Monday, January 15, 2018

मून अँड सिक्सपेन्स - २


चार्ल्स स्ट्रिकलँडवर आतापर्यंत एवढं लिहलं गेलंय की मला अधिक काही लिहीण्याची आवश्यकता उरलेली नाही. चित्रकाराचं खरं स्मारक त्याची चित्रंच असतात. त्याच्यावर ज्यांनी लिहीलं त्या सर्वांपेक्षा मी त्याला जास्त ओळखत होतो हे खरं आहे. तो चित्रकार होण्याच्या कितीतरी आधीच त्याची माझी भेट झाली होती. तो पॅरीसमध्ये अतिशय खडतर परिस्थितीत दिवस कंठत असतानाही मी त्याला बर्याच वेळा भेटलो होतो. जर युध्दाच्या निमीत्ताने मी ताहितीत गेलो नसतो तर मी माझ्या आठवणी शब्दबद्ध केल्या असत्या का नाही ते मला सांगता येत नाही. आपल्या आयुष्याच्या अखेरीला त्याचे वास्तव्य त्या कुप्रसिद्ध ताहिती बेटांवर होते. माझ्या ताहिती बेटांवरील मुक्कामात मला त्याच्या परिचयाच्या काही व्यक्ति भेटल्या. त्यामुळे कोणाला माहिती नसलेल्या त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळावर प्रकाश टाकण्याची संधी मला मिळाली. स्ट्रिकलँड हा एक महान कलाकार होता असं ज्यांना वाटतं त्यांना ही चतुर्वैसत्यम माहिती महत्वाची वाटू शकेल. ज्यांना सोळाव्या शतकातील एल ग्रेको हा स्पॅनिश चित्रकार माहिती असेल त्यांना मला स्ट्रिकलँडबद्दल काय म्हणायचंय ते कळू शकेल.
चित्तशुद्धीसाठी प्रत्येकाने आपल्याला आवडत नाही अशी एक तरी गोष्ट रोज केली पाहिजे, असं ज्याने मला सांगितलं होतं त्याचं नाव आता या क्षणी मला आठवत नाही. पण मी सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंत हा नियम कटाक्षाने पाळतो. माझ्या स्वभावातच थोडं फार वैराग्य आहे. मी बर्याच वेळा स्वत:ला खूप त्रास करून घेतो. शारिरीक तसाच मानसिकही. मी सहसा टाईम्स लिटररी सप्लिमेंट वाचण्याची संधी सोडत नाही. ज्या प्रमाणात आज पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत ते बघता त्याची नुसती माहिती घ्यायची असेल तर अशी शिस्त लावून घ्यावीच लागते. सगळ्या लेखकांना आपलं पुस्तक कधीतरी प्रसिद्ध होईल, त्याला कोणीतरी वाचक मिळेल अशी आशा असतेच. ढीगभर प्रसिद्ध होणार्या एवढ्या पुस्तकातून आपल्या पुस्तकाच्या नशीबी काय वाढून ठेवलं आहे, कोणी त्याची दखल घेईल का हे प्रश्न लेखकाला छळत असतात? बरीच गाजलेली पुस्तकं चार दिवसांनी लोक विसरूनही जातात. आपले पुस्तक वाचून वाचकाला दोन घटका विरंगुळा मिळावा म्हणून त्या बिचार्या लेखकाने किती परिश्रम घेतले असतील, कोणकोणते बरे वाईट अनुभव त्याच्या वाटेला आले असतील, त्याने काय काय यातना भोगल्या असतील ते एका परमेश्वरालाच ठाऊक. परिक्षण वाचून आपलं मत बनवायचं तर यातील बरीचशी पुस्तकं लेखकाने खूप मेहनत घेऊन विचारपूर्वक लिहीलेली असतात, कित्येक पुस्तकं तर लेखकाच्या आयुष्यभराच्या परिश्रमाचे फलित असतात. एवढं करून त्यातील किती पुस्तकं किती लोक वाचतील, जाणकार त्याची कितपत दखल घेतील ते काहीच सांगता येत नसतं. तात्पर्य काय तर लेखकाने आपल्या लेखनाची कोण आणि किती जण दखल घेतात, त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो की त्याच्या वाटेला कठार टीका येते याचा फारसा विचार न करता त्याने आपल्या लेखन-कामाठीतच समाधान मानावे हेच खऱं.
आमच्या पिढीने आमच्या तरूणपणीच देवपूजा वगैरे करणं सोडून दिलं होतं. परंतु या युद्धाच्या दिवसात हल्लीचा तरूण वर्ग पुन्हा देवपूजेच्या मागे लागला आहे. पुढची पिढी कोणत्या मार्गाने चालली आहे ते आपल्याला यावरून कळून येईल. या पिढीला आजच्या गोंधळाच्या परिस्थितीची शक्तिस्थाने चांगलीच ठाऊक आहेत. आपली जागा घ्यायला ही तरूण पिढी तयार आहे. पण काही जेष्ठ मंडळी आपले दिवस आता गेल्यात जमा आहेत हे मानायला अजून तयार होत नाहीत. त्यांनी तरूणांसारखा कितीही आरडा ओरडा केला तरी त्यात काही दम नसतो हे लक्षात येतं. तारूण्याचा भर ओसरलेल्या वेश्येने कितीही रंगरंगोटी केली तरी त्याने गेलेली जवानी परत येणार नसते. शहाणी मंडळी आपला आब राखून वेळीच बाजूला होतात. त्यांचा आब त्यांच्या मिश्किल हास्यात दडलेला असतो. त्यांच्या तारूण्यात त्यांनी हेच केलेले असते. पुढची पिढी एक प्रकारे मागच्याच पिढीचे अनुकरण करत असते. काळ बदलला असला तरी शब्द तेच असतात. फक्त लंबकाचा झोका दुसर्या टोकाला गेलेला असतो एवढंच.

लेखकाचं मुल्यमापन कालसापेक्ष असू शकत नाही. एके काळी प्रसिद्धिच्या शिखरावर असलेल्या लेखकाचे एवढे कालांतराने अवमुल्यन होते की तो अगदी नगण्य होऊन जातो. जॉर्ज क्रॅब आता कोणाला आठवेल तरी का. एके काळी तो केवढा प्रसिद्ध कवी होता. जाणकार रसिकांनी त्याला अगदी डोक्यावर घेतलं होतं. त्याची प्रतिभा वादातीत होती. पण काळ बदलला आणि त्यामुळे आलेल्या व्यामिश्रतेपुढे त्याची कविता अगदी बाळबोध वाटायला लागली. त्याच्या कवितांवर अलेक्झांडर पोपचा प्रभाव होता. त्याच्या कवितेत जागो जागी बोधवचनांची पखरण केलेली असे. तेवढ्यात फ्रेंच राज्याक्रांती झाली आणि पाठोपाठ झालेल्या नेपोलियनच्या युध्दांमुळे कवितांचे विषय बदलले, गाण्यांचे सूर बदलले. पण क्रॅब महाशय मात्र तीच जुनी नितीमत्तेचे बोधामृत पाजणारी कविता उगाळत बसले होते. क्रॅबने जगात खळबळ उडवणारी नव्या जाणिवांची कविता वाचली नसेल असं काही म्हणता येणार नाही. पण वाचली असली तरी त्याला ती आवडली नसणार याची मला खात्री आहे. अर्थात बरीचशी नवकविता त्याच लायकीची होती म्हणा. बर्याच प्रमाणात कीट्स आणि वर्ड्सवर्थ, कोलरीजच्या दोन तीन, शेलीच्या आणखी काही अपवाद म्हणाव्या लागतील. पण क्रॅबने मात्र जुन्या वळणाच्या बोधप्रद कवितांचा रतीब घालणे काही थांबवले नाही. तरूण पिढीचे काव्य मी थोडेफार वाचले आहे. कीट्सच्या काव्यात तळमळ आहे, शेलीच्या काव्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. या दोघांच्या बर्याच कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. पण काळाच्या ओघात त्यातील किती टिकून रहातात आणि किती वाहून जातात ते सांगणं कठीण आहे. त्यांच्या कवितेतील सफाई विलक्षण आहे. त्यांनी एवढ्या लहान वयात प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे की त्यांना उदयोन्मुख कवि म्हणणं तसं प्रस्तुत होणार नाही. त्यांची शैली कितीही सुरेख असली तरी त्यांचं काव्य माझ्या तरी मनाला भिडत नाही. त्यांच्या कवितेतील शब्दकळा पाहून रॉजेटचा थेसॉरस त्यांनी पाळण्यात असतानाच घोकून तोंडपाठ केला असावा की काय अशी शंका येते. माझ्या मते त्यांच्या काव्यातून त्यांचे माहितीचे ज्ञानभांडार आणि त्यांच्या भावना या दोन्ही गोष्टी खूपच उघडपणे व्यक्त होतात. त्यांच्या कवितेचं असं अंगावर येणं माझ्या पचनी पडत नाही. माझ्या मते त्यांच्या काव्यात जोश थोडा कमी पडतो. त्यांची स्वप्न थोडी फिकी वाटतात. मला ते फारसे आवडत नाहीत. तसं बघायला गेलं तर मी कुंपणावर बसलेलो आहे. मला आपल्या साध्या, सरळ, सोप्या, बोधकथा लिहायला आवडतील. पण अशा कथा लिहीण्यामागे माझा स्वप्नरंजन सोडून दुसर्या कोणताही हेतू असला तर त्याच्या सारखा दुसरा मूर्खपणा असणार नाही.


Artist: El Greco  (1541–1614)
Title: The Vision of Saint John, or The Opening of the Fifth Seal
Date between circa 1609 and circa 1614, Oil on canvas, : 87.5 × 76 in (222.3 × 193 cm)
Current location: Metropolitan Museum of Art, NY. Source :Wikimedia

10 comments:

  1. छान! मला वाचायला नक्कीच आवडेल. धन्यवाद!

    ReplyDelete
  2. पहिला भाग वाचल्यावर आता पुढचे भाग वाचायची उत्कंठा लागली आहे. Please keep sending. Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच. वाचकांचा प्रतिसाद हे मोठं टॉनिक आहे.

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Apratim..Aahe... niyatkalikatun aal tar jast changal..
    Mhanun mi kal suchawal.

    ReplyDelete
    Replies
    1. मॉमने एल ग्रेको आणि वेलाक्वेजची तुलना केली आहे त्याचा पुढे पॉल गोगँच्या शैलीशी संदर्भ लागू शकतो. पिकासोच्या काही पेंटींगवर एल ग्रेको आणि गोगॅ दोघांचाही प्रभाव जाणवतो. मॉमने उल्लेख केलेल्या प्रत्येक संदर्भाचा शोध घेणे इंटरनेट मुळे खूप सोपे झाले आहे. अनुवादात सर्व देणं शक्य होणार नाही कारण त्यामुळे कथासुत्रावरूल फोकस ढिला पडेल.

      Delete
  5. चित्रे ,चित्रकार, कवि, कविता यांच्याविषयीची भाष्ये विचारप्रवृत्त करणारी आहेत।

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या वर्षांच्या मैत्रीमुळे वेळात वेळ काढून वाचल्याबद्दल धन्यवाद देणं प्रशस्त वाटणार नाही याची कल्पना आहे तरीही सध्या जेथे वास्तव्य आहे तेथील संस्कृतीचा परीणाम म्हणून धन्यवाद देत आहे.

      Delete
  6. Jayant, aajach vachayala survat keli ahe. Madhe 4/5 divas palila hoto. Tithe range navhati. Its interesting. Vachayala maja yeil. Nakkich. Tuzi bhasha shaily chhan ahe. Anjali vaishampayan

    ReplyDelete