुण्याने ऐन वेळी नकार दिला होता म्हणून त्याची जागा भरून काढण्यासाठी मला आमंत्रण दिलं होतं. त्या चिठीत तिने लिहीलं होतं:
“तुम्हाला कदाचित कंटाळा येण्याची शक्यता याची मी आगाऊ सुचना देत आहे. ही पार्टी अगदी कंटाळवाणी होण्याची शक्यता आहे, पण तरीही तुम्ही आलात तर मी तुमची अत्यंत आभारी राहीन. कमीत कमी तुमच्याशी थोड्या गप्पा तरी मारता येतील.”
शेजारधर्म म्हणून तरी हे आमंत्रण स्विकारणं भाग होतं.
जेव्हा मिसेस स्ट्रिकलँडने तिच्या नवर्याशी ओळख करून दिली तेव्हा त्याने अगदी कोरडेपणाने हस्तांदोलन केले. त्याच्याकडे वळत थट्टेच्या सुरात ती म्हणाली,
“मला नवरा आहे हे मला यांना दाखवून द्यायचं होतं. त्यांना संशय यायला लागला होता की मी बिनलग्नाची आहे की काय.”
आपल्याला यात काहीच गंमत वाटत नाही हे दाखवून देण्यापुरतं तो जेवढ्याच तेवढं हसला. तेवढ्यात नवे पाहुणे आले आणि आम्हाला सोडून यजमानीणबाई त्यांच्याकडे वळल्या. शेवटी सगळी पाहूणे मंडळी जमली आणि जेवायला कधी सुरवात होत आहे त्याची वाट बघू लागली. मला स्पष्ट आठवतंय. न बोलता शहाणा अशा आविर्भावात तो आपला एक कोपरा पकडून उभा होता. या पार्टीच्या यजमानांनी एवढा आग्रह करून या सगळ्या पाहुण्यांना का बोलावलंय आणि ही सगळी मंडळी एवढी यातायात करून येथे का आली आहेत असं कोडं त्यावेळी मला पडलं. पार्टीला आलेल्या पाहुण्यात कसलाही उत्साह जाणवत नव्हता. जाते वेळी सगळ्यांच्या मनात एकदाची सुटका झाल्याची भावना होती. ती पार्टी म्हणजे केवळ एका उपचारासारखी वाटली. कारण स्ट्रिकलँड दांपत्य तेथे जमलेल्या पाहुण्यांपैकी बर्याच जणांना एक पार्टी देऊ लागत होते. पण पार्टीला येण्यात कोणालाच रस नव्हता. तरीही बहुतेक जण पार्टीला आले होते. का? तर कोणाला घरी एकट्याने जेवण्याचा कंटाळा आला होता, तर काहींना आपल् नोकरांना एक दिवस सुटी द्यायची होती, तर कोणाकडे नकार द्यायला सबळ कारण नव्हते आणि बर्याच जणांना एक फुकट जेवण वसूल करायचे होते.
जेवणाच्या खोलीत खूप गर्दी झाली होती. के.सी. दांपत्य, एक सरकारी उच्च पदस्थ आणि त्याची पत्नी, मिसेस स्ट्रिकलँडची बहीण आणि तिचा नवरा कर्नल मॅक-अँड्रयु आणि एक खासदार पत्नी. ज्याला संसदेच्या कामात अडकल्यामुळे यायला जमले नव्हते आणि ज्याच्या ऐवजी आयत्या वेळेला मला बोलावण्यात आलं होतं ती हीच व्यक्ति असावी. पार्टीला आलेली मंडळी भयंकर घरंदाज वगैरे होती. स्त्रिया आपल्या भपकेबाज कपड्यांचं प्रदर्शन करायला आल्यासारख्या वाटत होत्या. आपल्या वागण्या बोलण्यातून त्या आपला सामाजिक दर्जा ज्या कौशल्याने दाखवून देत होत्या की ते पहाणं मोठं गमतीचं होतं. पुरूष मंडळी आपापला आब सांभाळत वावरत होती.
पार्टीमध्ये आलोय तर काही तरी बोललं पाहिजे म्हणून सगळ्यांचे आवाज नकळत चढत होते. जेवणाच्या खोलीत एकच गोंगाट चालू होता. एकच एक विषय होता असं काही नव्हतं. प्रत्येक जण आपल्या शेजार्याशी, शेजारी त्याच्या शेजार्याशी बोलत होता. सूप, फिश, आँत्रे – मुख्य पदार्थ, भाजलेले पदार्थ, गोड आणि मसालेदार पदार्थ खाता खाता राजकिय परीस्थिती, गोल्फ, आपली मुलं-बाळं, नुकतंच आलेलं नाटक, रॉयल अकादमीला लागलेला नवा चित्रपट, हवापाणी, उन्हाळ्याच्या सुटीतील बेत असा कुठलाही विषय व्यर्ज नव्हता. क्षणाचीही उसंत नव्हती. आवाजाची पातळी हळूहळू वाढू लागली. पार्टी यशस्वी झाल्याबद्दल मिसेस स्ट्रिकलँडनी आपली पाठ थोपटून घेतली असती. तिचा नवराही त्याच्या वाटेला आलेली भूमिका वठवण्याचा प्रयत्नही करण्याच्या फंदात पडला नव्हता. मला वाटतं पार्टी सुरू झाल्यापासून तो कोणाशी एक शब्दही बोलला नसावा. त्याच्या बाजूला असलेली मंडळी पार कंटाळून गेलेली दिसत होती. एक दोन वेळा मिसेस स्ट्रिकलँडनी त्याच्याकडे वळून मोठ्या चिंतेने पाहिले.

शेवटी एकदा मिसेस स्ट्रिकलँड उठली आणि सगळ्या स्त्रियांना जेवणाच्या खोलीबाहेर घेऊन गेली. ती गेल्यावर स्ट्रिकलँडने दरवाजा लावून घेतला आणि के.सी. आणि सरकारी अधिकार्याच्या मधली जागा पटकावली. त्याने सगळ्यांच्या ग्लासात पोर्ट ओतली आणि सिगारचा खोका पुढे केला. के.सी. ने वाईनची तारीफ केली आणि तो ज्या एका प्रकरणात गुंतला होता ते प्रकरण थोडक्यात सांगितलं. कर्नल पोलोविषयी बोलला. माझ्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं म्हणून इतरांच्या बोलण्याकडे लक्ष आहे असं दाखवत मी गप्प बसलो. माझ्याशी बोलण्यात दुसर्या कोणाला रस नव्हता म्हणून मी स्ट्रिकलँडचं निरीक्षण करायला सुरवात केली. मला वाटलं होतं त्यापेक्षा तो चांगलाच धिप्पाड होता. पहिल्या भेटीत तो मला किरकोळ प्रकृतीचा असावा असं का वाटलं ते सांगता येत नाही. त्याचा बांधा आडवा होता. त्याचे हातपाय दणकट होते. त्याने संध्याकाळी पार्टीला म्हणून घातलेले कपडे कसे तरीच गबाळ्यासारखे वाटत होते. त्याच्याकडे पाहिल्यावर एखादा घोडागाडीवाला समारंभासाठी सजून तयार झाला आहे असं वाटत होतं. तो चाळीस एक वर्षांचा असावा. देखणा नाही पण त्याला कुरूपही म्हणता आलं नसतं. त्याने दाढी तुळतुळीत केली होती. त्यामुळे त्याचा रुंद चेहेरा उघडा बोडका वाटत होता. त्याने आपले लालसर रंगाचे केस अगदी बारीक कापले होते. त्याचे निळसर करड्या रंगाचे डोळे चेहेर्याच्या मानाने लहान वाटत होते. त्याचे एकूण व्यक्तिमत्व सर्वसाधारण म्हणता येईल असे होते. मिसेस स्ट्रिकलँडला त्याची लाज का वाटत होती ते माझ्या लक्षात आले. जिला साहित्यिक विश्वात आपली छाप पाडायची आहे अशा स्त्रीला त्याच्यासारख्या नवर्याकडून फारसा फायदा नव्हता. उच्चभ्रू समाजात वावरण्यासाठी उपयोगी पडतील असे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे त्याच्यात  विक्षीप्त म्हणावं असंही काही नव्हतं. अरसिक असला तरी मुदलातच तो एक चांगला, प्रामाणिक आणि सरळमार्गी इसम असावा असं दिसत होतं. असा सीधा-साधा गुणी माणूस कोणालाही आवडण्यासारखे असला तरी त्याच्याशी मुद्दाम मैत्री करावी असं कोणाला वाटणं कठीण होतं. समाजातील एक सन्माननिय घटक, एक सद्गृहस्थ, कुटुंबवत्सल पती आणि पिता म्हणून तो ठीक होता. पण त्याच्यापाय़ी आपला वेळ फुकट घालवावा असं कोणतंही कारण नव्हतं.



Paul Gauguin Wearing a Breton Jacket
Photography, ca. 1891, Isabell Cahn, Source: Wikipedia
Gauguin (exhibition catalogue, 1988, fig.47 p. 49), National Gallery of Washington


4 comments:

  1. अलीकडच्या काळातील उच्चभ्रू पार्ट्यांचं ,(ज्याला आज पेज 3 कल्चर म्हणून ओळखले जाते ) मूळ असलेल्या १०० वर्षांपूर्वीच्या पार्ट्यांचं वर्णन अगदी बारकाईने केलेलं आहे. त्यावेळचा पोशाख, खाणे - पिणे , फर्निचर इ. एकूणच राहणीमानाचे वर्णन इतके सूक्ष्मपणे केले आहे की तो काळ नजरेसमोर उभा राहतो. वाचक हळू हळू त्या काळात शिरतो आणि तिकडेच हरवून जातो ...
    कादंबरी पकड घेत चाललीये . अनुवाद उत्तम आहे . तुम्ही सुरुवातीला म्हणालात त्याप्रमाणे युनिकोड मध्ये आणतांना काही ठिकाणी शब्द चुकीचे पडलेयत. तेवढं सोडल्यास बाकी उत्तम ...
    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. तज्ञ व्यक्तिकडून प्रूफ रीडींग करण्याच गरज आहे. पण ऑनलाईन करणारा कोणी मिळाला नाही. तरीही पुढच्या भागात जास्त काळजी घेईन. तुमच्या सारख्यांनी नीट वाचून सुचना केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या परीचयाच्या इतरांना लिंक शेअर करा.

      Delete
    2. कौशल्य मॉमचं. मी तर केवळ अनुवाद केला आहे.

      Delete
  2. पार्टीचे वर्णन झकास

    ReplyDelete