Wednesday, July 24, 2013

Nevermore Nevermore

नेव्हरमोअर नेव्हरमोअर
लंडनमधील ग्रीनीच पार्कमधील एका टेकडीवर रॉयल ऑब्झर्वेटरीची सुप्रसिद्ध इमारत आहे. ज्या संदर्भात वेळ दर्शविली जाते ती ग्रीनीच मेरीडियन टाईमलाईन (GMT) येथून जाते. हे पार्क खूप मोठं आहे. मी रहात होतो ते घर पार्कच्या अगदी जवळ होतं. एके दिवशी मी या चौफेर पसरलेल्या विस्तीर्ण ग्रीनीच पार्कचा धांडोळा घ्यायचं ठरवलंपाच दहा मिनीटांचा चढ चढून मेझ हिल फाटकातून आत शिरलो. आत गर्द झाडी आणि चौफेर पसरलेला हिरवागार गालिचा. मेझ हिल भाग एका बाजूला येत असल्याने त्या बाजूने वर्दळ कमी होती. मी टेकडी चढून मेरीडीयन शून्य रेषेवर गेलो. तेथून एका बाजूला रॉयल ऑब्झर्व्हेटरी तर दुस-या बाजूने कॅनरी व्हार्फचा (लंडनचे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) विहंगम देखावा दिसत होता. एका बाजूला घनदाट जंगल तर दुस-या बाजूला क्षितीजावर गगनचुंबी इमारतींची गर्दी. वेळ संध्याकाळची होती. हवेत सुखद गारवा होता. सूर्य पश्चिमेला झुकला असला तरी उन्हाळ्यातील मोठे दिवस असल्याने मावळतीचे किरण रेंगाळत होते. थोडावेळ त्या रम्य दृष्याचा आस्वाद घेऊन परत फिरायचे ठरवले. परत जाताना वेगळी वाट शोधण्याच्या भरात थोडा भरकटलो. पार्कचा तो भाग अगदी एकाकी होता. जवळच पुरातन काळतल्या रोमन मंदिराचे भग्नावशेष होते. सभोवतालच्या दाट झाडीमुळे अंधारून आलं होतं. फांद्या कापल्यातरी चौफेर वाढणारा एक महाकाय वृक्ष राणा संगसारखा मैदानात पाय रोऊन उभा होता. त्या वृक्षाचे ते अंगावर येणारे आक्राळविक्राळ रूप नीट पहाण्यासाठी मी समोरच्या एका खडकावर जाऊन टेकलो. तेवढ्यात त्या विशाल वृक्षाच्या ढोलीतून एक पक्षी बाहेर आला आणि आपले काळेभोर पंख पसरून त्याने आकाशात एक झोका घेतला आणि सरळ माझ्या समोर येऊन बसला. मी त्या पक्ष्याकडे नीट पाहिलं तर तो रॅव्हेन – डोमकावळा होता. त्याचंही लक्ष माझ्याकडे गेलं. बघता बघता माझं मन भरकटू लागलं. समोर बसलेल्या त्या डोमकावळ्यावरून मला एडगर एलन पो या जगप्रसिद्ध लेखकाच्या रॅव्हेन या कवितेची आठवण झाली.
Once upon a midnight dreary, while I pondered, weak and weary,
Over many a quaint and curious volume of forgotten lore —
While I nodded, nearly napping, suddenly there came a tapping,
As of some one gently rapping, rapping at my chamber door.
"Tis some visiter," I muttered, "tapping at my chamber door —
Only this and nothing more."

…………………………………………………………………
…………………………………………………………………
…………………………………………………………………
…………………………………………………………………
………………………………………

And the raven, never flitting, still is sitting, still is sitting
On the pallid bust of Pallas just above my chamber door;
And his eyes have all the seeming of a demon that is dreaming,
And the lamp-light o’er him streaming throws his shadow on the floor;
And my soul from out that shadow that lies floating on the floor
Shall be lifted — nevermore!
या कवितेच्या निवेदकाच्या प्रियतमेचा अकाली मृत्यु झाला आहे. एके रात्री तो शोकाकूल मनस्थितीत आपल्या अभ्यासिकेत बसला असता कोणीतरी त्याचा दरवाजा ठोठावल्याचं त्याला ऐकू येतं. बघतो तर रॅव्हेन - एक डोमकावळा त्याच्या दाराच्या चौकटीवर बसून ओरडत असतो. तो गमतीने त्या कावळ्याला त्याचं नाव विचारतो. कावळा नेव्हरमोअर असं ओरडून सांगतो. त्याला बोलता येतंय याचं त्याला आश्चर्य वाटतं आणि तो त्याच्याशी गप्पा मारू लागतो. बोलता बोलता तो त्याला आपली दु:खद कहाणी सांगतो. कावळा हा लौकिक आणि पारलौकिक जगातील दुवा असतो असा समज आपल्याप्रमाणे जगातील ब-याच संस्कृतींमध्ये आहे. कवी आपल्या स्वर्गीय प्रियतमेला देण्यासाठी म्हणून त्याच्याकडे एक निरोप देतो. संपूर्ण कवितेत शोकाकूल कवी वारंवार आर्जवे करत असला तरी उत्तरादाखल रॅव्हेन मात्र फक्त एकच शब्द वारंवार उच्चारत असतो. नेव्हरमोअर नेव्हरमोअर. तो खरोखरच माणसासारखे बोलत असतो की त्याची कावकाव कविला नेव्हरमोअर अशी ऐकू येत असते. कवीने या बाबतीत संदिग्धता ठेवली होती. शेवटी तो कावळा पलास या देवतेच्या अर्धपुतळ्यावर जाऊन बसतो. त्याची सावली खाली फरशीवर पडलेली असते. कवितेतील निवेदकाला आपला आत्मा त्या सावलीच्या सापळ्यात अडकला आहे असा भास होतो. ऑक्टोमीटर या वृत्तात बांधलेल्या कवितेतील लय, तिच्या रचनेतील अंतर्गत नाद सौंदर्य आणि त्यातील गूढ आशय विलक्षण आहे. सुख-दु:ख, जागृती- स्वप्नावस्था, भ्रमिष्टपणा, मृत्यु आणि पारलौकिक जग यांच्या सीमारेषेवर घुटमळणा-या कविते लपलेल्या अव्यक्त आणि गर्भित अर्थांच्या शक्यता शोधता शोधता मन विषण्ण होऊन गेले.
आदल्या दिवशीच मी सॉमरसेट हाऊसमध्ये पॉल गोगँचं एक प्रदर्शन पाहिलं होतं. त्यात गोगँचं नेव्हरमोअर नावाचं एक न्युड पेंटींग होतं. यात गोगँने पलंगावर पहुडलेल्या एका ताहिती आदिवासी तरूणीचं पूर्ण लांबीचं चित्रण केलं आहे. रिक्लाअनींग न्युडची पोज अभिजात वाटेल अशी दिलेली आहे, पण चित्रण मात्र पाश्चात्य पारंपारिक पद्धतीत करतात तसं उत्तेजक न करता थोडंसं ढोबळ वाटेल असं केलंलं. पार्श्वभूमीला दोन माणसं एकमेकांशी कुजबुज करत बोलत आहेत. कोण आहेत ती माणसं?  मित्र, शेजारी, नातेवाईक, प्रियकर, नवरा किंवा भडवा. वरच्या उजव्या कोप-यात अघटिताचं सूचन करणारा कावळा. ती माणसं, कावळा यांचं चित्रण सपाट पध्दतीने केलंय. वाटलं तर खरं, वाटलं तर भिंतीवर टांगलेलं चित्रांचं पॅनेल. वास्तव आणि अवास्तव यातील भेद गोगँने मुद्दामच अस्पष्ट ठेवला आहे. गोगँला वस्तूंच्या दृष्य स्वरूपात रस नव्हता. त्याने म्हटलंच होतं की मी बघण्यासाठी डोळे बंद करतो. वस्तूच्या दृष्य स्वरूपाचं चित्रण करावं की अंतर्गत वास्तवाचं यावरून तर त्याचा आणि व्हिन्सेंट न्हॅन गॉगचा हातघाईवर येण्यापर्यंत वाद झाला होता. चित्रातील तरूणी डोळे किलेकिले करून कोणाकडे तरी बघतेय, पण प्रेक्षकाकडे नव्हे. ती पक्ष्याकडे किंवा त्या दोन माणसांकडे बघत आहे. ती दोन माणसं, कावळ्यासारखा दिसणारा पक्षी यांचं प्रत्यक्ष चित्रण नसून ते त्यांच्या चित्रांच्या पॅनेलचं चित्रही असेल, किंवा त्या तिच्या मनातील स्वप्न-प्रतिमा असण्याचीही एक शक्यता असेल. चित्राची एकूण रचनाही सपाट, खोलीचा अभाव असलेली, परस्पेक्टिव्ह रहित, संदिग्धतेत भर टाकणारी अशी आहे. कुजबुजणारी दोन माणसं, अपशकूनी कावळा या प्रतिमाचित्रांमुळे चित्रातील वातावरणाला गुढतेची डूब मिळते. त्यात वरच्या उजव्या कोप-यात लिहीलेल्या नेव्हरमोअर या शब्दामुळे पोच्या रॅव्हेन या कवितेतील गूढ वातावरणचा संदर्भ थेट आपल्या न्युड पेंटींगला आणून भिडवण्यात चित्रकार यशस्वी होतो. माझ्यासमोर बसलेल्या डोमकावळ्याकडे बघता बघता मला पॉल गोगँच्या आपण कुठून आलो? आपण कोण आहोत? आपण कुठे जात आहोत? ’ या सुप्रसिद्ध पेंटींगची आठवण झाली. १२.५ X ४.५ फूट आकाराचे हे तैलरंगातील भव्य पेंटींग मी आर्ट गॅलरी ऑफ शिकागोमध्ये पाहिले होते. हे पेंटींग करायला सुरवात केल्यानंतर त्याने आपण आत्महत्या करणार अशी शपथ घेतली होती. हे पेंटींग उजवीकडून डावीकडे असे पहावे असं त्याने त्या पेंटींगवरच त्याच्या शीर्षकाच्याखाली लिहून ठेवलं आहे. शीर्षकात उपस्थित केलेल्या तीन प्रश्नांच्या अनुषंगाने या चित्रातील व्यक्तिरेखांचे चित्रण तीन भागात केलेलं आहे. एका मुलाला घेऊन बसलेल्या तीन स्त्रिया जीवनाचा आरंभ दर्शवतात. मधल्या भागातील व्यक्तिरेखा म्हणजे यौवन आणि जीवन संघर्ष तर शेवटच्या भागात चित्रकाराच्या म्हणण्याप्रमाणे मृत्युला सामोरं जाताना आपल्याच विचारात गुंतलेल्या वृद्ध स्त्रीचं चित्रण केलेलं आहे. तसेच तिच्या पायाशी बसलेला विचीत्र पांढरा पक्षी शब्दांची निरर्थकता दाखवतो तर पाठीमागे असलेल्या निळ्या मुर्तीला चित्रकार द बियाँडअसं म्हणतो. गोगँ त्याच्या या पेंटींगबद्दल बोलायचा हा कॅनव्हास माझ्या पूर्वीच्या सर्व कलाकृतींच्या तुलनेत खूप महान असेल. एवढंच नव्हे तर या पुढे माझ्या हातून कोणतेही अधिक मोठे काम होणार नाही. हा कॅनव्हास हातावेगळा केल्यानंतर गोगँची आपण यानंतर आयुष्यात अयशस्वीच होऊ याची एवढी खात्री झाली होती की त्याने घोषीत केल्याप्रमाणे केलेला आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा अयशस्वीच झाला.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर आलेली भांडवलशाही स्थिरावली होती. मध्यम वर्गाचा उगम आणि आर्थिक सुबत्तेमुळे उंचावलेलं एकूण समाजजीमान यामुळे सांस्कृतीक आणि कलाजगतात नव्या प्रवाहांची चर्चा होत होती. त्याचवेळी वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे आलेल्या एलिअनेशनमळे संवेदनाशील लोकांना एक प्रकारचा उबग आला होता. अशा कालखंडात निसर्गाकडे चला असा एक प्रवाह इंटेलेक्च्युअल्स आणि कलावंतांमध्ये आला होता. त्यातून शहरीकरण आणि एकूण युरोपियन संस्कृतीपासून कोसो मैल दुर असलेल्या पॉलिनशियन बेटांवरील जीवनाबद्दल आकर्षण वाढू लागले होते. त्याचे प्रतिबिंब पॉल गोगँच्या अकृत्रीम, अनागरी जीवनशैली दाखवणा-या पेंटींगमध्ये पडले होते. पण आता एकवीसाव्या शतकातील बदलत्या आणि गुंतागुंतीच्या युगात पॉल गोगँची चित्रकला कितपत समर्पक वाटेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन एक वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये घेतलेल्या एका जनमत चाचणीत लोकांनी नेव्हरमोअरची इंग्लंडमधील सर्वात रोमँटीक पेंटींग म्हणून निवड केली. कदाचित यातच गोगँच्या सर्वकालीन लोकप्रियतेचे रहस्य दडलेलं असेल.
चित्र नुसतं बघून चालत नाही त्याचा अनुभव घ्यावा लागतो. गोगँ म्हणतो तसा डोळे बंद करून. चित्रात काय दाखवलंय यापेक्षा त्यात काय सुचवलंय ते शोधावं लागतं. ह्या चित्राचा आस्वाद घेण्यासाठी रोजच्या कोरड्या वास्तवाशी संबंध तोडून आपल्याला अर्धजागृत स्वप्नसृष्टीत शिरावं लागतं. माझीही तंद्री लागली होती. इतक्यात कावळ्यांचा कलकलाट कानी आला आणि लागलेली तंद्री मोडली. डोळे उघडून समोर पाहिलं. चार पाच कावळे कशावर तरी तुटून पडले होते. त्यातील एक डोमकावळा, कदाचित मगासचाच असेल, मान वळवून माझ्याकडे पहात होता. त्याला काही सांगायचं तर नसावं. तो मला काही तरी खुणावतोय या कल्पनेनेच मी दचकलो. माझ्या कानात कर्कश आवाज आला. नेव्हरमोअर नेव्हरमोअर. आपल्या संस्कृतीतील कावळ्याचा आणि परलोकाचा संबंध आठवून संध्याकाळच्या कातरवेळी अंगावर शहारे आले. तेवढ्यात त्या नीरव शांततेचा भंग करणारा घंटानाद ऐकू आला. दूरवर कुठेतरी चर्चची घंटा वाजत असावी. मी भानावर आलो. अंधार पडायच्या आतच वाट शोधायला हवी होती. एका खांबावर पार्कचा नकाशा लावलेला होता. त्यावरून आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचंय या तात्कालीक प्रश्नांचं उत्तर शोधू लागलो. समोरून येणा-या निळ्या डोळ्यांच्या एका समवयस्कर इंग्लीश आजोबाने मला कावराबावरा झालेला पाहून काय मदत हवी आहे का ते विचारलं. मी त्याला बाहेर जायचा रस्ता विचारला. त्याने मला त्याच्या बरोबर यायला सांगितलं. त्याच्या बरोबर गप्पा मारता मारता मुख्य फाटक कधी आलं ते कळलंच नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेरच Established 1879 अशी पाटी अभिमानाने मिरवणारा ग्रीनीच तावेर्न नावाचा पब होता. सूर्य मावळला होता. तरूण तरूणीच नव्हे तर सर्व वयाच्या माणसांची गर्दी आसमंतात ओसंडून वाहात होती. पबमध्ये बसायला जागा नव्हती. पण ज्या इंग्लीश म्हाता-याने मला बाहेर यायचा रस्ता दाखवला त्याने मला मोक्याची जागा मिळवून दिली. माझ्या आवडीची काळ्याकुट्ट रंगाची गिनेस स्टाउट मागवली. कित्येक वर्षांपूर्वी चाखलेली किंचीत कडवट चव अजून जिभेवर रेंगाळत होती. आमची पेयं आणि फिश अँड चिप्स आले. तो इंग्लिश म्हातारा निळे डोळे मिचकावून माझ्याकडे बघून हसला आणि त्याने त्याच्या हातातला ग्लास उंचावून चीअर्स केलं. शनिवारची रात्र उजाडत होती.