Sunday, January 21, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ९

“हे मात्र फारच भयंकर झालं.” आम्ही बाहेर पडून रस्त्यावर येताच कर्नल मॅक-अँड्रयु म्हणाला.
मेव्हणी बरोबर त्याची जी चर्चा चालू होती तीच चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी तो माझ्या बरोबर बाहेर आला होता हे माझ्या लक्षात आलं.
“ती बया कोण हे आपल्याला अजूनही ठाऊक नाही. या घटकेला तो हलकट इसम पॅरीसला पळून गेला आहे एवढीच माहिती आपल्या हाताशी आहे.”
“मला वाटत होतं ऍमी आणि चार्ल्सचं चांगलं चाललं असावं.”
“चांगलंच चाललं होतं. तुम्ही येण्यापूर्वी ऍमी म्हणाली की इतक्या वर्षांच्या संसारात त्यांचं नवराबायकोमध्ये होतात तसं एखादं साधं भांडणही कधी झालं नव्हतं. तिला तुम्ही ओळखताच. तिच्या एवढी चांगली बायको कोणाला शोधूनही मिळणार नाही.”
त्याने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे एखादा दुसरा अधिक प्रश्न विचारायला हरकत नसावी असं मला वाटलं.
“तिला कसलाही संशय आला नव्हता असं तुम्हाला म्हणायचंय का?”
“जरासुद्धा संशय आला नव्हता. गेल्या ऑगस्टमध्येच तो तिला आणि मुलांना नॉरफोकला घेऊन गेला होता. त्यावेळी मी सुद्धा माझ्या पत्नी बरोबर तेथेच होतो. तो अगदी नेहमीसारखा वागत होता. आम्ही गोल्फ खेळायलासुद्धा बरोबर गेलो होतो. त्याच्या ऑफिसमधल्या एका भागीदाराला सुट्टी घ्यायची होती म्हणून तो सप्टेंबरमध्ये थोडा लवकर लंडनला परत गेला. त्यांनी भाड्याने घेतलेल्या घराची मुदत तोपर्यंत संपली नव्हती म्हणून ऍमी तेथेच राहिली. भाड्याची मुदत संपता संपता तिने लंडनमध्ये परत येण्याचा दिवस त्याला पत्र लिहून कळवला. त्या पत्राचं उत्तर पॅरीसवरून आलं. त्यात त्याने लिहीलं होतं की यापुढे त्याला तिच्या बरोबर रहाण्यात रस नाही.”
“त्याचं त्याने काय कारण दिलं होतं.”
“महाशय, त्याने काहीही कारण दिलं नव्हतं. मी स्वत: ते पत्र पाहिलं आहे. त्यात फक्त दहा ओळीच आहेत.”
“हे मात्र अगदी विलक्षण आहे.”
आम्हाला रस्ता ओलांडायचा होता. रहदारीमुळे जास्त बोलता येईना. कर्नल जे सांगत होता ते मला असंभव वाटत होतं. मला वाटलं मिसेस स्ट्रिकलँड त्याच्यापासून काहीतरी लपवत असावी. तिने असं करण्यामागे काही तरी कारण असण्याची शक्यता होती. सतरा वर्षांच्या संसारानंतर कोण पत्नीला सोडून जात असेल तर काही ना काही तरी कारण असलंच पाहिजे आणि इतक्या वर्षात पत्नीला कुठे तरी बिनसतंय याची जाणीवही व्हायला पाहिजे. तेवढ्यात रहदारीत मागे पडलेल्या कर्नलने मला गाठलं.
“आपण एका बाईच्या नादाला लागून तिच्या बरोबर पळून गेलो या शिवाय दुसरा कोणता खुलासा त्याच्याकडे आहे. त्याला वाटलं असेल बाकी सगळे तपशील ऍमी शोधून काढेलच, आपल्या तोंडाने स्पष्टपणे कशाला सांगा. तो माणूस म्हणून काय लायकीचा आहे ते यावरून कळतं.”
“मिसेस स्ट्रिकलँडनी काय करायंच ठरवलं आहे.”
“पहिल्या प्रथम आम्ही पुरावे गोळा करणार आहोत. त्यासाठी मी स्वत: पॅरीसला जातोय.”
“चार्ल्सच्या व्यवसायाचं काय?”
“आपल्या संसाराची नसली तरी स्वत:च्या व्यवसायाची मात्र त्याने अगदी पद्धतशीर काळजी घेतली आहे. गेल्या वर्षापासून त्याने आपल्या धंद्यातील व्यवहार आटोपते घ्यायला सुरवात केली होती.”
“आपण व्यवसाय सोडून जात आहोत हे त्याने त्यांच्या भागीदारांना सांगितलं होतं का?”
“एका शब्दानेही नाही.” कर्नल मॅक-अँड्रयुला आर्थिक व्यवसाय कसे चालतात याची फारशी माहिती नव्हती आणि मला तर ती मुळीच नव्हती. त्यामुळे स्ट्रिकलँड आपला चालू व्यवसाय सोडून असा अचानक कसा काय गेला असेल हे माझ्या आकलना पलीकडचं होतं. मला खूप नंतर कळलं की त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याचा भागिदार खूप संतापला आणि त्याने स्ट्रिकलँडवर खटला भरण्याची धमकी दिली. ते सगळं प्रकरण मिटवायला त्याला कमीत कमी चारशे ते पाचशे पौंड लागणार होते.
“नशीबाने फ्लॅमधील फर्नीचर ऍमीच्या नावावर आहे. ते तिला कोणत्याही परीस्थित मिळेलच.”
“तिच्याकडे एक छदामही नाही हे तुम्ही म्हणाला होता ते खरं आहे का?”
“खरंच आहे. हे फर्नीचर सोडलं तर तिच्याकडे फारतर दोन-तीनशे पौंड निघतील. त्या व्यतिरिक्त अक्षरश: काहीही नाही.”
“यावर किती दिवस निभावतील?”
“देवालाच तिची काळजी.”
या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली होती आणि कर्नल रागाच्या भरात शिव्याशाप देऊन जे बोलत होते त्याने माझ्या ज्ञानात भर पडण्या ऐवजी गोंधळातच भर पडत होती. आर्मी अँड नेव्ही स्टोर्सचे घड्याळ दिसताच क्लबमध्ये पत्ते खेळायला जायची वेळ झाली हे त्याच्या लक्षात आलं. त्याने मला सोडलं आणि तो सेंट जेम्स पार्कच्या रस्त्याने निघून गेला. माझी सुटका झाल्याने माझा जीव भांड्यात पडला.

1 comment: