Saturday, December 14, 2013

जिवर्नीची बाग

जिवर्नीची बाग


(जिवर्नी – जपानी बाग)

पॅरीसला जायचे नक्की झाल्यावर तेथे काय पहायचे हे मी ठरवित होतो. मित्र, मित्राचा मित्र, इंटरनेट, पॅरीस वरील पुस्तके, दिवाळी अंकातील लेख अशा सगळ्या माध्यमातून शोध घेत एफेल टॉवर, शाँ एलिझे वरून फेरफटका, लिडो शो, लुवर अणि ओर्से म्युझियम, रोदँ गार्डन, पिकासो म्युझियम, मोंमार्त्रचे व्हाईट चर्च वरील सगळी माहीती मी कणाकणाने गोळा करत होतो. पॅरीस २०१० चे कॅलेंडर भिंतीवर लटकवून ठेवले होते. ल अँबेसडर आणि बाँज्यू इंडिया ही पोस्टर भिंतीवर चिकटवून ठेवली होती. अशा रीतीने तीन चार महिने मी घरीच पॅरीसची वातावरण निर्मिती केली होती. त्यात घरी आलेल्या एका पाहूण्याने हे पॅरीसमय वातावरण बघून तुम्ही पॅरीसला जाल तेव्हा ऑरेंजेरी येथील मॉनेची वॉटर लिली ही मालिका जरूर बघा असे बजावून सांगीतले. मॉने तसा मला लुवर आणि ओर्सेमध्ये भेटणारच होता पण फक्त मॉनेसाठी मुद्दाम होऊन मी ऑरेंजेरीला गेलो नसतो. त्याच्या एक सूरी, एक रंगी निसर्गचित्रांमध्ये असे आवर्जून पहाण्यासारखे काय असेल ते तेव्हा कळले नव्हते.
मराठी साहित्यात पुणे आणि लंडन या दोन शहरांची एवढी वर्णने आलेली आहेत की या वाङमयीन परीचयामुळे या शहरांच्या अगदी पहिल्या भेटीतसुध्दा परकेपणा वाटत नाही. पर्वती. डेक्कन जिमखाना, बिग बेन, ट्रॅफल्गार स्क्वेअर पहिल्यांदा बघताना सुध्दा आपल्याला ओळखीचे वाटतात. कॅचर इन द राय वाचल्यानंतर बरेच दिवस मला आपण न्युयॉर्कमध्ये रात्रीचे फिरत आहोत असे स्वप्न पडत असे. ब्रुकलीन ब्रिज ही सुप्रसिध्द कविता वाचल्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा ब्रुकलीन ब्रिज पाहिला तेव्हा ती कविताच पुन्हा वाचल्यासारखे वाटले. मॉने, रेन्वा, पिसारो, व्हान गॉग, तुलुझ लोत्रेक वगैरे चित्रकारांनी सीन नदीचा काठ, पॅरीसमधील कॅफे, शहरामधील विवीध कॅथेड्रील, बुलेवार, अँव्हेन्यू आणि रस्त्यांची जी पेंटींग केली आहेत त्यातून पॅरीस शहराचा आणि माझा परीचय अगोदरच झालेला होता. त्यामुळे मी जेव्हा पॅरीसला गेलो तेव्हा मोंमार्त्र, पाँत न्युफ्, शाँ एलिझे या विभागातून फिरत असताना पेंटींगमधून ओळखीच्या झालेल्या वास्तू आणि रस्ते शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.
(सीन नदीचा काठ आणि सँ लझार रेल्वे स्टेशन)
क्लॉद मॉनेचा जन्म १८४० मध्ये पॅरीस मध्ये झाला. त्याचे लहानपण ल हाव्र या नॉर्मंडीमधील सीन नदीच्या मुखाशी असलेल्या बंदराच्या गावी गेले. त्याच्या वडिलांचा किराणा भुसार मालाचा व्यवसाय होता. क्लॉडला चित्रकलेची चांगलीच आवड होती. तो आपल्या पुस्तकांमधील रिकाम्या जागा चित्र काढून भरून टाकायचा. त्याची एक आत्या हौशी चित्रकार होती. तिला आपल्या भाच्याची चित्रकलेतील गती लक्षात आली आणि तिने त्याला सतत उत्तेजन दिले. तिने छोट्या क्लॉडची चित्रे ल हाव्रमध्ये भरलेल्या एका प्रदर्शनात पाठवली. त्याच प्रदर्शनात युजीन बोदँ या निसर्ग चित्रकाराचीही पेंटींग होती. क्लॉदने एवढ्या लहान वयात काढलेली चित्रे पाहून बोदँ खूप प्रभावित झाला. त्याने छोट्या क्लॉदला आपल्या पंखाखाली घेतले.
त्याकाळी निसर्गचित्र काढताना त्या दृश्याचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन रेखाटन करून आणि नंतर फुरसतीने स्टुडियोत जाऊन संपूर्ण चित्र कॅनव्हासवर सावकाश रंगवण्याची पध्दत होती. चित्र काढणाच्या या पध्दतीत हुबेहुबपणावर भर असायचा. तरी त्यात तरी त्यात जिवंतपणा नसे. तो जिवंतपणा आपल्या पेंटींगमध्ये यावा म्हणून युजीन बोदँ प्रत्यक्ष जागीच पेंटींग पूर्ण करीत असे. समुद्रकिना-याचे दृश्य रंगवण्यात त्याचा हातखंडा होता. छोटा क्लॉद मॉने बोदँच्या शैलीने प्रभावित झाला. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी निसर्गदृश्य रंगवणे हेच आपल्या जीवनाचे इप्सित आहे असे त्याने ठरवले. तो म्हणतो ‘अचानक मला सगळे स्पष्ट दिसू लागले. पेंटींग म्हणजे काय याचा मला साक्षात्कार झाला. ह्या (बोदँ) चित्रकाराने आपल्या कलेत ज्या धैर्याने आपला स्वतंत्र मार्ग शोधला त्यामुळे मला कलाकार म्हणून माझा मार्ग सापडायला मदत झाली.’
कलाकारांची राजधानी म्हणून पॅरीस शहराची प्रसिध्दी हळू हळू फ्रान्सच्या बाहेर पसरत चालली होती. सर्व जगातून कलाकारांचा ओघ पॅरीसच्या दिशेने वहात होता. १८५९ मध्ये क्लॉदला त्याच्या वडिलांनी चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी म्हणून पॅरीसमध्ये पाठवले. एकोल द ब्यु आर्ट या प्रख्यात संस्थेत त्याने प्रवेश घ्यावा असे त्याच्या वडिलांचे मत होते. पण क्लॉदने ऍतेलिए स्विसे या खाजगी संस्थेच प्रवेश घेतला. आपल्या इच्छे विरूध्द वागलेले  त्याच्या वडिलांना मुळीच आवडले नाही आणि त्यांनी त्याला पैसे पाठवायचे बंद केले.
ऍतेलिए स्विसेमध्ये मॉनेची ओळख कॅमीय पिसारो, एदुआर्द मॅने आणि गुस्ताव्ह कुर्बे या चित्रकारांशी झाली. मोंमार्त्र मधील ब्रेसेरी द मर्तीर या कॅफेत पॉल सेझाँ, दगा, रेन्वा हे सगळे नव्या युगाचे पुरोगामी अव्हाँ-गार्द चित्रकार तासंतास गप्पा मारत बसत. त्यावेळच्या प्रचलीत पध्दतीमध्ये ऑइलपेंटींग करण्यासाठी आधी प्राथमिक संदर्भ रेखाटने केली जात. नंतर सावकाश स्टुडियोत इझलवर कॅनव्हास लावला जाई. त्यावर अगोदर केलेल्या संदर्भ रेखाटनांच्या आधारे चारकोल नाहीतर पेस्टलने रेखाटन केले जाई. त्यावर विचारपूर्वक रंगलेपन केले जाई. रंगवताना रंगांचे पातळ थर एकमेकांवर दिले जात. एकावर एक थर देताना अगोदर दिलेला थर सुकलेला असण्याची आवश्यकता असे. त्यामुळे खूप कारागीरी करता येत असे पण या सगळ्या प्रक्रियेला वेळही भरपूर लागे. नव्या चित्रकारांना हे सगळे पसंत नव्हते. निसर्ग क्षणोक्षणी बदलत असतो. आत्ता आपण बघत आहो ते दृश्य दुस-या क्षणी बदलते. छाया प्रकाशाचा खेळ सतत चालू असतो. मॉने तर म्हणायचा की निसर्गातील प्रतेक गोष्ट सतत बदलत असते. त्यामुळे आपल्या नजरेसमोरचे दृश्य कॅनव्हासवर हुबेहुब उतरवता येणे निव्वळ अशक्य असते. आपण जे चित्र काढतो ती फक्त त्या दृश्याची मन:पटलावर उमटलेली प्रतिमा असते. ती विसरून जाण्याच्या आत आपल्याला ती कॅनव्हासवर उतरवता आली पाहिजे. त्यासाठी चित्रकाराने चित्रविषयाच्या समिप, त्या दृश्याच्यासमोर जाऊन  तो निसटता क्षण पकडण्यासाठी अतिशय वेगाने काम केले पाहिजे. या विचारांनी त्यावेळचे तरूण चित्रकार भारलेले होते.
आता आपल्याला असा प्रश्न पडेल की यापूर्वी हा विचार कोणाला कसा सुचला नाही. हा विचार सुचण्यासाठी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेले दोन तांत्रिक शोध कारणीभूत झाले. पहिला शोध फोटाग्राफीचा आणि दुसरा ट्युब मधील तैलरंगांचा. फोटाग्राफीच्या शोधामुळे कॅमेरा नामक यंत्राच्या सहाय्याने हुबेहुब चित्र काढता येऊ लागले. चित्रकाराने जर हुबेहुबपणावर भर द्यायचा तर कॅमेरा त्याच्यापेक्षा कमी वेळात जास्त हुबेहुब चित्र काढू शकतो. या परीस्थितीत चित्रकाराचे प्रयोजन काय असा प्रश्न त्यावेळच्या चित्रकारांसमोर उभा राहीला. यातूनच चित्रकाराने कॅमेऱ्यापेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे हा विचार पुढे आला. चित्रकाराने हुबेहुब चित्रणापेक्षा आपल्या मन:पटलावर उमटलेल्या प्रतिमेशी प्रामाणिक रहायला हवे. पण यासाठी स्टुडियोतील वेळखाऊ तंत्र उपयोगी पडणार नव्हते. स्टुडियो पेंटींगचे वेळखाऊ तंत्र बदलण्यास त्याच सुमारास झालेली दुसरी एक तांत्रिक सुधारणा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत झाली. तैलरंग तेव्हा नुकतेच ट्युबमध्ये उपलब्ध होऊ लागले होते. रंग ट्युबमध्ये येण्याच्यापूर्वी चित्रकारांना रंगांचे चूर्ण बाजारात विकत घेऊन स्टुडियोत आणल्यावर ते खलबत्यात कुटून त्यात ऑईल आणि टर्पेंटाईन वगैरे मिसळून आपापले रंग तयार करावे लागत. हे रंग तयार करण्याचे काम खूप मेहनतीचे आणि वेळखाऊ असल्याने प्रत्यक्ष जागी जाऊन चित्र रंगवणे शक्य होत नसे. ट्युबमध्ये रंग उपलब्ध झाल्यामुळे तैलरंगाचे काम स्टुडियोच्या बाहेर प्रत्यक्ष जागी करता येण्याचा पर्याय शक्य स्वरूपात आला.
कॅनव्हास स्टुडियोच्या बाहेर आल्याने नुसता तंत्रातच बदल झाला असे नसून त्यामुळे चित्रविषय सुध्दा बदलत गेले. अकॅडेमीक शैलीमध्ये काम करणारे चित्रकार सहसा बायबल, ग्रीक पुराणे, राजे रजवाडे, चर्च, सुंदर निसर्गदृष्य यांच्या पलीकडे सहसा जात नसत. त्यांच्या दृष्टीने पॅरीस शहर, तेथील सामान्य नागरीकांचे दैनंदीन जीवन हे चित्राचे विषयच होऊ शकत नव्हते. या नव्या मनुच्या चित्रकारांनी त्यांच्या भोवतालच्या पॅरीस शहराचे, तेथील सामान्य नागरीकांचे, त्यांच्या सुख दु:खाचे चित्रण आपल्या पेंटींगमधून करायला सुरवात केली. कॅफेतील गप्पा, नृत्यगृहातील वातावरण, वनभोजन, गावाबाहेर काढलेल्या सहली असे विषय त्यांनी हाताळायला सुरवात केली. भांडवलशाही, औद्योगीक क्रांती आणि त्रिखंडात पसरलेले साम्राज्य यांची फळे समाज नुकतीच चाखू लागला होता. चर्चचा प्रभाव कमी झाला होता. लोकांच्यापाशी फुरसतीचा वेळ आणि समृध्दीमुळे आलेला पैसा होता. नव्या युगाच्या स्वागताला सर्व समाज उत्सुक होता. फ्रान्स आणि युरोपच्या इतिहासातील हे सुवर्णयुग होते. या काळाचे प्रतिबिंब नव्या मनुच्या चित्रकारांनी काढलेल्या पेंटींगमध्ये पडलेले दिसून येते.
(छत्री घेतलेली स्त्री आणि नदीकाठी मेजवानी)
त्याच वेळी तिस-या नेपोलीयनच्या कारकीर्दीत पॅरीसचे रूप पालटायला सुरवात झाली होती. आर्क द ट्रायम्फ पासून सूरू होणारे सर्व महत्वाचे रस्ते रूंद करण्याचा कार्यक्रम धडाक्याने हाती घेतला होता. या नूतनीकरण होत असलेल्या पॅरीसचे सौंदर्य या चित्रकारांनी आपल्या कॅनव्हासवर साकारले. मॉने, रेन्वा अणि पिसारोच्या पेंटींगमधले पॅरीस आजही जवळपास तसेच आपल्याला बघायला मिळते. मॉने जेव्हा पॅरीसमध्ये आला तेव्हा त्याच्या भोवती समविचारी कलाकार गोळा झाले. ते सर्व चित्रकार कॅफे मध्ये जमत. तेथे त्यांच्या गप्पांचा अड्डा जमे. हमरी तुमरीवर येऊन वाद होत. कित्येक वेळा हातघाईचीही वेळ येई. पण यातूनच नव्या विचारांची देवाण घेवाण होई. पॅरीसच्या जीवनात एकूणच या कॅफेंचे खूप महत्व आहे. कॅफे म्हणजे नुसती खाण्यापिण्याची जागा नसून गप्पा, चर्चा, वादविवाद, मनोरंजन, वाचन, लेखन करण्याचीसुध्दा जागा असते हे पॅरीसमध्ये समजून येते.
फ्रान्समधील कला अकादमी सलाँ नावाचे एक वार्षिक प्रदर्शन भरवित असे. या वार्षिक सलाँमध्ये पाठवण्यसाठी सर्व चित्रकार खूप मेहेनत घेऊन आपल्या कलाकृती तयार करीत. त्या कलाकृतींमधून फक्त काही चित्रांची निवड करून सलाँ नावाचे वार्षिक प्रदर्शन भरविले जाई. मॉनेच्या समविचारी अव्हाँ-गार्द चित्रकारांची पेंटींग सलाँमध्ये सातत्याने नाकरली जात. यावर उपाय म्हणून त्यांनी आपले स्वतंत्र प्रदर्शन भरवायचे ठरविले. त्यासाठी फोटेग्राफर नादर या त्यांच्या मित्राने आपला फोटो स्टुडियो मोठ्या खुशीने देऊ केला. अशा रीतीने त्यांचे स्वतंत्र प्रदर्शन १८७४ मध्ये भरले. या प्रदर्शनासाठी मॉनेने त्याचे ‘इंप्रेशन : सनराईज’ हे सुर्योदयाचे निसर्गचित्र पाठवले होते. ल हाव्र बंदराच्या पार्श्वभूमीवरील सुर्योदयाचा देखावा यात रंगवलेला होता. सुर्योदय झाला आहे पण वातावरणातील धुके अजून पूर्ण वितळलेले नाही अशा धूसर वातावराणाचे करड्या आणि नारींगी रंगात झपाट्याने केलेले हे तैलरंगातील पेंटींग होते. त्याकाळातील स्टुडियोत सावकाश पूर्ण केलेल्या पेंटींगच्या तुलनेत हे अपूर्ण, अर्धवट सोडलेले पेंटींग वाटू शकेल. त्या प्रदर्शनातील सर्वच पेंटींग या शैलीत केलेली होती. पारंपारीक शैलीतील कारागीरी केलेली पेंटींग पहाण्याची सवय झालेल्या प्रेक्षकांना ते प्रदर्शन आवडणे शक्यच नव्हते. त्या प्रदर्शनावर टीकेची झोड उठली. लुई लेरॉ नावाच्या कला समीक्षकाने तर त्या प्रदर्शनावर उपहासात्मक असा एक लेख लिहीला. त्या लेखाचे शीर्षक होते ‘एक्सपोझिशन द इंप्रेशनीस्टस्’. मॉनेच्या ‘इंप्रेशन : सनराईज’ हे पेंटींग पाहून दोन प्रेक्षक दचकून पळून जात आहेत असे एक व्यंगचित्र या लेखा सोबत छापले होते. पेंटींगची टवाळी करण्यासाठी लिहीलेल्या या लेखामुळे त्यांच्या शैलीला इंप्रेशनीझम असे जे नाव मिळाले ते पुढे त्यांना कायमचे चिकटले. पण या टवाळीने नाउमेद न होता त्यांनी या नव्या शैलीत काम करणे निष्ठेने पुढे चालू ठेवले. कॅफे मधल्या तासंतास चालणाऱ्या चर्चेत त्यांना त्यांचे समविचारी चित्रकारच नव्हे तर इतर क्षेत्रातूनसुध्दा  समर्थक मिळाले. त्यातून इंप्रेशनीझम या नव्या शैलीचा, संप्रदायाचा जन्म झाला. या कलाप्रकाराचा उदय आणि विकास पूर्णपणे या कॅफेमध्ये चालणा-या चर्चांमधून झाला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
(इम्प्रेशन - सनराईज)
त्याकाळातील मॉने, रेन्वा, पिसारो, एदोआर्द मॅने, कुर्बे, सिस्ले, सेझाँ. सरा, दगा हे सगळे चित्रकार इंप्रेशनीस्ट म्हणून ओळखले जातात. मॉने हा इंप्रेशनीस्टांचा एक प्रातिधीनीक चित्रकार म्हणता येईल. त्याने इंप्रेशनीझमच्या ध्येयांचा आयुष्यभर मोठ्या निष्ठेने पाठपुरावा केला. बाह्य चित्रण ही जी इंप्रेशनीस्टांची एक प्रमुख पध्दत होती ती त्याने आयुष्यभर पाळली. बाह्य चित्रण इतरांनीही केले होते. पण कडाक्याची थंडी, बर्फाचा वर्षाव, धुवांधार पाऊस, वादळी वारे हवामान कसेही असो मॉनेने उघड्यावर कॅनव्हास लावून बसण्याचा कधीही कंटाळा केला नाही. त्याने सीन नदीचे चित्रण केव्हाही करता यावे म्हणून एका होडीत तरंगता स्टुडियो बांधून घेतला होता. मॉने या तरंगत्या स्टुडियोत बसून पेंटींग करत आहे असे एक पेंटींग त्याचा मित्र एदुआर्द मॅनेने केले आहे. मॉनेने जेवढे प्रचंड आकाराचे कॅनव्हास हाताळले तेवढे इंप्रेशनीस्ट शैलीत पूर्वी कोणीही हाताळलेले नव्हते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की स्टुडियो बाहेर मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर काम करताना अनेक अडचणी येतात. मॉनेने ‘बगीच्यातील स्त्रिया’ हे आठ फुटी पेंटींग करताना कॅनव्हास हवा तसा खाली वर करता यावा म्हणून खंदक खणून त्यात कप्पीच्या सहाय्याने इझल टांगला होता. कित्येक वेळा वातावरणातील छायाप्रकाश, रंग एवढ्या झपाट्याने बदलत की हातात घेतलेला कॅनव्हास तसाच अर्धवट सोडून द्यावा लागे. त्याची मुलगी असे अर्धवट रंगवलेले कॅनव्हास ढकलगाडीत घेऊन त्याच्या मागे मागे फिरे. जर वातावरणात तसाच प्रकाश, तसेच रंग पुन्हा आले तर त्याला अनुरूप असा अर्धवट राहिलेला कॅनव्हास ढकलगाडीतून निवडून त्यावर तो पुन्हा काम सुरू करी.  इंप्रेशनीझम या एकाच ध्यासाने प्रेरीत होऊन मॉने आयुष्यभर कार्यरत राहिला.
(फ्लोटींग स्टुडियो)
मॉनेला बागबगीच्यांची खूप आवड होती. तो जेथे जेथे राहीला तेथे त्याने बाग जोपासली. १८८३ मध्ये त्याने पॅरीसपासून चाळीस मैलांवर जिवर्नी येथे डोंगर उतारावरची दोन एकर जमीन विकत घेऊन त्यावर एक टुमदार घर आणि स्टुडियो बांधला. घरा भोवती खूप मेहनत घेऊन एक बाग तयार केली. ही बाग आज एक पर्यटकांचे आकर्षण झाली आहे. जिवर्नीमध्ये मॉने त्याच्या मृत्युपर्यंत चाळीस वर्षे राहीला. त्याने केलील्या पेंटींगचे मूळ स्रोत, प्रेरणास्थान या बागेत आपल्याला पहायला मिळतात.
(क्लॉद मॉने – पेंटींग करताना)

(जिवर्नीच्या बागेतील तळी - वॉटर लिली)
रस्यालगतच्या फाटकातून आत शिरल्यावर घराकडे जाणाऱ्या पायवाटेच्या दुतर्फा सुर्यफुल, डेझी, इरीस, डेल्फीनीयम, वगैरे फुलांच्या रांगा लावलेल्या आहेत. वाटेवर ठिकठिकाणी कमानी उभारलेल्या आहेत. कमानी आणि बांबूच्या कामट्यांच्या जाळीवर क्लेमॅटीस्, रानगुलाब आणि व्हर्जिनीयाच्या वेली चढवलेल्या आहेत. डाव्या हाताला लाल, पिवळा, गुलाबी रंगांच्या ट्युलीपचे ताटवे आहेत. एका चौरसात जपानी चेरीची झाडे आहेत. आपल्या बागेत लावायला मॉनेने युरोप, आफ्रिका, आशिया अशा त्रिखंडातून विवीध फुलझाडे, वनस्पती मागवल्या होत्या. रस्याच्या दुसऱ्या बाजूला मॉनेने आपली सुप्रसिध्द वॉटर लिलींची बाग निर्माण केली. या बागेतून एक झरा वाहातो. या झऱ्यावर एक लहानसा जपानी पध्दतीचा लाकडी पूल बांधलेला आहे. मध्यभागी एक तळे आहे. या तळ्यात शेकडो जातीच्या लिली लावलेल्या आहेत. इंप्रेशनीस्ट शैलीत स्टुडियोच्या बाहेर उघड्यावर काम करताना काही मर्यादा पडतात. मॉनेने आपल्या स्टुडियोच्या सभोवतीच निसर्ग निर्माण करून त्या मर्यादांवर उपाय शोधला. आपल्या आयुष्यातील शेवटीची वीस वर्षे त्याने या वॉटर लिलींची पेंटींग करण्यात घालवली. त्यातील काही पेंटींग बागेतल्या एका छोट्या म्युझियममध्ये ठेवलेली आहेत. पॅरीसमधील्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या प्रख्यात म्युझियममध्ये मॉनेचे एकतरी वॉटर लिली सापडतेच.
मॉनेच्या सुरवातीच्या पेंटींगमध्ये तळे, काठावरची झाडे, जपानी पूल, पायवाटेच्याकडेला लावलेले फुलांचे ताटवे असे सगळे तपशील असायचे. नंतर त्याने तपशीलां ऐवजी फक्त तळ्याच्या पाण्यात पडलेल्या आकाश आणि ढगांच्या प्रतिबिंबावर लक्ष केंद्रित करायला सुरवात केली. त्याच्या तळ्याकडे बघण्याचा व्ह्यू पॉईंट खूप उंचावरून असल्यामुळे त्याच्या पेंटींगमध्ये पृष्ठभागाचे सपाटीकरण झाले. त्याचा संपूर्ण कॅनव्हासच जणू काही तळ्याचा आरसपानी पृष्ठभाग झाला. वॉटरलिलीचा आकार अस्पष्ट झाला आणि उरला फक्त रंगांच्या प्रतिबिंबाचा खेळ. रंगाच्या छटा आणि पोत यांच्या विवीध शक्यता त्याने आपल्या कॅनव्हासवर अजमावून पहायला सुरवात केली.
 (वॉटर लिली - ऑरेंज्युरी)
पहिल्या महायुध्दाच्या सुरवातीला त्याने प्रचंड मोठ्या आकाराचे कॅनव्हास रंगवायला घेतले. वीस पंचवीस फुटी कॅनव्हासवर काम करण्यासाठी त्याने वॉटरलिलीची शेकडो प्राथमीक रेखाटने केली. या कामाचा आवाका आणि स्वरूप अतिशय प्रचंड होते. वाढते वय, प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यात रेन्वा, रोदँ आणि दगा सारख्या जवळच्या मित्रांचे निधन याने तो शरीराने आणि मनाने खचला. या काळात त्याला त्याचा आर्ट डीलर पॉल ड्युरांड रूएल आणि मित्र जॉर्ज क्लेमांस्क्यू यांनी सतत उत्तेजन दिले. ड्युरांड रूएलने इंप्रेशनीस्टांना अगदी सुरवाती पासून पाठींबा दिला होता. इतर आर्ट डीलर इंप्रेशनीस्टांचे कॅनव्हास आपल्या गॅलेरीत ठेवायला सुध्दा नकार देत होते त्या काळी ड्युरांड रूएलने त्यांचे कॅनव्हास खरेदी करून त्यांना मदत केली होती. क्लेमांस्क्यू हा फ्रान्समधील एक फार मोठा राजकारण धुरंधर होता. त्याने मॉनेला तो करत असलेले वॉटर लिलीचे कॅनव्हास राष्ट्राला अर्पण करायला सुचविले. मॉनेचे हे वॉटर लिलीचे काम जिवर्नीमध्ये दहा वर्षे चालू होते या वरून त्याचा आवाका लक्षात यावा.
 (वॉटर लिली - ऑरेंज्युरी)
हे काम चालू असताना त्याला मोतीबिंदूचा त्रास होऊ लागला. आपण काय बघतोय व कॅनव्हासवर काय उतरवतोय तेच त्याला कळेनासे झाले. कित्येक वेळा तो फक्त इतक्या वर्षांचा अनुभव आणि अंत:प्रेरणेवर विसंबून अंदाजानेच काम करत असे. २००३ मध्ये एका नेत्रविकार तज्ञाने मॉनेला मोतीबिंदू झाल्यावर कसे दिसत असेल याचा काँप्युटर सिम्युलेशन या तंत्राच्या सहाय्याने अभ्यास केला. त्याने त्या अभ्यासातून मॉनेच्या उत्तरायुष्यातील कामात त्याच्या ब्रशचे फटकारे कसे जोरकस झाले, तो प्रामुख्याने निळा, नारींगी आणि तपकीरी रंगांचा वापर का करू लागला, त्याच्या पेंटींगमधील तपशील कसे गेले, वस्तूंचे आकार एकमेकात कसे विलीन होऊ लागले वगैरे बदलांचे विश्लेषण केले होते. पण मला ते फारसे पटत नाही. कारण अशा अभ्यासातून फार तर मॉनेला त्याच्या बाह्य चक्षूंनी काय दिसत होते याचा उलगडा करता येईल पण त्याच्या अंत:चक्षूंना काय दिसत होते याचा उलगडा करणे अशक्य आहे.
शेवटी १९२३ मध्ये त्याच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याची दृष्टी सुधारली. मला आता सगळे स्पष्ट दिसू लागले आहे असे त्याने जाहिर केले आणि तो पुन्हा झपाट्याने कामाला लागला. १९२६ पर्यंत त्याने वॉटर लिलीचे बरेच प्रचंड कॅनव्हास पूर्ण केले. डिसेंबर १९२६ मध्ये वयाच्या ८६व्या वर्षी क्लॉड मॉनेचे निधन झाले. क्लेमांस्क्यूच्या सांगण्याप्रमाणे मॉनेने वॉटर लिलीची पेंटींग राष्ट्राला अर्पण केली होती. ही पेंटींग लुव्र म्युझियमच्या परीसरातील ऑरेंजेरी या इमारतीत कायम स्वरूपी प्रदर्शनात मांडून ठेवली आहेत. मॉनेच्या निधनानंतर सहा महिन्यांनी मे १९२७ मध्ये त्याचा उद्-घाटन समारंभ झाला. मॉनेच्या पन्नास वर्षांच्या प्रदिर्घ कारकीर्दीतील सर्वात्कृष्ट काम आज आपल्याला ऑरेंजेरीमध्ये बघायला मिळते. ऑरेंजेरीमध्ये इतरही इंप्रेशनीस्ट चित्रकारांची पेंटींग आहेत पण गर्दी होते ती मॉनेच्या वॉटर लिलींसाठी. दोन मोठ्या लंबगोलाकृती आकाराच्या हॉल मध्ये मॉनेची वॉटर लिलीची चाळीस फुट लांब भव्य पॅनेल लावलेली आहेत. त्या हॉल मध्ये शिरल्यावर तोंडाचा आ वासतो. मॉनेच्या पेंटींगच्या भव्यतेची, आकार आणि रंग एकमेकात विलीन करताना त्याने निळ्या रंगाशी केलेला विस्मयकारी खेळ पाहून बघणारा थक्क होतो. आर्ट आणि पेंटींगवरील पुस्तकातील वॉटर लिलीचे कितीही प्रिंट पाहिले असले तरी ऑरेंजजेरीतील पॅनेल प्रत्यक्ष बघताना येणा-या अनुभवाची त्या प्रिंटवरून तीळमात्रही कल्पना येत नाही. लंबगोलाकर हॉलमध्ये वॉटर लिलीची भव्य पॅनेल बघताना जी प्रचीती येते ती केवळ अवर्णनीय अशीच म्हणावी लागेल. हॉफमन हा संगीत समीक्षक बीटहोवेनच्या सी मेजर मधल्या पाचव्या सिंफनीचे परीक्षण करताना म्हणाला होता ‘रात्रीच्या काळोखातून प्रकटलेल्या तेजस्वी प्रभेच्या प्रकाशातील मागे पुढे नाचणा-या राक्षसी सावल्यांनी आपण क्षणभर भयभीत होतो पण त्या तेजाने आपल्यातील सर्व हीण जळून जाते. उरते फक्त एक हळवी सुखद वेदना. त्या सर्वांग व्यापून टाकणाऱ्या वेदनेच्या गर्भात जाणवतात वैश्वीक प्रेमाची स्पंदने. त्या सुरांच्या आर्ततेने आपले हृदय भरून येते. तो विलक्षण आनंदाचा क्षण अनुभवत असताना आपण स्तिमीत होतो.’ हॉफमनच्या शब्दात वॉटर लिलीचे वर्णन करायचे झाले तर ते सिंफनी इन ब्ल्यु असेच करावे लागेल.
 (वॉटर लिली - ऑरेंज्युरी)
 पूर्वी अमूर्त चित्रकला मला फारशी भावत नसे. उत्तर आधुनीक कालखंडात संगीत आणि चित्रकलेतील सीमारेषा पुसण्याचे जे प्रयोग झाले ते मला अनाकलनीय वाटायचे. पण वॉटर लिली बघीतल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर असे म्हणू या, पूर्वी अनाकलनीय वाटणा-या गोष्टींकडे बघण्याची एक नवी दृष्टी माझ्याकडे आली. युरोपच्या सहलीची मी एवढी काळजी पूर्वक आखणी केली होती. पण फारशी ओळख नसलेल्या एका व्यक्तीने अल्पपरीचयात दिलेला सल्ला न एकता ऑरेंजेरीला आणि नंतर पाँपिदू सेंटरला मी गेलो नसतो तर आयुष्यातील एका मोठ्या आनंदाला मुकलो असतो हे निश्चीत. हा आनंद सतरा दिवसात अठरा देश बघण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा होता. माझ्यापुरता तरी.


(क्लॉद मॉने – फोटो – नाडर)
मूळ प्रसिद्धी – हितगूज – ई दिवाळी २०११ अंक / सुधारीत – नोव्हेंबर २०१३
मूळ  पेंटींग - तैलरंग कॅनव्हास – क्लॉड मॉने / सौजन्य - विकीपिडीया
टेलिफोन – 91- 22-26116995 / 91-9619016385 / इमेल – jayant.gune@gmail.com

3 comments:

  1. खूप समाधान वाटलं वाचून. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. चित्रकलेचा गंध नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला इंप्रेशनिझमचे सप्रयोग आणि सुलभ प्राथमिक धडे मिळाल्यासारखे वाटले. खूप छान.

    ReplyDelete
  3. if possible please read मुलाँ रूज on bookganga.com. or get it from book stall. you may like it.

    ReplyDelete