Friday, January 19, 2018

मून अँड सिक्सपेन्स - ७

वसंत ऋतुचे अखेरचे दिवस होते. माझ्या माहितीतील सर्वजण कुठे ना कुठे गेलेले तरी होते किंवा जायच्या तयारीत होते. मिसेस स्ट्रिकलँड नॉरफोकला जाण्याच्या तयारीत होती. मुलांना समुद्रकिनारी खेळायला मिळालं असतं आणि नवर्याला गोल्फ. मीही बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होतो. आम्ही नंतर शरद ऋतुत भेटायचं ठरवून एकमेकांचा निरोप घेतला. जाण्याच्या आदल्या दिवशी शेवटची खरेदी करावी म्हणून मी एका दुकानात गेलो होतो. माझ्यासारखी ती सुद्धा त्याच दुकानात बाहेरगावी जाताना शेवटच्या क्षणी आठवलेल्या गोष्टी खरेदी करायला म्हणून आपल्या मुलांना घेऊन आली होती. खूप उकडत होतं आणि खरेदी करून आम्ही दमलो होतो म्हणून मी समोरच्या बागेत जाऊन आईस्क्रीम खाऊया असं सुचवलं.
मिसेस स्ट्रिकलँडला तिच्या मुलांशी माझी ओळख करून द्यायला मनापासून आवडलं असावं कारण तिने माझं आमंत्रण तत्परतेने स्वीकारलं. तिची मुलं फोटोत दिसत होती त्यापेक्षा खूपच छान दिसत होती. मुलांचा तिला अभिमान होता ते अनाठायी नव्हतं. मी तरूण असल्याने मुलं न संकोचता माझ्याशी आनंदाने गप्पा मारू लागली. ती सुस्वभावी आणि सुदृढ प्रकृतीची होती आणि बागेत बागडताना तर फारच छान दिसत होती.
तासाभरानंतर ते कुटुंब टॅक्सीतून घरी जायला निघाले आणि मी माझ्या क्लबच्या दिशेने हळू हळू चालत निघालो. सुखी कुटुंब कसं असतं त्याची एक झलक नुकतीच बघायला मिळाली होती. मला त्यांचा हेवा वाटायला लागला. त्या कुटुंबीयांच एकमेकांवर अपार प्रेम असावं असं वाटत होतं. कुटुंबाबाहेरच्या व्यक्तिला समजणार नाहीत अशा त्यांच्या म्हणून खास गमती-जमती होत्या. त्यात सर्व कुटुंब रमत असे. चमकदार बोलता येणं या एकाच गुणावरून चार्ल्स स्ट्रिकलँडवर अरसिकतेचा शिक्का मारण्यात आपण फार मोठी चूक करतोय असं मला वाटलं. सभोवतालच्या कौटुंबीक वातावरणात समाधानाने जगण्यासाठी जेवढी आवश्यक तेवढी हुशारी त्याच्याकडे निश्चित होती. जीवनात यशस्वी होण्यासाठी याचा फारसा उपयोग पडणार नाही पण आयुष्यात सुखी होण्यासाठी मात्र हे पुरेसं आहे. मिसेस स्ट्रिकलँटडसारख्या सुंदर सहचारिणीचं त्याच्यावर प्रेम आहे. नकळत मी त्यांच्या सुखी संसाराचं चित्र मनासमोर उभं करू लागलो. साधं नाकासमोर जाणारे सरळमार्गी चाकोरीबद्ध आयुष्य. गृहकृत्यदक्ष सुंदर पत्नी, दोन गोंडस मुलं. मोठी झाली की लग्न करून मार्गी लागतील. आजची सुंदर मुलगी पुढच्या पिढीची प्रेमळ आई होईल. तरूण देखणा मुलगा कर्तबगार सेनाधिकारी होईल. मुलं, नातवंड आपला वारसा पुढे चालवत आहेत. असं सुखी आणि समृद्ध आयुष्य जगून तृप्त झाल्यावर एके दिवशी निवृत्त होऊन कालमानपरत्वे कबरीत कायमची विश्रांती घ्यायला मोकळे. आयुष्याचं सार्थक म्हणतात ते याहून वेगळे काय असतं.

अगणित दांपत्यांची कहाणी याहून वेगळी नसते. अशा शांत जीवनात एक प्रकारची घरगुती अशी शान असते. हिरव्या कुरणातून बागडत, दर्या खोर्यातून वाट शोधत शेवटी विशाल सागराला मिळणार्या एखाद्या निर्झराची मला येथे आठवण झाली. त्या निर्झराच्या अस्तित्वाची दखलही न घेणारा समुद्र मात्र शांत असतो. त्या शांततेनेच मला अस्वस्थ वाटायला लागतं. आयुष्याच्या अस्तित्वहीनतेने मी अस्वस्थ होतो. सर्वसामान्य लोकांना ज्यामुळे समाधान वाटतं त्याचा माझ्यात मुळातच अभाव आहे. सामान्यजनांचं जीवन सुखी आणि संथ असणं हे समाजस्वस्थ्याच्या दृष्टीने किती महत्वाचं असतं याची मला कल्पना आहे. पण माझं रक्त नव्या वाटा धुंडाळण्यासाठी नेहमी सळसळत असतं. सरळ सोप्या वाटेवरून चालण्यात मला फारसं स्वारस्य वाटत नाही. ज्यामुळे नित्याच्या शिरस्त्यात बदल होणार असेल अशा अपरीचित वाटेवरील खाचखळगे आणि धोके पत्करायला माझी हरकत नसते. बदलामुळे येणार्या अनिश्चिततेने मी हुरळून जातो. अनिश्चिततेचे आव्हान स्विकारणे हे कदाचित माझ्या स्वभावातच असावे.



Paul Gauguin and his wife Mette Copenhagen 1885, Photograph


Paul Gauguin and his children Emil and Alina, Photograph

4 comments:

  1. एकेक पदर उलगडत चाललाय , कादंबरी म्हणा किंवा स्ट्रिकलँड, पकड घ्यायला लागलाय ...

    ReplyDelete
  2. मॉमलाही स्वत:च्या कादंबर्यांपैकी ही कादंबरी सर्वात जास्त आवडायची.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. पुढच्या chapter कडे डोळे लागले आहेत

    ReplyDelete